शिवलीलामृत अध्याय चौथा | Shri Shiv Leelamruta Adhyay 4

शिवलीलामृत अध्याय चौथा | Shri Shiv Leelamruta Adhyay 4

श्रीगणेशाय नमः ॥

धराधरेंद्रनंदिनीमानससरोवर । मराळ उदार कर्पूरगौर ।
अगम्य गुण अपार । तुझे वर्णिती सर्वदा ॥ 1 ॥

न कळे जयाचे मूळ मध्य अवसान । आपणचि सर्व कर्ता कारण ।
कोठे प्रगटेल ज्याचे आगमन । ठायीं न पडे ब्रह्मादिका ॥ 2 ॥

जाणोनि भक्तांचे मानस । तेथेच प्रगटे जगन्निवास ।
येचविषयी सूते इतिहास । शौनकादिकांप्रती सांगितला ॥ 3 ॥

किरातदेशीचा राजा विमर्शन । परम प्रतापी शत्रुभंजन ।
मृगया करीत हिंसक दारुण । मद्यमांसी रत सदा ॥ 4 ॥

चतुर्वर्णांच्या स्त्रिया भोगीत । निर्दय अधर्मेचि वर्तत ।
परी शिवभजनी असे रत । विधीने पूजित नित्य शिवासी ॥ 5 ॥

त्याचे स्त्रियेचे नाम कुमुद्वती । परम चतुर गुणवती ।
पतीप्रति पुसे एकांती । कापट्यरीति टाकोनिया ॥ 6 ॥

म्हणे शिवव्रत आचरता बहुवस । शिवरात्रि सोमवार प्रदोष ।
गीतनृत्य स्वये करिता विशेष । शिवलीलामृत वर्णिता ॥ 7 ॥

दोषही घडती तुम्हांपासून । इकडे शिवभजनी सावधान ।
मग तो राजा विमर्शन । वर्तमान सांगे पुरातन पै ॥ 8 ॥

मी पूर्वी पंपा नाम नगरी । सारमेय होतो सुंदरी ।
तो माघ वद्य चतुर्दशी शिवरात्री । शिवमंदिरासमोर आलो ॥ 9 ॥

शिवपूजा पाहिली समस्त । द्वारी उभे होते राजदूत ।
तिही दंड मारिता त्वरित । सव्य पळत प्रदक्षिणा करी ॥ 10 ॥

आणीक आलो परतोनी । बलिपिंड प्राप्त होईल म्हणोनी ।
मागुती दटाविता त्यांनी । प्रदक्षिणा केल्या शिवसदना ॥ 11 ॥

मागुती बैसलो येऊन । तव तिही क्रोधे मारिला बाण ।
म्या शिवलिंग पुढे लक्षून । तेथेच प्राण सोडिला ॥ 12 ॥

त्या पुण्यकर्मेकरून । आता राजदेह पावलो जाण ।
परी श्वानाचे दुष्ट गुण । नाना दोष आचरे ॥ 13 ॥

कुमुद्वती म्हणे तुम्हांसी पूर्वज्ञान । तरी मी कोण होते सांगा मजलागून ।
मग तो बोले विमर्शन । कपोती होतीस पूर्वी तू ॥ 14 ॥

मांसपिंड नेता मुखी धरून । पाठी लागला पक्षी श्येन ।
शिवालयास प्रदक्षिणा तीन । करूनि बैसलीस शिखरी ॥ 15 ॥

तू श्रमलीस अत्यंत । तुज श्येन पक्षी मारीत ।
शिवसदनासमोर शरीर पडत । ती राणी सत्य झालीस तू ॥ 16 ॥

मग कुमुद्वती म्हणे रायास । तुम्ही त्रिकाळज्ञानी पुण्यपुरुष ।
तुम्हीआम्ही आऊ जाऊ कोण्या जन्मास । सांगा समस्त वृत्तांत हा ॥ 17 ॥

यावरी तो राव म्हणे । ऐके मृगनेत्रे इभगमने ।
सिंधुदेशीचा नृप इंदुवदने । होईन पुढिलिये जन्मी मी ॥ 18 ॥

तू जयानामे राजकन्या होसी । मजलागी राजसे वरिसी ।
तिसरे जन्मी सौराष्ट्रराव नेमेसी । होईन सत्य गुणसरिते ॥ 19 ॥

तू कलिंगकन्या होऊन । मज वरिसी सत्य जाण ।
चौथे जन्मी गांधारराव होऊन । तू मागधकन्या होऊन वरिसी मज ॥ 20 ॥

पाचवे जन्मी अवंतीराज । दाशार्ह कन्या तू पावसी मज ।
सहावे जन्मी आनर्तपति सहज । तू ययातिकन्या गुणवती ॥ 21 ॥

सातवे जन्मी पांड्यराजा होऊन । तू पद्मराजकन्या वसुमती पूर्ण ।
तेथे मी बहुत ख्याति करून । शत्रु दंडीन शिवप्रतापे ॥ 22 ॥

महाधर्म वाढवीन । जन्मोजन्मी शिवभजन करीन ।
मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन । तपास जाईन महावना ॥ 23 ॥

शरण रिघेन अगस्तीस । शैवदीक्षा घेऊन निर्दोष ।
शुभवदने तुजसमवेत कैलास- । पद पावेन निर्धारे ॥ 24 ॥

सूत म्हणे शौनकादिकांप्रती । तितुकेही जन्म घेवोनि तो भूपती ।
ब्रह्मवेत्ता होऊनि अंती । अक्षय शिवपद पावला ॥ 25 ॥

ऐसा शिवभजनाचा महिमा । वर्णू न शके द्रुहिण सुत्रामा ।
वेदशास्त्रांसी सीमा । न कळे ज्याची वर्णावया ॥ 26 ॥

ऐकून शिवगुणकीर्तन । सद्‍गद न होय जयाचे मन ।
अश्रुधारा नयन । जयाचे कदा न वाहती ॥ 27 ॥

धिक् त्याचे जिणे धिक् कर्म । धिक् विद्या धिक् धर्म ।
तो वाचोनि काय अधम । दुरात्मा व्यर्थ संसारी ॥ 28 ॥

ऐक शिवभजनाची थोरी । उज्जयिनी नामे महानगरी ।
राव चंद्रसेन राज्य करी । न्यायनीतीकरूनिया ॥ 29 ॥

ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर । त्याचे भजनी रत नृपवर ।
मित्र एक नाम मणिभद्र । प्राणसखा रायाचा ॥ 30 ॥

मित्र चतुर आणि पवित्र । देशिक सर्वज्ञ दयासागर ।
शिष्य भाविक आणि उदार । पूर्वसुकृते प्राप्त होय ॥ 31 ॥

गृहिणी सुंदर आणि पतिव्रता । पुत्र भक्त आणि सभाग्यता ।
व्युत्पन्न आणि सुरस वक्ता । होय विशेष सुकृते ॥ 32 ॥

दिव्य हिरा आणि परीस । मुक्ताफळ सुढाळ सुरस ।
पिता ज्ञानी गुरू तोचि विशेष । हे अपूर्व त्रिभुवनी ॥ 33 ॥

ऐसा तो राव चंद्रसेन । मित्र मणिभद्र अति सुजाण ।
तेणे एक मणि दिधला आणोन । चंडकिरण दूसरा ॥ 34 ॥

अष्टधातूंचा होता स्पर्श । होय चामीकर बावनकस ।
सर्पव्याघ्रतस्करवास । राष्ट्रात नसे त्याकरिता ॥ 35 ॥

त्या मण्याचे होता दर्शन । सर्व रोग जाती भस्म होऊन ।
दुर्भिक्ष शोक अवर्षण । दारिद्रय नाही नगरात ॥ 36 ॥

तो कंठी बांधिता प्रकाशवंत । राव दिसे जैसा पुरुहूत ।
समरांगणी जय अद्भुत । न ये अपयश कालत्रयी ॥ 37 ॥

जे करावया येती वैर । ते आपणचि होती प्राणमित्र ।
आयुरारोग्य ऐश्वर्य अपार । चढत चालिले नृपाचे ॥ 38 ॥

भूप तो सर्वगुणी वरिष्ठ । की शिवभजनी गंगेचा लोट ।
की विवेकभावरत्नांचा मुकुट । समुद्र सुभट चातुर्याचा ॥ 39 ॥

की वैराग्यसरोवरीचा मराळ । की शांतिउद्यानीचा तपस्वी निर्मळ ।
की ज्ञानामृताचा विशाळ । कूपचि काय उचंबळला ॥ 40 ॥

ऐश्वर्य वाढता प्रबळ । द्वेष करिती पृथ्वीचे भूपाळ ।
मणि मागो पाठविती सकळ । स्पर्धा बळे वाढविती ॥ 41 ॥

बहुतांसी असह्य झाले । अवनीचे भूभुज एकवटले ।
अपार दळ घेवोनि आले । वेढिले नगर रायाचे ॥ 42 ॥

इंदिरावर कमलदलनयन । त्याचे कंठी कौस्तुभ जाण ।
की मृडानीवरमौळी रोहिणीरमण । प्रकाशधन मणि तैसा ॥ 43 ॥

तो मणि आम्हासी दे त्वरित । म्हणोनि नृपांनी पाठविले दूत ।
मग राव विचारी मनात । कैसा अनर्थ ओढवला ॥ 44 ॥

थोर वस्तूंचे संग्रहण । तेचि अनर्थासी कारण ।
ज्याकारणे जे भूषण । तेचि विदूषणरूप होय ॥ 45 ॥

अतिरूप अतिधन । अतिविद्या अतिप्रीति पूर्ण ।
अतिभोग अतिभूषण । विघ्नासी कारण तेचि होय ॥ 46 ॥

बोले राव चंद्रसेन । मणि जरी द्यावा यालागून ।
तरी जाईल क्षात्रपण । युद्ध दारुण न करवे ॥ 47 ॥

आता स्वामी महाकाळेश्वर । करुणासिंधु कर्पूरगौर ।
जो दीनरक्षण जगदुद्धार । बज्रपंजर भक्तांसी ॥ 48 ॥

त्यासी शरण जाऊ ये अवसरी । जो भक्तकाजकैवारी ।
जो त्रिपुरांतक हिमनग-कुमारी – । प्राणवल्लभ जगदात्मा ॥ 49 ॥

पूजासामग्री सिद्ध करून । शिवमंदिरी बैसला जाऊन ।
सकळ चिंता सोडून । विधियुक्त पूजन आरंभिले ॥ 50 ॥

बाहेर सेना घेऊन प्रधान । युद्ध करीत शिव स्मरून ।
महायंत्रांचे नगरावरून । मार होती अनिवार ॥ 51 ॥

सर्व चिंता सोडूनि चंद्रसेन । चंद्रचूड आराधी प्रीतीकरून ।
करी श्रौतमिश्रित त्र्यंबकपूजन । मानसध्यान यथाविधी ॥ 52 ॥

बाहेर झुंजती पृथ्वीचे भूपाळ । परी चिंतारहित भूपति प्रेमळ ।
देवद्वारी वाद्यांचा कल्लोळ । चतुर्विध वाद्ये वाजताती ॥ 53 ॥

राव करीत महापूजन । पौरजन विलोकिती मिळोन ।
त्यात एक गोपगृहिणी पतिहीन । कुमार कडिये घेऊन पातली ॥ 54 ॥

सहा वर्षांचा बाळ । राजा पूजा करिता पाहे सकळ ।
निरखोनिया वाढवेळ । गोपगृहिणी आली घरा ॥ 55 ॥

कुमार कडेखालता उतरोन । आपण करी गृहीचे कारण ।
शेजारी उद्वस तृणसदन । बाळ जाऊनि बैसला तेथे ॥ 56 ॥

लिंगाकृति पाषाण पाहून । मृत्तिकेची वेदिका करून ।
दिव्य शिवप्रतिमा मांडून । करी स्थापन प्रीतीने ॥ 57 ॥

कोणी दुजे नाही तेथ । लघुपाषाण आणोनि त्वरित ।
पद्मासनी पूजा यथार्थ । पाषाणचि वाहे प्रीतीने ॥ 58 ॥

राजपूजा मनात आठवून । पदार्थमात्राविषयी वाहे पाषाण ।
धूप दीप नैवेद्य पूर्ण । तेणेचिकरून करीतसे ॥ 59 ॥

आर्द्र तृण पुष्पध्या सुवासहीन । तेचि वाहे आवडीकरून ।
नाही ठाऊके मंत्र ध्यान आसन । प्रेमभावे पूजीतसे ॥ 60 ॥

परीमळद्रव्ये कैचि जवळी । शिवावरी मृत्तिका उधळी ।
मृत्तिकाच घेवोनि करकमळी । पुष्पांजुळी समर्पित ॥ 61 ॥

एवं रायाऐसे केले पूजन । मग मानसपूजा कर जोडून ।
ध्यान करी नेत्र झाकून । शंकरी मन दृढ जडले ॥ 62 ॥

मातेने स्वयंपाक करून । ये बा पुत्रा करी भोजन ।
बहु वेळा हाक फोडोन । पाचारिता नेदी प्रत्युत्तर ॥ 63 ॥

म्हणोनि बाहेर येवोनि पाहे । तव शून्यगृही बैसला आहे ।
म्हणे अर्भका मांडिले काये । चाल भोजना झडकरी ॥ 64 ॥

परी नेदी प्रत्युत्तर । मातेने क्रोधेकरूनि सत्वर ।
त्याचे लिंग आणि पूजा समग्र । निरखूनिया झुगारिली ॥ 65 ॥

चाल भोजना त्वरित । म्हणोनि हस्तकी धरूनि ओढीत ।
बाळ नेत्र उघडोनि पाहत । तव शिवपूजा विदारिली ॥ 66 ॥

अहा शिव शिव म्हणोन । घेत वक्षःस्थळ बडवून ।
दुःखे पडला मूर्च्छा येऊन । म्हणे प्राण देईन मी आता ॥ 67 ॥

गालिप्रदाने देऊन । माता जाऊनि करी भोजन ।
जीर्ण वस्त्र पांघरून । तृणसेजे पहुडली ॥ 68 ॥

इकडे पूजा भंगली म्हणून । बाळ रडे शिवनाम घेऊन ।
तंव तो दयाळ उमारमण । अद्भुत नवल पै केले ॥ 69 ॥

तृणगृह होते जे जर्जर । झाले रत्नखचित शिवमंदिर ।
हिर्‍यांचे स्तंभ वरी शिखर । नाना रत्नांचे कळस झळकती ॥ 70 ॥

चारी द्वारे रत्नखचित । मध्ये मणिमय दिव्य लिंग विराजित ।
चंद्रप्रभेहूनि अमित । प्रभा ज्योतिर्लिंगाची ॥ 71 ॥

नेत्र उघडोनि बाळ पहात । तव राजोपचारे पूजा दिसत ।
सिद्ध करोनि ठेविली समस्त । बाळ नाचत ब्रह्मानंदे ॥ 72 ॥

यथासांग महापूजन । बाळें केले प्रीतीकरून ।
षोडशोपचारे पूजा समर्पून । पुष्पांजुळी वाहतसे ॥ 73 ॥

शिवनामावळी उच्चारीत । बाळ कीर्तनरंगी नाचत ।
शिव म्हणे माग त्वरित । प्रसन्न झालो बाळका रे ॥ 74 ॥

बाळक म्हणे ते वेळी । मम मातेने तुझी पूजा भंगिली ।
तो अन्याय पोटात घाली । चंद्रमौळी अवश्य म्हणे ॥ 75 ॥

मातेसी दर्शना आणितो येथ । म्हणोनि गेला आपुले गृहात ।
तव ते देखिले रत्नखचित । माता निद्रिस्त दिव्यमंचकी ॥ 76 ॥

पहिले स्वरूप पालटून । झाली ते नारी पद्मीण ।
सर्वालंकारेकरोन । शोभायमान पहुडली ॥ 77 ॥

तीस बाळके जागे करून । म्हणे चाल घेई शिवदर्शन ।
तव ती पाहे चहूकडे विलोकून । अद्भुत करणी शिवाची ॥ 78 ॥

हृदयी धरूनि दृढ बाळ । शिवालया आली तात्काळ ।
म्हणे धन्य तू शिव दयाळ । धन्य बाळ भक्त हा ॥ 79 ॥

गोपदारा गेली राजगृहा धावून । चंद्रसेना सांगे वर्तमान ।
राव वेगे आला प्रीतीकरून । धरी चरण बाळकाचे ॥ 80 ॥

शंकराची अद्भुत करणी । राव आश्चर्य करून पाहे नयनी ।
नागरिक जनांच्या श्रेणी । धावती बाळ पहावया ॥ 81 ॥

दिगंतरी गांजली हाक बहुत । बाळकासी पावला उमानाथ ।
अवंतीनगरा येती धावत । जन अपार पहावया ॥ 82 ॥

चंद्रसेन रायाप्रती । नृप अवनीचे सांगोनि पाठविती ।
धन्य धन्य तुझी भक्ती । गिरिजावर प्रसन्न तूते ॥ 83 ॥

आम्ही टाकूनि द्वेष दुर्वासना । तुझ्या भेटीस येऊ चंद्रसेना ।
तो बाळ पाहू नयना । कैलासराणा प्रसन्न ज्यासी ॥ 84 ॥

ऐसे ऐकता चंद्रसेन । प्रधानासमेत बाहेर येऊन ।
सकळ रायांस भेटून । आला मिरवत घेऊनी ॥ 85 ॥

अवंतीनगरीची रचना । पाहता आश्चर्य वाटे मना ।
सप्तपुरींत श्रेष्ठ जाणा । उज्जयिनी नाम तियेचे ॥ 86 ॥

राजे सकळ कर जोडून । शिवमंदिरापुढे घालिती लोटांगण ।
त्या बाळकासी वंदून । आश्चर्य करिती सर्वही ॥ 87 ॥

म्हणती जै शिव प्रसन्न । तै तृणकुटी होय सुवर्णसदन ।
शत्रू ते पूर्ण मित्र होऊन । वोळंगती सर्वस्वे ॥ 88 ॥

गृहीच्या दासी सिद्धि होऊन । न मागता पुरविती इच्छिले पूर्ण ।
आंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन । कल्पिले फळ देती ते ॥ 89 ॥

मुका होईल पंडित । पांगुळ पवनापुढे धावत ।
जन्मांध रत्ने पारखीत । मूढ अत्यंत होय वक्ता ॥ 90 ॥

रंक-भणंगा भाग्य परम । तोचि होईल सार्वभौम ।
न करिता सायास दुर्गम । चिंतामणि येत हाता ॥ 91 ॥

त्रिभुवनभरी कीर्ति होय । राजे समग्र वंदिती पाय ।
जेथे जेथे खणू जाय । तेथे तेथे निधाने सापडती ॥ 92 ॥

अभ्यास न करिता बहवस । सापडे वेदांचा सारांश ।
सकळ कळा येती हातास । उमाविलास भेटे जेव्हा ॥ 93 ॥

गोपति म्हणे गोरक्षबाळा । तुजसी गोवाहन प्रसन्न झाला ।
गो विप्र प्रतिपाळी स्नेहाळा । धन्य नृपराज चंद्रसेन ॥ 94 ॥

यात्रा दाटली बहुत । सर्व राजे आश्चर्य करीत ।
तो तेथे प्रकटला हनुमंत । वायुसुत अंजनीप्रिय जो ॥ 95 ॥

जो राघवचरणारविंदभ्रमर । भूगर्भरत्नमानससंतापहर ।
वृत्रारिशत्रुजनकनगर । दहन मदनदमन जो ॥ 96 ॥

द्रोणाचळउत्पाटण । उर्मिलाजीवनप्राणरक्षण ।
ध्वजस्तंभी बैसोन । पाळी तृतीयनंदन पृथेचा ॥ 97 ॥

ऐसा प्रगटता मारुती । समस्त क्षोणीपाळ चरणी लागती ।
राघवप्रियकर बाळाप्रती । हृदयी धरोनि उपदेशी ॥ 98 ॥

शिवपंचाक्षरी मंत्र । उपदेशीत साक्षात् रुद्र ।
न्यास मातृका ध्यानप्रकार । प्रदोष सोमवार व्रत सांगे ॥ 99 ॥

हनुमंते मस्तकी ठेविला हात । झाला चतुर्दशविद्यावंत ।
चतुःषष्टि कळा आकळीत । जैसा आमलक हस्तकी ॥ 100 ॥

त्याचे नाम श्रीकर । ठेविता झाला वायुकुमर ।
सकळ राव करिती जयजयकार । पुष्पे सुरवर वर्षती ॥ 101 ॥

यावरी अंजनीहृदयाब्ज़मिलिंद । श्रीकरास म्हणे तुज हो आनंद ।
तुझे आठवे पिढीस नंद । जन्मेल गोपराज गोकुळी ॥ 102 ॥

त्याचा पुत्र पीतवसन । होईल श्रीकृष्ण कंसदमन ।
शिशुपालांतक कौरवमर्दन । पांडवपाळक गोविंद ॥ 103 ॥

श्रीहरीच्या अनंत अवतारपंक्ती । मागे झाल्या पुढेही होती ।
जेवी जपमाळेचे मणी परतोन येती । अवतार स्थिति तैसीच ॥ 104 ॥

की संवत्सर मास तिथि वार । तेचि परतती वारंवार ।
तैसा अवतार धरी श्रीधर । श्रीकरा सत्य जाण पा ॥ 105 ॥

ऐसे हरिकुळभूषण बोलून । पावला तेथेचि अंतर्धान ।
सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य । सभाग्यपण श्रीकराचे ॥ 106 ॥

ज्याचा श्रीगुरु हनुमंत । त्यासी काय न्यून पदार्थ ।
श्रीकर चंद्रसेन नृपनाथ । बोळवीत सर्व भूपांते ॥ 107 ॥

वस्त्रे भूषणे देऊनी । बोळविले पावले स्वस्थानी ।
मग सोमवार प्रदोष प्रीतीकरूनी । श्रीकर चंद्रसेन आचरती ॥ 108 ॥

शिवरात्रि उत्साह करिती । याचकांचे आर्त पुरविती ।
शिवलीलामृत श्रवण करिती । अंती शिवपदाप्रती पावले ॥ 109 ॥

हा अध्याय करिता पठण । संततिसंपत्तिआयुष्यवर्धन ।
शिवार्चनी रत ज्याचे मन । विघ्ने भीति तयासी ॥ 110 ॥

शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी । देखोनि विकासती सज्जनकमळिणी ।
जीव शिव चक्रवाके दोनी । ऐक्या येती प्रीतीने ॥ 111 ॥

निंदक दुर्जन अभक्त । ते अंधारी लपती दिवाभीत ।
शिवनिंदकासी वैकुंठनाथ । महानरकात नेऊनि घाली ॥ 112 ॥

विष्णुनिंदक जे अपवित्र । त्यासी कुंभीपाकी घाली त्रिनेत्र ।
एवं हरिहरनिंदकासी सूर्यपुत्र । नानाप्रकारे जाच करी ॥ 113 ॥

ब्रह्मानंदा यतिवर्या । श्रीभक्तकैलासाचळनिवासिया ।
श्रीधरवरदा मृडानीप्रिया । तुझी लीला वदवी तू ॥ 114 ॥

शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड । स्कंदपुराण ब्रह्मोत्तरखंड ।
परिसोत सज्जन अखंड । चतुर्थाध्याय गोड हा ॥ 115 ॥

॥ श्रीसांबसदाशिवार्पणमस्तु ॥ शुभं भवतु ॥


शिवलीलामृत अन्य अध्याय


शिवलीलामृत अध्याय पहिला | Shri Shiv Leelamruta Adhyay 1
शिवलीलामृत अध्याय दुसरा | Shri Shiv Leelamruta Adhyay 2
शिवलीलामृत अध्याय तिसरा | Shri Shiv Leelamruta Adhyay 3
शिवलीलामृत अध्याय पाचवा | Shri Shiv Leelamruta Adhyay 5
शिवलीलामृत अध्याय सहावा | Shri Shiv Leelamruta Adhyay 6
शिवलीलामृत अध्याय सातवा | Shri Shiv Leelamruta Adhyay 7
शिवलीलामृत अध्याय आठवा | Shri Shiv Leelamruta Adhyay 8
शिवलीलामृत अध्याय नववा | Shri Shiv Leelamruta Adhyay 9
शिवलीलामृत अध्याय दहावा | Shri Shiv Leelamruta Adhyay 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *