श्री पुरुषोत्तम मास अध्याय तिसावा

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 30 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 30

श्री गणेशाय नमः ॥

श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जयजयाजी श्रीरामा ॥ अनुपम्य तुझा महिमा ॥
तव कृपा बळें माझिया नेमा ॥ सिद्धि पावविलें दातारा ॥ १ ॥

मार्गे कवी थोर थोर झाले ॥ तयांनी अपार ग्रंथ केले ॥
तूं तें गीतीं आळवीत गेले ॥ तुवा धावणें केलें तात्काळीं ॥ २ ॥

तयाची येथें न साजे उपमा ॥ मी तंव अधमामाजी अधम ॥
नाहीं क्रिया दानधर्म ॥ नाही सुगम उपाव ठावा ॥ ३ ॥

वाचेसही नाहीं मधुरता ॥ किती आळवावे रघुनाथा ॥
त्याही वरी दरिद्र अवस्था ॥ सदा वाहे चिंता हळहळ ॥ ४ ॥

तेथें मी काळ कैसा क्रमावा ॥ म्हणोन उद्‌गार जाला जिवा ॥
बुद्धि दाता तू राघवा ॥ तुझिया भावा अगम्य ॥ ५ ॥

हे माझी नव्हे स्वबुद्धि कविता ॥ अवघी ही तुझी सर्व सत्ता ॥
वाचेसि नाही मधुरता ॥ परि संपूर्णता तुवां केली ॥ ६ ॥

मागील कवींचे जे जे बोल ॥ ते तंव सुवासिकपुष्पें केवळ ॥
तेथें माझी वाणी केवळ ॥ धत्तुतपुष्पें जाण पां ॥ ७ ॥

समर्थे मौक्तिकांची लाखोली ॥ तुजलागीं रामा अर्पिली ॥
तेथें माझी हे वाग्वल्ली ॥ तुलसी दल समर्पिलेंसे ॥ ८ ॥

आतां कळसाध्याय तिसावा ॥ तो कृपाबळें सिद्धीते न्यावा ॥
संपूर्ण मलमहत्म्याचा ठेवा ॥ तुजप्रती देवा पावों दे ॥ ९ ॥

संपूर्ण व्रताचे जें फळ ॥ माझें तव हेंचि सकळ ॥
तुज प्रीत्यर्थ अळूमाळ ॥ पावो सकळ देवराया ॥ १० ॥

आता परिसाहो सादर ॥ श्रोते सज्ञान चतुर ॥
संपूर्ण कथिला प्रसर ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ ११ ॥

संपूर्ण भरतां एक मास ॥ तयाची गणती तीस दिवस ॥
म्हणोनी अध्याय हे तीस ॥ जाले असती निर्धारें ॥ १२ ॥

ह्या तीस मौक्तिकांच्या माळा ॥ सभाग्य श्रोतीं घालाव्या गळां ॥
भावें अर्चिजे धनसावळा ॥ घाला गळां त्याचिया ॥ १३ ॥

किंवा हे तीस दीप उजळा ॥ भावार्थे घृत वाति घाला ॥
अंतरज्योत पे पाजळा ॥ तेणें वोवाळा लक्ष्मीरमण ॥ १४ ॥

अथवा हे तीस कुंभ जाण ॥ श्रवण जीवनें भरि जे पूर्ण ॥
भावबळें दीजे हो दान ॥ तेणें नारायण संतोषे ॥ १५ ॥

वादविवाद टाकून ॥ मूकवत करावे श्रवण ॥
तेंचि तुम्हा घडे मौन्य ॥ तेणें नारायण संतुष्टे पैं ॥ १६ ॥

ऐसिया संपूर्ण नेम ॥ अर्चिजे हो पुरुषोत्तमा ॥
तयायोगें कर्मीकर्मा ॥ मुक्त होती प्राणी पैं ॥ १७ ॥

ऐसे हे तीस अध्याय पूर्ण ॥ ग्रंथ जालासो निर्माण ॥
तुजप्रती पावो नारायण हें वाकपुष्प चरणीं अर्पिलें ॥ १८ ॥

संपूर्ण ग्रंथ जरी न हो श्रवण ॥ तरी शेवटील अध्याय हा पूर्ण ॥
श्रवण फलप्राप्ति जाण ॥ समग्र कथन ग्रंथ गर्भी ॥ १९ ॥

म्हणोन तीस अध्यायांची ॥ वेगळालीं फळे तयांची ॥
परिसवू तुम्हां तैसेची ॥ एकाग्र मन असों द्या ॥ २० ॥

मिळोन समग्र ऋषींचा मेळा ॥ सूताप्रती तयांनी प्रश्न केला ॥
सूत तयातें वदता जाला ॥ लक्ष्मीनारायण संवाद ॥ २१ ॥

मलमासाची उत्पत्ती ॥ कथिता जाला निगुती ॥
ब्राह्मणसेवा दानपद्धती ॥ सांगोन प्रथमोध्याय संपविला ॥ २२ ॥

द्वितीयोध्यायीं गोसेवा वर्णन ॥ कमलासनाचा गर्वहरण ॥
केतकी आणि धेनू तें जाण ॥ असत्य वदता पंचवदनें शापिलें ॥ २३ ॥

गोसेवाविशेष पाही ॥ निवेदिली त्रितीयोध्यायी ॥
पौलव्यऋषीतें छळितां वासवीं ॥ नवल पदवी ऐकिली ॥ २४ ॥

वासवासहीत तिन्ही देव ॥ शापावया ऋषिपुंगव ॥
उदक घेता धेनू अंगी सर्व ॥ देखता जाला ऋषी तो ॥ २५ ॥

मग उदक टाकिता झाला ॥ विवेकें क्रोध शांतविला ॥
प्रसन्न होऊन देवतामेळा ॥ ऋषि बैसविला विमानी ॥ २६ ॥

चतुर्थोध्यायी कथा बरवी ॥ ब्राह्मणसेवा निवेदिली आघवी ॥
उपरि दृष्टांती कथा लाघवी ॥ शूद्रें नेले पाही द्रव्यातें ॥ २७ ॥

नृगराज झाला सरड ॥ ब्रह्म शाप अतिप्रचंड ॥
तो कृष्णदर्शनें उद्धरिला वितंड ॥ पंचमोध्यायीं कथाही ॥ २८ ॥

सहावियामाजी कथा ॥ दानमहिमा वर्णिला तत्वतां ॥
आणि दीपदान विप्रस्त्री करितां ॥ उद्धरिला मार्जार ॥ २९ ॥

सातव्यामाजी कथा बरवी ॥ शांकली विप्र सामवेदी पाही ॥
त्यातें भार्या उभयतांही ॥ एकी अधोगती एकी उद्धारू ॥ ३० ॥

दीपदान करितां ज्येष्ठकांता ॥ धाकुटी सवत मत्सरें विध्वंसितां ॥
त्रयपुत्र नष्ट होऊन अधोगतिता ॥ प्राप्त जाली तयेतें ॥ ३१ ॥

अष्टमोध्यायीं कथानक ॥ उत्तर देशी नर्मदातीरी एक ॥
ज्योतिषी ब्राह्मण एक ॥ अतिकृपण धनवान तो ॥ ३२ ॥

कांतेनें उदक म्हणोन पय दिधले ॥ त्या योगें शेष प्रसन्नवदनें बोलें ॥
संचित द्रव्य कांतेचे बोलें ॥ देऊनि लाविलें साधनासी ॥ ३३ ॥

दक्षिण देशीं महीस्मृती नगरी ॥ विप्रस्त्री वैधव्य वृद्धाचारी ॥
तें व्रत करितां शूद्रनारी ॥ तात्काळ उद्धरी पुण्योदकें ॥ ३४ ॥

सप्तदिवसांचे स्नानोदक ॥ ती ते करीं अर्पिले देख ॥
उद्धरगती तात्काळिक ॥ वाराणसी देख जन्म झाला ॥ ३५ ॥

काशीनाथ नामाभिधान ॥ उभयता वृद्धासहीत विमान ॥
नवव्यामाजी हेचि कथन ॥ जालें संपूर्ण निर्धारें ॥ ३६ ॥

दशमामाजी कथा पाहीं ॥ अवंती नगरीचा ब्राह्मण दरिद्री ॥
मौन्य व्रत करितांना होई ॥ उद्धार तयाचा ॥ ३७ ॥

अकराव्यामाजी कथा अव्यग्र ॥ पंचपर्वे सांगितलीं साचार ॥
व्यतीपात वैधृती अमावास्या थोर ॥ पूर्णिमा आणी द्वादशी ॥ ३८ ॥

द्वादशामाजी तेची कथा ॥ सांगितली पर्वाची कथा ॥
पूर्णिमा-अमावास्या तत्वता ॥ महिमा निरुता वर्णिला ॥ ३९ ॥

त्रयोदशामाजी कथा ॥ निवेदिलें त्रिरात्रीचे व्रता ॥
दशमी एकादशी सहिता ॥ द्वादशी महिमा वर्णिला ॥ ४० ॥

आणि अंबरीष नृपराणा ॥ दुर्वासें केली छळणा ॥
तात्काळ पावला नारायण ॥ चौदावा जाण असे हा ॥ ४१ ॥

श्रीरामेंव्रत करितां द्वादशी ॥ तेची व्रतें शतमुख रावणासी ॥
मुक्ति दिधली तयासी ॥ पंधराव्यासी हे कथा ॥ ४२ ॥

इंद्राची अप्सरा स्मितविलासिनी ॥ दुर्वासें शापिलें तियेलागुनी ॥
ते पिशाच्च होऊन याज्ञवल्कीची मैत्रिणी ॥ सोळाव्या माजी उद्धरिली ॥ ४३ ॥

धर्म शर्म स्वस्त्रियेसी प्रतिष्ठानता ॥ व्रत करी त्रिरात्री नेमस्ता ॥
पिशाच्य उद्धरून तत्वता ॥ सत्राव्यांत हे कथा ॥ ४४ ॥

विंध्याद्री पाठारीं जाण ॥ गर्गनामें नगरी पूर्ण ॥
तेथील एक भृगुगोत्री ब्राह्मण ॥ कन्या जाण तयाची ॥ ४५ ॥

तियेतें वैधव्य प्राप्त होतां ॥ व्रतप्रभावें अक्षयीं सौभाग्यता ॥
नामे मंगळागौरी तत्वता ॥ वाराणसीये ॥ ४६ ॥

अठराव्यामाजी हे कथा ॥ आतां एकुणिसावा तत्वता ॥
विप्रदास नामें शूद्र होता ॥ आचरे व्रता कांतेसहित ॥ ४७॥

तयानें उद्धरला राक्षस ॥ देऊनि त्रिदिनी पुण्यास ॥
आतां विसाव्या माजी विशेष ॥ कथानक परिसिजे ॥ ४८ ॥

सौराष्ट्र देशीं प्रभासनगरीं ॥ तेथील सोमशर्मा विप्र निर्धारी ॥
स्नानास जातां गंगातीरीं ॥ पिशाच्य निर्धारीं उद्धरिला ॥ ४९ ॥

सौराष्ट्र देशीं अतिसुशीळ ॥ प्रभास क्षेत्र परमविशाळ ॥
तेथील ब्राह्मण पुण्यशीळ ॥ नामें जाण सोमशर्मा ॥ ५० ॥

तयानें आचरतां व्रतास ॥ स्नाना जातां उद्धरिला राक्षस ॥
त्रिरात्री देऊनि व्रत पुण्यास ॥ विसावा निर्दोष जाणिजे ॥ ५१ ॥

विराट देशाचिये ठायीं ॥ माहुरनामें नगरी पाही ॥
रेणुक दैवत तये ठायीं ॥ अनुसूया परम पतिव्रता ॥ ५२ ॥

तेथील एक शूद्र भावार्थी ॥ विप्रसेवा करितसे दिनराती ॥
कुष्ठ भरतांच तयाप्रती ॥ गंगास्नानें उद्धरागती तो गेला ॥ ५३ ॥

असे कथानक एकविसावा ॥ आता परिसा बाविसावा ॥
नाना दानाचा वेगळा ठेवा ॥ सांगितला आदरेसी ॥ ५४ ॥

तेथें महीस्मृती नगरीं ॥ एक ब्राह्मण सदाचारी अग्निहोत्री ॥
तेथें नारायण राहून मंदिरीं ॥ विपरीत परी पैं केली ॥ ५५ ॥

तक्रविक्री तयाचा कुमर ॥ तात्काळ केला तयाचा उद्धार ॥
विप्रदुहिता होती जार ॥ तेहि उद्धार पावली ॥ ५६ ॥

ऐसा कथानक बरवा ॥ बावीसापासून चोविसावा ॥
आतां ऐकिजे पंचविसावा ॥ प्रेमभावा आदरेंसी ॥ ५७ ॥

मासामाजि मलमस उत्तम ॥ स्वयें वदला पुरुषोत्तम ॥
अरुंधती पार्वती संवाद परम ॥ अखंड सौभाग्य लाधले ॥ ५८ ॥

वीरबाहु नृपाची कांता ॥ तीतें प्रबोधि प्रधानवनिता ॥
ते तंव व्रताते हेळणा करितां ॥ शरिरीं अवस्था भोगिली ॥ ५९ ॥

मग मंडण प्रधान कांतेसि ॥ कारागृहीं ठेविले नृपवर त्यासीं ॥
स्वप्नामाजी येऊन ह्रषीकेशी मुक्त तयासी करविले ॥ ६० ॥

इतुका कथानक सव्विसावा ॥ पुढें ऐकिजे सत्ताविसावा ॥
समान फळव्रत प्रभावा ॥ पुसे माधव लक्ष्मीतें ॥ ६१ ॥

साधारणें करितां व्रतास ॥ कांही न लागता सायास ॥
ऎशा अधमी स्त्री पुरुषास ॥ पावली निःशेष मोक्षातें ॥ ६२ ॥

ऐसा कथानक सुशर्म नृपवर ॥ कथितसे अंगिरा ऋषेश्वर ॥
सत्ताविसाव्या माजी प्रकार ॥ जाला साचार इतुका ॥ ६३ ॥

आतां अष्टविंशति कथा ॥ पतिव्रताधर्म वदलासे तत्वता ॥
काश्मीर देशी धर्मशर्मा द्विज होता ॥ तयाची कांता पतिव्रता निःसीमा ॥ ६४ ॥

तिये तें पुत्र जाले दोन पाही ॥ ते उद्धरिले निषादियें लवलाही ॥
ऐसी तेथील पदवी आघवी ॥ अठ्ठाविसामाजी आणिजे ॥ ६५ ॥

व्रत उद्यापनाची सविस्तर ॥ कथिता जाला शारंगधर ॥
एकूणतिसाव्यामाजी समग्र ॥ हाचि प्रकार सांगितला ॥ ६६ ॥

उद्यापनावाचून व्रतसिद्धि ॥ प्राप्त होय कदाचि कधीं॥
म्हणोन उद्याचनातें आधीं ॥ आचराहो भावार्थे ॥ ६७ ॥

आतां कळस अध्याय तिसावा ॥ तो भावबळें परिसावा ॥
म्हणजे संपूर्ण ग्रंथगर्भठेवा ॥ हाता चढे अनयासेंसी ॥ ६८ ॥

जरि नित्य न घडे पुराण श्रवण ॥ तरी शेवटील अध्याय पूर्ण ॥
ऐकिजे एकाग्र मन करुन ॥ फळ संपूर्ण तो लाहे ॥ ६९ ॥

ऐसी हे तीस कमळ पुष्पमाल ॥ सभाग्य श्रोती घालिजे गळां ॥
जोडूनिया करकमळा ॥ प्रार्थितों सकळा बद्धहस्तें ॥ ७० ॥

एवं तीस अध्याय संपूर्ण ग्रंथ ॥ तुज अर्पिला श्रीरघुनाथा ॥
वदता आणि वदविता ॥ सकळसत्ता पैं तुझी ॥ ७१ ॥

मी तंव मतिमंद आळसी ॥ प्रापंच धंदा अहर्निशी ॥
नेणो कांहींच साधनासी ॥ दान धर्मासी नसें धन ॥ ७२ ॥

ऐसा मी दरिद्री अकिंचन ॥ तुझी सेवा करू नेणेजाण ॥
यालागीं कळेल तैसेम कृपादान ॥ करी रघुनंदना तूचि एक ॥ ७३ ॥

अवघ्या ग्रंथाची रचना बरी ॥ संपूर्ण जाली सागराचे तीरी ॥
तेथें पश्चिमेसी मुमुक्षुपुरी ॥ असे राजधानी सांप्रत ॥ ७४ ॥

तेथें ग्रंथ पावला सिद्धीतें ॥ नमूनिया श्रीगुरुमोरेश्वरातें ॥
तयाचेनि वरदहस्तें ॥ ग्रंथसिद्धि ते पावला ॥ ७५ ॥

उमा नामें माझी माता ॥ साध्वी ते परम पतिव्रता ॥
मनोहरनामे आमुचा पिता ॥ तया उभयतां वंदिलेंसे ॥ ७६ ॥

जैसी शिव आणि भवानी ॥ तेवीं उभयता मज लागुनी ॥
भाव धरून तयांचें चरणीं ॥ ग्रंथ कथनीं संपविला ॥ ७७ ॥

शके सत्राशे बहात्तरी ॥ साधारण नाम संवत्सरीं ॥
पश्चिमेसी समुद्रपुरीं ॥ ग्रंथ निर्धारीं संपविला ॥ ७८ ॥

ग्रंथकर्ता नामाभिधान ॥ गोपिनाथ बाहाती सर्वजन ॥
मनोहरसुत म्हणोन ॥ अभंगीं नाम जाणतें ॥ ७९ ॥

गोपिनाथ तोचि नारायण ॥ जो गोइंद्रियांचें करी पाळण ॥
तोची ह्रदयस्थ श्रीभगवान ॥ ग्रंथ जाण वदला तोची ॥ ८० ॥

म्हणोनि हा मास उत्तम ॥ नाम जाणा पुरुषोत्तम ॥
एकादशी पर्व उत्तमोत्तम ॥ कृष्णपक्ष निर्धारेंसी ॥ ८१॥

सौम्यवार असे ते दिनीं ॥ सौख्य दे सकळांलागुनी ॥
परम पर्वकाळ हरिदिनी ॥ ग्रंथकथनीं संपविला ॥ ८२ ॥

श्रोता आणि वक्ता यातें ॥ श्रवण करिती जे भावार्थे ॥
आयुरारोग्य ऐश्वर्यातें ॥ पुत्रपौत्राते तो पावे ॥ ८३ ॥

आधिव्याधि नाहीं दरिद्र ॥ मनेच्छा पुरवी रघुवीर ॥
ऐसा वदला सर्वेश्वर ॥ लक्ष्मीतें आदरेंसी ॥ ८४ ॥

इति श्रीमलमाहात्मय ग्रंथ पद्‍मपुराणासारोद्धारसंमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ त्रिंशतितमोऽध्याय गोड हा ॥ ३० ॥

श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ इति मलमासमाहात्म्य संपूर्णंम् ॥

॥ श्री अधिकमास माहात्म्यं संपूर्णम् ॥


पुरुषोत्तम/अधिक मास कथा अन्य अध्याय


अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 1 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 1
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 2 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 2
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 3 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 3
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 4 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 4
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 5 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 5
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 6 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 6
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 7 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 7
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 8 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 8
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 9 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 9
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 10 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *