श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4

॥ श्री गणेशाय नमः ॥

मुखे कीर्तन करावे । अथवा श्रवणी ऐकावे ।
षोडशोपचारे पूजावे । स्वामीचरण भक्तीने ॥१॥

न लगे करणे तीर्थाटन । योग्याभ्यास होमहवन ।
सांडोनिया अवघा शीण । नामस्मरण करावे ॥२॥

स्वामी नामाचा जप करिता । चारी पुरुषार्थ योती हाता ।
स्वामीचरित्र गात ऐकता । पुनरावृत्ति चुकेल ॥३॥

गताध्यायाचे अंती । अक्कलकोटी आले यति ।
नृपराया दर्शन देती । स्वेच्छेने राहती तया पुरी ॥४॥

चोळप्पाचा दृढ भाव । घरी राहिले स्वामीराव ।
हे तयाचे सुकृत पूर्व । नित्य सेवा घडे त्याते ॥५॥

जे केवळ वैकुंठवासी । अष्टसिद्धी ज्यांच्या दासी ।
नवविधी तत्पर सेवेसी । ते धरिती मानवरुप ॥६॥

चोळप्पा केवळ निर्धन । परी स्वामीकृपा होता पूर्ण ।
लक्ष्मी होऊनिया आपण । सहज आली तया घरी ॥७॥

कैसी आहे तयाची भक्ती । नित्य पाहती परीक्षा यति ।
नाना प्रकारे त्रास देती । परी तो कधी न कंटाळे ॥८॥

चोळप्पाची सद़्गुणी कांता । तीही केवळ पतिव्रता ।
सदोदित तिच्या चित्ता । आनंद स्वामीसेवेचा ॥९॥

स्वामी नाना खेळ खेळती । विचित्र लीला दाखविती ।
नगरवासी जनांची भक्ती । दिवसेंदिवस दृढ जडली ॥१०॥

स्वामी केवळ ईश्वरमूर्ती । देशोदेशी झाली ख्याती ।
बहुत लोक दर्शना येती । कामना चित्ती धरोनी ॥११॥

कोणी संपत्तीकारणे । कोणी मागते संताने ।
व्हावी म्हणोनिया लग्ने येती दूर देशाहूनी ॥१२॥

शरीरभोगे कष्टले । संसारतापे तप्त झाले ।
मायामय पसाऱ्याते फसले । ऐसे आले किती एक ॥१३॥

सर्वांशी कल्पद्रुमासमान । होऊनी कामना करिती पूर्ण ।
भक्तकाजास्तव अवतीर्ण । मानवरूपे जाहले ॥१४॥

भक्त अंतरी जे जे इच्छिती । ते ते यतिराज पुरविती ।
दृढ चरणी जयांची भक्ति । त्यासी होती कल्पतरू ॥१५॥

जे का निंदक कुटिल । तया शास्ते केवळे ।
नास्तिकाप्रती तात्काळ । योग्य शासन करिताती ॥१६॥

महिमा वाढला विशेष । कित्येक करू लागले द्वेष ।
कोणा एका समयास । वर्तमान घडले पै ॥१७॥

कोणी दोन संन्यासी । आले अक्कलकोटासी ।
हासोनि म्हणती जनांसी । ढोंगियाच्या नादी लागला ॥१८॥

हा स्वामी नव्हे ढोंगी । जो नाना भोग भोगी ।
साधू लक्षणे याचे अंगी । कोणते ही वसतसे ॥१९॥

काय तुम्हा वेड लागले । वंदिता ढोंग्याची पाऊले ।
यात स्वार्थ ना परमार्थ मिळे । फसला तुम्ही अवघेही ॥२०॥

ऐसे तयांनी निंदिले । समर्थांनी अंतरी जाणिले ।
जेव्हा ते भेटीसी आले । तेव्हा केले नवल एक ॥२१॥

पहावया आले लक्षण । समर्थ समजले ती खूण ।
ज्या घरी बैसले तेथोन । उठोनिया चालिले ॥२२॥

एका भक्ताचिया घरी । पातली समर्थांची स्वारी ।
तेही दोघे अविचारी । होते बरोबरी संन्यासी ॥२३॥

तेथे या तिन्ही मूर्ती । बैसविल्या भक्ते पाटावरती ।
श्रीस्वामी आपुले चित्ती । चमत्कार म्हणती करू आता ॥२४॥

दर्शनेच्छू जन असंख्यात । पातले तेथे क्षणार्धात ।
समाज दाटला बहुत । एकच गर्दी जाहली ॥२५॥

दर्शन घेऊन चरणांचे । मंगल नांव गर्जतीवाचे ।
हेतू पुरवावे मनीचे । म्हणोनिया विनविती ॥२६॥

कोणी द्रव्य पुढे ठेविती । कोणी फळे समर्पिती ।
नाना वस्तू अर्पण करिती । नाही मिती तयांचे ॥२७॥

कोणी नवसाते करिती । कोणी आणोनिया देती ।
कोणी काही संकल्प करिती । चरण पूजिती आनंदे ॥२८॥

संन्यासी कौतुक पाहती । मनामाजी आश्चर्य करिती ।
क्षण एक तटस्थ होती । वैरभाव विसरोनी ॥२९॥

क्षण एक घडता सत्संगती । तत्काळ पालटे की कुमति ।
म्हणोनी कवि वर्णिताती । संतमहिमा विशेष ॥३०॥

स्वामीपुढे जे जे पदार्थ । पडले होते असंख्यात ।
ते निजहस्ते समर्थ । संन्याशांपुढे लोटिती ॥३१॥

पाणी सुटले त्यांच्या मुखासी । म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी ।
आजसारा दिवस उपवासी । जीव आमुचा कळवळला ॥३२॥

मोडली जनांची गर्दी । तो येवोनी सेवेकरी ।
संन्याशांपुढल्या नानापरी । वस्तू नेऊ लागले ॥३३॥

तेव्हा एक क्षणार्धात । द्रव्यादिक सारे नेत ।
संन्यासी मनी झुरत । व्याकुळ होत भुकेने ॥३४॥

समर्थांनी त्या दिवशी । स्पर्श न केला अन्नोदकासी ।
सूर्य जाता अस्ताचलासी । तेथोनिया उठले ॥३५॥

दोघे संन्यासी त्या दिवशी । राहिले केवळ उपवासी ।
रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज्य असे ॥३६॥

जे पातले करू छळणा । त्यांची जाहली विटंबना ।
दंडावया कुत्सित जना । अवतरले यतिवर्य ॥३७॥

त्यांच्या चरणी ज्यांची भक्ति । त्यांचे मनोरथ पुरविती ।
पसरली जगी ऐशी ख्याती । लीला ज्यांची विचित्र ॥३८॥

श्रीपादवल्लभ भक्ति । कलियुगी वाढेल निश्चिती ।
त्यांचा अवतार स्वामी यति । वर्णी कीर्ती विष्णुदास ॥३९॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा ।
संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त । चतुर्थोध्याय गोड हा ॥४०॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


श्री स्वामी चरित्र सारामृत अन्य अध्याय


श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 1
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 2
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 3
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 5
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 6
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 7
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 8
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा  | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 9
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *