श्री गणेशाय नम: ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा: ॥
दत्तात्रेयो हरि कृष्णो । मुकुंदो आनंददायका ।
मुनी दिगंबरो बालो । सर्वज्ञो ज्ञानसागरा ॥१॥
दिगंबर मुने बाला । समर्था विश्व स्वामीने ।
परहंसा महाशून्या । महेश्वासा महानिधे ॥२॥
ऊँ हंस हंसाय विद्महे । परमहंसाय धिमही ।
तन्नो दत्त प्रचोदयात् ॥३॥
ऊँ शून्य शून्याय विद्महे । परमशून्याय धिमही
तन्नो परब्रह्म प्रचोदयात् ॥४॥
ऊँ दत्तात्रेयाय विद्महे । योगीश्वराय धिमही ।
तन्नो दत्त प्रचोदयात् ॥५॥
ऊँ स्वामी समर्थाय विद्महे । परम अवधूताय धिमही ।
तन्नो महादत्त प्रचोदयात् ॥६॥
खंडोबाचे देवळात । राहू लागले स्वामी समर्थ ।
अलिखान घेऊनी जात । चोळाप्पा घरी स्वामींना ॥७॥
चोळाप्पा स्वामी भक्त । त्याचे घरी समर्थ राहत ।
अनेक लीला करीत । निष्ठा पाहती भक्ताची ॥८॥
सिध्द अन्न गाईसी घालिती । कडधान्ये गुरांना चारिती ।
घरात शौचास बैसती । ऐसे छळती तयालागी ॥९॥
विविध प्रकारे छळती नित्य । वरी शिवीगाळ करीत ।
वस्तू वाटूनी टाकीत । ऐसे छळती भक्तासी ॥१०॥
मालोजीराजे प्रतिवर्षी । गाणगापुरी जाऊनी सेवा करिती ।
स्वप्नी नृसिंह सरस्वती । म्हणती पाहा काय ते ॥११॥
मी आलो तुझ्या गावात । तू का येसी गाणगापुरात ।
राजसी विश्वास होत । समर्थ दत्त म्हणोनिया ॥१२॥
एक मोठे वडाचे झाड आहे आणि
झाडाखाली स्वामी समर्थ बसलेले आहेत.
येऊनी चोळाप्पाचे घरी । राजा दत्ताचे पाय धरी ।
म्हणे गुरुदत्त अवतारी । आपणा मी ओळखिले ॥१३॥
तैपासोनी समर्थ । कधी कधी जाती राजवाडयात ।
राजासही त्रास देत। विविध प्रकारे करोनिया ॥१४॥
सुवर्ण अलंकार विहिरीत टाकावे । क्रोधे राजासी मरावे ।
वाडयातील स्त्री – पुरुषांशी छळावे । ऐसे करिती श्री स्वामी ॥१५॥
परी निष्ठावान भक्त । आपुली निष्ठा न सोडीत ।
सर्व त्रास साहित । श्री गुरुकृपे कारणे ॥१६॥
कधी राहती राजवाडयात । कधी वटवृक्ष स्थानात ।
कधी चोळाप्पाचे घरात । ऐसे राहती श्री स्वामी ॥१७॥
काशीपासोनी रामेश्वरपर्यंत ।दुरदुरोनी लोक येत ।
गर्दी जव वाढू लागन । वटवृक्ष स्थानी राहिले ॥१८॥
समर्थ होता क्रोधित । थरथरा कापती भक्त ।
एकेका चोपुनी काढीत । ऐसा क्रोध स्वामींचा ॥१९॥
मालोजीराजे भोसले । स्वामी सेवा करु लागले ।
एकदा भेटीसी आले । अंबारीत बैसोनिया ॥२०॥
स्वामी जवळी जावोन । केला दंडवत प्रणाम ।
दिली श्रीमुखात ठेवून । पागोटे उडाले दूर ते ॥२१॥
घातल्या शिव्या भरपूर । दिले हाकलोनी सत्वर ।
ऐसे राजे पैशास शेर। बाजाराता विकतो मी ॥२२॥
पाहोनी उग्र अवतार । भक्त पळाले दूरवर ।
ऐसा स्वामींचा व्यवहार । अक्कलकोटी चालतसे ॥२३॥
नृसिंहवाडीचे भक्तगण । आले दर्शना कारण ।
चरणी घालोनी लोटांगण । पुसती स्वामीलागी ते ॥२४॥
स्वामी आपण कोण । कोठूनी झाले आगमन ।
स्वामीही प्रसन्नवदन । वदती पाहा काय ते ॥२५॥
‘मूळपुरुष वडाचे झाड ’ । ‘दत्तनगर’ देती उत्तर ।
ऐकोनी जयजयकार । भक्त करिती तेधवा ॥२६॥
तैसेची एका भक्ता सांगत । मी नृसिंहभान असत ।
काश्यप गोत्र माझे म्हणत । मीन राशी आमुची ॥२७॥
ऐशा लीला करीत । अक्कलकोटी राहती समर्थ ।
त्यांचे चरित्र अद्भुत । संक्षिप्त रुपे पाहतसो ॥२८॥
एकदा कलकत्याहून । दर्शना येती भक्त दोन ।
एक पारशी एक युरोपियन । दर्शन घेती स्वामींचे ॥२९॥
काली रुपात दर्शन । देती समर्थ तयालागोन ।
आश्चर्यचकित होवोन । जाती पाहा दोघे ते ॥३०॥
म्हणती समर्थ निराकार । देवी देवता रुपाकार ।
पूर्णब्रह्म परात्पर । अक्कलकोटी राहिले ॥३१॥
होऊनी अत्यंत प्रभावित । राहती सेवा करीत ।
पाहूनी स्वामी प्रसन्न चित्त । पुसती पाहा काय ते ॥३२॥
स्वामी आपण कोण । येणे झाले कोठून ।
स्वामी समर्थ प्रसन्न । वदती पाहा काय ते ॥३३॥
मूळपुरुष मी निराकार । दत्तात्रेय दिगंबर ।
अवधूतरुपे संचार । करीत असतो भूवरी ॥३४॥
कर्दळी वनातून सांप्रप्त । निघालो पाहा फिरत फिरत ।
बगाल कलकत्ता पाहत । बद्रीकेदार पाहिले ॥३५॥
तेथूनी पाहिले हरिव्दार । अयोध्या व्दरका पंढरपुर ।
हुमणाबाद बेगमपूर । पाहोनी येथे आलो मी ॥३६॥
तेव्हापासून अक्कलकोटात । आहे पाहा येथे राहत ।
दत्तावधूत स्वामी समर्थ । ऐसे म्हणती मजलागी ॥३७॥
ऐकोनी ऐसा वृत्तान्त । जयजयकार करिती भक्त ।
म्हणती दत्त साक्षात । येऊनी येथे राहिला ॥३८॥
गाणगापुरातील भक्त । अक्कलकोटी दर्शना येत ।
तयासी म्हणती स्वामी समर्थ । नृसिंह सरस्वती मी असे ॥३९॥
मी श्रीपाद श्रीवल्लभ । होतो कुरवपुरी राहत ।
नृसिंह सरस्वती रुपात । गाणगापुरात मी होतो ॥४०॥
कर्दळीवनात मीच गेलो । तेथूनी पुन्हा परतलो ।
सांप्रत येथे राहिलो । जगदोध्दारा कारणे ॥४१॥
ऐसे ऐकोनी वचन । भक्त पावती समाधान ।
म्हणती गुरु दयाळ पूर्ण । पुन्हा पाहा प्रकटले ॥४२॥
गाणगापुरात काही भक्त । होते अनुष्ठान करीत ।
तयासी स्वप्नी श्री दत्त । सांगती पाहा काय ते ॥४३॥
अक्कलकोटी सांप्रत । समर्थरुपे मी राहत ।
जावोनी सेवा त्वरित । श्री स्वामी समर्थाते ॥४४॥
ऐसे आदेश होत । सेवकांसी गाणगापुरात ।
गाणगापुराहूनी नित्य । लोक येवो लागले ॥४५॥
गिरनार पर्वती एक भक्त । दत्त दर्शनार्थ तप करीत ।
त्यासी दृष्टांत होत । श्रोते तुम्ही अवधारा ॥४६॥
दत्त तयासी सांगत । जावे अक्कलकोटात ।
स्वामी समर्थ रुपात । सांप्रत आहे मी तेथे ॥४७॥
ऐसे होती दृष्टांत । तपस्वी आणि योग्यांप्रत ।
अक्कलकोटी महिमा वाढत । श्री स्वामी समर्थांचा ॥४८॥
दूरदुरोनी तडी तापसी । येती स्वामी दर्शनासी ।
पूर्ण परब्रह्म दत्तात्रेयासी । पाहोनी तृप्त होती ते ॥४९॥
ठाकूरदास गाणगापुरात । श्री दत्ताची सेवा करीत ।
त्यासी दृष्टांत होत। अक्कलकोटी आहे मी ॥५०॥
म्हणोनी अक्कलकोटी येत । स्वामी दर्शन करण्या जात ।
परी मनामाजी म्हणत । पाहू सामर्थ्य स्वामींचे ॥५१॥
दत्त पादुका गाणगापुरी । वहावया त्यावरी कस्तुरी ।
ती घेऊनी बरोबरी । अक्कलकोटी पोचले ॥५२॥
करिता समर्थांसी वंदन । ‘ हमारा कस्तुरी लाव ’ म्हणोन ।
केले स्वामींनी आज्ञापन । भक्त विस्मित होत असे ॥५३॥
हेची दत्तात्रेय समर्थ । खूण त्यासी पटत ।
तात्काळ कस्तुरी अर्पित । श्री स्वामींसी तेधवा ॥५४॥
ऐसे स्वामी समर्थ । लीला करिती अनंत ।
नित्य नूतन महिमा होत । अक्कलकोटा माझारी ॥५५॥
गोविंदराव गाणगापुरात । होते पादुका सेवा करीत ।
त्यांसी दृष्टांत होत । श्रोते पाहा काय तो ॥५६॥
गाणगापूर गर्भ मंदिरात । जेथे निर्गुण पादुका असत ।
श्री स्वामी सम्रर्थ । बैसले तेथे पाहे तो ॥५७॥
स्वामी तयासी म्हणत । हे माझेची स्थान असत ।
परी सदेहाने सांप्रत । अक्कलकोटी आहे मी ॥५८॥
पाहोनी ऐसा दृष्टांत । गोविंदराव अक्कलकोटी येत ।
श्री स्वामींसी निवेदीत । दृष्टांत सारा तेथवरी ॥५९॥
तव म्हणती स्वामी समर्थ । पूर्वी होतो गाणगापुरात ।
तैसेची गिरनार पर्वतात । होतो आम्ही जाण पा ॥६०॥
माहूरगड अबू पर्वत । मेरु पठार हिम पर्वत ।
औदुंबर नृसिंहवाडीत । होतो पूर्वी अवधारा ॥६१॥
तैसेची कर्दळीवनात । श्रीशैल सुब्रमण्य स्थानात ।
आणि निलगिरी पर्वतात । पूर्वी राहिलो होतो मी ॥६२॥
ऐसे सांगती समर्थ । विस्मित होती भक्त ।
म्हणती श्रीपाद श्रीवल्लभ । पुन्हा ऐसे प्रकटले ॥६३॥
अजानुबाहू भव्य शरीर । टोपी शोभे मुकुटाकार ।
अवधूत दत्त दिगंबर । लोकोध्दारा प्रकटले ॥६४॥
योगी तपस्वी संन्यासी । दुरोनी येती दर्शनासी ।
ब्रह्मप्राप्ती तयांसी । स्वामीकृपे होत असे ॥६५॥
सीताराम नामे भक्त । होते योगसाधना करीत ।
परी समाधी न लागत । येती दर्शना कारणे ॥६६॥
स्वामी कृपादृष्टी करीत । योग्यासी समाधी लागत ।
आठ तासपर्यंतस । समाधी त्यांसी लागतसे ॥६७॥
ऐसा महिमा अगाध । वर्णिता थकती वेद ।
स्वामी समर्थ श्री दत्त अक्कलकोटी राहिले ॥६८॥
म्हणोनिया दत्तगिरी । श्री गुरुचरित्र विस्तारी ।
समर्थ स्वामी अवतारी । अक्कलकोटी राहिले ॥६९॥
हा ग्रंथ नव्हे अमृत । श्री स्वामींची वाड्मय मूर्त ।
पठणे दर्शन साक्षात । श्री स्वामींचे होत असे ॥७०॥
॥ अध्याय तिसरा ॥ ॥ ओवी संख्या ७०॥
श्री स्वामी समर्थ सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 10
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय नववा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 9
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय आठवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 8
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय चौथा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 4
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 1