ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा | Dnyaneshwari Adhyay 2

ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा | Dnyaneshwari Adhyay-2 | ज्ञानेश्वरी अध्याय 2


संजय उवाच :
तं तथा कृपयाविष्टमश्रूपूर्णाकुलेक्षणम् ।
विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः ॥ १॥

मग संजयो म्हणे रायातें । आइकें तो पार्थु तेथें ।
शोकाकुल रुदनातें । करितुसे ॥ १॥

तें कुळ देखोनि समस्त । स्नेह उपनलें अद्भुत ।
तेणें द्रवले असे चित्त । कवणेपरी ॥ २ ॥

जैसें लवण जळें झळंबलें । ना तरी अभ्र वातें हाले ।
तैसे सधीर परी विरमलें । हृदय तयाचें ॥ ३॥

म्हणोनि कृपा आकळिला । दिसतसे अति कोमाइला ।
जैसा कर्दमीं रुपला । राजहंस ॥ ४ ॥

तयापरी तो पांडुकुमरु । महामोहें अतिजर्जरु ।
देखोनि । शार्गङधरु । काय बोले ॥ ५ ॥

श्रीभगवानुवाच : कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् ।
अनार्यजुष्टमस्वर्ग्यमकीर्तीकरमर्जुन ॥ २ ॥

म्हणे अर्जुना आदि पाहीं । हें उचित काय इये ठायीं ।
तूं कवण हें कायी । करीत आहासी ॥ ६ ॥

तुज सांगे काय जाहलें । कवण उणें आलें ।
करितां काय ठेलें । खेदु कायिसा ॥ ७ ॥

तूं अनुचिता चित्त नेदिसी । धीरु कंहीच न संडिसी ।
तुझेनि नामे अपयशीं । दिशा लंघिजे ॥ ८ ॥

तू शूरवृत्तीचा ठावो । क्षत्रियांमाजीं रावो ।
तुझिया लाठेपणाचा आवो । तिहीं लोकीं ॥ ९ ॥

तुवा संग्रामीं हरु जिंतिला । निवात्कवचांचा ठावो फेडिला ।
पवाडा तुवां केला । गंधर्वासी ॥ १० ॥

हें पाहता तुझेनि पाडें । दिसे त्रैलोक्यही थोकडें ।
ऐसें पौरुष चोखडें । पार्था तुझे ॥ ११ ॥

तो तूं कीं आजि एथें । सांडुनिया वीरवृत्तीतें ।
अधोमुख रुदनातें । करितु आहासी ॥ १२ ॥

विचारीं तूं अर्जुनु । कीं कारुण्यें कीजसी दीनु ।
सांग पां अंधकारे । भानु ग्रासिला आथी ॥ १३ ॥

ना तरी पवनु मेघासी बिहे । कीं अमृतासी मरण आहे ।
पाहे पा इंधनचि गिळोनि जाये । पावकातें ॥ १४ ॥

की लवणेंचि जळ विरे । संसर्गें काळकूट मरे ।
सांग महाफणी दर्दुरें । गिळिजे कायी ॥ १५ ॥

सिंहासी झोंबे कोल्हा । ऐसा अपाडु आथी कां जाहला ।
परी तो त्वां साच केला । आजि एथ ॥ १६ ॥

म्हणोनि अझुनि अर्जुना । झणें चित्त देसी या हीना ।
वेगीं धीर करूनियां मना । सावधान होईं ॥ १७ ॥

सांडी हे मूर्खपण । उठीं घे धनुष्यबाण ।
संग्रामीं हें कवण । कारुण्य तुझे ॥ १८ ॥

हां गा तू जाणता । तरी न विचारीसी कां आता ।
सांगे झुंजावेळें सदयता । उचित कायी ॥ १९ ॥

हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि पारत्रिकासी अपभ्रंशु ।
म्हणे जगन्निवासु । अर्जुनातें ॥ २० ॥

क्लैब्यं मा स्म गमः पार्थ नैतत् त्वय्युपपद्यते ।
क्षुद्रं ह्रदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप ॥ ३ ॥

म्हणोनि शोक न करीं । तूं पुरता धीरु धरीं ।
हे शोच्यता अव्हेरीं । पंडुकुमरा ॥ २१ ॥

तुज नव्हे हें उचित । येणें नासेल जोडले बहुत ।
तूं अझुनिवरी हित । विचारी पां ॥ २२ ॥

येणें संग्रामाचेनि अवसरें । एथ कृपाळुपण नुपकरे ।
हे आतांचि काय सोयरे । जाहले तुज ॥ २३ ॥

तूं आधींचि काय नेणसी । कीं गोत्र नोळखसी ।
वायांचि काय करिसी । अतिशो आतां ॥ २४ ॥

आजिंचे हें काय झुंज । काय जन्मा नवल तुज ।
हें परस्परें तुम्हां व्याज । सदाचि आथि ॥ २५ ॥

तरी आतां काय जाहलें । कायि स्नेह उपनले ।
हें नेणिजे परि कुडे केले । अर्जुना तुवा ॥ २६ ॥

मोह धरिलिया ऐसें होईल । जे असती प्रतिष्ठा जाईल ।
आणि परलोकही अंतरेल । ऐहिकेंसी ॥ २७ ॥

हृदयाचे ढिलेपण । एथ निकयासी नव्हे कारण ।
हें संग्रामीं पतन जाण । क्षत्रीयांसी ॥ २८ ॥

ऐसेनि तो कृपावंतु । नानापरी असे शिकवितु ।
हे ऐकोनि पंडुसुतु । काय बोले ॥ २९ ॥

अर्जुन उवाचः कथं च भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन ।
इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हावरिसूदन ॥ ४॥

देवा हें येतुलेवरी । बोलावे नलगे अवधारीं ।
आधीं तूंचि चित्ती विचारीं । संग्रामु हा ॥ ३० ॥

हें झुंज नव्हे प्रमादु । एथ प्रवर्तलिया दिसतसे बाधु ।
हा उघडा लिंगभेदु । वोढवला आम्हा ॥ ३१ ॥

देखें मातापितरें अर्चिजती । सर्वस्वें तोष पावविजती ।
तियें पाठीं केवीं वधिजती । आपुला हातीं ॥ ३२ ॥

देवा संतवृंदु नमस्कारिजे । कां घडे तरी पूजिजे ।
हें वांचूनि केवीं निंदिजे । स्वयें वाचा ॥ ३३ ॥

तैसे गोत्रगुरु आमुचे । हे पूजनीय आम्हां नियमांचे ।
मज बहुत भीष्मद्रोणांचे । वर्ततसे ॥ ३४ ॥

जयालागीं मनें विरु । आम्ही स्वप्नींही न शको धरूं ।
तया प्रत्यक्ष केवीं । घातु देवा ॥ ३५ ॥

वर जळो हें जियालें । एथ आघवेयांसी हेंचि काय जाहले ।
जे यांचां वधीं अभ्यासिलें । मिरविजे आम्हीं ॥ ३६ ॥

मी पार्थु द्रोणाचा केला । येणें धनुर्वेदु मज दिधला ।
तेणें उपकारें काय आभारैला । वधीं तयातें ॥ ३७ ॥

जेथींचिया कृपा लाभिजे वरु । तेथेंचि मने व्यभिचारु ।
तरी काय मी भस्मासुरु । अर्जुन म्हणे ॥ ३८ ॥

गुरूनहत्वा हि महानुभवान् श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके ।
हत्वार्थकामांस्तु गुरूनिहैव भुंजीय भोगान् रुधिरप्रदिग्धान् ॥ ५ ॥

देवा समुद्र गंभीर आइकिजे । वर तोहि आहाच देखिजे ।
परी क्षोभु मनीं नेणिजे । द्रोणाचिये ॥ ३९ ॥

हें अपार जें गगन । वर तयाही होईल मान ।
परि अगाध भलें गहन । हृदय यांचे ॥ ४० ॥

वरी अमृतही विटे । कीं काळवशें वज्र फुटे ।
परि मनोधर्मु न लोटे । विकरविला हा ॥ ४१ ॥

स्नेहालागीं माये । म्हणिपे तें कीरु होये ।
परि कृपा ते मूर्त आहे । द्रोणीं इये ॥ ४२ ॥

हा कारुण्याची आदि । सकळ गुणांचा निधि ।
विद्यासिंधु निरवधि । अर्जुन म्हणे ॥ ४३ ॥

हा येणें मानें महंतु । वरी आम्हांलागी कृपावंतु ।
आतां सांग पां येथ घातु । चिंतूं येईल ॥ ४४ ॥

ऐसे हे रणीं वधावे । मग आपण राज्यसुख भोगावें ।
तें मना न ये आघवें । जीवितेंसीं ॥ ४५ ॥

हें येणें मानें दुर्भर । जे याहीहुनि भोग सधर ।
ते असतु येथवर । भिक्षा मागतां भली ॥ ४६ ॥

ना तरी देशत्यागें जाइजे । का गिरिकंदर सेविजे ।
परी शस्त्र आतां न धरिजे । इयांवरी ॥ ४७ ॥

देवा नवनिशतीं शरीं । वावरोनि यांचां जिव्हारीं ।
भोग गिंवसावे रुधिरीं । बुडाले जे ॥ ४८ ॥

ते काढूनि काय कीजती । लिप्त केवीं सेविजती ।
मज न ये हे उपपत्ति । याचिलागीं ॥ ४९ ॥

ऐसे अर्जुन तिये अवससरीं । म्हणे श्रीकृष्णा अवधारीं ।
परि ते मना न येचि मुरारी । आइकोनियां ॥ ५० ॥

हें जाणोनि पार्थु बिहाला । मग पुनरपि बोलों लागला ।
म्हणे देवो कां चित्त या बोलां । देतीचिना ॥ ५१ ॥

न चैतद् विद्मः करतन् नो गरीयो यद् वा जयेम यदि वा नो जयेयुः ।
यानेव हत्वा न जिजीविषामस्तेऽवस्थिताः प्रमुखे धार्तराष्ट्राः ॥ ६ ॥

येर्‍हवीं माझां चित्तीं जें होते । तें मी विचारूनि बोलिलों एथें ।
परि निकें काय यापरौते । तें तुम्ही जाणा ॥ ५२ ॥

पै विरु जयांसी ऐकिजे । आणि या बोलाचि प्राणु सांडिजे ।
ते एथ संग्रामव्याजें । उभे आहाती ॥ ५३ ॥

आतां ऐसेयांतें वधावे । कीं अव्हेरुनिया निघावें ।
या दोहोंमाजी काइ करावे । तें नेणों आम्ही ॥ ५४ ॥

कार्पण्यदोषोपहत्स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसंमूढचेताः ।
यत् श्रेयः स्यान् निश्चितं ब्रूहि तन् मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम् ॥ ७॥

आम्हां काय उचित । तें पाहतां न स्फुरे एथ ।
जे मोहें येणें चित्त । व्याकुळ माझे ॥ ५५ ॥

तिमिरावरुद्ध जैसें । दृष्टीचे तेज भ्रंशे ।
मग पांसीच असतां न दिसे । वस्तुजात ॥ ५६ ॥

देवा मज तैसे जाहले । जें मन भ्रांती ग्रासिलें ।
आतां काय हित आपुलें । तेंही नेणे ॥ ५७ ॥

तरी श्रीकृष्णा तुवां जाणावें । निकें तें आम्हां सांगावें ।
जे सखा सर्वस्व आघवें । आम्हांसी तूं ॥ ५८ ॥

तूं गुरु बंधु पिता । तूं आमची इष्ट देवता ।
तूंचि सदा रक्षिता । आपदीं आमुतें ॥ ५९ ॥

जैसा शिष्यांते गुरु । सर्वथा नेणे अव्हेरु ।
कीं सरितांते सागरु । त्यजी केवीं ॥ ६०॥

नातरी अपत्यातें माये । सांडुनि जरी जाये ।
तरी ते कैसेनिं जिये । ऐकें कृष्णा ॥ ६१ ॥

तैसा सर्वांपरी आम्हांसी । देवा तूंचि एक आहासी ।
आणि बोलिलें जरी न मानिसी । मागील माझें ॥ ६२ ॥

तरी उचित काय आम्हां । जे व्यभिचरेना धर्मा ।
तें झडकरी पुरुषोत्तमा । सांगें आतां ॥ ६३ ॥

न हि प्रपश्यामि ममापुनुद्याद् यच्छोकमुछोषणमिन्द्रियाणाम् ।
अवाप्य भूमावसपत्नमृद्धं राज्यं सुराणामपि चाधिपत्यम् ॥ ८ ॥

हें सकळ कुळ देखोनि । जो शोकु उपजलासे मनीं ।
तो तुझिया वाक्यावांचुनि । न जाय आणिकें ॥ ६४ ॥

एथ पृथ्वीतळ आपु होईल । हें महेंद्रपदही पाविजेल ।
परि मोह हा न फिटेल । मानसींचा ॥ ६५ ॥

जैसीं बीजें सर्वथा आहाळलीं । तरी सुक्षेत्री जर्‍ही पेरिलीं ।
तरी न विरुढती सिंचलीं । आवडे तैसीं ॥ ६६ ॥

ना तरी आयुष्य पुरलें आहे । तरी औषधें काही नोहे ।
एथ एकचि उपेगा जाये । परमामृत ॥ ६७ ॥

तैसे राज्यभोगसमृद्धि । उज्जीवन नोहे जीवबुद्धि ।
एथ जिव्हाळा कृपानिधि । कारुण्य तुझें ॥ ६८ ॥

ऐसें अर्जुन तेथ बोलिला । जंव क्षण एक भ्रांति सांडिला ।
मग पुनरपि व्यापिला । उर्मीं तेणें ॥ ६९ ॥

कीं मज पाहता उर्मी नोहे । हें अनारिसें गमत आहे ।
तो ग्रासिला महामोहें । काळसर्पें ॥ ७० ॥

सवर्म हृदयकल्हारीं । तेथ कारुण्यवेळेचां भरीं ।
लागला म्हणोनि लहरी । भांजेचि ना ॥ ७१ ॥

हें जाणोनि ऐसी प्रौढी । जो दृष्टीसवें विष फेडी ।
तो धावया श्रीहरी गारुडी । पातला कीं ॥ ७२ ॥

तैसिया पंडुकुमरा व्याकुळा । मिरवतसे श्रीकृष्ण जवळा ।
तो कृपावशें अवलीळा । रक्षील आतां ॥ ७३ ॥

म्हणोनि तो पार्थु । मोहफणिग्रस्तु ।
म्यां म्हणितला हा हेतु । जाणोनियां ॥ ७४ ॥

मग देखा तेथ फाल्गुनु । घेतला असे भ्रांती कवळूनु ।
जैसा घनपडळीं भानु । आच्छादिजे ॥ ७५ ॥

तयापरी तो धर्नुधरू । जाहलासे दुःखे जर्जरु ।
जैसा ग्रीष्मकाळीं गिरिवरु । वणवला कां ॥ ७६ ॥

म्हणोनि सहजे सुनिळु । कृपामृते सजळु ।
तो वोळलासे श्रीगोपाळु । महामेघु ॥ ७७ ॥

तेथ सुदर्शनाची द्युति । तेचि विद्युल्लता झळकती ।
गंभीर वाचा ते आयती । गर्जनेची ॥ ७८ ॥

आतां तो उदार कैसा वर्षेल । तेणे अर्जुनाचळु निवेल ।
मग नवी विरुढी फुटेल । उन्मेषाची ॥ ७९ ॥

ते कथा आइका । मनाचिया आराणुका ।
ज्ञानदेवो म्हणे देखा । निवृत्तिदासु ॥ ८० ॥

संजय उवाच: एवमुक्त्वा हृषीकेशं गुडाकेशः परंतपः ।
न योत्स्य इति गोविंदमुक्त्वा तूष्णीं बभूव ह ॥ ९ ॥

ऐसें संजयो सांगतु । म्हणे राया तो पार्थु ।
पुनरपि शोकाकुलितु । काय बोले ॥ ८१ ॥

आइकें सखेदु बोले श्रीकृष्णातें । आतां नाळवावें तुम्हीं मातें ।
मी सर्वथा न झुंजें येथें । भरंवसेनि ॥ ८२ ॥

ऐसें येकि हेळां बोलिला । मग मौन धरोनि ठेला ।
तेथ श्रीकृष्णा विस्मो पातला । देखोनि तयाते ॥ ८३ ॥

तमुवाच हृषीकेशः प्रहसन्निव भारत ।
सेनयोरुभयोर्मध्ये विषीदंतमिदं वचः ॥ १० ॥

मग आपुला चित्तीं म्हणे । एथ हें काय आदरिलें येणें ।
अर्जुन सर्वथा कांही नेणे । काय कीजे ॥ ८४ ॥

हा उमजे आतां कवणेपरी । कैसेनि धीरु स्वीकारी ।
जैसा ग्रहाते पंचाक्षरी । अनुमानी कां ॥ ८५ ॥

ना तरी असाध्य देखोनि व्याधी । अमृतासम दिव्य औषधी ।
वैद्य सूचि निरवधि । निदानींची ॥ ८६ ॥

तैसा विवरितु असे श्रीअनंतु । तया दोन्हीं सैन्याआंतु ।
जयापरी पार्थु । भ्रांति सांडी ॥ ८७ ॥

तें कारण मनीं धरिलें । मग सरोष बोलों आदरिले ।
जैसें मातेच्या कोपीं थोकलें । स्नेह आथी ॥ ८८ ॥

कीं औषधाचिया कडुवटपणीं । जैसी अमृताची पुरवणी ।
ते आहाच न दिसे परी गुणीं । प्रकट होय ॥ ८९ ॥

तैसे वरिवरि पाहतां उदासें । आंत तरी अतिसुरसें ।
तियें वाक्यें हृषीकेशें । बोलों आदरिलीं ॥ ९० ॥

श्रीभगवानुवाच: अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे ।
गतासूनगतासूंश्च नानुशोचंति पंडितः ॥ ११ ॥

मग अर्जुनाते म्हणितलें । आम्ही आजि हें नवल देखिलें ।
जें तुवां येथ आदरिलें । माझारींचि ॥ ९१ ॥

तूं जाणता तरी म्हणविसी । परी नेणीवेतें न संडिसी ।
आणि शिकवूं म्हणों तरी बोलसी । बहुसाल नीति ॥ ९२ ॥

जात्यंधा लागे पिसें । मग तें सैरा धांवे जैसें ।
तुझे शहाणपण तैसें । दिसतसे ॥ ९३ ॥

तूं आपणपें तरी नेणसी । परी या कौरवांते शोचूं पहासी ।
हा बहु विस्मय आम्हांसी । पुढतपुढती ॥ ९४ ॥

तरी सांग पां मज अर्जुना । तुजपासोनि स्थिती या त्रिभुवना ।
हे अनादि विश्वरचना । तें लटकें कायी ॥ ९५ ॥

एथ समर्थु एक आथीं । तयापासूनि भूतें होती ।
तरी हें वायाचि काय बोलती । जगामाजीं ॥ ९६ ॥

हो कां सांप्रत ऐसें जहालें । जे हे जन्ममृत्यू तुवा सृजिले ।
आणि नाशु पाविले । तुझेनि कायी ॥ ९७ ॥

तूं भ्रमलेपणें अहंकृती । यांसी घातु न करिसी चितीं ।
तरी सांगे कायि हे होती । चिरंतन ॥ ९८ ॥

कीं तूं एक वधिता । आणि सकळ लोकु हा मरता ।
ऐसी भ्रांति झणें चित्ता । येवो देसी ॥ ९९ ॥

अनादिसिद्ध हें आघवें । होत जात स्वभावें ।
तरी तुवा का शोचावे । सांग मज ॥ १०० ॥

परी मूर्खपणे नेणसी । न चिंतावें तें चिंतसी ।
आणि तूंचि नीति सांगसी । आम्हाप्रति ॥ १०१ ॥

देखें जे विवेकी जे होती । ते दोहींतेही न शोचती ।
जे होय जाय हे भ्रांती । म्हणऊनियां ॥ १०२ ॥

न त्वेवाहं जातुं नासं न त्वं नेमे जनाधिपाः ।
न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम् ॥ १२ ॥

अर्जुना सांगेन आइक । एथ आम्ही तुम्ही देख ।
आणि हे भूपति अशेख । आदिकरुनी ॥ १०३ ॥

नित्यता ऐसेचि असोनि । ना तरी निश्चित क्षया जाऊनि ।
हे भ्रांति वेगळी करूनी । दोन्हीं नाहीं ॥ १०४ ॥

हे उपजे आणि नाशे । ते मायावशें दिसे ।
येर्‍हवीं तत्वता वस्तु जे असे । ते अविनाशचि ॥ १०५ ॥

जैसें पवनें तोय हालविलें । आणि तरंगाकार जाहलें ।
तरी कवण कें जन्मलें । म्हणों ये तेथ ॥ १०६ ॥

तेंचि वायूचे स्फुरण ठेलें । आणि उदक सहज सपाटलें ।
तरी आता काय निमालें । विचारीं पां ॥ १०७ ॥

देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा ।
तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्त्तत्र न मुह्यति ॥ १३ ॥

आइकें शरीर तरी एक । परी वयसा भेद अनेक ।
हें प्रत्यक्षचि देख । प्रमाण तूं ॥ १०८ ॥

एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यीं तें भ्रंशे ।
परी देहचि न नाशे । एकेकासवें ॥ १०९ ॥

तैसीं चैतन्याचां ठायीं । इयें शरीरांतरे होति जाति पाहीं ।
ऐसें जाणे जया नाहीं । व्यामोहदुःख ॥ ११० ॥

मात्रास्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुखदुःखदाः ।
आगमापायिनोऽनित्यास्तांस्तितिक्षस्व भारत ॥ १४ ॥

एथ नेणावया हेंचि कारण । जें इंद्रियांआधीनपण ।
तिहीं आकळिजे अंतःकरण । म्हणऊनि भ्रमे ॥ १११ ॥

इंद्रियें विषय सेविती । तेथ हर्ष शोकु उपजती ।
ते अंतर आप्लविती । संगें येणें ॥ ११२ ॥

जयां विषायांचां ठायीं । एकनिष्ठता कहीं नाहीं ।
तेथ दुःख आणि कांहीं । सुखहि दिसे ॥ ११३ ॥

देखें हे शब्दाची व्याप्ति । निंदा आणि स्तुति ।
तेथ द्वेषाद्वेष उपजति । श्रवणद्वारें ॥ ११४ ॥

मृदु आणि कठीण । जे स्पर्शाचे दोन्ही गुण ।
जे वपूचेनि संगे कारण संतोषखेदां ॥ ११५ ॥

भ्यासुर आणि सुरेख । हें रुपाचें स्वरूप देख ।
जें उपजवी सुखदुःख । नेत्राद्वारें ॥ ११६ ॥

सुगंधु आणि दुर्गंधु । हा परिमळाचा भेदु ।
जो घ्राणसंगे विषादु – । तोषु देता ॥ ११७ ॥

तैसाचि द्विविध रसु । उपजवी प्रीतित्रासु ।
म्हणूनि हा अपभ्रंशु । विषयसंगु ॥ ११८ ॥

देखें इंद्रियां आधीन होईजे ।तें शीतोष्णांते पाविजे ।
आणि सुखदुःखी आकळिजे । आपणपें ॥ ११९ ॥

या विषयावांचूनि कांही । आणीक सर्वथा रम्य नाहीं ।
ऐसा स्वभावोचि पाहीं । इंद्रियांचा ॥ १२० ॥

हे विषय तरी कैसे । रोहिणीचें जळ जैसें ।
कां स्वप्नींचा आभासे । भद्रजाति ॥ १२१ ॥

देखें अनित्य तियापरी । म्हणऊनि तूं अव्हेरीं ।
हा सर्वथा संगु न धरीं । धनुर्धरा ॥ १२२ ॥

यं हि न व्यथयन्त्येते पुरुषं पुरुषषर्भ ।
समदुःखसुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते ॥ १५ ॥

हे विषय जयाते नाकळिती । तयाते सुखदुःखें दोन्ही न पवती ।
आणि गर्भवासुसंगती । नाहीं तया ॥ १२३ ॥

तो नित्यरूपु पार्था । वोळखावा सर्वथा ।
जो या इंद्रियार्था । नागवेचि ॥ १२४ ॥

नासंतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः ।
उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्वदर्शिभिः ॥ १६ ॥

आतां अर्जुना आणिक कांही एक । सांगेन मी आइक ।
जें विचारें परलोक । वोळखिती ॥ १२५ ॥

या उपाधिमाजि गुप्त । चैतन्य असे सर्वगत ।
तें तत्वज्ञ संत । स्वीकारिती ॥ १२६ ॥

सलिलीं पय जैसें । एक होऊन मीनलें असे ।
परीं निवडूनि राजहंसें । वेगळें कीजे ॥ १२७ ॥

कीं अग्निमुखें किडाळ । तोडोनियां चोखाळ ।
निवडिती केवळ । बुद्धिमंत ॥ १२८ ॥

ना तरी जाणिवेच्या आयणी । करितां दधिकडसणी ।
मग नवनीत निर्वाणीं । दिसे जैसें ॥ १२९ ॥

कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट ।
तेथ उडे तें फलकट । जाणों आले ॥ १३० ॥

तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें ।
मग तत्वता तत्व उरलें । ज्ञानियांसी ॥ १३१ ॥

म्हणोनि अनित्याचां ठायीं । तयां आस्तिक्यबुद्धि नाहीं ।
निष्कर्ष दोहींही । देखिला असे ॥ १३२ ॥

अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमैदं तत् ।
विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति ॥ १७ ॥

देखें सारासार विचारितां । भ्रांति जे पाहीं असारता ।
तरी सार तें स्वभावता । नित्य जाणें ॥ १३३ ॥

हा लोकत्रयाकारु । तो जयाचा विस्तारु ।
तेथ नाम वर्ण आकारु । चिन्ह नाही ॥ १३४ ॥

जो सर्वदा सर्वगतु । जन्मक्षयातीतु ।
तया केलियाहि घातु । कदाचि नोहे ॥ १३५ ॥

अन्तवंतः इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणः ।
अनाशिनोऽप्रमेयस्य तस्याद् युध्यस्व भारत ॥ १८ ॥

आणि शरीरजात हे आघवें । हें नाशवंत स्वभावें ।
म्हणोनि तुवा झुंजावें । पंडुकुमरा ॥ १३६ ॥

य एनं वेत्ति हन्तारं यश्चैनं मन्यते हतम् ।
उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते ॥ १९ ॥

तूं धरूनि देहाभिमानातें । दिठी सूनि या शरीरातें ।
मी मारिता हे मरते । म्हणत आहासी ॥ १३७ ॥

तरी अर्जुना तूं हें नेणसी । जरी तत्वता विचारिसी ।
तरी वधिता तूं नव्हेसी । हे वध्य नव्हती ॥ १३८ ॥

न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता न भूयः ।
अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे ॥ २० ॥

वेदाविनाशिनं नित्यं य एनमजव्ययम् ।
कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कम् ॥ २१ ॥

जैसें स्वप्नामाजिं देखिजे । तें स्वप्नींचि साच आपजे ।
मग चेऊनियां पाहिजे । तंव कांही नाहीं ॥ १३९ ॥

तैसी हे जाण माया । तूं भ्रमत आहासी वायां ।
शस्त्रें हाणितलिया छाया । जैसी आंगी न रुपे ॥ १४० ॥

कां पूर्ण कुंभ उलंडला । तेथ बिंबाकारु दिसे भ्रंशला ।
परी भानु नाहीं नासला । तयासवें ॥ १४१ ॥

ना तरी मठीं आकाश जैसें । मठाकृती अवतरले असे ।
तो भंगलिया आपैसे । स्वरूपचि ॥ १४२ ॥

तैसें शरीराचां लोपीं । सर्वथा नाशु नाहीं स्वरूपीं ।
म्हणऊनि तूं हें नारोपीं । भ्रांति बापा ॥ १४३॥

वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि ।
तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नावानि देही ॥ २२॥

जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे ।
तैसे देहांतराते स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥ १४४ ॥

नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ २३॥

अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च ।
नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥ २४ ॥

हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु ।
म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥ १४५ ॥

अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते ।
तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि ॥ २५ ॥

हा प्रळयोदके नाप्लवे । अग्निदाहो न संभवे ।
एथ महाशोषु न प्रभवे । मारुताचा ॥ १४६ ॥

अर्जुना हा नित्यु । अचळु हा शाश्वतु ।
सर्वत्र सदोदितु । परिपूर्णु हा ॥ १४७ ॥

हा तर्काचिये दिठी । गोचर नोहे किरिटी ।
ध्यान याचिये भेटी । उत्कंठा वाहे ॥ १४८ ॥

हा सदा दुर्लभु मना । आपु नोहे साधना।
निःसीमु हा अर्जुना । पुरुषोत्तमु ॥ १४९ ॥

हा गुणत्रयरहितु । व्यक्तीसी अतीतु ।
अनादि अविकृतु । सर्वरूप ॥ १५० ॥

अर्जुना ऐसा जाणावा । हा सकळात्मकु देखावा ।
मग सहजे शोकु आघवा । हरेल तुझा ॥ १५१ ॥

अथ चैनं नित्यजात नित्यं वा मन्यसे मृतं ।
तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि ॥ २६ ॥

अथवा ऐसा नेणसी । तूं अंतवंतचि हें मानिसी ।
तर्‍ही शोचूं न पवसी । पंडुकुमरा ॥ १५२ ॥

जे आदि-स्थिती- अंतु । हा निरंतर असे नित्यु ।
जैसा प्रवाहो अनुस्यूतु । गंगाजळाचा ॥ १५३ ॥

तें आदि नाहीं खंडले । समुद्रीं तरी असे मिनलें ।
आणि जातचि मध्यें उरले । दिसे जैसें ॥ १५४॥

इये तिन्हीं तयापरी । सरसींच सदा अवधारीं ।
भूतांसी कवणीं अवसरीं । ठाकती ना ॥ १५५ ॥

म्हणोनि हे आघवें । एथ तुज न लगे शोचावें ।
जे स्थितीची हे स्वभावें । अनादि ऐसी ॥ १५६ ॥

ना तरी हे अर्जुना । न येचि तुझिया मना ।
जे देखोनि लोकु अधीना । जन्मक्षया ॥ १५७ ॥

तरी येथ कांही । तुज शोकासि कारण नाहीं ।
जे जन्ममृत्यु हे पाहीं । अपरिहर ॥ १५८ ॥

जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।
तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥ २७ ॥

उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे ।
हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥ १५९ ॥

ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें ।
हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥ १६० ॥

महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे ।
म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥ १६१ ॥

तूं जरी हे ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी ।
काय जाणतचि नेणसी । धनुर्धरा ॥ १६२ ॥

एथ आणिकही एक पार्था । तुज बहुतीं परी पाहतां ।
दुःख करावया सर्वथा । विषो नाहीं ॥ १६३ ॥

अव्यक्तादिनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत ।
अव्यक्तनिधनान्येव तत्र का परिदेवना ॥ २८ ॥

जें समस्तें इयें भूते । जन्मा आदि अमूर्ते ।
मग पातलीं व्यक्तीतें । जन्मलेया ॥ १६४ ॥

तियें क्षयासि जेथ जाती । तेथ निभ्रांत आने नव्हती ।
देखें पूर्व स्थितीच येती । आपुलिये ॥ १६५ ॥

येर मध्यें जें प्रतिभासे । तें निद्रिता स्वप्न जैसें ।
तैसा आकारु हा मायावशें । सत्स्वरूपीं ॥ १६६ ॥

ना तरी पवनें स्पर्शिलें नीर । पढियासे तरंगाकार ।
का परापेक्षा अळकांर- । व्यक्ति कनकीं ॥ १६७ ॥

तैसें सकळ हें मूर्त । जाण पां मायाकारित ।
जैसें आकाशीं बिंबत । अभ्रपटल ॥ १६८ ॥

तैसें आदीचि जें नाही । तयालागीं तूं रुदसि कायी ।
तूं अवीट तें पाहीं । चैतन्य एक ॥ १६९ ॥

जयाचि आर्तीचि भोगित । विषयी त्यजिले संत ।
जयालागीं विरक्त । वनवासिये ॥ १७० ॥

दिठी सूनि जयातें । ब्रह्मचर्यादि व्रतें ।
मुनीश्वर तयातें आचरताती ॥ १७१ ॥

आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः ।
आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । शृत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥ २९ ॥

एक अंतरी निश्चळ । जें निहाळितां केवळ ।
विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥

एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता ।
निरवधि तल्लीनता । निरंतर ॥ १७३ ॥

एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले ।
एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥ १७४ ॥

जैसा सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत ।
परी माघौते न समात । परतले नाहीं ॥ १७५ ॥

तैसिया योगीश्वरांचिया मती । मिळणीसवें एकवटती ।
परी जे विचारूनि पुनरावृत्ति । भजतीचिना ॥ १७६ ॥

देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत ।
तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि ॥ ३० ॥

जें सर्वत्र सर्वही देहीं । जया करितांही घातु नाहीं ।
तें विश्वात्मक तूं पाहीं । चैतन्य एक ॥ १७७ ॥

याचेनिचि स्वभावें । हें होत जात आघवें ।
तरी सांग काय शोचावें । एथ तुवां ॥ १७८ ॥

एर्‍हवीं तरी पार्था । तुज कां नेणों न मनें चित्ता ।
परी किडाळ हें शोचितां । बहुतीं परीं ॥ १७९ ॥

स्वधर्मपि चावेक्ष्य न विकंपितुमर्हसि ।
धर्म्याद्धि युद्धात् श्रेयोऽन्यत् क्षत्रियस्य न विद्यते ॥ ३१ ॥

तूं अझुनि कां न विचारिसी । काय हें चिंतितु आहासी ।
स्वधर्मु तो विसरलासी । तरावें जेणें ॥ १८० ॥

या कौरवां भलतें जाहलें । अथवा तुजचि कांही पातलें ।
कीं युगचि हें बुडालें । जर्‍हीं एथ ॥ १८१ ॥

तरी स्वधर्मु एक आहे । तो सर्वथा त्याज्य नोहे ।
मग तरिजेल काय पाहे । कृपाळुपणें ॥ १८२ ॥

अर्जुना तुझें चित्त । जर्‍ही जाहलें द्रवीभूत ।
तर्‍ही हें अनुचित । संग्रामसमयीं ॥ १८३ ॥

अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाही म्हणितलें ।
ऐसेनिहि विष होय सुदलें । नवज्वरीं देतां ॥ १८४ ॥

तैसे आनीं आन करितां । नाशु होईल हिता ।
म्हणऊनि तूं आतां । सावध होई ॥ १८५ ॥

वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं ।
जो आचरिता बाधु नाहीं । कवणे काळीं ॥ १८६ ॥

जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा ।
कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥ १८७ ॥

म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांही ।
संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥ १८९ ॥

निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें ।
हें असो काय सांगावे । प्रत्यक्षावरी ॥ १९० ॥

यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृत्तम् ।
सुखिनः क्षत्रियाः पार्थ लभंते युद्धमीदृशम् ॥ ३२ ॥

अर्जुना झुंज देखें आतांचें । हें हो काय दैव तुमचे ।
कीं निधान सकळ धर्माचें । प्रगटले असे ॥ १९१ ॥

हा संग्रामु काय म्हणिपे । कीं स्वर्गुचि येणें रूपें ।
मूर्त कां प्रतापे । उदो केला ॥ १९२ ॥

ना तरी गुणाचेनि पतिकरें । आर्तिंचेनि पडिभरें ।
हें कीर्तीचि स्वयंवरे । आली तुज ॥ १९३ ॥

क्षत्रियें बहुत पुण्य कीजे । तें झुंज ऐसें हें लाहिजे ।
जैसें मार्गें जातां आडळिजे । चिंतामणीसी ॥ १९४ ॥

ना तरी जांभया पसरे मुख । तेथ अवचटें पडे पीयूख ।
तैसा संग्रामु हा देख । पातला असे ॥ १९५ ॥

अथ चेत् त्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि ।
ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्यसिं ॥ ३३ ॥

आतां हा ऐसा अव्हेरिजे । मग नाथिले शोचूं बैसिजे ।
तरी आपण आहाणा होईजे । आपणपेयां ॥ १९६ ॥

पूर्वजांचे जोडलें । आपणचि होय धाडिलें ।
जरी आजि शस्त्र सांडिले । रणीं इये ॥ १९७ ॥

असती कीर्ति जाईल । जग अभिशापु देईल ।
आणि गिंवसित पावतील । महादोष ॥ १९८ ॥

जैसी भ्रतारेहीन वनिता । उपहृती पावे सर्वथा ।
तैशी दशा जीविता । स्वधर्मेंवीण ॥ १९९ ॥

ना तरी रणीं शव सांडिजे । तें चौमेरीं गिधीं विदारिजे ।
तैसे स्वधर्महीन अभिभविजे । महादोषी ॥ २०० ॥

अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यंति तेऽव्याम् ।
संभावितस्य चाकीर्तिर्मरणादतिरिच्यते ॥ ३४ ॥

म्हणोनि स्वधर्म हा सांडसील । तरी पापा वरपडा होसील ।
आणि अपेश तें न वचेल । कल्पांतावरी ॥ २०१ ॥

जाणतेनि तंवचि जियावे । जंव अपकीर्ति आंगा न पवे ।
आणि सांग पां केवी निगावें । एथोनियां ॥ २०२ ॥

तूं निर्मत्सरु सदयता । येथूनि निघसी कीर माघौता ।
परी ते गति समस्तां । न मनेल ययां ॥ २०३ ॥

हें चहूंकडून वेढितील । बाणवरी घेतील ।
तेथ पार्था न सुटिजेल । कृपाळुपणे ॥ २०४ ॥

ऐसेनिही प्राण्संकटे । जरी विपायें पां निघणें घटे ।
तरी तें जियालेंही वोखटें । मरणाहुनी ॥ २०५ ॥

भयाद् रणादुपरं मंस्यते त्वां महारथाः ।
येषां त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् ॥ ३५ ॥

तूं आणिकही एक न विचारिसी । एथ संभ्रमे झुंजो आलासी ।
आणि सकणवपणे निघालासी । मागुता जरी ॥ २०६ ॥

तरी तुझें तें अर्जुना । या वैरियां दुर्जनां
कां प्रत्यया येईल मना । सांगे मज ॥ २०६ ॥

अवाच्यवादांश्च बहून् वदिष्यंति तवाहिताः ।
निंदंतस्तव सामर्थ्य ततो दुःखतरं नु किम् ॥ ३६ ॥

हे म्हणतील गेला रे गेला । अर्जुन आम्हां बिहाला ।
हा सांगें बोलु उरला । निका कायी ॥ २०८ ॥

लोक सायासें करूनि बहुतें । कां वेंचिती आपुली जीवितें ।
परी वाढविती कीर्तीतें । धनुर्धरा ॥ २०९ ॥

ते तुज अनायसें । अनकळित जोडिली असे ।
हें अद्वितीय जैसें । गगन आहे ॥ २१० ॥

तैसी कीर्ती निःसीम । तुझां ठायीं निरुपम ।
तुझे गुण उत्तम । तिहीं लोकीं ॥ २११॥

दिगंतीचे भूपति । भाट होऊनि वाखाणिती ।
जे ऐकिलिया दचकती । कृतांतादिक ॥ २१२ ॥

ऐसा महिमा घनवट । गंगा तैसी चोखट ।
जयां देखी जगीं सुभट । वांठ जाहली ॥ २१३ ॥

ते पौरुष तुझें अद्भुत । आइकोनियां हे समस्त ।
जाहले आथि विरक्त । जीवितेंसी ॥ २१४ ॥

जैसा सिंहाचिया हांका । युगांतु होय मदमुखा ।
तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा॥ २१५ ॥

जैसे पर्वत वज्रांते । ना तरी सर्प गरुडातें ।
तैसा अर्जुना हे तूंते । मानिती सदा ॥ २१६ ॥

ते अगाधपण जाईल । मग हिणावो अंगा येईल ।
जरी मागुता निघसील । न झुंजतचि ॥ २१७ ॥

आणि हे पळतां पळों नेदिती । धरूनि अवकळा करिती ।
न गणित कुटी बोलती । आइकतां तुज ॥ २१८ ॥

मग ते वेळी हियें फुटावें । आंता लाठेपणे कां न झुंजावे ।
हें जिंतले तरी भोगावें । पृथ्वीतल ॥ २१९ ॥

हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्षसे महीम् ।
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ ३७ ॥

ना तरी रणीं एथ । झुंजतां वेंचलें जीवित ।
तरी स्वर्गसुख अनकळित । पावसील ॥ २२० ॥

म्हणोनि ये गोठी । विचारु न करीं किरिटी ।
आतां धनुष्य घेऊनि उठी । झुंजें वेगीं ॥ २२१ ॥

देखें स्वधर्मु हा आचरतां । दोषु नासे असता ।
तुज भ्रांति हे कवण चित्ता । एथ पातकाची ॥ २२२ ॥

सांगे प्लवेंचि काय बुडिजे । कां मार्गीं जातां आडळिजे ।
परी विपायें चालो नेणिजे । तरी तेंही घडे ॥ २२३ ॥

अमृतें तरीचि मरीजे । जरी विखेंसी सेवीजे ।
तैसा स्वधर्में दोषु पाविजे । हेतुकपणे ॥ २२४ ॥

म्हणोनि तुज पार्था । हेतु सांडोनि सर्वथा ।
क्षात्रवृत्ती झुंजतां । पाप नाही ॥ २२५ ॥

सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि ॥ ३८ ॥

सुखीं संतोषा न यावे । दुःखी विषादा न भजावें ।
आणि लाभालाभ न धरावे । मनामाजीं ॥ २२६ ॥

एथ विजयपण होईल । कां सर्वथा देह जाईल ।
हें आधींचि कांही पुढील । चिंतावेना ॥ २२७ ॥

आपणयां उचिता । स्वधर्मातेंचि रहाटतां ।
जे पावें तें निवांता । साहोनि जावें ॥ २२८ ॥

ऐसेया मनें होआवें । तरी दोषु न घडे स्वभावें ।
म्हणोनि आतां झुंजावें । निभ्रांत तुवां ॥ २२९ ॥

एषाऽतेभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु ।
बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि ॥ ३९ ॥

हे सांख्यस्थिति मुकुलित । सांगितली तुज एथ ।
आतां बुद्धियोगु निश्चित । अवधारीं पां ॥ २३० ॥

जया बुद्धियुक्ता । आहालिया पार्था ।
कर्मबंधु सर्वथा । बांधू न पावे ॥ २३१ ॥

जैसे वज्रकवच लेईजे । मग शस्त्रांचा वर्षावो साहिजे ।
परी जैतेंसी उरिजे । अचुंबिता ॥ २३२ ॥

नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते ।
स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात् ॥ ४० ॥

तैसें ऐहिक तरी न नशे । आणि मोक्षु तो उरला असे ।
जेथ पूर्वानुक्रम दिसे । चोखाळत ॥ २३३ ॥

कर्माधारे राहाटिजे । परी कर्मफळ न निरीक्षिजे ।
जैसा मंत्रज्ञु न बधिजे । भूतबाधा ॥ २३४ ॥

तियापरी जे सुबुद्धि । आपुलाल्या निरवधि ।
हां असतांचि उपाधि । आंकळू न सके ॥ २३५ ॥

जेथ न संचरे पुण्यपाप । जे सूक्ष्म अति निष्कंप ।
गुणत्रयादि लेप । न लगती जेथ ॥ २३६ ॥

अर्जुना ते पुण्यवशें । जरी अल्पचि हृदयीं बुद्धि प्रकाशे ।
तरी अशेषही नाशे । संसारभय ॥ २३७ ॥

व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनन्दन ।
बहुशाखा ह्यनन्ताश्च बुद्धयोऽव्यवस्थिताम् ॥ ४१ ॥

जैसी दीपकळिका धाकुटी । परी बहु तेजातें प्रगटी ।
तरी सद्बुद्धि हे थेकुटी । म्हणों नये ॥ २३८ ॥

पार्था बहुतीं परी । हे अपेक्षिजे विचारशूरी ।
जे दुर्लभ चराचरीं । सद्वासना ॥ २३९ ॥

आणिकासारिखा बहुवसु । जैसा न जोडे परिसु ।
कां अमृताचा लेशु । दैवगुणें ॥ २४० ॥

तैसी दुर्लभ जे सद्बुद्धि । जिये परमात्माचि अवधि ।
जैसा गंगेसी उदधि । निरंतर ॥ २४१ ॥

तैसी ईश्वरावांचूनि कांही । जिये आणिक लाणी नाहीं ।
ते एकचि बुद्धि पाहीं । अर्जुना जगीं ॥ २४२ ॥

येरी ते दुर्मति । जे बहुधा असे विकरती ।
तेथ निरंतर रमती । अविवेकिये ॥ २४३ ॥

म्हणोनि तया पार्था । स्वर्ग संसार नरकावस्था ।
आत्मसुख सर्वथा । दृष्ट नाहीं ॥ २४४ ॥

यामिनां पुष्पितां वाचं प्रवदन्त्यविपश्चितः ।
वेदवादरताः पार्थ नान्यदस्तीति वादिनः ॥ ४२ ॥

वेदाधारें बोलती । केवळ कर्म प्रतिष्ठिती ।
परी कर्मफळीं आसक्ती । धरूनियां ॥ २४५ ॥

म्हणती संसारी जन्मिजे । यज्ञादि कर्म कीजें ।
मग स्वर्गसुख भोगिजे । मनोहर ॥ २४६ ॥

एथ हें वांचूनि कांही । आणिक सर्वथा सुखचि नाही ।
ऐसें अर्जुना बोलती पाहीं । दुर्बुद्धि ते ॥ २४७ ॥

कामात्मानः स्वर्गपरा जन्मकर्मफलप्रदाम् ।
क्रियाविषेश्बहुलां भोगैश्वर्यगतिं प्रति ॥ ४३ ॥

देखें कामना अभिभूत । होऊनि कर्में आचरत ।
ते केवळ भोगीं चित्त । देऊनियां ॥ २४८ ॥

क्रियाविशेषें बहुतें । न लोपितीं विधीतें ।
निपुण होऊनि धर्मातें । अनुष्ठिती ॥ २४९ ॥

भोगैश्वर्यप्रसक्तानां तयापहृतचेतसाम् ।
व्यवसायात्मिका बुद्धिः समाधौ न विधीयते ॥ ४४ ॥

परि एकचि कुडें करिती । जे स्वर्गकामु मनीं धरिती ।
यज्ञपुरुषा चुकती । भोक्ता जो ॥ २५० ॥

जैसा कर्पुराचा राशि कीजे । मग अग्नि लाऊनि दीजे ।
कां मिष्टानीं संचरविजे । काळकूट ॥ २५१ ॥

दैवें अमृतकुंभ जोडला । तो पायें हाणोनि उलंडिला ।
तैसा नासिती धर्म निपजला । हेतुकपणें ॥ २५२ ॥

सायासें पुण्य अर्जिजे । मग संसारु का अपेक्षिजे ।
परी नेणती ते काय कीजे । अप्राप्त देखें ॥ २५३ ॥

जैसे रांधवणी रससोय निकी । करुनियां मोले विकी ।
तैसा भोगासाठी अविवेकी । धाडिती धर्मु ॥ २५४ ॥

म्हणोनि हे पार्था । दुर्बुद्धि देख सर्वथा ।
तयां वेदवादरतां । मनीं वसे ॥ २५५ ॥

त्रैगुण्यविषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन ।
निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान् ॥ ४५ ॥

तिन्हीं गुणीं आवृत्त । हे वेद जाणे निभ्रांत ।
म्हणोनि उपनिषदादि समस्त । सात्विक ते ॥ २५६ ॥

येर रजतमात्मक । जेथ निरुपिजे कर्मादिक ।
जे केवळ स्वर्गसूचक । धनुर्धरा ॥ २५७ ॥

म्हणोनि तूं जाण । हे सुखदुःखासीच कारण ।
एथ झणे अंतःकरण । रिगों देसी ॥ २५८ ॥

तूं गुणत्रयातें अव्हेरीं । मी माझें हें न करीं ।
एक आत्मसुख अंतरी । विसंब झणीं ॥ २५९ ॥

यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके ।
तावान्सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः ॥ ४६ ॥

जरी वेदें बहुत बोललें । विविध भेद सूचिले ।
तर्‍ही आपण हित आपुलें । तेंचि घेपे ॥ २६० ॥

जैसा प्रगटलिया गभस्ती । अशेषही मार्ग दिसती ।
तरी तेतुलेही काय चालिजती । सांगे मज ॥ २६१ ॥

का उदकमय सकळ । जर्‍ही जाहलें असे महीतळ ।
तरी आपण घेपे केवळ । आर्तीचजोगें ॥ २६२ ॥

तैसे ज्ञानिये जे होती । ते वेदार्थाते विवरिती ।
मग अपेक्षित तें स्वीकारिती । शाश्वत जें ॥ २६३ ॥

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि ॥ ४७ ॥

म्हणौनि आइकें पार्था । याचिवरी पाहतां ।
तुज उचित होय आतां । स्वकर्म हें ॥ २६४ ॥

आम्हीं समस्तही विचारिलें । तंव ऐसेंचि हें मना आलें ।
जे न संडिजे तुवा आपुलें । विहित कर्म ॥ २६५ ॥

परी कर्मफळीं आस न करावी । आणि कुकर्मी संगति न व्हावी ।
हे सत्क्रियाचि आचरावी । हेतूविण ॥ २६६ ॥

योगस्थ कुरू कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय ।
सिद्ध्यसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योग उच्यते ॥ ४८ ॥

तूं योगयुक्त होऊनी । फळाचा संग सांडुनी ।
मग अर्जुना चित्त देऊनी । करीं कर्में ॥ २६७ ॥

परी आदरिले कर्म दैवें । जरी समाप्तीतें पावे ।
तरी विशेषें तेथ तोषावें । हेही नको ॥ २६८ ॥

कां निमित्तें कोणे एकें । तें सिद्धी न वचतां ठाकें ।
तरी तेथिंचेनि अपरितोखें । क्षोभावें ना ॥ २६९ ॥

आचरता सिद्धी गेलें । तरी काजाचि कीर आलें ।
परी ठेलियाही सगुण जहालें । ऐसेंचि मानीं ॥ २७० ॥

देखें जेतुलालें कर्म निपजे । तेतुलें आदिपुरुषीं जरी अर्पिजे ।
तरी परीपूर्ण सहजें । जहालें जाणे ॥ २७१ ॥

देखें संतासंती कर्मीं । हें जे सरिसेपण मनोधर्मीं ।
तेचि योगस्थिति उत्तमीं । प्रशंसिजे ॥ २७२ ॥

दूरेण ह्यत्वरं कर्म बुद्धियोगाद्धनंजय ।
बुद्धौ शरणमन्विछ कृपणाः फलहेतवः ॥ ४९ ॥

बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत्दुष्कृते ।
तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलं ॥ ५० ॥

अर्जुना समत्व चित्ताचें । तेचिं सार जाण योगाचें ।
जेथ मना आणि बुद्धीचें । ऐक्य आथी ॥ २७३ ॥

तो बुद्धियोग विवरितां । बहुतें पाडे पार्था ।
दिसे हा अरुता । कर्मभागु ॥ २७४ ॥

परि तेंचि कर्म आचरिजे । तरीच हा योगु पाविजे ।
जें कर्मशेष सहजे । योगस्थिति ॥ २७५ ॥

म्हणोनि बुद्धियोगु सधरु । तेथ अर्जुना होई स्थिरु ।
मनिं करी अव्हेरु । फळहेतूचा ॥ २७६ ॥

जे बुद्धियोगा योजिले । तेचि पारंगत जाहले ।
इहीं उभय संबंधी सांडिले । पापपुण्यीं ॥ २७७ ॥

कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः ।
जन्मबंधविनिर्मुक्ताः पदं गच्छन्त्यनामयम् ॥ ५१ ॥

ते कर्मी तरी वर्तती । परी कर्मफळा नातळती ।
आणि यातायाति लोपती । अर्जुना तयां ॥ २७८ ॥

मग निरामयभरित । पावती पद अच्युत ।
ते बुद्धियोगयुक्त । धनुर्धरा ॥ २७९ ॥

यदा ते मोहकलिलं बुद्धुर्व्यतितरिष्यति ।
तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च ॥ ५२ ॥

तूं ऐसा तैं होसी । जैं मोहातें या सांडिसी ।
आणि वैराग्य मानसीं । संचरेल ॥ २८० ॥

मग निष्कळंक गहन । उपजेल आत्मज्ञान ।
तेणे निचाडें होईल मन । अपैसें तुझे ॥ २८१ ॥

तेथ आणिक कांही जाणावे । कां मागिलातें स्मरावें ।
हें अर्जुनां आघवें । पारुषेल ॥ २८२ ॥

श्रुतिविप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला ।
समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि ॥ ५३ ॥

इंद्रियांचिया संगती । जिये पसरु असे मती ।
ते स्थिर होईल मागुती । आत्मस्वरूपीं ॥ २८३ ॥

समाधिसुखीं केवळ । जैं बुद्धि होईल निश्चळ ।
तैं पावसी तूं सकळ । योगस्थिति ॥ २८४ ॥

अर्जुन उवाच: स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव ।
स्थितधीः किं प्रभाषेत किमासीत ब्रजेत किम् ॥ ५४ ॥

तेथ अर्जुन म्हणे देवा । हाचि अभिप्रावो आघवा ।
मी पुसेन आतां सांगावा । कृपानिधि ॥ २८५ ॥

मग अच्युत म्हणे सुखें । जें किरीटी तुज निकें ।
तें पूस पां उन्मेखें । मनाचेनि ॥ २८६ ॥

या बोला पार्थें । म्हणितलें सांग पां श्रीकृष्णातें ।
काय म्हणिपे स्थितप्रज्ञातें । वोळखों केवीं ॥ २८७ ॥

आणि स्थिरबुद्धि जो म्हणिजे । तो कैसां चिन्हीं जाणिजे ।
जो समाधिसुख भुंजिजे । अखंडित ॥ २८८ ॥

तो कवणे स्थिती असे । कैसेनि रूपी विलसे ।
देवा सांगावें हें ऐसें । लक्ष्मीपती ॥ २८९ ॥

तव परब्रह्मअवतरणु । जो षड्गुणाधिकरणु ।
तो काय तेथ नारायणु । बोलतु असे ॥ २९० ॥

श्रीभगवानुवाच: प्रजहाति यदा कामान् सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्तदोच्यते ॥ ५५ ॥

म्हणे अर्जुना परियेसीं । हा अभिलाषु प्रौढ मानसीं ।
तो अंतराय स्वसुखेसीं । करीत असे ॥ २९१ ॥

जो सर्वदा नित्यतृप्तु । अंतःकरणभरितु ।
परि विषयामाजि पतितु । जेणें संगे कीजे ॥ २९२ ॥

तो कामु सर्वथा जाये । जयाचे आत्मतोषीं मन राहें ।
तोचि स्थितप्रज्ञु होये । पुरुष जाणे ॥ २९३ ॥

दुःखेष्वनुद्विग्नमनाः सुखेषु विगतस्पृहः ।
वीतरागभयक्रोधः स्थितधीर्मुनीरुच्यते ॥ ५६ ॥

नाना दुःखी प्राप्तीं । जयासी उद्वेगु नाहीं चित्तीं ।
आणि सुखाचिया आर्ती । अडपैजेना ॥ २९४ ॥

अर्जुना तयाचां ठायीं । कामक्रोधु सहजें नाहीं ।
आणि भयातें नेणें कहीं । परिपूर्ण तो ॥ २९५ ॥

ऐसा जो निरवधि । तो जाण पां स्थिरबुद्धि ।
जो निरसूनि उपाधि । भेदरहितु ॥ २९६ ॥

यः सर्वत्रानभिस्नेहस्तत्तत्प्राप्य शुभाशुभम् ।
नाभिननंदंति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५७ ॥

जो सर्वत्रा सदा सरिसा । परिपूर्ण चंद्रु कां जैसा ।
अधमोत्तम प्रकाशा – । माजीं न म्हणे ॥ २९७ ॥

ऐसी अनवच्छिन्न समता । भूतामत्रीं सदयता ।
आणि पालटु नाहीं चित्ता । कवणे वेळे ॥ २९८ ॥

गोमटें कांही पावे । तेणे संतोषें तेणें नाभिभवे ।
जो ओखटेनि नागवे । विषादासी ॥ २९९ ॥

ऐसा हरिखशोकरहितु । जो आत्मबोधभरितु ।
तो पां जाण प्रज्ञायुक्तु । धनुर्धरा ॥ ३०० ॥

यदा संहरते चायं कूर्मोऽङगानीव सर्वशः ।
इंद्रियाणींद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ५८ ॥

कां कूर्म जियापरी । उवाइला अवेव पसरी ।
ना इच्छावशें आवरी । आपुले आपण ॥ ३०१ ॥

तैसीं इंद्रिये आपैतीं होतीं । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातलीं असे ॥ ३०२ ॥

विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्ज्यं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते ॥ ५९ ॥

आतां अर्जुना आणिकही एक । सांगेन ऐकें कवतिक ।
या विषयांते साधक । त्यजिती नियमें ॥ ३०३ ॥

श्रोत्रादि इंद्रिये आवरती । परि रसने नियमु न करिती ।
ते सहस्रधा कवळिजती । विषयीं इहीं ॥ ३०४ ॥

जैसी वरिवरि पालवी खुडिजे । आणि मुळीं उदक घालिजे ।
तरी कैसेनि नाशु निपजे । तया वृक्षा ॥ ३०५ ॥

तो उदकाचेनि बळें अधिकें । जैसा आडवोनि आंगे फांके ।
तैसा मानसी विषो पोखे । रसनाद्वारें ॥ ३०६ ॥

येरां इंद्रिया विषय तुटे । तैसा नियमूं न ये रस हटें ।
जे जीवन हें न घटे । येणेंविण ॥ ३०७ ॥

मग अर्जुना स्वभावे । ऐसियाही नियमातें पावे ।
जैं परब्रह्म अनुभवें । होऊनि जाईजे ॥ ३०८ ॥

तैं शरीरभाव नासती । इंद्रिये विषय विसरती ।
सोहंभावप्रतीति । प्रकट होय ॥ ३०९ ॥

यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः ।
इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः ॥ ६० ॥

येर्‍हवीं तरी अर्जुना । हें आया नये साधना ।
जे रहाटताती जतना । निरंतर ॥ ३१० ॥

जयातें अभ्यासाची घरटी । यमनियमांची ताटी ।
जे मनाते सदा मुठी । धरूनि आहाती ॥ ३११ ॥

तेही किजती कासाविसी । या इंद्रियांची प्रौढी ऐसी ।
जैसी मंत्रज्ञातें विवसी । भुलवी कां ॥ ३१२ ॥

देखे विषय हे तैसे । पावती ऋद्धिसिद्धीचेनि मिषें ।
मग आकळती स्पर्शें । इंद्रियांचेनि ॥ ३१३ ॥

तिये संधी मन जाये । मग अभ्यासां ठोठावलें ठाये ।
ऐसें बळकटपण आहे । इंद्रियांचे ॥ ३१४ ॥

तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः ।
वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६१ ॥

म्हणोनि आइकें पार्था । यांते निर्दळी जो सर्वथा ।
सर्व विषयीं आस्था । सांडूनिया ॥ ३१५ ॥

तोचि तूं जाण । योगनिष्ठेसी कारण ।
जयाचे विषयसुखे । अंतःकरण झकवेना ॥ ३१६ ॥

जो आत्मबोधयुक्तु । होऊनि असे सततु ।
जो मातें हृदयाआंतु । विसंबेना ॥ ३१७ ॥

एर्‍हवीं बाह्य विषय तरी नाहीं । परी मानसीं होईल जरी कांही ।
तरी साद्यंतुचि हा पाहीं । संसारु असे ॥ ३१८ ॥

जैसा कां विषाचा लेशु । घेतलिया होय बहुवसु ।
मग निभ्रांत करी नाशु । जीवितासी ॥ ३१९ ॥

तैसी या विषयांची शंका । मनीं वसती देखा ।
घातु करी अशेखा । विवेकजाता ॥ ३२० ॥

ध्यायतो विषयान्पुंसः सङगस्तेषूपजायते ।
सङगात्संजायते कामः कामात्क्रोधोभिजायते ॥ ६२ ॥

क्रोधाद् भवति संमोहः संमोहात्स्मृतिविभ्रमः ।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ॥ ६३ ॥

जरी हृदयीं विषय स्मरती । तरी निसंगाही आपजे संगती ।
संगी प्रगटे मूर्ति । अभिलाषाची ॥ ३२१ ॥

जेथ कामु उपजला । तेथ क्रोधु आधींचि आला ।
क्रोधीं असे ठेविला । संमोह जाणे ॥ ३२२ ॥

संमोहा जालिया व्यक्ति । तरी नाशु पावे स्मृति ।
चंडवातें ज्योति । आहत जैसी ॥ ३२३ ॥

कां अस्तमानीं निशी । जैसी सूर्यतेजातें ग्रासी ।
तैसी दशा स्मृतिभ्रंशीं । प्राणियांसी ॥ ३२४ ॥

नग अज्ञानांध केवळ । तेणे आप्लविजे सकळ ।
तेथ बुद्धि होय व्याकुळ । हृदयामाजीं ॥ ३२५ ॥

जैसें जात्यंधा पळणी पावे । मग ते काकुळती सैरा धांवे ।
तैसे बुद्धीसि होती भवें । धनुर्धरा ॥ ३२६ ॥

ऐसा स्मृतिभ्रंशु घडे । मग सर्वथा बुद्धि अवघडे ।
तेथ समूळ हें उपडे । ज्ञानजात ॥ ३२७ ॥

चैतन्याचां भ्रंशी । शरीरा दशा जैशी ।
पुरुषा बुद्धिनाशीं । होय देखें ॥ ३२८ ॥

म्हणोनि आइकें अर्जुना । जैसा विस्फुल्लिंग लागे इंधना ।
मग प्रौढ जालिया त्रिभुवना । पुरों शके ॥ ३२९ ॥

तैसें विषयांचे ध्यान । जरी विपायें वाहे मन ।
तरी येसणे हें पतन । गिंवसीत पावे ॥ ३३० ॥

रागद्वेषवियुकतैस्तु विषयानिन्द्रियैश्चरन् ।
आत्मवशैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ ६४ ॥

म्हणोनि विषय हे आघवे । सर्वथा मनौनि सांडावे ।
मग रागद्वेष स्वभावें । नाशतील ॥ ३३१ ॥

पार्था आणिकही एक । जरी नाशिले रागद्वेष ।
तरी इंद्रियां विषयीं बाधक । रमतां नाही ॥ ३३२ ॥

जैसा सूर्य आकाशगतु । रश्मिकरीं जगातें स्पर्शतु ।
तरी संगदोषें काय लिंपतु । तेथिंचेनि ॥ ३३३ ॥

तैसा इंद्रियार्थी उदासीन । आत्मरसेंचि निर्भिन्न ।
जो कामक्रोधविहीन । होऊनि असे ॥ ३३४ ॥

तरी विषयांतुही कांही । आपणपेवाचुनि नाहीं ।
मग विषय कवण कायी । बाधीतील कवणा ॥ ३३५ ॥

जरी उदकें उदकीं बुडीजे । कां अग्नि आगी पोळिजे ।
तरीं विषयसंगे आप्लविजे । परिपूर्ण तो ॥ ३३६ ॥

ऐसा आपणचि केवळ । होऊनि असे निखळ ।
तयाचि प्रज्ञा अचळ । निभ्रांत मानीं ॥ ३३७ ॥

प्रसादे सर्वदुःखानां हानिरस्योपजायते ।
प्रसन्नचेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते ॥ ६५ ॥

देखें अखंडित प्रसन्नता । आथी जेथ चित्ता ।
तेथे रिगणें नाहीं समस्तां । संसारदुःखां ॥ ३३८ ॥

जैसा अमृताचा निर्झरु । प्रसवे जयाचा जठरु ।
तया क्षुधेतृष्णेचा अडदरु । कहींचि नाहीं ॥ ३३९ ॥

तैसें हृदय प्रसन्न होये । तरी दुःख कैचें कें आहे ।
तेथ बुद्धि आपैसी राहे । परमात्मरूपीं ॥ ३४० ॥

जैसा निर्वातीचा दीपु । सर्वथा नेणे कंपु ।
तैसा स्थिरबुद्धि स्वस्वरूपु । योगयुक्तु ॥ ३४१ ॥

नास्ति बुद्धिरयुक्तस्य न चायुक्तस्य भावना ।
न चाभावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम् ॥ ६६ ॥

ये युक्तीचि कडसणी । नाहीं जयाचां अंतःकरणीं ।
तो आकळिलां जाण गुणीं । विषयादिकीं ॥ ३४२ ॥

तया स्थिरबुद्धि पार्था । कहीं नाहीं सर्वथा ।
आणि स्थैर्याची आस्था । तेही नुपजे ॥ ३४३ ॥

निश्चळत्वाची भावना । जरी नव्हेचि देखें मना ।
तरी शांति केवी अर्जुना । आपु होय ॥ ३४४ ॥

आणि जेथ शांतिचा जिव्हाळा नाहीं । तेथ सुख विसरोनि न रिगे कहीं ।
जैसा पापियाचां ठायीं । मोक्षु न वसे ॥ ३४५ ॥

देखें अग्निमाजी धापती । तियें बीजें जरी विरुढती ।
तरी अशांत सुखप्राप्ती । घडों शके ॥ ३४६ ॥

म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेंचि सर्वस्व दुःखाचें ।
या कारणें इंद्रियांचें । दमन निकें ॥ ३४७ ॥

इन्द्रियाणां हि चरतां यन्मनोऽनुविधीयते ।
तदस्य हरति प्रज्ञां वायुर्नावमिवाम्भसि ॥ ६७ ॥

ये इंद्रियें जें जें म्हणती । तें तेंचि जे पुरुष करिती ।
ते तरलेचि न तरिती । विषयसिंधु ॥ ३४८ ॥

जैसी नाव थडिये ठाकितां । जरी वरपडी होय दुर्वाता ।
तरी चुकलाही मागौता । अपावो पावे ॥ ३४९ ॥

तैसी प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।
तरी आक्रमिला देख दुःखे । सांसारिकें ॥ ३५० ॥

तस्माद् यस्य महाबाहो निगृहितानि सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ ६८ ॥

म्हणोनि आपुलीं आपणपेया । जरी ये इंद्रिये येती आया ।
तरी अधिक कांही धनंजया । सार्थक असे ॥ ३५१ ॥

देखे कूर्म जियापरी । उवाइला अवयव पसरी ।
ना तरी इच्छावशें आवरी । आपणपेंचि ॥ ३५२ ॥

तैसीं इंद्रिये आपैती होती । जयाचें म्हणितलें करिती ।
तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ॥ ३५३ ॥

आता आणिक एक गहन । पूर्णाचें चिन्ह ।
अर्जुना तुज सांगेन । परिस पां ॥ ३५४ ॥

या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी ।
यस्यां जाग्रति भूतानां सा निशा पश्यतो मुनेः ॥ ६९ ॥

देखे भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।
आणि जीव जेथ चेइले । तेथ निद्रित तो ॥ ३५५ ॥

तैसा तो निरुपाधि । अर्जुना तो स्थिरबुद्धि ।
तोचि जाणे निरवधि । मुनीश्वर ॥ ३५६ ॥

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् ।
तद्वत्कामा यं प्रविशन्ति सर्वे स शान्तिमाप्नोति न कामकामी ॥ ७० ॥

पार्था आणिकही परी । तो जाणो येईल अवधारीं ।
जैसी अक्षोभता सागरीं । अखंडित ॥ ३५७ ॥

जरी सरिताओघ समस्त । परिपूर्ण होऊनि मिळत ।
तरी अधिक नोहे ईषत् । मर्यादा न संडी ॥३५८ ॥

ना तरी ग्रीष्मकाळीं सरिता । शोषूनि जाति समस्ता ।
परी न्यून नव्हे पार्था । समुद्रु जैसा ॥ ३५९ ॥

तैसा प्राप्तीं ऋद्धिसिद्धी । तयासि क्षोभु नाहीं बुद्धी ।
आणि न पवतां न बाधी । अधृति तयातें ॥ ३६० ॥

सांगे सूर्याचां घरी । प्रकाशु काय वातीवेरी ।
की न लविजे तरी अंधारीं । कोंडेल तो ॥ ३६१ ॥

देखें ऋद्धिसिद्धि तयापरी । आली गेली से न करी ।
तो विगुंतला असे अंतरीं । महासुखीं ॥ ३६२ ॥

जो आपुलेनि नागरपणें । इंद्रभुवनातें पाबळें म्हणे ।
तो केवि रंजे पालविणें । भिल्लांचेनि ॥ ३६३ ॥

जो अमृतासि ठी ठेवी । तो जैसा कांजी न सेवी ।
तैसा स्वसुखानुभवी । न भोगी ऋद्धि ॥ ३६४ ॥

पार्था नवल हें पाहीं । जेथ स्वर्गसुख लेखनीय नाही ।
तेथ ऋद्धिसिद्धि कायी । प्राकृता होती ॥ ३६५ ॥

विहाय कामान्यः सर्वान्पुमांश्चरति निस्पृहः ।
निर्ममो निरहंकरः स शान्तिमधिगच्छति ॥ ७१ ॥

ऐसा आत्मबोधें तोषला । जो परमानंदें पोखला ।
तोचि स्थिरप्रज्ञु भला । वोळख तूं ॥ ३६६ ॥

तो अहंकाराते दंडुनी । सकळ काम सांडोनि ।
विचरे विश्व होऊनि । विश्वाचिमाजीं ॥ ३६७ ॥

एष ब्राह्मो स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति ।
स्थित्वास्यामन्तकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति ॥ ७२ ॥

हे ब्रह्मस्थिती निःसीम । जे अनुभवितां निष्काम ।
पातलें परब्रह्म । अनायासें ॥ ३६८ ॥

जे चिद्रूपीं मिळतां । देहांतीची व्याकुळता ।
आड ठाकों न शके चित्ता । प्राज्ञा जया ॥ ३६९ ॥

तेचि हे स्थिति । स्वमुखें श्रीपति ।
सांगत अर्जुनाप्रति । संजयो म्हणे ॥ ३७० ॥

ऐसे कृष्णवाक्य ऐकिलें । तेथ अर्जुने मनीं म्हणितलें ।
आतां आमुचियाचि काजा आलें । उपपत्ति इया ॥ ३७१ ॥

जे कर्मजात आघवें । एथ निराकारिलें देवें ।
तरी पारुषलें म्यां झुंजावें । म्हणूनियां ॥ ३७२ ॥

ऐसा श्रीअच्युताचिया बोला । चित्तीं धनुर्धरु उवायिला ।
आतां प्रश्नु करील भला । आशंकोनियां ॥ ३७३ ॥

तो प्रसंगु असे नागरु । जो सकळ धर्मासि आगरु ।
कीं विवेकामृतसागरु । प्रांतहीनु ॥ ३७४ ॥

जो आपणपे सर्वज्ञनाथु । निरुपिता होईल श्रीअनंतु ।
ते ज्ञानदेवो सांगेल मातु । निवृत्तीदासु ॥ ३७५ ॥

दुसरा अध्याय समाप्त ||



ज्ञानेश्वरी अन्य अध्याय


ज्ञानेश्वरी अध्याय पहिला | Dnyaneshwari Adhyay-1 | ज्ञानेश्वरी अध्याय 1
ज्ञानेश्वरी अध्याय तिसरा | Dnyaneshwari Adhyay-3 | ज्ञानेश्वरी अध्याय 3
ज्ञानेश्वरी अध्याय चौथा | Dnyaneshwari Adhyay-4 | ज्ञानेश्वरी अध्याय 4
ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा | Dnyaneshwari Adhyay-5 | ज्ञानेश्वरी अध्याय 5
ज्ञानेश्वरी अध्याय सहावा | Dnyaneshwari Adhyay-6 | ज्ञानेश्वरी अध्याय 6
ज्ञानेश्वरी अध्याय सातवा | Dnyaneshwari Adhyay-7 | ज्ञानेश्वरी अध्याय 7

4 thoughts on “ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा | Dnyaneshwari Adhyay-2 | ज्ञानेश्वरी अध्याय 2

    1. Thank you so much for your kind words! I’m delighted to hear that you find the content valuable. I’ll definitely keep up the good work!
      If there’s anything specific you’d like to see in the future, feel free to share your suggestions.
      Thanks again!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *