शिवलीलामृत अध्याय बारावा | Shri Shiv Leelamruta Adhyay 12

शिवलीलामृत अध्याय बारावा | Shri Shiv Leelamruta Adhyay 12

श्रीगणेशाय नमः ॥

ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रवर्ण । ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ पूर्ण ।
स्त्री बाल वृद्ध तरुण । सर्वी शिवकीर्तन करावे ॥ १ ॥

शिवस्मरण नावडे अणुमात्र । तो अंत्यजाहूनि अपवित्र ।
तो लेइला वस्त्र अलंकार । जेवी प्रेत शृंगारिले ॥ २ ॥

तेणे भक्षिले जे अन्न । जैसे पशु भक्षिती यथेष्ट तृण ।
जैसे मयूराअंगी नयन । तैसेच नेत्र तयाचे ॥ ३ ॥

वल्मीकछिद्रवत कर्ण । द्रुमशाखावत हस्त चरण ।
त्याची जननी व्यर्थ जाण । विऊनि वांझ जाहली ॥ ४ ॥

जो शिवभजनावीण । तो जावो समुद्रात बुडोन ।
अथवा भस्म करो वडवाग्न । का सर्प डेखो तयासी ॥ ५ ॥

तरी श्रवणी धरावी आवडी । जैसी पिपीलिका गुळासी न सोडी ।
अर्ध तुटे परी न काढी । मुख तेथूनि सर्वदा ॥ ६ ॥

की चुकला बहुत दिवस सुत । तेवढाच पोटी प्रीतिवंत ।
त्याची शुभवार्ता ऐकता अकस्मात । धावती मातापिता जेवी ॥ ७ ॥

अमृताहूनि वाड । गोष्टी लागती कर्णास गोड ।
तैसे कथाश्रवणी ज्यांचे न पुरे कोड । सर्व टाकोनि जाईजे ॥ ८ ॥

गावास गेला प्राणनाथ । प्रिय पतिव्रता वाट पहात ।
तो पत्र आले अकस्मात धावे श्रवण करावया ॥ ९ ॥

निर्धनासि सापडे धन । की जन्मांधासी आले नयन ।
की तृषेने जाता प्राण । जीवन शीतळ मिळाले ॥ १० ॥

ऐसे ऐकावया कथा पुराण । धावावे सर्व काम टाकून ।
चिंता निद्रा दूर करून । श्रवणी सादर बैसावे ॥ ११ ॥

वक्ता पंडित चातुर्यखाणी । नमावा तो सद्गुरू म्हणोनि ।
की हा शंकरचि मानूनी । धरिजे पूजनी आदर ॥ १२ ॥

सुरभीच्या स्तनांतूनि अवधारा । सुटती जैशा सुधारसधारा ।
तैसा वक्ता वदता शिवचरित्रा । कर्णद्वारे प्राशिजे ॥ १३ ॥

वक्ता श्रेष्ठ मानावा अत्यंत । न पुसावे भलते पाखंड मत ।
नसते कुतर्क घेवोनि चित्त । न शिणवावे सर्वथा ॥ १४ ॥

न कळे तरी पुसावे आदरे । सांगेल ते श्रवण करावे सादरे ।
उगेच छळिता पामरे । तरी ते पिशाचजन्म पावती ॥ १५ ॥

वक्त्यासी छळिती अवधारा । तरी दोष घडे त्या नरा ।
पुराणिकावेगळे नमस्कारा । न करावे सभेत कोणासी ॥ १६ ॥

मध्येच टाकून कथाश्रवण । उगाच गर्ने जाय उठोन ।
तरी तो अल्पायुषी जाण । संसारी आपदा बहु भोगी ॥ १७ ॥

कुटिल खळ पापी धूर्त । तो मुख्य श्रोता न करावा यथार्थ ।
दुग्ध पिता सर्वांगी पुष्ट होत । परी नवज्वरिता विषवत ते ॥ १८ ॥

तैसा श्रवणी बैसोन । कुतर्क घेवोन करी कथाखंडन ।
त्याचे व्यर्थ गेले श्रवण । नरकासी कारण पुढे केले ॥ १९ ॥

कथेत न बोलावे इतर । मन करावे एकाग्र ।
कथेची फलश्रुती साचार । तरीच पावती बैसता ॥ २० ॥

वस्त्रे अलंकार दक्षिणासहित । वक्ता पूजावा प्रीती अत्यंत ।
धन देता कोश बहुत । भरे आपुला निर्धारे ॥ २१ ॥

रत्ने देता बहुत । नेत्र होती प्रकाशवंत ।
अलंकारे प्रतिष्ठा अत्यंत । श्रोतयांची वाढतसे ॥ २२ ॥

एवं पूजिता षोडशोपचार । तेणे तुष्टमान होय उमावर ।
जे जे पदार्थ अर्पावे साचार । त्यांचे कोटिगुणे प्राप्त होती ॥ २३ ॥

त्यासी कदा नाही दरिद्र । शेवटी स्वपदा नेईल भालचंद्र ।
कथेसी येता पाऊले टाकी निर्धार । पापसंहार पदोपदी ॥ २४ ॥

मस्तकी उष्णीष घालूनि ऐकती । तरी जन्मांतरी बाळपक्षी होती ।
म्हणाल उष्णीष काढिता न ये सभेप्रती । तरी मुख्य पल्लव सोडावा ॥ २५ ॥

जे विडा घेवोनि ऐकती । तरी यमकिंकर त्यांसी जाचिती ।
नाना यातना भोगविती । मूळ व्यासवचन प्रमाण हे ॥ २६ ॥

एक बैसती उगेच श्रवणी । निद्रा मोडावी बहुत प्रकारेकरूनी ।
अंतर सद्गद नेत्री यावे पाणी । मग निद्रा कैची स्पल ॥ २७ ॥

वरी जीवन काय व्यर्थ लावून । जैसे एकांती द्रव्य आपुले पूर्ण ।
तेथे घडता जागरण । निद्रा न ये प्राणियां ॥ २८ ॥

निद्रा लागली दारुण । तरी उभे ठाकावे कर जोडून ।
निद्रा न ये तो उपाय करून । मुख्य श्रवण करावे ॥ २९ ॥

वक्त्याहूनि उंच आसन तत्त्वता । तेथे न बैसावे धरूनि अहंता ।
हे न मानिती ते काग तत्त्वता । जगपुरीष भक्षिती ॥ ३० ॥

जे बैसती वीरासन घालून । ते होती वृक्ष अर्जुन ।
पाय पसरिती त्यांस सूर्यनंदन । शुष्ककाष्ठे झोडी बळे ॥ ३१ ॥

जे सांगताही न ऐकती । बळेच जेठा घालून बैसती ।
त्यांसी यमदूत बांधोनि नेती । नेऊन टाकिती नरककुंडी ॥ ३२ ॥

जो श्रवणी निजे दाटून । तो उपजे अजगर होऊन ।
बैसे नमस्कार केलिया वाचून । वंशवृक्ष होय तो ॥ ३३ ॥

कथेत बोले भलत्या गोष्टी । तो मंडूक होय सदा वटवटी ।
हर्षे टाळिया न वाजवी हट्टी । हो कष्टी संसारी ॥ ३४ ॥

जे शिवकीर्तन हेळसती । ते शतजन्मी सारमेय होती ।
दुरुत्तरे बोलती निश्चिती । जन्मा येती सरड्याच्या ॥ ३५ ॥

जे श्रवणी न होती सादर । ते अन्य जन्मी होती सूकर ।
जे उच्छेदिती शिवचरित्र । ते वृकयोनी पावती ॥ ३६ ॥

वक्त्यासी देता आसन । शिवसन्निध बैसे जावोन ।
वस्त्रे देता अन्न । प्राप्त होय तयाते ॥ ३७ ॥

करिता कथापुराण श्रवण । भक्ति वैराग्य ये आंगी पूर्ण ।
यदर्थी कथा सुगम जाण । जेणे अनुताप उपजे मनी ॥ ३८ ॥

दक्षिणेकडे ग्राम एक अमंगळ । त्याचे नाव मुळीच बाष्कळ ।
सर्वधर्मविवर्जित केवळ । स्त्रीपुरुष जारकर्मी ॥ ३९ ॥

धर्म नाहीच अणुमात्र । अनाचारी परमं अपवित्र ।
जपतप विवर्जित अग्निहोत्र । वेदशास्त्र कैचे तेथे ॥ ४० ॥

वेद आणि शास्त्र । हे विप्राचे उभय नेत्र ।
एक नाही तरी साचार । एकाक्ष तयासी बोलिजे ॥ ४१ ॥

वेदशास्त्र उभयहीन । तो केवळ अंधचि जाण ।
असो त्या नगरीचे लोक संपूर्ण । सर्व लक्षणी अपवित्र ॥ ४२ ॥

तस्कर चाहाड आणि जार । मद्यपी मार्गघ्न दुराचार ।
मातापितयांचा द्रोह करणार । एवं सर्वदोषयुक्त जे ॥ ४३ ॥

त्या ग्रामीचा एक विप्र । नाम तयाचे विदुर ।
वेश्येसी रत अहोरात्र । कामकर्दमी लोळत ॥ ४४ ॥

त्याची स्त्री बहुला नाम । तीही जारिणी अपवित्र परम ।
एके जारासी असता सकाम । भ्रतारे जपोनि धरियेली ॥ ४५ ॥

जार पळाला सत्वर । तीस भ्रतारे दिधला मार ।
यथेष्ट लत्तामुष्टिप्रहार । देता बोले काय ते ॥ ४६ ॥

म्हणे तू झालासी जार । मीही तेचि करिते निरंतर ।
मग बोले तो विप्र विदुर । तुवा द्रव्य अपार मेळविले ॥ ४७ ॥

ते द्रव्य दे मजलागून । मी देईन वारांगनेसी नेऊन ।
ती म्हणे मी देऊ कोठून । ऐकता मारी पुढती तो ॥ ४८ ॥

मग तिचे अलंकार हिरोनि घेत । घरची सर्व संपत्ति नेत ।
ते वारांगनेंसी देत । तेही समर्षी जाराते ॥ ४९ ॥

ऐसी दोघेही पापे आचरत । तो विदुर विप्र पावला मृत्य ।
यमदूती नेला मारीत । बहुत जाचिती तयाते ॥ ५० ॥

कुंभीपाकादि परम दु:ख । भोगूनिया तो शतमूर्ख ।
मग विंध्याचळाच्या दरीत देख । भयानक पिशाच जाहला ॥ ५१ ॥

आळेपिळे आंगासी देत । हिंडे क्षुधातृषापीडित ।
रक्तवर्ण आंग त्याचे समस्त । जेवी शेंदूर चर्चिला ॥ ५२ ॥

वृक्षासी घेत टांगून । सवेचि कि देत फिरे वन ।
रक्तपिती भरोन । सर्वांग त्याचे नासले ॥ ५३ ॥

कंटकवन परम दुर्धर । न मिळे कदा फळमूळआहार ।
आपुल्या पापाचे भाग समग्र । भोगी विदुर विप्र तो ॥ ५४ ॥

इकडे बहुला धवरहित । एक होता तियेसी सुत ।
तो कोणापासोनि झाला त्वरित । ते स्मरण नाही तियेसी ॥ ५५ ॥

तव आले शिवरात्रिपर्व । गोकर्णयात्रेस चालिले सर्व ।
नाना वाद्ये वाजती अभिनव । ध्वजा पताका मिरवती ॥ ५६ ॥

शिवनामे गर्जती दास । वारंवार करिती घोष ।
कैचा उरेल पापलेश । सर्वदा निर्दोष सर्व जन ॥ ५७ ॥

त्यांच्या संगती बहुला निघत । सवे घेवोनि धाकटा सुत ।
गोकर्णक्षेत्र देखिले पुण्यवंत । झाले पुनीत सर्व जन ॥ ५८ ॥

बहुलेने स्नान करून । घेतले महाबळेश्वराचे दर्शन ।
पुराणश्रवणी बैसली येऊन । तो निरूपण निघाले ॥ ५९ ॥

जी वनिता जारीण । तीस यमदूत नेती धरोन ।
लोहपरिघ तप्त करून । स्मरगृहामाजी घालिती ॥ ६० ॥

ऐसे बहुला ऐकोनी । भयभीत झाली तेच क्षणी ।
अनुताप अंगी भरोनी । रडो लागली अट्टाहासे ॥ ६१ ॥

मग पुराणिकासी समस्त । आपुला सांगे वृत्तान्त ।
झाले जे जे पापाचे पर्वत । ते निजमुखे उच्चारी ॥ ६२ ॥

अंतकाळी यमकिंकर । ताडण करतील मज अपार ।
ते वेळी मज कोण सोडविणार । दु:ख अपार सोसू किती ॥ ६३ ॥

स्वामी माझे कापते शरीर । काय करू सांगा विचार ।
गळा पाश घालूनि यमकिंकर । करिती मार तप्तशत्रे ॥ ६४ ॥

नानापरी विटंबविती । असिपत्रवनी हिंडविती ।
उफराटे बांधोनि टांगिती । नरककुंडी अधोमुख ॥ ६५ ॥

ताम्रभूमि तापवून । त्यावरी लोळविती नेऊन ।
तीक्ष्ण शस्त्र आणोन । पोटामाजी खोविती ॥ ६६ ॥

तीक्ष्ण धूम्र करून । वरी टांगिती नेऊन ।
भूमीत मज रोवून । तप्तशरे मार करिती ॥ ६७ ॥

तप्तशूळावरी घालिती । पायी चंडशिळा बांधिती ।
महानरकी बुडविती । सोडवी कोण तेथुनि ॥ ६८ ॥

बहुलेसी गोड न लागे अन्न । दुःखे रडे रात्रंदिन ।
म्हणे मी कोणास जाऊ शरण । आश्रय धरू कोणाचा ॥ ६९ ॥

कोण्या नरकी पडेन जाऊन । मग त्या ब्राह्मणाचे धरी चरण ।
सद्गुरु मज तारी येथून । आले शरण अनन्य मी ॥ ७० ॥

मग गुरु पंचाक्षर मंत्र । सांगे बहुलेप्रती सत्वर ।
शिवलीलामृत सुरस फार । श्रवण करवी शिवद्वारी ॥ ७१ ॥

मग तिणे सर्व ग्रंथ । गुरुमुखे ऐकिले प्रेमयुक्त ।
श्रवण भक्ति अवघ्यांत । श्रेष्ठ ऐसे जाणिजे ॥ ७२ ॥

सत्संगे होय निःसंग । निःसंगे निर्मोह सहज मग ।
निर्मोहत्वे निश्चित उद्वेग । कैचा मग तयासी ॥ ७३ ॥

बहुला झाली परम पवित्र । शिवनाम जपे अहोरात्र ।
दोष न उरे तिळमात्र । शूचिर्भूत सर्वदा ॥ ७४ ॥

तव्याचा जाय बुरसा । मग तो सहजचि होय आरसा ।
की लोह लागता परिसा । चामीकर सहजचि ॥ ७५ ॥

की अग्नीत काष्ठ पडले । मग ते सहजचि अग्निमय झाले ।
गंगेसी वोहळ मिळाले । गंगाजळ सहजचि ॥ ७६ ॥

जप करिता पाप जाय निःशेष । ज्ञानाहूनि ध्यान विशेष ।
श्रवणाहुनि मननास । सतेजता सहजचि ॥ ७७ ॥

मननाहूनि निदिध्यास । त्याहूनि साक्षात्कार समरस ।
मग तो शिवरूप निर्दोष । संशय नाही सर्वथा ॥ ८ ॥

बहुला निर्दोष होऊन । श्रवणे झाली सर्वपावन ।
जिव्हेने करू लागली शिवकीर्तन । मग कैचे बंधन तियेसी ॥ ९ ॥

श्रवणे थोर पावन होत । श्रवणे याच जन्मी मुक्त ।
नलगे तीर्थाटन श्रम बहुत । श्रवणे सार्थक सर्वही ॥ ८० ॥

ज्यासी न मिळे सत्समागम श्रवण । त्याने करू जावे तीर्थाटन ।
नलगे अष्टांगयोगसाधन । करावे श्रवण अत्यादरे ॥ ८१ ॥

योग याग व्रत साधन । नलगे काहीच करावे जाण ।
नवविधा भक्ति पूर्ण । श्रवणेचि हाता येतसे ॥ ८२ ॥

चारी वर्ण चारी आश्रम । श्रवणेचि पावन परम ।
असो बहुलेस संतसमागम । सर्वांहूनि थोर वाटे ॥ ८३ ॥

गुरूची सेवा अखंड करी । त्यावरी राहिली गोकर्णक्षेत्री ।
जटावल्कलअजिनधारी । तीर्थी करी नित्य स्नान ॥ ८४ ॥

सर्वांगी भस्मलेपन । करी पुण्यरुद्राक्षधारण ।
सर्व आप्त सोडोनिया जाण । गुरुसेवा केली तिणे ॥ ८५ ॥

नित्य गोकर्णलिंगाचे दर्शन । गोकर्णक्षेत्र पुण्यपावन ।
तेथीचा महिमा विशेष पूर्ण । तृतीयाध्यायी वर्णिला ॥ ८६ ॥

स्वयातिकीर्तिपुष्टिवर्धन । बहुलेने तिन्ही देह जाळून ।
तेचि भस्म अंगी चर्चेन । झाली पावन शिवरूपी ॥ ८७ ॥

शंकरे विमान धाडिले ते काळी । बहुला शिवपदाप्रती नेली ।
एवढी पापीण उद्धरिली । चतुर्दश लोक नवल करिती ॥ ८८ ॥

सदाशिवापुढे जाऊन । बहुलेने केले बहुत स्तवन ।
मग अंबेची स्तुति करिता पावन । झाली प्रसन्न हिमनगकन्या ॥ ८९ ॥

म्हणे इच्छित वर माग त्वरित । येरी म्हणे पति पडला अधोगतीत ।
कोठे आहे नकळे निश्चित । पावन करोनि आणी येथे ॥ ९० ॥

मग ते त्रिजगज्जननी । अंतरी पाहे विचारूनी ।
तो विंध्याचळी पिशाच होऊनि । रडत हिंडे पापिष्ठ ॥ ९१ ॥

मग बहुलेसी म्हणे भवानी । जाई सवे तुंबर घेऊनि ।
पतीस आणी विंध्याद्रीहुनी । श्रवण करवी शिवकथा ॥ ९२ ॥

मग गेली विंध्याचळा । तव पिशाच नग्न देखिला ।
धरोनि वृक्षासी बांधिला । तुंबरे बळेकरोनिया ॥ ९३ ॥

मग वलकी काढून । सप्तस्वर मेळवून ।
आरंभिले शिवकीर्तन । ऐकता पशुपक्षी उद्धरती ॥ ९४ ॥

शिवकीर्तनरसराज । तुंबरे मात्रा देता सतेज ।
सावध झाला विदुर द्विज । म्हणे मज सोडा आता ॥ ९५ ॥

मग सोडिताचि धावोन । धरिले तुंबराचे चरण ।
म्हणे स्वामी धन्य धन्य । केले पावन पापियाते ॥ ९६ ॥

स्त्रियेसी म्हणे धन्य तू साचार । केला माझा आजि उद्धार ।
मग तुंबरे शिवपंचाक्षर । त्यासी मंत्र उपदेशिला ॥ ९७ ॥

त्याचा करिता जप । तव विमान आले सतेजरूप ।
विदुर झाला दिव्यरूप । स्त्रीसहित विमानी बैसला ॥ ९८ ॥

आणिली शिवापाशी मिरवीत । दोघेही शिवचरणी लागत ।
लवण जळी विरत । तैसी मिळत शिवरूपी ॥ ९९ ॥

जळी विराली जळगार । नभी नाद विरे सत्वर ।
तैसी बहुला आणि विदुर । शिवस्वरूप जाहली ॥ १०० ॥

ज्योति मिळाली कर्पूरी । गंगा सामावली सागरी ।
ब्रह्मस्वरूपी निर्धारी । विराली ऐक्य होऊनिया ॥ 10१ ॥

शिवमंत्र शिवकथाश्रवण । शिवदीक्षा रुद्राक्षधारण ।
भस्मलेपने उद्धरोन । गेली किती संख्या नाही ॥ 10२ ॥

भस्मातून निघाला भस्मासूर । शिवद्रोही परम पामर ।
त्याचा कैसा केला उद्धार । ते चरित्र सांग कैसे ॥ 10३ ॥

हे शिवपुराणी कथा सुरस । श्रोती ऐकावी सावकाश ।
कैलासी असता महेश । प्रदोषकाळी एकदा ॥ 10४ ॥

भस्म स्वकरी घेऊन । आंगी चर्ची उमारमण ।
तव एक खडा लागला तो शिवे जाण । भूमीवर ठेविला ॥ 10५ ॥

नवल शिवाचे चरित्र । तेथेचि उत्पन्न झाला असुर ।
नाम ठेविले भस्मासुर । उभा सदा कर जोडूनि ॥ 10६ ॥

म्हणे वृषभध्वजा सदाशिवा । मजे काही सांगिजे सेवा ।
शंभु म्हणे मज नित्य येधवा । चिताभस्म आणोनि देईजे ॥ 10७ ॥

नित्य नूतन आणी भस्म । हीच सेवा करी उत्तम ।
ऐसी आज्ञा होता परम । भस्मासुर संतोषला ॥ 10८ ॥

कर्मभूमीस नित्य येवोन । वसुंधरा शोधी संपूर्ण ।
जो शिवभक्तपरायण । लिंगार्चन घडले ज्यासी ॥ 10९ ॥

शिवरात्री सोमवार प्रदोष । सदा ऐके शिवकीर्तन सुरस ।
त्याचेच भस्म भवानीश । अंगिकारी आदरे ॥ ११० ॥

जे का भक्त अभेद प्रेमळ । त्यांच्या मुंडांची करी माळ ।
श्मशानी वैराग्य वाढे प्रबळ । म्हणोनि दयाळ राहे तेथे ॥ १1१ ॥

लोक श्मशानाहूनि घरा येती । वैराग्य जाय विषयी जडे प्रीती ।
म्हणोनि उमावलुभे वस्ती । केली महाश्मशानी ॥ १1२ ॥

पंचभूते तत्त्वांसहित । पिंडब्रह्मांड जाळोनि समस्त
सर्व निरसूनि जे उरत । स्वात्मसुख भस्म तेचि ॥ १1३ ॥

तेचि ब्रह्मानंदसुख सोज्ज्वळ । ते भस्म चर्ची दयाळ ।
तो अमूर्तमूर्त कृपाळ । षड्विकाररहित जो ॥ १1४ ॥

अस्ति जायते वर्धते विपरिणमते। अपक्षीयते निधन षड्विकार समस्त ।
शिव परब्रह्म शाश्वत । विकाररहित निर्विकार जो ॥ १1५ ॥

जो षड्गुणैश्वर्यसंपन्न। यश श्री कीर्ति विज्ञान ।
औदार्य वैराग्य संपूर्ण। ऐसे कोठे असेना ॥ १1६ ॥

आणिक षचिन्ही मंडित। ती ऐका सर्वज्ञ पंडित ।
कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व। विभुत्व साक्षित्व सर्वज्ञत्व पै ॥ १1७ ॥

या चिन्ही मंडित शुद्ध। शंकर परिपूर्ण ब्रह्मानंद ।
मायाचक्रचाळक शुद्ध। त्रिविधभेदरहित जो ॥ १1८ ॥

भक्तरक्षणार्थ सगुण। शंभु झाला चैतन्यघन ।
तेणे भस्मासुर निर्मून। धाडिला भस्म आणावया॥ १1९ ॥

ऐसे नित्य आणिता चिताभस्म । असुर मातला मदे परम ।
गोब्राह्मण देखे मनुष्य उत्तम। म्हणे संहारूनिया टाकू हे ॥ १२० ॥

हे संहारूनिया सकळ। असुरराज्य करावे सबळ ।
जाऊनिया निर्जरमंडळ। शक्र कमलोद्भव जिंकावे ॥ 1२१ ॥

विष्णु आणि धूर्जटी । हेही संहारावे शेवटी ।
त्रिभुवन जिंकल्यापाठी । मीच इंद्र होईन ॥ 1२२ ॥

ऐसी मनी बांधोनि गाठी । कैलासा गेला तो कपटी ।
म्हणे ऐकतोसी धूर्जटी । भस्म सृष्टी न मिळे कोठे ॥ 1२३ ॥

चार लक्ष मनुष्ययोनी पाहे । नित्य सव्वालक्ष घडामोड होये ।
शोधिली सर्व अवनी हे । परी भस्म शुद्ध न मिळेचि ॥ 1२४ ॥

ऐसी कपटभक्ती दावी परम । म्हणे माझा टळतो नित्यनेम ।
तुज अर्पावे चिताभस्म । तरी एक वर्म सुगम असे ॥ 1२५ ॥

म्हणे हरा पंचवदना । विरूपाक्षा त्रिपुरच्छेदना ।
उमावलुभा नागभूषणा । वरप्रदान दे माते ॥ 1२६ ॥

मज देई एक वर । ज्याच्या माथा ठेवी कर ।
तो भस्म व्हावा निर्धार । कार्य फार साधे येणे ॥ 1२७ ॥

म्हणोनि लोटांगण घालीत । इतुके माझे चालवी व्रत ।
निष्कपट शिव भोळानाथ । वर द्यावया सिद्ध झाला ॥ 1२८ ॥

मग बोले हिमनगराजकुमारी । हा नष्ट परम दुराचारी ।
यासी वर देता धरित्री । भस्म करील निर्धारि ॥ 1२९ ॥

महाशब्द करावयाची हौस । तो पातला फाल्गुन मास ।
आधीच वाटपाड्या चोरास । निरोप दिधला भूभुजे ॥ १३० ॥

आधीच जारकर्मी रत । त्यासी प्रभुत्व दिधले स्त्रीराज्यात ।
की मद्यपियासी दावीत । सिंदीवन साक्षेपे ॥ 1३१ ॥

मर्कटासी मद्यपान । त्यात झाले वृश्चिकदंशन ।
त्याहीवरी भूत संचरले दारुण । मग अन्योन्य वर्ते जेवीं ॥ 1३२ ॥

यालागीं हा तामसी असुर । यास न द्यावा कदापि वर ।
षडास्य गजास्य वीरभद्र । नंदिकेश्वर हेचि सांगे ॥ 1३३ ॥

परम भोळा शंकर । म्हणे आमुचे लेकरू भस्मासुर ।
यास द्यावा अगत्य वर । तो अन्यत्र राहाटी न करीच ॥ 1३४ ॥

म्हणे बाळका तुज दिधला वर । ऐसे ऐकतांचि असुर ।
उडे नाचे आनंद थोर । त्रिभुवनामाजी न समाये ॥ 1३५ ॥

मृत्युलोकासी आला सत्वर । मग करीत चालिला संहार ।
संत भक्त गो विप्र । शोधूनि भस्म करीतसे ॥ 1३६ ॥

मस्तकीं हस्त ठेवितां तत्काळ । भस्म होय नलगे वेळ ।
ऋषिचक्र शोधूनि सकळ । भस्म करी एकदांचि ॥ 1३७ ॥

छप्पन्न देश शोधित । चमूसहित भूभुज समस्त ।
भस्म करी क्षणांत । थोर अनर्थ वोढवला ॥ 1३८ ॥

कुटुंबांसहित ब्राह्मण । गिरिविवरी बैसती लपोन ।
पृथ्वी उद्वस संपूर्ण । बाहेर कोणी न फिरेचि ॥ ३९ ॥

जैसा श्येनपक्षी अकस्मात । पक्षी धरोनि संहारित ।
तैसा अंतरिक्ष येवोनि त्वरित । मस्तकीं हस्तस्पर्श करी ॥ १४० ॥

महायोद्धा रणपंडित । समरीं जिंकी कृतांत ।
परी भस्मासुरापुढे बलहत । कांहीच न चले युक्ति त्या ॥ 1४१ ॥

जैसा पाखाडी खळ तत्त्वतां । तो नावरे बहुतां पंडितां ।
तैसी त्या असुरापुढे पाहतां । न चले युक्ति कवणाची ॥ 1४२ ॥

असुर करितो नित्य संहार । शिवासी न कळे समाचार ।
भस्म नेऊनि दे सत्वर । महानम्र होय तेथे ॥ 1४३ ॥

सवेंचि ये मृत्युलोका । मनीं धरिला ऐसा आवांका ।
त्रिदशांसहित शचीनायका । भस्म करावे यावरी ॥ 1४४ ॥

मग कमलोद्भव कमलावर । शेवटीं भस्म करावा गंगाधर ।
उमा त्रिभुवनांत सुंदर । हिरोनि घ्यावी वृद्धाची ॥ 1४५ ॥

पृथ्वी पडली उद्वस । मिळाल्या प्रजा ऋषी आसमास ।
सर्वांचे भय पावलें मानस । पुरुहूतास शरण आले ॥ 1४६ ॥

मग मघवा सकळांसहित । पद्मजाप्रती गा-हाणे सांगत ।
तो म्हणे क्षीराब्धिजामात । त्यास सांगू चला आतां ॥ 1४७ ॥

अक्षज नाम इंद्रियज्ञान । ते ज्याने केलें आधीं दमन ।
म्हणोनि अधोक्षज नाम त्यालागून । अतींद्रियद्रष्टा तो ॥ 1४८ ॥

ऐसा जो अधोक्षज । जवळी केला वैकुंठराज ।
गा-हाणे सांगती प्रजा द्विज । भस्मासुराचें समस्त ॥ 1४९ ॥

मग समस्तांसहित नारायण । शिवाजवळी सांगे वर्तमान ।
भस्मासुरे जाळून । भस्म केलें सर्वही ॥ १५० ॥

उरलों आम्ही समस्त । इतुक्यांचाही करील अंत ।
सदाशिवा तुझाही प्रांत । बरा न दिसे आम्हांते ॥ 1५१ ॥

हैमवती करीं जतन । ऐकोनि हांसला भाललोचन ।
म्हणे भस्मासुरास मरण । आलें जवळी यावरी ॥ 1५२ ॥

तुम्ही जावें स्वस्थाना सत्वर । ऐसें बोले कर्पूरगौर ।
तो अकस्मात आला असुर । भस्म घेऊन तेधवां ॥ 1५३ ॥

आपुलें गा-हाणे आणिलें येथ । मिळाले ते देखिले समस्त ।
असुर मान तुकावित । सरड्याऐसी तयांवरी ॥ 1५४ ॥

म्हणे जे जे आले येथ । उद्यां भस्म करीन समस्त ।
मग क्रोधे बोले उमानाथ । भस्मासुरासी तेधवां ॥ 1५५ ॥

अरे तू अधम असुर । केला पृथ्वीचा संहार ।
तुज आम्हीं दिधला वर । परिणाम त्याचा बरा केला ॥ 1५६ ॥

असुर क्रोधे बोले ते समयी । तुझी सुंदर दारा मज देईं ।
नातरी तव मस्तकीं लवलाहीं । हस्त आतांचि ठेवितों ॥ 1५७ ॥

भवानी उठोन गेली सदनांत । असुर ग्रीवा तुकावित ।
शिवाच्या माथां ठेवोनि हस्त । तुज नेईन क्षणार्धे ॥ 1५८ ॥

शिवमस्तकीं ठेवावया कर । वेगें धांविन्नला भस्मासुर ।
प्रजा आणि ऋषीश्वर । पळू लागले दशदिशा ॥ 1५९ ॥

जो भक्तजनभवभंग । मायालाघवी उमारंग ।
पळता झाला सवेग । घोरांदर वन घेतलें ॥ १६० ॥

पाठीं लांगला भस्मासुर । म्हणे जोगड्या उभा धरीं धीर ।
आजि तुझा करीन संहार । रक्षा लावीन अंगासी ॥ 1६१ ॥

वेदशास्त्रां न कळे पार । मायाचक्रचाळक अगोचर ।
त्यास पामर भस्मासुर । धरीन म्हणे निजबळे ॥ 1६२ ॥

जो ब्रह्मादिक देवांचे ध्यान । सनकादिकांचे देवतार्चन ।
त्यास भस्मासुर आपण । धरीन म्हणे पुरुषार्थे ॥ 1६३ ॥

त्यास वाटे धरीन मी आतां । दिसे जवळी परी नाटोपे सर्वथा ।
ऐसा कोटि वर्षे धांवतां । न लगे हाता सर्वेश्वर ॥ 1६४ ॥

उणे पुरे शब्द बोलत । शब्दां नातुडे गिरिजाकांत ।
तर्क कुतर्क करितां बहुत । हांक फोडितां नातुडे ॥ 1६५ ॥

वेदशास्त्रांचा तर्क चांचरे । घोकिता शास्त्रज्ञ झाले म्हातारे ।
सकळ विद्या घेतां एकसरें । मदनांतक नाटोपे ॥ 1६६ ॥

जे प्रेमळ शुद्ध भाविक । त्यांचा विकला कैलासनायक ।
उमेसहित त्यांचे घरीं देख । वास करी सर्वदा ॥ 1६७ ॥

तप बळ विद्या धन । या बळे धरू म्हणती ते मूर्ख पूर्ण ।
कल्पकोटि जन्ममरण । फिरतां गणित न होय ॥ 1६८ ॥

असो अहंकारें भस्मासुर । धांवतां नाटोपे शंकर ।
इकडे भवानी इंदिरावर । बंधु आपुला स्तवी तेव्हां ॥ 1६९ ॥

म्हणे कमलोद्भवजनका कमलनयना । कमलनाभा मुरमर्दना ।
कमलधारका कमलशयना । कमलाभरणा कमलाप्रिया ॥ 1७० ॥

जगद्वंद्या जगद्वयापका । जनजराजन्ममोचका ।
जनार्दना जगरक्षका । जगदुद्धारा जलाब्धिशयना ॥ 1७१ ॥

ऐसें ऐकतां माधव । मोहिनीरूप धरोनि अभिनव ।
शिवमनरंजन केशव । आडवा आला असुराते ॥ 1७२ ॥

शिव न्यग्रोध होऊनि देख । दुरून पाहता झाला कौतुक ।
मोहिनी देखतां असुर निःशंक । भुलोनि गेला तेधवां ॥ 1७३ ॥

विमान पाहती समस्त देव । म्हणती हें कैंचें रूप अभिनव
अष्टनायिकांचे वैभव । चरणांगुष्ठीं न तुळेचि ॥ 17४ ॥

नृत्य करीत मोहिनी । असुर तन्मय झाला देखोनी ।
म्हणे ललने तुजवरोनी । कमला अपर्णा ओवाळिजे ॥ 17५ ॥

तुझे देखतां वदन । वाटे ओंवाळूनि सांडावा प्राण ।
तुवां नयनकटाक्षबाणेकरून । मनमृग माझा विंधिला ॥ 1७६ ॥

तुझे पदकमळ जेथे उमटलें । तेथे सुवास घ्यावया वसंत लोळे ।
तुवां पसरोनि शृंगारजाळे । आकळिलें चित्तमीना ॥ 1७७ ॥

मज माळ घालीं सत्वर । तुझे दास्य करीन निरंतर ।
मायावेषधारी मुरहर । हास्यवदने बोलतसे ॥ 1७८ ॥

म्हणे मी तुज वरीन त्वरित । पैल तो न्यग्रोधतरु दिसत ।
माझे त्यांत आहे आराध्य दैवत । नवस तेथे केला म्यां ॥ 1७९ ॥

लग्नाआधीं पतीसहित । तेथे करावें गायन नृत्य ।
परी मी जेथे ठेवीन हस्त । तुवां तेथेंचि ठेवावा ॥ १८० ॥

मी जे दावीन हावभाव । तूही तैसेच दावीं सर्व ।
तेथे अणुमात्र उणे पडतां देव । क्षोभेल मग तुजवरी ॥ 1८१ ॥

महाखडतर माझे दैवत । सकळ ब्रह्मांड जाळील क्षणांत ।
असुर तियेसी अवश्य म्हणत । सांगसी तैसा वर्तेन मी ॥ 1८२ ॥

ऐसा भुलवून तयासी । आणिला तो वरच्छायेसी ।
मग नमूनि दैवतासी । आरंभी नृत्य मोहिनी ॥ 1८३ ॥

मोहिनी नृत्य करित । अष्टनायिका तटस्थ पाहात ।
किन्नर गंधर्व तेथ । गायन ऐकतां भुलले ॥ 1८४ ॥

देव सर्व षट्पद होऊनी । सुवासा तिच्या वेधूनी ।
गुप्तरूपें गुंजारव करिती वनीं । परी ते कामिनी कोणा नेणवे ॥ 1८५ ॥

तिचे सुस्वर ऐकतां गायन । विधिकुरंग गेला भुलोन ।
कुभिनी सोडून करावया श्रवण । कद्रूतनय येऊ पाहे ॥ 1८६ ॥

मोहिनी जेथे ठेवी हस्त । असुरही तैसेच करित ।
आपुले मस्तकीं ठेवित । आत्मकर मोहिनी ॥ 1८७ ॥

मग असुरेंही आपुले शिरीं हात । ठेवितां भस्म झाला तेथ ।
मोहिनीरूप त्यागून भगवंत । चतुर्भुज जाहला ॥ 1८८ ॥

वटरूप सोडोनि देख । प्रकट झाला तेथे मदनांतक ।
हरिहर भेटले झाले एक । देव वर्षती सुमनमाळा ॥ 1८९ ॥

मोहिनीरूप जेव्हां धरिलें । पाहोनि शिवाचे वीर्य द्रवले ।
भूमीवरी पडतां अष्टभाग झाले । अष्टभैरव अवतार ते ॥ १९० ॥

असितांग रुरु चंड क्रोध । उन्मत्त कपाल भीषण प्रसिद्ध ।
संहारभैरव आठवा सुसिद्ध । अंशावतार शिवाचे ॥ 1९१ ॥

भस्मासुर वधिला हे मात । प्रकटतां त्रैलोक्य आनंदभरित ।
हस्त धरोनि रमाउमानाथ । येते झाले कैलासा ॥ 1९२ ॥

अंबिका तात्काळ प्रगटोन । करी हरिहरांतें बंदन ।
दोन्ही मूर्ती बैसवून । करी पूजन हैमवती ॥ 1९३ ॥

हरिहर नारायण नागभूषण । शिव सीतावल्लभ नाम सगुण ।
पंचवदन पन्नगशयन । कर्पूरगौर कमलोद्भवपिता ॥ 1९४ ॥

पिनाकपाणी पीतांबरधर । नीलकंठ नीरदवर्णशरीर ।
वृंदारकपति वृंदावनवासी मधुहर । गोवाहन हर गोविंद ॥ 1९५ ॥

चंद्रशेखर शंखचक्रधर । विश्वनाथ विश्वंभर ।
कपालनेत्र कमनीयगात्र । लीला विचित्र दोघांची ॥ 1९६ ॥

मुरहर मायामलहर । व्यालभूषण मोहहर्ता श्रीधर ।
अंधकमर्दन अघबकहर । असुरमर्दन दोघेही ॥ 1९७ ॥

सिद्धेश्वर सिंधुजावर । निःसंसार निरहंकार ।
नगतनयावर नंदकिशोर । ईशान ईश्वर इंदिरापती ॥ 1९८ ॥

क्षीरवर्णतनु क्षीराब्धिशयन । एक ब्रह्मादिवंद्य एक ब्रह्मानंद पूर्ण ।
त्या दोघांसी पूजोन । आनंदमय जगदंबा ॥ 1९९ ॥

श्रोते सावधान । पुढे सुरस कथा अमृताहून ।
वीरभद्रजन्म शिवपार्वतीलग्न । आणि षडाननजन्म असे ॥ २०० ॥

शिवलीलामृत ग्रंथ सिंहस्थ । गौतमस्वधुनी भेटों येत ।
या अध्याय कैलासवैकुंठनाथ । एके ठायीं मिळाले ॥ 20१ ॥

तरी ह्या सिंहस्थ भाविक जन । ग्रंथगौतम करिती स्नान ।
अर्थजीवनीं बुडी देवोन । अघमर्षणी निमग्न जे ॥ 20२ ॥

श्रीधरस्वामी ब्रह्मानंद । सुखावला तेथेंचि प्रसिद्ध ।
जेथे नाही भेदाभेद । अक्षय अभंग सर्वदा ॥ 20३ ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सजन अखंड । द्वादशाध्याय गोड हा ॥ २०४ ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


शिवलीलामृत अन्य अध्याय


शिवलीलामृत अध्याय पहिला | Shri Shiv Leelamruta Adhyay 1
शिवलीलामृत अध्याय दुसरा | Shri Shiv Leelamruta Adhyay 2
शिवलीलामृत अध्याय तिसरा | Shri Shiv Leelamruta Adhyay 3
शिवलीलामृत अध्याय चौथा | Shri Shiv Leelamruta Adhyay 4
शिवलीलामृत अध्याय पाचवा | Shri Shiv Leelamruta Adhyay 5
शिवलीलामृत अध्याय सहावा | Shri Shiv Leelamruta Adhyay 6
शिवलीलामृत अध्याय सातवा | Shri Shiv Leelamruta Adhyay 7
शिवलीलामृत अध्याय आठवा | Shri Shiv Leelamruta Adhyay 8
शिवलीलामृत अध्याय नववा | Shri Shiv Leelamruta Adhyay 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks