श्री गणेशाय नमः ॥
श्रीसरस्वत्यै नमः ॥ गुरवे नमः ॥
जयजयाजी रुक्मिणीरमणा ॥ कृपासागरा दयाघना ॥
तव स्मरणें अघ नाशना ॥ जायं निरसून तात्काळ ॥ १ ॥
तुझिये नामीं उपजो प्रेमा ॥ हेची देई सर्वोत्तमा ॥
निशिदिनी आत्मयारामा ॥ भजन घडो अक्षयी ॥ २ ॥
आतां शक्ति नसे शरीरीं ॥ भजनही नव्हे क्षणभरी ॥
उसंत नाहीं या संसारीं ॥ आठवून अंतरीं पाय तुझे ॥ ३ ॥
परी न कंठेची काळ ॥ चित्तीं वाहें तळमळ ॥
केधवा येईल वोखटी वेळ ॥ नेणों कपाळ महाराजा ॥ ४ ॥
ऐका श्रोतेहो चतुर ॥ मलमास कथानक सार ॥
जें ऐकतां पापें अपार ॥ भस्म होती क्षणमात्रें ॥ ५ ॥
लक्ष्मीनारायण संवाद ॥ परिसा होऊनि सावध ॥
संस्कृत भाषेचे प्रबंध ॥ प्राकृतावबोध परिसावा ॥ ६ ॥
लक्ष्मी रुवाचय ॥ भगवन् ब्रूहि मे सर्व मलमासस्य यत्फलं ॥
उपवासस्य सायर्थ्यं येषां नास्ति मलिम्लुचे ॥ १ ॥
किंकर्तव्यं नरैस्तैस्तु कथं पाप क्षयोभवेत् ॥
तद्वदस्व सुरश्रेष्ठ कृपां कृत्वा ममोपरि ॥ २ ॥
लक्ष्मी म्हणे कृपावंता ॥ मागें निवेदिली उपोषण कथा ॥
परी जया आंगीं नसे सामर्थ्यता ॥ उपाय केउता तयातें ॥ ७ ॥
तयाने व्रत केवी कीजे ॥ परलोकीं कैसेंनि पाविजे ॥
येविषयी निवेदीजे ॥ कवण कीजे सार्थक ॥ ८ ॥
परिसोनिया ऐसें उत्तर ॥ वदता झाला शाङ्गधर ॥
येविषयींचा तो प्रकार ॥ श्रवण कीजे शुभानने ॥ ९ ॥
श्रीकृष्ण उवाच ॥ श्रृणु देवि प्रवक्ष्यामि व्रतं पापप्रणाशनं ॥
येषामुपोषणे शक्तिर्नास्ति किंचिच्चभक्षणे ॥ ३ ॥
तैरेकभुक्तं कर्तव्यं हविष्यान्नेन नित्यशः ॥
तथा मौनंच कर्तव्यं अनंतफलमीप्सुभिः ॥ ४ ॥
विष्णु वदे ते अवसरीं ॥ शक्ति नाही जयाते शरीरीं ॥
तयाचे व्रत श्रवण करीं ॥ कवणे परी आचरावे ॥ १० ॥
तयाने करावे हविष्यान्न ॥ वरी एक भुक्त करून भोजन ॥
करावें मौन्य धरून ॥ नसे अन्य साधन पैं ॥ ११ ॥
मौन्य भोजना ऐसें पाहीं ॥ साधन दुसरें नाहीं नाहीं ॥
तेणें माते जिंकिलें पाहीं ॥ ऐके नवाई आणीक ॥ १२ ॥
मौन्यें पापाचा क्षय ॥ मौन्यें सौभाग्य प्राप्त होय ॥
मौन्यें सर्व शांत होय ॥ निरसुनि जाय सर्व अरिष्टें ॥ १३ ॥
मौन्यें कलहाची हानी ॥ मौन्यें आयुष्य वर्धनी ॥
मौन्यें सौख्यातें पावनी ॥ मौन्यें भोजनीं सादर ॥ १४ ॥
त्रिकार्यातें असावें मौन्य ॥ स्नान होम आणि भोजन ॥
याचें फळ करीं श्रवण ॥ अति आदरें करूनियां ॥ १५ ॥
मौन्य केलिया स्नान ॥ कांतीं सुंदर तेजस्वी पूर्ण ॥
आणीक होय श्रीमान् ॥ करी स्नान मौन्येसी ॥ १६ ॥
होम करितां मौन्ये करून ॥ आयुष्य वृद्धि होय जाण ॥
आणीकही साधन ॥ करिता भोजन मौन्येसीं ॥ १७ ॥
स्नानें संतुष्ट होय जाण ॥ अग्नि संतुष्ट होमें करून ॥
मौन्यें करितां भोजन ॥ स्वयें नारायण संतुष्टे ॥ १८ ॥
प्रसन्न होतां वरुण ॥ दिव्य कांती होय तेणें ॥
होम करितां मौन्ये करून ॥ श्रीवर्धमान अग्नि करितां ॥ १९ ॥
नित्य भोजन करितां मौन्ये ॥ सायुज्यता पावे तेणे ॥
ऐसे मौन्ये भोजनाचे कारण ॥ केले कथन सकळिकां ॥ २० ॥
पंच प्राणाहुति करितां ॥ बोलो नये सर्वथा ॥
संपूर्ण भोजन करितां पापे नासती समूळ ॥ २१ ॥
ऐसे भोजन करितां पाहीं ॥ तयाते प्रायश्चित्त आणीक नाहीं ॥
प्रायश्चिते पापे दहन होई ॥ हा निर्णय शास्त्रीं असे ॥ २२ ॥
मौन्य भोजन करितां ॥ आणीक प्रायश्चित्त नलगे तत्वता ॥
पापे भस्म होती जाणत जाणता ॥ नसे असत्यता हे वाणी ॥ २३ ॥
ऐसे प्रतिदिनी जयाते घडत ॥ त्या येवढा नाहीं पुण्यवंत ॥
तयावरी मलमास जाला प्राप्त ॥ तरी अधिकाधिक पैं ॥ २४ ॥
आदौ संपूर्ण एकमास ॥ तो तंव अवघाची पुण्यदिवस ॥
तयामाजी विशेष ॥ तेंही निःशेष अवधारा ॥ २५ ॥
दशमी द्वादशी तिथी पाहीं ॥ पौर्णिमा अमावास्या तेही ॥
सर्वां वरिष्ट तिथी ह्याही ॥ शास्त्रीं नवाई बोलिली असे ॥ २६ ॥
इतुकिया तिथी वरुनी ॥ पर्वकाळ टाकिजे ओवाळुनी ॥
व्यतीपात वैधृती कल्याणी ॥ इतुकिया वरुनि वोवाळीजे ॥ २७ ॥
प्रत्यही जरी न घडे स्नान ॥ अथवा ब्राह्मणपूजन ॥
नक्त अथवा मौनीभोजन ॥ दीपदान यथाविधी ॥ २८ ॥
न घडे अपूपादी दान ॥ न घडे ब्राह्मण भोजन ॥
सत्पात्रीं न घडे गोदान ॥ तेची लक्षण ऐकें पां ॥ २९ ॥
इतुकेंही न घडे जरी ॥ त्रिरात्र व्रतातें स्वीकारी ॥
स्नानदान बरविया परी ॥ नक्त करी मौन्यभोजन ॥ ३० ॥
यासीं तो वेंचावें न लागे कांहीं ॥ कष्ट करावें स्वदेहीं ॥
तेणें तुष्टमान शेषशायी ॥ पर्व सर्वही कुलकल्याण पुढें ॥ ३१ ॥
हेंची व्रत नारदें केलें ॥ तयातें ज्ञान प्राप्त झालें ॥
सत्यवतीनाथें सेविलें ॥ विश्वामित्रादि भले मुनींद्र ॥ ३२ ॥
यांनीं केलें मौन्य व्रत ॥ तरीच पावलें ब्रह्मत्व ॥
ऋषीमंडळीमाजी महत्व ॥ प्राप्त झालें तयातें ॥ ३३ ॥
आधींच मलमास उत्तम ॥ त्यांवरी द्वादशी पर्व नेम ॥
वरी पूर्णिमा उत्तमोतम ॥ कैचा राहे पापलेशा ॥ ३४ ॥
सकळ दान केलियाचें फळ ॥ अथवा तीर्थ केलियाचें फळ ॥
किंवा पुरश्चरण मंत्रमंडल ॥ किंवा दिधलें पृथ्वीदान ॥ ३५ ॥
इतुकेही घडतां एकीकडे ॥ मौन्यभोजन जयातें घडे ॥
तरी ना तुळे तयातें न घडे ॥ सांगतों रोकडे श्लोकाधारें ॥ ३६ ॥
सर्व फलंच मौनेन तिथि नक्षत्रयोस्ततं ॥
इष्टापूर्तफलं तस्य मलमासेतु मौनतः ॥ ५ ॥
मौनव्रतीततो धन्यः स्नाने वै भोजनार्चने ॥
आजन्मतः कृतात्पापान्मुच्यते नात्रसंशयः ॥ ६ ॥
उपवासेन यत्पुण्यं जायते शतवत्सरात् ॥
तत्पुण्यं लभ्यते देवि मौनेनैकेनमानवैः ॥ ७ ॥
मासवरी उपोषण करितां पाहें ॥ शतसंवत्सराचें पाप जाये ॥
एकपर्वणी मौन्य भौजन होये ॥ तरी लाभ पाहे तितुकाची ॥ ३७ ॥
तयावरी पूर्णिमा तिथी ॥ स्नान दान घडे अतिथी ॥
वरी मौन्य भोजनाची रीती ॥ नाहीं गणती पुण्यातें ॥ ३८ ॥
येविषयीं पुरातन इतिहास ॥ श्रवण कीजे सावकाश ॥
बोलता जाला जगदीश ॥ त्याच्या भावार्थास परीस तूं ॥ ३९ ॥
पूर्वी अवंती नगरीं जाण ॥ वेदशर्मा नामें ब्राह्मण ॥
तपोतेजें देदिप्यमान ॥ सूर्यनारायण दुसरा तो ॥ ४० ॥
स्वाध्यायीं नित्यरत असें ॥ दुष्ट प्रतिग्रह कोणाचा नसे ॥
स्वधर्माचारें काळ क्रमित असे ॥ लोलंगता नसे निजांगीं ॥ ४१ ॥
निर असतां निरहंकारी ॥ मत्सर कवणातेंही न करी ॥
प्राणीमात्रातें कृपा करी अपत्यापरी जीवमात्रीं ॥ ४२ ॥
तंव प्रवर्तला मलमास ॥ ब्राह्मण चिंता करी रात्रंदिवस ॥
म्हणे पदरीं संचय नसे धनास ॥ वाटे हव्यास धनाचा ॥ ४३ ॥
तयासीं उपाय कीजे कवण ॥ भिक्षा मागत न मिळे कण ॥
कोणी न देती वस्त्र जीर्ण ॥ मग द्रव्य कोठून प्राप्त होय ॥ ४४ ॥
फुकाचें न मिळे तक्रपाणी ॥ हे तंव सोलीव दुःखाची करणी ॥
पूर्ण दरिद्र कृपे करूनी ॥ दिधलें मजलागुनी भगवंतें ॥ ४५ ॥
जरी कष्टवावें शरीर ॥ तरी शक्ती नाहीं अपार ॥
उपोषण करावे निर्धार ॥ तरी अन्नगत प्राण ॥ ४६ ॥
क्षणभरी नसतां अन्न ॥ तात्काळ जाऊं पाहे प्राण ॥
पित्तक्षोभ होय तत्क्षण ॥ यालागीं उपोषण घडेना ॥ ४७ ॥
ऐशी चिंता करितां ह्रदयीं ॥ निजध्यास बैसला जीवीं ॥
म्हणे पुण्यलेश आमुचे दैवीं ॥ प्राप्त केवीं होऊं शके ॥ ४८ ॥
मुमुक्षु दशा दृढोत्तर ॥ आंगीं बाणतां साचार ॥
कृपाळू तो सर्वेश्वर ॥ द्रवले अंतर तयाचे ॥ ४९ ॥
स्वप्नीं येऊनियां श्रीअच्युत ॥ तया ब्राह्मणाते संबोधित ॥
म्हणे मी सांगतो निश्चित ॥ करी व्रत मौन्य तेव्हां ॥ ५० ॥
मौन्याची करावे स्नान ॥ मौन्यची कीजे हवन ॥
मौन्यची साधावे भोजन ॥ नलगे आन साधनाते ॥ ५१ ॥
परान्नाचा करीं त्याग ॥ मासमात्र नेम प्रसंग ॥
उपरी उद्यापन यथासांग ॥ तेणे श्रीरंग संतोषे ॥ ५२ ॥
ऐसे स्वप्न होतांचि निशीते ॥ येरू चाकाटला सभोवते ॥
म्हणे दृष्टांत दिधला भगवंते ॥ म्हणोन हर्षाते निजमनीं ॥ ५३ ॥
मग प्रतिदिनी व्रतारंभ ॥ करितां जाला स्वयंभ ॥
मौन्यव्रतीं अलभ्य लाभ ॥ लाभला भला तयाते ॥ ५४ ॥
प्रातःकाळीं नर्मदा तीरीं ॥ स्नानाते जातसे निर्धारी ॥
मौन्येचि येतसे माघारी ॥ याचना न करी कवणाते ॥ ५५ ॥
करुनि देवदेवतार्चन ॥ विधियुक्त जप अनुष्ठान ॥
सारूनियां होमहवन ॥ नक्त उपोषण करितसे ॥ ५६ ॥
अस्तमानीं करी भोजन ॥ स्वपंक्ती अतिथी जाण ॥
परी स्वप्न वचनीं भावार्थ धरून ॥ करी आचरण मौन्येसी ॥ ५७ ॥
धन्य ते सांसारिक जन ॥ जयातें घडे अतिथी जाण ॥
नको देवा ऐशीयाचें जिणे ॥ असाक्षी भोजन जयातें ॥ ५८ ॥
ऐसा नव्हे वेदशर्मा ॥ कर्म करी अकर्मा ॥
सदां सर्वकाळ सर्वोत्तमा ॥ भजन प्रेमा अगम्य ॥ ५९ ॥
संपूर्ण भरतां एकमास ॥ उद्यापन करी सायास ॥
चित्तीं धरूनि अति हव्यास ॥ मौन्यव्रतास संपविले ॥ ६० ॥
तया व्रतप्रभावे करून ॥ आरोग्य कांतिवर्धमान ॥
जरामृत्यु दूर होऊन ॥ पावे निर्वाण पदातें ॥ ६१ ॥
एवं नानाविधा भोगावरमत्तोहिचार्थितः ॥
दत्तामया सुमनसाव्रतेन परितोषिणा ॥ ८ ॥
मग तया विप्रालागीं पाहीं ॥ संतोषून शेषशायी ॥
विमान आणविले लवलाहीं ॥ उद्धरून नेला वैकुंठा ॥ ६२ ॥
इंद्र करीतसे सन्मान ॥ आपणा निकट बैसवून ॥
स्वर्गसुखाचे भोग संपूर्ण ॥ भोगिता झाला स्वयें पैं ॥ ६३ ॥
तो ब्राह्मण अद्याप वरी ॥ स्वर्गलोकीं वास करी ॥
साक्ष घेईजे श्लोकांतरीं ॥ नसे वैखरी अप्रमाण ॥ ६४ ॥
धन्यस्त्वं कृतकृत्यश्च येनेदंव्रतमुत्तमं ॥
मौनादिकं कृतं विप्रतस्येदं फलमीदृशं ॥ ९ ॥
इंद्रस्तमाहसंपूज्य देहिमे किंचिदीप्सितं ॥
मौनव्रतैकदिनजं फलं कृत्वा कृपांमयि ॥ १० ॥
सविप्रोऽद्यापि वैकुंठे वसते बहुसौख्यभाक् ॥
एवं कृत्वाधिके मौनंव्रती किं लभतेनवै ॥ ११ ॥
ऐसा तरला वेदशर्मा ॥ म्हणोन श्रवण केलें तुम्हां ॥
यालागीं भाविकहो धरूनि प्रेमा ॥ ह्रदयीं पुरुषोत्तमा ध्याईजे ॥ ६५ ॥
संकल्प विकल्प करून दूर ॥ मिथ्या जाणून संसार ॥
ह्रदयीं चिंता रघुवीर ॥ नेतसे पैलतीर दासातें ॥ ६६ ॥
जयाचें नाम घेतां जाण ॥ जळीं तरले हो पाषाण ॥
ते तंव निर्जीव कीं हो जाण ॥ परी महिमान नामाचें ॥ ६७ ॥
मग मानव देह तो सजीहो ॥ केवी न तरे पाहाहो ॥
परी एकनिष्ठेविण देवो ॥ केवी पावें दासातें ॥ ६८ ॥
पूर्ण भावार्थाविण सर्वथा ॥ कृपा नयेची अनंता ॥
यालागीं श्रोतेहो तत्वतां ॥ आचरावें व्रता निजनिष्ठें ॥ ६९ ॥
परम साधारण हें व्रत ॥ ऐश्वर्य आयुरारोग्य प्राप्त ॥
कृपा करूनि श्रीभगवंत ॥ निवेदिलें आदरें ॥ ७० ॥
तरी भगवद्भजनासीं अव्हेर ॥ केवी करावा साचार ॥
अव्हेरितां तयाचें उत्तर ॥ मग होय निष्ठुर दासातें ॥ ७१ ॥
पाहा उदरालागीं नीचसेवन ॥ करावें लागे जीवित्व अर्पण ॥
येथें केंचित पडतां न्यून ॥ क्षोभे दारुण सेवकातें ॥ ७२ ॥
आणि आपुली जे कांता ॥ पतिवचनातें आव्हेरितां ॥
मग तो कोपे तियेवरुता ॥ करी लत्ता प्रहारातें पै ॥ ७३ ॥
ऐसें विचारून मानसीं ॥ हा तो स्वामी त्रैलोक्यवासी ॥
अमान्य होतां त्याचिया वचनासी ॥ तरणोपाव केसेनि पावला ॥ ७४ ॥
म्हणोन प्रार्थितो बद्धहस्तीं ॥ विन्मुख न व्हावें भगवंती ॥
हेंची सांगणें पुढतो पुढती ॥ श्रोत्यांप्रती आदरें ॥ ७५ ॥
स्वस्ति श्री अधिकमास माहात्म ग्रंथ ॥ पद्म पुराणींचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ दशमोध्याय गोड हा ॥ १० ॥
ओंव्या ॥ ७५ ॥ श्लोक ॥ ११ ॥
॥ इति दशमोऽध्यायः ॥
पुरुषोत्तम/अधिक मास कथा अन्य अध्याय
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 1 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 1
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 2 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 2
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 3 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 3
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 4 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 4
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 5 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 5
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 6 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 6
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 7 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 7
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 8 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 8
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 9 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 9
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 11 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 11