ज्ञानेश्वरी अध्याय चौथा | Dnyaneshwari Adhyay-4

ज्ञानेश्वरी अध्याय चौथा | Dnyaneshwari Adhyay-4 | ज्ञानेश्वरी अध्याय 4


आजि श्रवणेंद्रिया पिकलें । जे येणें गीतानिधान देखिलें ।
आता स्वप्नचि हें तुकलें । साचासरिसें ॥ १ ॥

आधी विवेकाची गोठी । वरी प्रतिपादी कृष्ण जगजेठी ।
आणि भक्तराजु किरीटी । परिसत असे ॥ २ ॥

जैसा पंचमालापु सुगंधु । कीं परिमळ आणि सुस्वादु ।
तं भला जाहला विनोदु । कथेचा इये ॥ ३ ॥

कैसी आगळिक दैवाची । जे गंगा वोळली अमृताची ।
हो कां जपतपें श्रोतयांची । फळा आली ॥ ४ ॥

आतां इंद्रियजात आघवें । तिहीं श्रवणाचे घर रिघावें ।
मग संवादसुख भोगावें । गीताख्य हें ॥ ५ ॥

हा अतिसो अतिप्रसंगे । सांडूनि कथाचि ते सांगे ।
जे कृष्णार्जुन दोघे । बोलत होते ॥ ६ ॥

ते वेळी संजयों रायातें म्हणे । अर्जुन अधिष्ठिला दैवगुणें ।
जे अतिप्रीती नारायणें । बोलिजतु असे ॥ ७ ॥

जें न संगेचि पितया वसुदेवासी । जें न संगे माते देवकीसी ।
जें न संगेचि बळिभद्रासी । तें गुह्य अर्जुनेंसी बोलत ॥ ८ ॥

देवी लक्ष्मीयेवढी जवळीक । तेही न देखे या प्रेमाचे सुख ।
आणि कृष्णस्नेहाचें पिक । यांतेचि आथी ॥ ९ ॥

सनकादिकांच्या आशा । वाढिनल्या होत्या कीर बहुवसा ।
परी त्याही येणें माने यशा । येतीचिना ॥ १० ॥

या जगदीश्वराचें प्रेम । एथ दिसतसे निरुपम ।
कैसें पार्थें येणें सर्वोत्तम । पुण्य केलें ॥ ११ ॥

हो कां जयाचिया प्रीती । अमूर्त हा आला व्यक्ती ।
मज एकवंकी याची स्थिती । आवडतु असे ॥ १२ ॥

एर्‍हवीं हा योगिया नाडळे । वेदार्थासी नाकळे ।
जेथ ध्यानाचेही डोळे । पावतीना ॥ १३ ॥

तें हा निजस्वरूप । अनादि निष्कंप ।
परी येणे मानें सकृप । जाहला असे ॥ १४ ॥

हा त्रैलोक्यपटाचि घडी । आकाराची पैलथडी ।
कैसा याचिये आवडी । आवरला असे ॥ १५ ॥

श्रीभगनानुवाच: इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम् ।
विवस्वान् मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत् ॥ १ ॥

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुवां दिवसांची ॥ १६ ॥

मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी ।
निरूपिली बरवी । मनूप्रती ॥ १७ ॥

मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।
ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ॥ १८ ॥

एवं परंपराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः ।
स कालेनेह महता योगो नष्टः परंतप ॥ २ ॥

मग आणिकही या योगाते । राजर्षि जाहले जाणते ।
परी तेथोनि आतां सांप्रतें । नेणिजे कोणी ॥ १९ ॥

जे प्राणियां कामी भरू । देहाचिवरी आदरु ।
म्हणोनि पडला विसरु । आत्मबोधाचा ॥ २० ॥

अव्हांटलिया आस्थाबुद्धि । विषयसुखचि परमावधि ।
जीवु तैसा उपाधि । आवडे लोकां ॥ २१ ॥

एर्‍हवीं तरी खवणेयांच्या गांवीं । पाटाऊवें काय करावीं ।
सांगे जात्यंधा रवी । काय आथी ॥ २२ ॥

कां बहिरयांचां आस्थानीं । कवणे गीतातें मानी ।
कीं कोल्हेया चांदणीं । आवडी उपजे ॥ २३ ॥

पैं चंद्रोदया आरौतें । जयांचे डोळे फुटती असते ।
ते काऊळे केवीं चंद्रातें । ओळखती ॥ २४ ॥

तैसे वैराग्याची शिंव न देखती । जे विवेकाची भाषा नेणती ।
ते मूर्ख केंवीं पावती । मज ईश्वराते ॥ २५ ॥

कैसा नेणों मोहो वाढीनला । तेणें बहुतेक काळु व्यर्थ गेला ।
म्हणोनि योगु हा लोपला । लोकीं इये ॥ २६ ॥

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः ।
भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम् ॥ ३ ॥

तोचि हा आजि आतां । तुजप्रती कुंतीसुता ।
सांगितला आम्हीं तत्वता । भ्रांति न करीं ॥ २७ ॥

हें जीवींचे निज गुज । परी केवीं राखों तुज ।
जे पढियेसी तूं मज । म्हणऊनियां ॥ २८ ॥

तूं प्रेमाचा पुतळा । भक्तीचा जिव्हाळा ।
मैत्रियेची चित्कळा । धनुर्धरा ॥ २९ ॥

तूं अनुसंगाचा ठावो । आतां तुज काय वंचूं जावों ।
जरी संग्रामारूढ आहों । जाहलों आम्ही ॥ ३० ॥

तरी नावेक हें सहावें । गाजाबज्यही न धरावें ।
परी तुझें अज्ञानत्व हरावें । लागे आधीं ॥ ३१ ॥

अर्जुन उवाच: अपरं भवतो जन्मं परं जन्म विवस्वतः ।
कथमेतद् विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४ ॥

तंव अर्जुन म्हणे हरी । माय आपुलेयाचा स्नेहो करी ।
एथ विस्मो काय अवधारीं । कृपानिधी ॥ ३२ ॥

तूं संसारश्रांतांची साऊली । अनाथ जीवांची माऊली ।
आमुतें कीर प्रसवली । तुझीच कृपा ॥ ३३ ॥

देवा पांगुळ एकादें विईजे । तरी जन्मोनि जोजारू साहिजे ।
हें बोलों काय तुझें । तुजचि पुढां ॥ ३४ ॥

आतां पुसेन जें मी कांही । तेथ निकें चित्त देईं ।
तेवींचि देवें कोपावें ना कांही । बोला एका ॥ ३५ ॥

तरी मागील जे वार्ता । तुवां सांगितली होती अनंता ।
ते नावेक मज चित्ता । मानेचिना ॥ ३६ ॥

जे तो विवस्वतु म्हणजे कायी । ऐसें हें वडिलां ठाऊवें नाहीं ।
तरी तुवांचि केवीं पाहीं । उपदेशिला ॥ ३७ ॥

तो तरी आइकिजे बहुतां काळांचा । आणि तूं तंव कृष्ण सांपेचा ।
म्हणोनि गा इये मातुचा । विसंवादु ॥ ३८ ॥

तेवींचि देवा चरित्र तुझें । आपण कांही काय जाणिजे ।
हें लटिके केवीं म्हणिजे । एकिहेळां ॥ ३९ ॥

परी हेचि मातु आघवी । मी परियेसें तैशी सांगावी ।
जे तुवांचि तया रवीं केवीं । उपदेशु केला ॥ ४० ॥

श्री भगवानुवाच: बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन ।
तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप ॥ ५ ॥

तंव कृष्ण म्हणे पंडुसुता । तो विवस्वतु जैं होता ।
तैं आम्ही नसों ऐसी चित्ता । भ्रांति जरी तुज ॥ ४१ ॥

तरी तूं गा हें नेणसी । पैं जन्में आम्हां तुम्हांसी ।
बहुतें गेलीं परी तियें न स्मरसी । आपली तूं ॥ ४२ ॥

मी जेणें जेणें अवसरें । जें जें होऊनि अवतरें ।
ते समस्तही स्मरें । धनुर्धरा ॥ ४३ ॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतामामिश्वरोऽपि सन् ।
प्रकृतिं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया ॥ ६ ॥

म्हणोनि आघवें । मज मागील आठवें ।
मी अजुही परि संभवे । प्रकृतिसंगे ॥ ४४ ॥

माझें अव्ययत्व तरी न नसे । परी होणें जाणें एक दिसे ।
ते प्रतिबिंबे मायावशें । माझांचि ठायीं ॥ ४५ ॥

माझी स्वतंत्रता तरी न मोडे । परी कर्माधीनु ऐसा आवडे ।
तेंही भ्रांतिबुद्धि तरी घडे । एर्‍हवीं नाहीं ॥ ४६ ॥

कीं एकचि दिसे दुसरें । तें दर्पणाचेनि आधारें ।
एर्‍हवीं काय वस्तुविचारें । दुजें आहे ॥ ४७ ॥

तैसा अमूर्तचि मी किरीटी । परी प्रकृति जैं अधिष्ठीं ।
तैं साकारपणे नटें नटीं । कार्यालागीं ॥ ४८ ॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ७ ॥

ते वेळी आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें ।
मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥ ४९ ॥

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५० ॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥ ८ ॥

ते वेळी आपुल्याचेनि कैवारें । मी साकारु होऊनि अवतरें ।
मग अज्ञानाचें आंधारें । गिळूनि घालीं ॥ ५१ ॥

अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं ।
सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं ॥ ५२ ॥

दैत्यांचीं कुळें नाशीं । साधूंचा मानू गिंवशीं ।
धर्मासी नीतीशी । शेंज भरी ॥ ५३ ॥

मी अविवेकाची काजळी । फेडूनी विवेकदीप उजळीं ।
तैं योगियां पाहे दिवाळी । निरंतर ॥ ५४ ॥

स्वसुखे विश्व कोंदे । धर्मचि जगीं नांदे ।
भक्तां निघती दोंदें । सात्विकाचीं ॥ ५५ ॥

तैं पापाचा अचळु फिटे । पुण्याची पहाट फुटे ।
जैं मूर्ति माझी प्रगटे । पंडुकुमरा ॥ ५६ ॥

ऐसेया काजालागी । अवतरें मी युगीं युगीं ।
परि हेंचि वोळखे जो जगीं । तो विवेकिया ॥ ५७ ॥

जन्म कर्म च ने दिव्यमेवं यो वेत्ति तत्वतः ।
त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ९ ॥

माझे अजत्वें जन्मणें । अक्रियताचि कर्म करणें ।
हें अविकार जो जाणे । तो परममुक्त ॥ ५८ ॥

तो चालिला संगे न चळे । देहींचा देहा नाकळे ।
मग पंचत्वीं तंव मिळे । माझांचि रूपीं ॥ ५९ ॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः ।
बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ १० ॥

एर्‍हवीं परापर न शोचिती । जे कामनाशून्य होती ।
वाटा केवेळीं न वचती । क्रोधाचिया ॥ ६० ॥

जे सदा मियांचि आथिले । माझिया सेवा जियाले ।
कां आत्मबोधे तोषले । वीतराग जे ॥ ६१ ॥

जे तपोतेजाचिया राशी । कां एकायतन ज्ञानासी ।
जे पवित्रता तीर्थांसी । तीर्थरूप ॥ ६२ ॥

ते मद्भावा सहजें आले । मी तेचि ते होऊनि ठेले ।
जे मज तयां उरले । पदर नाहीं ॥ ६३ ॥

सांगे पितळेची गंधिकाळिक । जे फिटली होय निःशेख ।
तैं सुवर्ण काई आणिक । जोडूं जाईजे ॥ ६४ ॥

तैसे यमनियमीं कडसले । ते तपोज्ञानीं चोखळले ।
मी तेचि ते जाहले । एथ संशयो कायसा ॥ ६५ ॥

ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् ।
मम वर्त्मानुवर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः ॥ ११ ॥

एर्‍हवीं तरी पाहीं । जे जैसे माझां ठाईं ।
भजती तया मीही । तैसाचि भजे ॥ ६६ ॥

देखें मनुष्यजात सकळ । हें स्वभावता भजनसीळ ।
जाहलें असे केवळ । माझां ठायीं ॥ ६७ ॥

परी ज्ञानेंवीण नाशिले । जे बुद्धिभेदासि आले ।
तेणेंचि या कल्पिलें । अनेकत्व ॥ ६८ ॥

म्हणऊनि अभेदीं भेदु देखती । यया अनाम्या नामें ठेविती ॥
देवी देवो म्हणती । अचर्चातें ॥ ६९ ॥

जें सर्वत्र सदा सम । तेथे विभाग अधमोत्तम ।
मतिवशें संभ्रम । विवंचिती ॥ ७० ॥

काङक्षन्तः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः ।
क्षिप्रं हि मानुषे लोके सिद्धिर्भवति कर्मजा ॥ १२ ॥

मग नानाहेतुप्रकारें । यथोचितें उपचारें ।
मानिलीं देवतांतरें । उपासिती ॥ ७१ ॥

तेथ जें जें अपेक्षित । तें तैसेंचि पावति समस्त ।
परी ते कर्मफळ निश्चित । वोळख तूं ॥ ७२ ॥

वाचूंनि देतें घेतें आणिक । निभ्रांत नाही सम्यक ।
एथ कर्मचि फळसूचक । मनुष्यलोकीं ॥ ७३ ॥

जैसें क्षेत्रीं जें पेरिजे । तेंवांचूनि आन न निपजे ।
कां पाहिजे तेंचि देखिजे । दर्पणाधारें ॥ ७४ ॥

ना तरी कडेयातळवटीं । जैसा आपुलाचि बोलु किरीटी ।
पडिसादु होऊनि उठी । निमित्तयोगें ॥ ७५ ॥

तैसा समस्तां यां भजनां । मी साक्षिभूतु पैं अर्जुना ।
एथ प्रतिफळे भावना । आपुलाली ॥ ७६ ॥

चातुर्वर्ण्यं मया सृष्टं गुणकर्मविभागशः ।
तस्य कर्तारमपि मां विध्यकर्तारमव्यम् ॥ १३ ॥

आतां याचिपरी जाण । चार्‍ही आहेती हे वर्ण ।
सृजिले म्यां गुण – । कर्मभागें ॥ ७७ ॥

जे प्रकृतीचेनि आधारें । गुणाचेनि व्यभिचारें ।
कर्में तदनुसारें । विवंचिली ॥ ७८ ॥

एथ एकचि हे धनुष्यपाणी । परीं जाहले गा चहूं वर्णीं ।
ऐसी गुणकर्मीं कडसणी । केली सहजें ॥ ७९ ॥

म्हणोनि आईकें पार्था । हे वर्णभेदसंस्था ।
मी कर्ता नव्हे सर्वथा । याचिलागीं ॥ ८० ॥

न मां कर्माणि लिम्पन्ति न मे कर्मफले स्पृहा ।
इति मां योऽभिजानाति कर्मभिर्न स बध्यते ॥ १४ ॥

हें मजचिस्तव जाहलें । परी म्यां नाहीं केलें ।
ऐसे जेणे जाणितलें । तो सुटला गा ॥ ८१ ॥

एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वेरपि मुमुक्षुभिः ।
कुरु कर्मेव तस्मात् त्वं पूर्वैः पूर्वतरं कृतम् ॥ १५ ॥

मागील मुमुक्षु जे होते । तिहीं ऐशियाचि जाणोनि मातें ।
कर्मे केलीं समस्तें । धर्नुधरा ॥ ८२ ॥

परी तें बीजें जैसीं दग्धलीं । नुगवतीचि पेरलीं ।
तैशीं कर्मेंचि परि तयां जाहली । मोक्षहेतु ॥ ८३ ॥

एथ आणिकही एक अर्जुना । हे कर्माकर्मविवंचना ।
आपुलिये चाडे सज्ञाना । योग्य नोहे ॥ ८४ ॥

किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः ।
तत् ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ज्ञात्वा मोक्ष्यसेऽशुभात् ॥ १६ ॥

मर्म म्हणिजे तें कवण । अथवा अकर्मा काय लक्षण ।
ऐसें विचारितां विचक्षण । गुंफोनि ठेले ॥ ८५ ॥

जैसें का कुडें नाणें । खर्‍याचेनि सारखेपणें ।
डोळ्यांचेहि देखणें । संशयी घाली ॥ ८६ ॥

तैसे नैष्कर्म्यतेचेनि भ्रमें । गिंवसिजत आहाति कर्में ।
जे दुजी सृष्टि मनोधर्में । करूं शकती ॥ ८७ ॥

वाचूनि मूर्खाची गोठी कायसी । एथ मोहले गा क्रांतदर्शी ।
म्हणोनि आतां तेचि परियेसीं । सांगेन तुज ॥ ८८ ॥

कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः ।
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः ॥ १७ ॥

तरी कर्म म्हणजे स्वभावें । जेथ विश्वाकारु संभवे ।
ते सम्यक आधीं जाणावें । लागे एथ ॥ ८९ ॥

मग वर्णाश्रमासि उचित । जे विशेष कर्म विहित ।
तेंही वोळखावें निश्चित । उपयोगेंसीं ॥ ९० ॥

पाठीं जें निषिद्ध म्हणिपे । तेंही बुझावें स्वरूपें ।
येतुलेनि येथ कांही न गुंफे । आपैसेंचि ॥ ९१ ॥

एर्‍हवीं जग हें कर्माधीन । ऐसी याची व्याप्ती गहन ।
परि तें असो आइकें चिन्ह । प्राप्ताचें गा ॥ ९२ ॥

कर्मण्य कर्म यः पश्येदकर्मणि च कर्म यः ।
स बुद्धिमान् मनुष्येषु स युक्तः कृत्स्नकर्मकृत् ॥ १८ ॥

जो सकळकर्मीं वर्ततां । देखे आपुली नैष्कर्म्यता ।
कर्मसंगे निराशता । फळाचिया ॥ ९३ ॥

आणि कर्तव्यतेलागीं । जया दुसरें नाहीं जगीं ।
ऐसिया नैष्कर्मता तरी चांगी । बोधला असे ॥ ९४ ॥

परि क्रियाकलापु आघवा । आचरतु दिसे बरवा ।
तरी तो इहीं चिन्हीं जाणावा । ज्ञानिया गा ॥ ९५ ॥

जैसा कां जळापाशीं उभा ठाके । तो जरी आपणपें जळामाजिं देखे ।
तरी तो निभ्रांत वोळखे । म्हणे मी वेगळा आहे ॥ ९६ ॥

अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ।
तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥ ९७ ॥

तैसे सर्व कर्मीं असणें । तें फुडें मानूनि वायाणें ।
मग आपणपें जो जाणे । नैष्कर्म्यु ऐसा ॥ ९८ ॥

आणि उदोअस्ताचेनि प्रमाणें । जैसे न चलतां सूर्याचें चालणें ।
तैसें नैष्कर्म्यत्व जाणे । कर्मीचि असतां ॥ ९९ ॥

तो मनुष्यासारिखा तरी आवडे । परी मनुष्यत्व तया न घडे ।
जैसें जळीं जळामाजीं न बुडे । भानुबिंब ॥ १०० ॥

तेणें न पाहतां विश्व देखिलें । न करितां सर्व केले ।
न भोगितां भोगिलें । भोग्यजात ॥ १०१ ॥

एकेचि ठायीं बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।
हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ॥ १०२ ॥

यस्य सर्वे समारम्भाः कामसंकल्पवर्जिताः ।
ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहुः पंडितं बुधाः ॥ १९ ॥

जया पुरुषाचां ठायीं । कर्माचा तरी खेदु नाहीं ।
परी फळापेक्षा कहीं । संचरेना ॥ १०३ ॥

आणि हें कर्म मी करीन । अथवा आदरिले सिद्धी नेईन ।
येणें संकल्पेंही जयाचें मन । विटाळेना ॥ १०४ ॥

ज्ञानाग्निचेनि मुखें । जेणें जाळिली कर्में अशेखें ।
तो ब्रह्मचि मनुष्यवेखें । वोळख तूं ॥ १०५ ॥

त्यक्त्वा कर्मफलासंगं नित्यतृप्तो निराश्रयः ।
कर्मण्यभिप्रवृत्तोऽपि नैव किंचित् करोति सः ॥ २० ॥

जो शरीरीं उदासु । फळभोगीं निरासु ।
नित्यता उल्हासु । होऊनि असे ॥ १०६ ॥

जो संतोषाचां गाभारां । आत्मबोधाचिया वोगरा ।
पुरे न म्हणेचि धनुर्धरा । आरोगितां ॥ १०७ ॥

निराशीर्यतचित्तात्मा त्यक्तसर्वपरिग्रहः ।
शारीरं केवलं कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिशम् ॥ २१ ॥

यदृच्छा लाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः ।
सम सिद्धावसिद्धौच कृत्वाऽपि न निबध्यते ॥ २२ ॥

कैसा अधिकाधिक आवडी । घेत महासुखाची गोडी ।
सांडोनियां आशा कुरोंडी । अहंभावेसीं ॥ १०८ ॥

म्हणोनि अवसरें जें जें पावे । तेणेचि तो सुखावे ।
जया आपुले आणि परावें । दोन्ही नाहीं ॥ १०९ ॥

तो दिठी जें पाहे । ते आपणचि होऊनि जाये ।
आइकें तें आहे । तोचि जाहाला ॥ ११० ॥

चरणीं हन चाले । मुखें जें जें बोले ।
ऐसें चेष्टाजात तेतुलें । आपणचि जो ॥ १११ ॥

हें असो विश्व पाहीं । जयासि आपणपेवांचूनि नाहीं ।
आता कवण तें कर्म कायी । बाधी तयातें ॥ ११२ ॥

हा मत्सरु जेथ उपजे । तेतुले नुरेचि जया दुजें ।
तो निर्मत्सरु काइ म्हणिजे । बोलवरी ॥ ११३ ॥

म्हणोनि सर्वांपरी मुक्तु । तो सकर्मुचि तो कर्मरहितु ।
सगुण परि गुणातीतु । एथ भ्रांति नाहीं ॥ ११४ ॥

गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित्चेतसः ।
यज्ञायाचरतः कर्म समग्रं प्रविलीयते ॥ २३ ॥

तो देहसंगे तरी असे । परी चैतन्यासारिखा दिसे ।
पाहतां परब्रह्माचेनि कसें । चोखाळु भला ॥ ११५ ॥

ऐसाही परी कौतुकें । जरी कर्मे करी यज्ञादिकें ।
तरी तियें लया जाती अशेखें । तयाचांचि ठायीं ॥ ११६ ॥

अकाळींची अभ्रें जैसी । उर्मीविण आकाशीं ।
हारपती आपैशीं । उदयलीं सांती ॥ ११७ ॥

तैशीं विधीविधान विहितें जरी आचरे तो समस्तें ।
तरी तियें ऐक्यभावें ऐक्यातें । पावतीचि गा ॥ ११८ ॥

ब्रह्मार्पणं ब्रह्महविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणा हुतम् ।
ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मस्माधिना ॥ २४ ॥

जें हें हवन मी होता । कां इये यज्ञीं हा भोक्ता ।
ऐसीया बुद्धीसि नाही भंगता । म्हणऊनियां ॥ ११९ ॥

जे इष्टयज्ञ यजावे । तें हविर्मंत्रादि आघवें ।
तो देखतसे अविनाशभावें । आत्मबुद्धि ॥ १२० ॥

म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आले जया सम ।
तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ॥ १२१ ॥

आतां अविवेककुमारत्वा मुकले । जयां विरक्तीचे पाणिग्रहण जाहलें ।
मग उपासन जिहीं आणिलें । योगाग्नीचें ॥ १२२ ॥

दैवमेवापरे यज्ञं योगिनः पर्युपासते ।
ब्रह्माग्नावपरे यज्ञं यज्ञेनैवोपजुह्वति ॥ २५ ॥

जे यजनशील अहर्निशीं । जिहीं अविद्या हविली मनेंसी ।
गुरुवाक्यहुताशीं । हवन केलें ॥ १२३ ॥

तिहीं योगाग्निकीं यजिजे । तो दैवयज्ञु म्हणिजे ।
जेणे आत्मसुख कामिजे । पंडुकुमरा ॥ १२४ ॥

दैवास्तव देहाचे पाळण । ऐसा निश्चयो परिपूर्ण ।
जो चिंतीना देहभरण । तो महायोगी जाण दैवयोगें ॥ १२५ ॥

आतां अवधारीं सांगेन आणिक । जे ब्रह्माग्नी साग्निक ।
तयांते यज्ञेंचि यज्ञु देख । उपासिजे ॥ १२६ ॥

श्रोत्रादीनींद्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति ।
शब्दादीन् विषयानन्य । इंद्रियाग्निषु जुह्वति ॥ २६ ॥

एथ संयमाग्निहोत्री । जे युक्तित्रयांच्यां मंत्रीं ।
यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ॥ १२७ ॥

एकां वैराग्यरवि विवळे । तंव संयती विहार केले ।
तेथ अपावृत्त जाहले । इंद्रियानळ ॥ १२८ ॥

तिहीं विरक्तीची ज्वाळा घेतली । तंव विकारांची इंधने पळिपलीं ।
तेथ आशाधूमें सांडिलीं । पांचही कुंडें ॥ १२९ ॥

मग वाक्यविधीचिया निरवडी । विषयआहुति उदंडी ।
हवन केलें कुंडी । इंद्रियाग्नीचां ॥ १३० ॥

सर्वाणीन्द्रियकर्माणि प्राणकर्माणि चापरे ।
आत्मसंयमयोगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते ॥ २७ ॥

एकीं ययापरी पार्था । दोषु क्षाळिले सर्वथा ।
आणिकीं हृदयारणीं मंथा । विवेकु केला ॥ १३१ ॥

तो उपशमें निहटिला । धैर्यें वरी दाटिला ।
गुरुवाक्यें काढिला । बळकटपणें ॥ १३२ ॥

ऐसे समरसें मंथन केलें । तेथ झडकरी काजा आलें ।
जे उज्जीवन जहालें । ज्ञानाग्नीचें ॥ १३३ ॥

पहिला ऋद्धिसिद्धीचा संभ्रमु । तो निवर्तोनि गेला धूमु ।
मग प्रगटला सूक्ष्मु । विस्फुलिंगु ॥ १३४ ॥

मन तयाचे मोकळें । तेचि पेटवण घातलें ।
जें यमदमीं हळुवारलें । आइतें होतें ॥ १३५ ॥

तेणें सादुकपणें ज्वाळा समृद्धा । मग वासनांतराचिया समिधा ।
स्नेहेंसी नानाविधा । जाळिलिया ॥ १३६ ॥

तेथ सोहंमंत्रें दीक्षितीं । इंद्रियकर्मांचिया आहुती ।
तिये ज्ञानानळीं प्रदीप्तीं । दिधलिया ॥ १३७ ॥

पाठीं प्राणक्रिचेनि स्रुवेनिशीं । पूर्णाहुती पडली हुताशीं ।
तेथ अवभृत समरसीं । सहजें जाहलें ॥ १३८ ॥

मग आत्मबोधींचे सुख । जे संयमाग्नीचें हुतशेष ।
तोचि पुरोडाशु देख । घेतला तिहीं ॥ १३९ ॥

एक ऐशिया इहीं यजनीं । मुक्त ते जाहले त्रिभुवनीं ।
या यज्ञक्रिया तरी आनानी । परि प्राप्य तें एक ॥ १४० ॥

द्रव्ययज्ञास्तपोयज्ञा योगयज्ञास्तथापरे ।
स्वाध्यायज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रताः ॥ २८ ॥

एक द्रव्ययज्ञु म्हणिपती । एक तपसामग्रिया निपजती ।
एक योगयागुही आहाती । जे सांगितले ॥ १४१ ॥

एकीं शब्दीं शब्दु यजिजे । तो वाग्यज्ञु म्हणिजे ।
ज्ञाने ज्ञेय गमिजे । तो ज्ञानयज्ञु ॥ १४२ ॥

हें अर्जुना सकळ कुवाडें । जे अनुष्ठितां अतिसांकडे ।
परी जितेंद्रियासीचि घडे । योग्यतावशें ॥ १४३ ॥

ते प्रवीण तेथ भले । आणि योगसमृद्धी आथिले ।
म्हणोनि आपणपां तिहीं केले । आत्महवन ॥ १४४ ॥

अपाने जुह्वति प्राणं प्राणेऽपाऽनं तथापरे ।
प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः ॥ २९ ॥

मग अपाग्नीचां मुखी । प्राणद्रव्यें देखी ।
हवन केलें एकीं । अभ्यासयोगें ॥ १४५ ॥

एकु अपानु प्राणीं अर्पिती । एक दोहींतेंही निरुंधिती ।
ते प्राणायामी म्हणिपती । पंडुकुमरा ॥ १४६ ॥

अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति ।
सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः ॥ ३० ॥

एक वज्रयोगक्रमें । सर्वाहारसंयमें ।
प्राणीं प्राणु संभ्रमें । हवन करिती ॥ १४७ ॥

ऐसे मोक्षकाम सकळ । समस्त हे यजनशीळ ।
जिहीं यज्ञद्वारा मनोमळ । क्षाळण केले ॥ १४८ ॥

जया अविद्याजात जाळितां । जे उरलें निजस्वभावता ।
जेथ अग्नि आणि होता । उरेचिना ॥ १४९ ॥

जेथ यजितयाचा कामु पुरे । यज्ञींचें विधान सरे ।
मागुते जेथूनि वोसरे । क्रियाजात ॥ १५० ॥

विचार जेथ न रिगे । हेतु जेथ न निगे ।
जें द्वैतदोषसंगें । सिंपेचिना ॥ १५१ ॥

यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् ।
नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरुसत्तम ॥ ३१ ॥

ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञावशिष्ट ।
तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रे ॥ १५२ ॥

ऐसे शेषामृते धाले । कीं अमर्त्यभावा आले ।
म्हणोनि ब्रह्म ते जहाले । अनायासे ॥ १५३ ॥

येरां विरक्ति माळ न घालीचि । जयां संयमाग्नीची सेवा न घडेचि ।
जें योगयागु न करितीचि । जन्मले सांते ॥ १५४ ॥

जयां ऐहिक धड नाहीं । तयांचें परत्र पुससी काई ।
म्हणोनि सांगों कां वांई । पंडुकुमरा ॥ १५५ ॥

एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे ।
कर्मजान् विद्धि तान् सर्वानेवं ज्ञात्वा विमोक्षसे ॥ ३२ ॥

ऐसे बहुतीं परीं अनेग । जे सांगितले तुज कां याग ।
ते विस्तारुनि वेदेंचि चांग । म्हणितले आहाती ॥ १५६ ॥

परि तेणें विस्तारें काय करावें । हेंचि कर्मसिद्ध जाणावें ।
येतुलेनि कर्मबंधु स्वभावें । पावेल ना ॥ १५७ ॥

श्रेयान् द्रव्यमयाद् यज्ञान् ज्ञानयज्ञः परंतप ।
सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते ॥ ३३ ॥

अर्जुना वेदु जयांचे मूळ । जे क्रियाविशेषें स्थूळ ।
जयां नव्हाळियेचे फळ । स्वर्गसुख ॥ १५८ ॥

ते द्रव्यादियागु कीर होती । परी ज्ञानयज्ञाची सरी न पवती ।
जैशी तारातेजसंपत्ती । दिनकरापाशीं ॥ १५९ ॥

देखें परमात्मसुखनिधान । साधावया योगीजन ।
जें न विसंबिती अंजन । उन्मेषनेत्रीं ॥ १६० ॥

जें धांवतया कर्माची लाणी । नैष्कर्म्यबोधाची खाणी ।
जें भुकेलिया धणी । साधनाची ॥ १६१ ॥

जेथ प्रवृत्ति पांगुळ जाहली । तर्काची दिठी गेली ।
जेणें इंद्रिये विसरलीं । इंद्रियसंगु ॥ १६२ ॥

मनाचे मनपण गेलें । जेथ बोलाचे बोलपण ठेलें ।
जयामाजि सांपडलें । ज्ञेय दिसें ॥ १६३ ॥

जेथ वैराग्याचा पांगु फिटे । विवेकाचाही सोसु तुटे ।
जेथ न पाहता सहज भेटे । आपणपें ॥ १६४ ॥

तद् विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ।
उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्वदर्शिनः ॥ ३४ ॥

तें ज्ञान पैं गा बरवें । जरी मनीं आथि आणावें ।
तरी संतां यां भजावें । सर्वस्वेंशीं ॥ १६५ ॥

जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।
तू स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ॥ १६६ ॥

तरी तनुमनुजीवें । चरणासी लागावें ।
आणि अगर्वता करावें । दास्य सकळ ॥ १६७ ॥

मग अपेक्षित जें आपुलें । तेंही सांगती पुसिलें ।
जेणे अंतःकरण बोधलें । संकल्पा न ये ॥ १६८ ॥

यज् ज्ञात्वा न पुनर्मोहमेवं यास्यसि पांडव ।
येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि ॥ ३५ ॥

जयाचेनि वाक्यउजिवडें । जाहलें चित्त निधडें ।
ब्रह्माचेनि पाडे । निःशंकु होय ॥ १६९ ॥

ते वेळीं आपणपेया सहितें । इये अशेषेंही भूतें ।
माझां स्वरूपीं अखंडितें । देखसी तूं ॥ १७० ॥

ऐसें ज्ञानप्रकाशें पाहेल । तैं मोहांधकारू जाईल ।
जैं गुरुकृपा होईल । पार्था गा ॥ १७१ ॥

अपि चेदसी पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः ।
सर्व ज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि ॥ ३६ ॥

जरी कल्मषांचा आगरु । तूं भ्रांतीचा सागरु ।
व्यामोहाचा डोंगरु । होऊनि अससी ॥ १७२ ॥

तर्ही ज्ञानशक्तीचेनि पाडें । हें आघवेंची गा थोकडें ।
ऐसे सामर्थ्य असे चोखडें । ज्ञानी इये ॥ १७३ ॥

देखें विश्वभ्रमाऐसा । जो अमूर्ताचा कवडसा ।
तो जयाचिया प्रकाशा । पुरेचिना ॥ १७४ ॥

तया कायसें हें मनोमळ । हें बोलतांचि अति किडाळ ।
नाहीं येणें पाडें हे ढिसाळ । दुजें जगीं ॥ १७५ ॥

यथैधांसि समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ।
ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा ॥ ३७ ॥

सांगे भुवनत्रयाची काजळी । जे गगनामाजि उधवली ।
तिये प्रळयींचे वाहुटळी । काय अभ्र पुरे ॥ १७६ ॥

कीं पवनाचेनि कोंपें । पाणियेंचि जो पळिपें ।
तो प्रळयानळु दडपे । तृणें काष्ठे काइ ॥ १७७ ॥

न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ।
तत् स्वयं योगसंसिद्धः कालेनात्मनि विन्दति ॥ ३८ ॥

म्हणोनि असे हें न घडे । तें विचारितांचि असंगडे ।
पुढती ज्ञानाचेनि पाडें । पवित्र न दिसे ॥ १७८ ॥

एथ ज्ञान हें उत्तम होये । आणिकही एक तैसें के आहे ।
जैसें चैतन्य कां नोहे । दुसरे गा ॥ १७९ ॥

या महातेजाचेनि कसें । जरी चोखाळु प्रतिबिंब दिसे ।
कां गिंवसिलें गिंवसे । आकाश हें ॥ १८० ॥

ना तरी पृथ्वीचेनि पाडें । कांटाळें जरी जोडे ।
तरी उपमा ज्ञानी घडे । पंडुकुमरा ॥ १८१ ॥

म्हणूनी बहुतीं परीं पाहतां । पुढतपुढती निर्धारिता ।
हे ज्ञानाची पवित्रता । ज्ञानींचि आथि ॥ १८२ ॥

जरी अमृताचि चवी निवडिजे । तरी अमृतासारखी म्हणिजे ।
तैसें ज्ञान हें उपमिजे । ज्ञानेसींचि ॥ १८३ ॥

आतां यावरि जे बोलणे । ते वायां वेळु फेडणें ।
तंव सांचचि जी हे पार्थु म्हणे । जें बोलत असां ॥ १८४ ॥

परि तेंचि ज्ञान केवीं जाणावें । ऐसें अर्जुनें जंव पुसावें
तंव तें मनोगत देवें । जाणितलें ॥ १८५ ॥

मग म्हणतसे किरीटी । आतां चित्त देयीं गोठी ।
सांगेन ज्ञानाचिये भेटी । उपाय तुज ॥ १८६ ॥

श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ।
ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिमचिरेणाधिगच्छति ॥ ३९ ॥

तरी आत्मसुखाचिया गोडिया । विटे जो कां सकळ विषयां ।
जयां ठायीं इंद्रियां । मानु नाही ॥ १८७ ॥

जो मनाचि चाड न सांगे । जो प्रकृतीचे केलें नेघे ।
जो श्रद्धेचेनि संभोगें । सुखिया जाहला ॥ १८८ ॥

तयातेंचि गिंवसित । हेंहें ज्ञान पांवे निश्चित ।
जयामाजि अचुंबित । शांति असे ॥ १८९ ॥

तें हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।
मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ॥ १९० ॥

मग जेऊति वास पाहिजे । तेऊति शांतीचि देखिजे ।
तेथ अपारा पारु नेणिजे । निर्धारितां ॥ १९१ ॥

ऐसा हा उत्तरोत्तरु । ज्ञानबीजाचा विस्तारु ।
सांगता असे अपारु । परि असो आतां ॥ १९२ ॥

अज्ञाश्चाश्रद्दधानश्च संशयात्मा विनश्यति ।
मायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः ॥ ४0॥

ऐकें जया प्राणियाचां ठायीं । इया ज्ञानाची आवडी नाहीं ।
तयाचें जियालें म्हणों काई । वरी मरण चांग ॥ १९३ ॥

शून्य जैसें गृह । कां चैतन्येंवीण देह ।
तैसें जीवित तें संमोह । ज्ञानहीना ॥ १९४ ॥

अथवा ज्ञान कीर आपु नोहे । परी ते चाड एकी जरी वाहे ।
तरी तेथ जिव्हाळा कांही आहे । प्राप्तीचा पैं ॥ १९५ ॥

वांचूनि ज्ञानाची गोठी कायसी । परी ते आस्थाही न धरी मानसीं ।
तरी तो संशयरूप हुताशीं । पडिला जाण ॥ १९६ ॥

जे अमृतही परि नावडे । ऐसें सावियाचि आरोचकु जैं पडे ।
तैं मरण आले आलें असे फुडें । जाणों ये कीं ॥ १९७ ॥

तैसा विषयसुखें रंजे । जो ज्ञानेंसींचि माजे ।
तो संशये अंगीकारिजे । एथ भ्रांति नाहीं ॥ १९८ ॥

मग संशयी जरी पडला । तरी निभ्रांत जरी नासला ।
ति ऐहिकपरत्रा मुकला । सुखासी गा ॥ १९९ ॥

जया काळज्वरु आंगी बाणे । तो शीतोष्णें जैशीं नेणे ।
आगी आणि चांदिणें । सरिसेंचि मानी ॥ २०० ॥

तैसे साच आणि लटिकें । विरुद्ध आणि निकें ।
संशयी तो नोळखे । हिताहित ॥ २०१ ॥

हा रात्रिदिवसु पाहीं जैसा । जात्यंधा ठाउवा नाहीं ।
तैसे संशयीं असतां काहीं । मना न ये ॥ २०२ ॥

म्हणऊनि संशयाहुनि थोर । आणिक नाही पाप घोर ।
हा विनाशाची वागुर । प्राणियासी ॥ २०३ ॥

येणें कारणे तुवा त्यजावा । आधी हाचि एकु जिणावा ।
जो ज्ञानाचिया अभावा- । माजी असे ॥ २०४ ॥

जैं अज्ञानाचे गडद पडे । तैं हा बहुवस मनीं वाढे ।
म्हणोनि सर्वथा मागु मोडे । विश्वासाचा ॥ २०५ ॥

हृदयी हाचि न समाये । बुद्धींते गिंवसूनि ठाये ।
तेथ संशयात्मक होये । लोकत्रय ॥ २०६ ॥

योगसंन्यस्तकर्माणि ज्ञानसंछिन्नसंशयम् ।
आत्मवंतं न कर्माणि निबध्नन्ति धनंजयः ॥ ४१ ॥

ऐसे जरी थोरावे । तरी उपायें एकें आंगवे ।
जरी हाती होय बरवें । ज्ञानखड्ग ॥ २०७ ॥

तरी तेणें ज्ञानशस्त्रें तिखटें । निखळु हा निवटे ।
मग निःशेष खता फिटे । मानसींचा ॥ २०८ ॥

तस्मादज्ञानसंभूतं हृत्स्थं ज्ञानासिनात्मनः ।
छित्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत ॥ ४२ ॥

याकारणे पार्था । उठीं वेगीं वरौता ।
नाशु करोनि हृदयस्था । संशयासी ॥ २०९ ॥

ऐसे सर्वज्ञानाचा बापु । जो कृष्ण ज्ञानदीपु ।
तो म्हणतसे सकृपु । ऐकें राया ॥ २१० ॥

तंव या पूर्वापर बोलाचा । विचारुनि कुमरु पंडूचा ।
कैसा प्रश्नु हन अवसरींचा । करिता होईल ॥ २११ ॥

ते कथेची संगति । भावाची संपत्ति ।
रसाचि उन्नति । म्हणिपेल पुढां ॥ २१२ ॥

जयाचिया बरवेपणीं । कीजे आठां रसांची ओवाळणी ।
सज्जनाचिये आयणी । विसांवा जगी ॥ २१३ ॥

तो शांतुचि अभिनवेल । ते परियेसा मऱ्हाठे बोल ।
जे समुद्राहूनि खोल । अर्थभरित ॥ २१४ ॥

जैसें बिंब तरी बचकें एवढें । परि प्रकाशा त्रैलोक्य थोकडें ।
शब्दाची व्याप्ती तेणें पाडें । अनुभवावी ॥ २१५ ॥

ना तरी कामितयाचिया इच्छा । फळे कल्पवृक्षु जैसा ।
बोल व्यापकु होय तैसा । तरी अवधान द्यावे ॥२१६ ॥

हें असो काय म्हणावें । सर्वज्ञु जाणतीं स्वभावें ।
तरी निकें चित्त द्यावें । हें विनंती माझी ॥ २१७ ॥

जेथ साहित्य आणि शांति । हे रेखा दिसे बोलती ।
जैसी लावण्यगुणकुळवती । आणि पतिव्रता ॥२१८ ॥

आधींचि साखर आवडे । आणि तेचि जरी ओखदीं जोडे ।
तरी सेवावी ना कां कोडें । नावानावा ॥ २१९ ॥

सहजे मलयानिळु मंद सुगंधु । तया अमृताचा होय स्वादु ।
आणि तेथेंचि जोडे नादु । जरी दैवगत्या ॥ २२० ॥

तरी स्पर्शें सर्वांग निववी । स्वादें जिव्हेतें नाचवी ।
तेवीचि कानाकरवीं । म्हणवी बापु माझा ॥ २२१ ॥

तैसे कथेचें इये ऐकणें । एक श्रवणासि होय पारणें ।
मग संसारदुःख मूळवणें । विकृतीविणें ॥ २२२ ॥

जरी मंत्रेचि वैरी मरे । तरी वायांचि कां बांधावीं कटारें ।
रोग जाये दुधें साखरे । तरी निंब कां पियावा ॥ २२३ ॥

तैसा मनाचा मारु न करितां । आणि इंद्रियां दुःख न देतां ।
एथ मोक्षु असे आयता । श्रवणाचिमाजी ॥ २२४ ॥

म्हणोनि आथिलिया आराणुका । गीतार्थु हा निका ।
ज्ञानदेवो म्हणे आइका । निवृत्तीदासु ॥ २२५ ॥

चौथा अध्याय समाप्त



ज्ञानेश्वरी अन्य अध्याय


ज्ञानेश्वरी अध्याय पहिला | Dnyaneshwari Adhyay-1 | ज्ञानेश्वरी अध्याय 1
ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा | Dnyaneshwari Adhyay-2 | ज्ञानेश्वरी अध्याय 2
ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा | Dnyaneshwari Adhyay-3 | ज्ञानेश्वरी अध्याय 3
ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा | Dnyaneshwari Adhyay-5 | ज्ञानेश्वरी अध्याय 5
ज्ञानेश्वरी अध्याय सहावा | Dnyaneshwari Adhyay-6 | ज्ञानेश्वरी अध्याय 6
ज्ञानेश्वरी अध्याय सातवा | Dnyaneshwari Adhyay-7 | ज्ञानेश्वरी अध्याय 7

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks