श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीरामचंद्राय नमः ॥ जय रुक्मिणीवरा ॥
पांडुरंगा दीनोद्धारा ॥ कृपासागरा करुणाकरा ॥ वेदोद्धारा दीनबंधो ॥ १ ॥
अनाथनाथा दयासिंधो ॥ करुणासागरा दीनबंधो ॥
कृपाकटाक्षें अवबोधो ॥ ग्रंथारंभीं वेधो लागो पैं ॥ २ ॥
श्रीगुरुवाच ॥
भगवन् भवतापौघहारिन्नानंदविग्रह ॥
मलमासेत्वशक्तानां स्नानादौ किं शुभं नृणां ॥ १ ॥
ऐका आतां श्रोतेजन ॥ लक्ष्मीनारायण संवाद जाण ॥
जे करिती समग्र कथन ॥ होय निरसन महापाप ॥ ३ ॥
लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा ॥ अगाध तुमचा महिमा ॥
जो ऐकतां कर्माकर्मा ॥ पासावमुक्त होती ॥ ४ ॥
तरी आतां प्रश्न एक ॥ स्वामीराया असे देख ॥
शरीर जालिया अशक्त ॥ न घडे देख स्नानविधी ॥ ५ ॥
जयातें मुख्य नाहीं स्नान ॥ तयानें काय करावें दान ॥
तरी निर्फळ तो जन्मोन ॥ भूभार केला तेणें पैं ॥ ६ ॥
तरी ऐसियाची कवण गती ॥ मज निवेदावें कृपामूर्ति ॥
जेणें तरणोपाय प्राणियाप्रती ॥ घडे सद्गती अनयासें ॥ ७ ॥
श्रीकृष्ण उवाच ॥
श्रृणुसाध्वि प्रवक्ष्यामि लोकानुग्रहकारिणि ॥
सम्यक् प्रश्नः कृतः सर्वलोकोपकृतिकारकः ॥ २ ॥
ऐक साध्वी वचनातें ॥ तुवां प्रश्न केला निरुतें ॥
तो तंव सर्वया जगातें ॥ परम उपकारातें जाणपां ॥ ८ ॥
तरी शक्ती नाहीं जया शरीरीं ॥ आणि धन तेंही नसे पदरीं ॥
इच्छा ते उद्भवलीसे अंतरीं ॥ करावें परोपरी व्रतातें ॥ ९ ॥
ऐसें अंतर जयाचें द्रवलें ॥ नारी अथवा पुरुष भले ॥
तयानें पाहिजे काय केलें ॥ तरी ऐक वहिले भामिनी ॥ १० ॥
मुक्त क्रिया जयाची पाहीं ॥ तो विचरो भलतिये ठायीं ॥
तैसीच हेहि नवाई ॥ ठाईंचे ठायीं तटस्थ ॥ ११ ॥
यालागीं सांगतों ऐकें ॥ भजन करावें परम निकें ॥
भजनावीण आणीक देखें ॥ सार्थक आणिक नसेची ॥ १२ ॥
भजनें तरले महाज्ञानी ॥ तपस्वियांमाजी शिरोमणी ॥
महाराज तो नारदमुनी ॥ नामस्मरणीं रत सदां ॥ १३ ॥
नामजपें कैलासनायक ॥ हळाहळ जालें शांत तात्काळिक ॥
ऋषीमाजी पुण्य श्लोक ॥ वाल्मिकि देख तरलासे ॥ १४ ॥
नामस्मरणाचा प्रादुर्भावो ॥ शतकोटी प्रबंध पाहाहो ॥
त्रैलोकींचा समुदावो ॥ मान्य केलें तयालागीं ॥ १५ ॥
यालागीं सुंदरी पाहीं ॥ नामस्मरणाविण सार्थक नाहीं ॥
न पडावें आणिक प्रवाहीं ॥ शक्ती नाहीं म्हणोनिया ॥ १६ ॥
अपि कर्मफलौधानां दाहकं भवतारकं ॥
अशक्तानां विशेषेण मलमासे विशेषतः ॥ ३ ॥
हरेर्नाम हरेर्नाम कीर्तनं कथितं बुधैः ॥
येनकेन प्रकारेण सर्व कामाप्तिसाधनं ॥ ४ ॥
शक्ती नसे जयाचे देहीं ॥ तरी भजन करावें तेंही ॥
सदां सर्व काळ ह्रदयीं ॥ अच्युतचिंतन करावे ॥ १७ ॥
कोटि गोदानाचें फळ पाहीं ॥ जन्मवरी तीर्थ केलें नाहीं ॥
अपार दाने दिधली स्वगृहीं ॥ परी तुळना नाहीं नामासीं ॥ १८ ॥
कृष्णकृष्णेति कृष्णेति प्रत्यहं वक्तिवैकलौ ॥
नित्यं यज्ञायुतं पुण्यं तीर्थकोटिफलं लभेत् ॥५ ॥
कोटि यज्ञाचें जें फल ॥ तें नामें पाविजे तात्काळ ॥
ऐसे हें नाम सुफळ ॥ कोणी न भजे तयातें ॥ १९ ॥
फुकाचें मुखीं नाम घेतां ॥ काय वेंचे हो तत्वता ॥
अवघा वेळ भांडता ॥ उसंत तत्वता नसेची ॥ २० ॥
परी यासाठीं घडीमाजी एक ॥ पळ अथवा निमिष देख ॥
आठवितां यदुनायक ॥ याविण आणिक नसे कांहीं ॥ २१ ॥
म्हणोन अशक्त पुरुषातें पाहीं ॥ हरि भजनावीण कांहीं ॥
दुसरें सार्थक नाहीं ॥ न पडावें प्रवाही आणिक ॥ २२ ॥
जरीं जाले पापाचे डोंगर ॥ नारी हो अथवा नर ॥
पाप क्षाळणातें आन विचार ॥ नाम निर्धार बोलिला असे ॥ २३ ॥
या कलियुगीं जाण लतिके ॥ घडतील अनंत पातकें ॥
स्त्रीहत्या बाळहत्या देखें ॥ भ्रूणहत्या महापाप ॥ २४ ॥
मात्रागमनी मातृहत्यारी ॥ भगिनीश्नुषागमनी निर्धारी ॥
शेखीं तयाचा जो वध करी ॥ पापें अघोरिया नामें ॥ २५ ॥
गुरुहत्या पितृहत्या जाण ॥ गोहत्या अभिलाषी जो धन ॥
मांसाहारी मद्यप्राशन ॥ निंद्य जाण विप्रासी ॥ २६ ॥
हीं महत्पापें सांगितलीं ॥ क्षुद्रपापें नाहीं गणिलीं ॥
नामें नाश होती सकळी ॥ जेवी होळी तृणाची ॥ २७ ॥
एते चान्येच पापिष्ठा महापापमृताश्चये ॥
सर्वपापैः प्रमुच्यंते कृष्णरामेतिकिर्तनात् ॥ ६॥
आपुलेनि न करवे नामोच्चार ॥ तरी दुजियातें करावा सोपस्कार ॥
अथवा पुराण श्रवणीं क्षणभर ॥ जाऊनियां बैसावें ॥ २८ ॥
अवघा वेळ संसार धंदा करितां ॥ फुरसतची नाहीं तत्वतां ॥
तथापी क्षण एक पाहतां ॥ अवकाश कीजे सज्जनीं ॥ २९ ॥
अमोल्य नरदेहाची प्राप्ती ॥ कोटि वेंचितां नये एक घटी ॥
आयुष्य जातसे उठाउठी ॥ म्हणोनि पुण्यासांठी पैं कीजे ॥ ३० ॥
घोरे कलियुगे प्राप्ते सर्व धर्म विवर्जिते ॥
हरिकीर्तनमेवात्र संपूर्ण फलदायकं ॥ ७ ॥
हरेर्नामैव नामैव नामैव मम जीवनं ॥
कलौनास्त्येव नास्त्येव नास्त्येव गतिरन्यथा ॥ ८ ॥
यदर्थी इतिहास बरवा ॥ श्रोता विमळ परिसावा ॥
तयायोगें जगाते सर्वा ॥ उपरती घडे तात्काळ ॥ ३१ ॥
उत्तरदेशीं नर्मदा तीरीं ॥ भूसुर नामें एक नगरी ॥
तेथील एक ब्राह्मण गृहाचारी ॥ असे अधिकारी ज्योतिषी ॥ ३२ ॥
कांता तयाची पाहतां ॥ नामें सावित्री परमपतिव्रता ॥
अवघा वेळ संसार धंदा करितां ॥ नाम तत्वता न सोडी ॥ ३३ ॥
हे कृष्ण गोविंदा गोपाळा ॥ मुखीं सर्वदां हाचि चाळा ॥
पती तिचा परम धनागळा ॥ असे आगळा कृपण तो ॥ ३४ ॥
पोटा न खाय पुरतें अन्न ॥ सांचिलेंची सांची तसे धन ॥
कोणी दिधलिया वस्त्र नूतन ॥ टाकी विकून धनलोभें ॥ ३५ ॥
ऐसें धन संग्रहितां पाही ॥ सप्त कुंभ सांचले स्वगृहीं ॥
सुवर्ण नाणें असे तेंही ॥ धन पाहीं संचितार्थ ॥ ३६ ॥
कांतेसी धड वस्त्रे नसें ॥ पोटा अन्न मोजून देतसे ॥
स्वयें एक भुक्त करीतसे ॥ धन गोडसरसें न पाहे ॥ ३७ ॥
या रीतीं क्रमीतसें काळ ॥ पोटीं नसे एकही बाळ ॥
कांता सदा करी तळमळ ॥ म्हणे धन हें निर्फळ असोनी ॥ ३८ ॥
नेणें कधी कुळधर्म कुळाचार ॥ तीर्थ पर्वणी सणवार ॥
आसक्त सदां धनाचार ॥ नेणें प्रकार आणिकही ॥ ३९ ॥
काय करावें ऐसियास ॥ नेणें कधीही सुग्रास ॥
ऐसियाचे देवें संगतीस ॥ कां पां घातलें मजलागीं ॥ ४० ॥
स्वगृही इतुकी आपदा ॥ परी पतीते न मागे कदां ॥
नामही न सांडी सर्वदां ॥ गोविंदा गोपाळा माधवा ॥ ४१ ॥
ऐसें वर्ततां संसारीं ॥ तंव वर्तली नवल परी ॥
ब्राह्मण गेलासें बाहेरी ॥ कृषीवळीते आणावया ॥ ४२ ॥
तयाचा नित्य हाचि व्यापार ॥ पंचांग घेऊनि बरोबर ॥
सदांचा तो रानभर ॥ जाय निर्धार रानातें ॥ ४३ ॥
ऐसें असतां एके अवसरीं ॥ एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी ॥
मध्यान्ह समयीं पातला घरीं ॥ म्हणे आहेत घरीं भट्टबाबा ॥ ४४ ॥
तंव कांता आली धावत ॥ कोण म्हणूनि पुसत ॥
येरु वदे मी शूद्र निश्चित ॥ आमंत्रणार्थे पातलों ॥ ४५ ॥
आज माझिये ग्रामीं ॥ ब्राह्मणभोजन आहे धामीं ॥
ऐसें म्हणोन पातलों मीं ॥ द्यावया आमंत्रण ॥ ४६ ॥
तरी बावा आलिया बाहेरूनी ॥ सत्वर धाडा माझिये सदनीं ॥
विलंब न लाविजे तें क्षणी ॥ येता क्षणी धाडिजे ॥ ४७ ॥
ऐसे सांगोनि तो गेला ॥ तंव दिवस संपूर्ण माध्यान्ह झाला ॥
तों सवेंची ब्राह्मणही पातला ॥ कृषीभारा शिरावरी ॥ ४८ ॥
तो भारा आपटिला तात्काळी ॥ उसासा बैसला स्थळीं ॥
कांतेसि म्हणे ते वेळी ॥ उदक आणी प्राशना ॥ ४९ ॥
येरी उदक न देतां घडी ॥ निरोप सांगतसे तातडी ॥
म्हणें ऐका हो स्वामी परवडी ॥ शूद्र याघडीं पातलासे ॥ ५० ॥
ग्राम तयाचा कोश दोन ॥ तुम्हां देऊन गेला आमंत्रण ॥
म्हणे सत्वर द्या पाठवून ॥ खोळंबतील ब्राह्मण भोजनासी ॥ ५१ ॥
ऐसी ऐकतांची मात ॥ तैसाचि उठिला खडबडीत ॥
म्हणे पंचपात्र देई त्वरित ॥ जातो निश्चित धावूनी ॥ ५२ ॥
येरी म्हणें उदक स्वीकारा ॥ तो म्हणें मार्गी असें झरा ॥
मज जाण्याची असें त्वरा ॥ उदक मार्गी स्वीकारीन ॥ ५३ ॥
ऐसें ऐकतां वचन गांठा ॥ येरी पिटीतसे लल्लाटा ॥
म्हणे अहो कटकटा ॥ केवि हा वांटा पापाचा ॥ ५४ ॥
इतुकें धन असोनि गृहीं ॥ परी नाहीं याचिया दैवीं ॥
अहारें शेषशायी ॥ कैसी नवाई हे केली ॥ ५५ ॥
कां न सरे हे माझा भोग ॥ याचें पावल्यें मी अर्धांग ॥
तव पापियामाजी सांग ॥ शिरोमणी असें हा ॥ ५६ ॥
ऐसें म्हणोनि ते अवसरीं ॥ शर्करामिश्रित दुग्ध झारी ॥
आणून ठेविली झडकरी ॥ तया निकटीं तात्काळिक ॥ ५७ ॥
म्हणे हे उदकाची झारी ॥ घेऊनि जाइजे बरोबरी ॥
तृषा लागतां मार्गावरी ॥ प्राशन करीं दयाळा ॥ ५८ ॥
निकें म्हणोनी वरीं घेतलें ॥ तत्क्षणीं प्राशन नाहीं केलें ॥
मार्ग झडकरोनि चाले ॥ विलंब जाला म्हणोनि ॥ ५९ ॥
चालतां क्रमितसे पंथ ॥ घर्म दाटलासे अतोत ॥
धापा देऊनी धांवत ॥ लगबग बहुत भोजनाची ॥ ६० ॥
पाहाहो मिष्टान्नासाठीं ॥ विप्रा लागी आवड मोठी ॥
परान्नातें लाळघोटी ॥ टपत बैसे बक जैसा ॥ ६१ ॥
आलियाही आमंत्रण ॥ जीवा उल्हास मानी पूर्ण ॥
ऐसें तें ब्राह्मणाचें जिणें ॥ यालागीं घडोन जाले तें ॥ ६२ ॥
असो मार्गी जातां ब्राह्मण ॥ वसंत ऋतु तापले उष्ण ॥
जवळी असतां जीवन ॥ प्राण जावो परी न सेवी ॥ ६३ ॥
तृषेनें जाहलासे व्याकुळ ॥ म्हणे उदक असे अळुमाळु ॥
सभोंवते निरखितसें सकळ ॥ सावली पैं न देखे तेथे ॥ ६४ ॥
मग एक वारूळ देखिलें नयनीं ॥ तयाची साउली पाहुनी ॥
नावेक स्थिरावला तये स्थानीं ॥ उदक झारी काढीत ॥ ६५ ॥
तृषेची लगबग मोठी ॥ म्हणोन पाहिलें नाहीं दृष्टी ॥
तैसेंचि लावीतसे होटीं ॥ गौल्यता दृष्टी देखत ॥ ६६ ॥
मग प्राशन करितां जाण ॥ तैसेंच तोंडींचे हातीं घेऊन ॥
म्हणे हे शिव भगवान ॥ बुडविलें रांडेनें सर्वही ॥ ६७ ॥
यावरी ते दुग्ध झारी ॥ वोतिली वारुळा माझारी ॥
चांडाळ तो प्राशन न करी ॥ केली परी असी तेणें ॥ ६८ ॥
परी नामस्मरणाचें महिमान ॥ कांता नित्य करीतसे आपण ॥
तयाचेनि योगें करूनि जाण ॥ फिरलें अदृष्ट तयाचें ॥ ६९ ॥
एका फुस्करा सरसी ध्वनी ॥ निघती झाली तत्क्षणीं ॥
येरू दचकला अंतःकरणीं ॥ म्हणे हे तो करणी अघटित ॥ ७० ॥
तया वारुळामाजी देख ॥ महा भुजंग असे भयानक ॥
तप्तशरीर पसरिलें मुख ॥ उष्णें देख संतप्त जालासे ॥ ७१ ॥
तंव त्या वारुळामाजी ॥ दुग्ध धार पडली मुखामाजी ॥
घटघटोन प्राशन करितां जी ॥ मनामाजी संतोषला ॥ ७२ ॥
तात्काळ निघाला बाहेरी ॥ मनुष्यरूपें ते अवसरीं ॥
फणा उभारूनियां शिरीं ॥ बोले त्या अवसरी ब्राह्मणातें ॥ ७३ ॥
म्हणे कृपावंता तूं कोण ॥ पर उपकारिया सगुण ॥
संतुष्ट केलें मजलागून ॥ इये काळीं स्वामिराजा ॥ ७४ ॥
म्हणे इच्छा असेल मानसीं ॥ तोंचि मागिजे आम्हां पासीं ॥
संकोच न धरावा मानसीं ॥ ब्रह्मदेवा महाराजा ॥ ७५ ॥
ऐसें तयाचें उत्तर ऐकूनी ॥ येरू परम दचकला मनीं ॥
म्हणे कवण बोले मनुष्यवाणी ॥ मागे परतुनि पाहात ॥ ७६ ॥
मागें परतुनी पाहे तयातें ॥ तंव पंचफणा मस्तका वरुतें ॥
मनुष्यवाणी बोले त्यातें ॥ ऐका श्रोते हो ॥ ७७ ॥
म्हणे आपण असा कवण ॥ मस्तकी फणा दारुण जाण ॥
बोलता मनुष्या ऐसें वचन ॥ कीजे निवेदन मजलागीं ॥ ७८ ॥
तंव बोलता झाला ईश ॥ म्हणे मी तंव असे शेष ॥
संतुष्ट जालें मानस ॥ दुग्धप्राशनें तुझिया ॥ ७९ ॥
यालागीं झालोंसे प्रसन्न ॥ इच्छा असेल तें मागें वरदान ॥
येरू करि हास्यवदन ॥ म्हणे हें तो विंदान कांतेचें ॥ ८० ॥
ऐकें महाराजा ये अवसरी ॥ कांता आमुची असे घरीं ॥
ती तें पुसोन झडकरी ॥ येतों माघारी परतोनी ॥ ८१ ॥
तियेची इच्छा असे काय ॥ हेतो मज ठाउके न होय ॥
इतका केला जो उपाय ॥ तो पर्याय तियेचा असे पैं ॥ ८२ ॥
मी परतून मागुता येतां ॥ आपण स्थिरावें समर्था ॥
येरु तथास्तु म्हणोन तत्वता ॥ झाला परतता ब्राह्मण ॥ ८३ ॥
कैची संध्या कैचें स्नान ॥ तेथें कैचें भोजन पान ॥
दिधलें सोडून आमंत्रण ॥ आला परतून निजगृहीं ॥ ८४ ॥
धांवत पळत लगबगें ॥ गृहीं पातला लाग वेगें ॥
द्वारदेशींहुनि म्हणें कोठे गे ॥ घरबुडवणी पापिष्ठे ॥ ८५ ॥
ऐसा पति शब्द ऐकतां ॥ धांवत आली पतिव्रता ॥
चरणावर ठेवून माथा ॥ अपराध समर्था क्षमा करीं ॥ ८६ ॥
नमना ऐसे वोढण ॥ दुजें न देखों पै जाण ॥
तात्कालची शांत होऊन ॥ क्रोध निघोन पै गेला ॥ ८७ ॥
मग समूळ वृत्तांतातें ॥ सांगता झाला तियेतें ॥
तुवां दुग्ध झारी निरुते ॥ दिधली प्राशना मजलागीं ॥ ८८ ॥
उदक म्हणूनि पय दिले ॥ क्रोधे मी तो नसो प्राशिले ॥
म्हणोंनि वारुळीं उलंडिलें ॥ तें प्राशिलें भुजंगें ॥ ८९ ॥
तात्काळ मनुष्य रूप धरून ॥ प्रसन्न झाला मजलागून ॥
पुसावया तुज कारणें ॥ आलों धांवून तात्काळीं ॥ ९० ॥
तरी काय इच्छा असेल मानसीं ॥ तेंचि माग तूं तयासीं ॥
ऐकून ऐसिया वचनासी ॥ येरी मानसीं चाकाटली ॥ ९१ ॥
म्हणे नवल केवढें जाहलें ॥ आमंत्रणें सोडिलें ॥
बोलतसे ऐसिया बोलें ॥ सत्यमिथ्या हरि जने ॥ ९२ ॥
विचार करू निजमनी ॥ म्हणे इतुकेंची मागिजे तया लागुनीं ॥
जें दिधलें असे तेंची देऊनीं ॥ मनोरथ पुरवावे ॥ ९३ ॥
इतुकेंचि मागा स्वामी ॥ आणीक नसे कांहीं उर्मी ॥
तथास्तु म्हणोन स्वआगमीं ॥ परता जाला तात्काळ ॥ ९४ ॥
येऊनि नमिलें शेषराजा ॥ म्हणे ऐकें वचन महाराजा ॥
कांतेचे मानसीं जे चोजा ॥ श्रवण करीं आदरेंसी ॥ ९५ ॥
ती बोलें दिधलें तेंचि द्यावें ॥ आणिक न मागूं जिवें भावें ॥
समर्थे हेंची पुरवावें ॥ मनोभावें दयाळुवा ॥ ९६ ॥
ऐकूनि तयाचें उत्तर ॥ शेष वदे कर्म अघोर ॥
कांता तुझी परम चतुर ॥ मागितला वर नेटका ॥ ९७ ॥
तें तव नसे तुझिये कपाळीं ॥ परी देणें घडे ये काळीं ॥
तथास्तु म्हणून ते वेळीं ॥ गुप्त झाला भुजंग ॥ ९८ ॥
ब्राह्मण परतला तेथूनी ॥ मार्गी विचार करीतसे मनीं ॥
म्हणें आमंत्रणें दिधली सोडूनी ॥ संधी अस्तमानी होऊं आली ॥ ९९ ॥
तरी आजी सुदीन पर्वकाळ ॥ शनिप्रदोष परममंगळ ॥
तरी ग्रामवासी द्विज सकळ ॥ भोजनालागीं पाचारूं ॥ १०० ॥
म्हणें मिष्टान्न करुन बरवें ॥ भूदेवातें तोषवावें ॥
आपणही यथेष्ट भक्षावें ॥ मन संतोषवावें कांतेचें ॥ १ ॥
ऐसा विचार करूनि विचार ॥ गृहीं पातला सत्वर ॥
परम हर्षे होऊन निर्भर ॥ बोले उत्तर स्त्रियेसीं ॥ २ ॥
म्हणें तुवां सांगितलीं जी रीती ॥ आम्हीं मागितलें भुजंगाप्रती ॥
दिधलें म्हणोन त्रिवार वचनोक्ती ॥ वदुनि गुप्त जाहला तो ॥ ३ ॥
तरीं ऐकें एक विचार ॥ आम्हां क्षुधेनें पीडिलें फार ॥
आजी प्रदोष आणि मंदवार ॥ पर्व अपार बोलिजे ॥ ४ ॥
यालागीं ग्रामवासीं ब्राह्मण ॥ तया देऊनि येतो आमंत्रण ॥
तुवां षड्रस अन्न निर्मून ॥ करि पक्वान्न यथास्थित ॥ ५ ॥
सामोग्री आणितों या अवसरीं ॥ म्हणोनि पातला गृहांतरीं ॥
उकरूनियां द्रव्याची घागरी ॥ घेतलें करी सुवर्ण नाणें पांच ॥ ६ ॥
मग शर्करेसहीत सामोग्री ॥ सर्वही बांधी पदरीं ॥
आमंत्रणें करून विप्रा घरीं ॥ आला झडकरी मागुतां ॥ ७ ॥
ऐसें होतां ते अवसरी ॥ कांतेचा हर्ष न माये अंतरीं ॥
म्हणे संतुष्ट जाला मुरारी ॥ उपजली अंतरी सद्वासना ॥ ८ ॥
मग लगबगें पाकसिद्धी ॥ करिती झाली ते गुणनिधी ॥
षड्रस अन्नें नानाविधी ॥ सिद्ध करूनि ठेवीत ॥ ९ ॥
मग भ्रतारातें विनवी सूंदरा ॥ म्हणे सत्वर ब्राह्मणातें पाचारा ॥
विलंब जालासे तुम्हां तें खरा ॥ होईल एकादा पित्तक्षोभ ॥ १० ॥
एक याम भरली निशी ॥ सत्वर बैसावें भोजनासी ॥
येरू परम हर्षयुक्त मानसीं ॥ ब्राह्मणांसी पाचारिलें ॥ ११ ॥
अर्घ्यपाद्यादी पूजन ॥ करितां झाला आपण ॥
देऊन सुमन आणि चंदन ॥ रंगमाळिका घातली ॥ १२ ॥
विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रें ॥ दीप उजळोनियां पवित्रें ॥
कणारांगोळी निरांजन पात्रें ॥ प्रतिपात्रें ठेविलासे ॥ १३ ॥
मग सरसाऊनि अचळातें ॥ वाढीतसे पक्वान्नातें ॥
जोडूनियां बद्ध हस्तातें ॥ ब्राह्मणाते वाढीतसे ॥ १४ ॥
म्हणतीं ब्राह्मण नवलकायी ॥ कधींच ऐसें देखिलें नाहीं ॥
अप्रुप आजिची नवाई ॥ भाग्य आमुचें उदेलें ॥ १५ ॥
असो भोजन होऊन निवाडे ॥ मग अर्पून त्रयोदशगुणी विडे ॥
दक्षिणा देतसे अति कोडें ॥ सुवर्ण नाणें प्रत्येका एक ॥ १६ ॥
कांतेनेंही भोजन सारिलें ॥ म्हणे आजि परम भाग्य उदेलें ॥
सावकाश भोजन झालें ॥ भूसुर आलें गृहासी ॥ १७ ॥
मग तो ब्राह्मण धनसंचय ॥ सत्कारणीं करिता झाला व्यय ॥
समयीं अतित आलिया पाहे ॥ नव्हे विन्मुख तयातें ॥ १८ ॥
ऐसी धरितां सद्वासना ॥ पापातें जालीसे क्षाळणा ॥
झाली पुण्याची गणना ॥ पतिव्रता अंगना तयाची ॥ १९ ॥
कालांतरें करूनि उभयतां ॥ पावतीं जालीं मोक्षपंथा ॥
ऐशी नामस्मरणाची वार्ता ॥ तुम्हां सर्वथा निवेदिली ॥ २० ॥
कथा हे गोड ऐकिली ॥ म्हणोनि दृष्टांतीं असे योजिली ॥
न्यून ते पाहिजे क्षमा केली ॥ श्रोतेयांणीं आदरेसी ॥ २१ ॥
हें तव दंतकथा न म्हणिजे ॥ प्रत्ययो पुराणांतरीं पाहिजे ॥
नामस्मरणाविण आन दुजे ॥ नसे जाणिजे सर्वथा ॥ २२ ॥
या कलियुगीं नामसार ॥ वदोनि गेले महाज्ञानी ऋषेश्वर ॥
आणि भगवद्वचन निर्धार ॥ श्लोकाधार परिसावा ॥ २३ ॥
सर्वकामांश्च मुक्तिश्च हस्ते तेषां वरानने ॥
ये स्मरंति नरानित्यं नाममेसर्वरूपिणः ॥ ९ ॥
इति श्रीअधिकमहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ अष्टमोध्याय गोड हा ॥ ८ ॥
ओव्या १२३ ॥ श्लोक ॥ ९ ॥
॥ इति अष्टमोध्यायः ॥
पुरुषोत्तम/अधिक मास कथा अन्य अध्याय

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 1 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 1

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 2 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 2

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 3 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 3

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 4 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 4

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 5 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 5

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 6 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 6

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 7 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 7

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 9 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 9

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 10 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 10

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 11 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 11