श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 18

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय अठरावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 18

॥ श्री गणेशाय नमः ॥

स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी ।
ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥

तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत ।
परी एकही मजला त्यांत । योग्य कोणी दिसेना ॥२॥

जेव्हा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी ।
अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥

मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा ।
रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥

आमुची पाऱ्याची वीट । जतन करावी नीट ।
वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥

लपवून ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी ।
याचा अर्थ कवणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥

असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहत होता ।
स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥

तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान ।
त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥

काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी ।
एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥

बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी ।
निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥

समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी ।
आरोग्य होईल बाळासी । चिंता मानसी करु नको ॥११॥

त्याप्रमाणे बाई करिता । दादासी झाली आरोग्यता ।
समर्थांची कृपा होता । रोग कोठे राहील ॥१२॥

केजगांव मोगलाईत । तेथे नानासाहेब भक्त ।
त्यांनी बांधिला श्रींचा मठ । द्रव्य बहुत खर्चिले ॥१३॥

श्रींची आज्ञा घेऊनी सत्य । पादुका स्थापाव्या मठात ।
याकारणे अक्कलकोटी येत । दर्शन घेत समर्थांचे ॥१४॥

ते म्हणती काकूबाईंसी । पादुका स्थापन करायासी ।
तुम्ही पाठवा दादासी । समागमे आमुच्या ॥१५॥

बाई म्हणे तो अज्ञान । तशात शरीरी असमाधान ।
त्याची काळजी घेईल कोण । सत्य सांगा मजलागी ॥१६॥

परी आज्ञा देतील समर्थ । तरी पाठवीन मी सत्य ।
मग समर्थांजवळी येत । घेवोनिया दादासी ॥१७॥

समर्थे वृत्त ऐकोन । म्हणती द्यावे पाठवून ।
बाळ जरी आहे अज्ञ । तरी सांभाळू तयासी ॥१८॥

काकूबाई बहुत प्रकारे । समर्था सांगे मधुरोत्तरे ।
दादासी पाठविणे नाही बरे । वर्जावे आपण सर्वांते ॥१९॥

समर्थ तियेसी बोलले । त्यात तुमचे काय गेले ।
आम्हांसी दिसेल जे भले । तेच आम्ही करु की ॥२०॥

शेवटी मंडळी सांगाती । दादासी पाठविले केजेप्रती ।
पादुका स्थापन झाल्यावरती । दादा आला परतोनी ॥२१॥

पुढे सेवेकऱ्यांसांगाती । त्यासी मुंबईस पाठविती ।
ब्रह्मचाऱ्यांसी आज्ञा करिती । यासी स्थापा गादीवरी ॥२२॥

ब्रह्मचारीबुवांजवळी । दादासी नेत मंडळी ।
जी समर्थे आज्ञा केली । ती सांगितली तत्काळ ॥२३॥

दादासी करुनी गोसावी । मुंबईची गादी चालवावी ।
स्वामीसुताची यासी द्यावी । कफनी झोळी निशाण ॥२४॥

ब्रह्मचारी दादासी । उपदेशिती दिवस निशी ।
गोसावी होऊनी गादीसी । चालवावे आपण ॥२५॥

दादा जरी अज्ञान होता । तरी ऐशा गोष्टी करिता ।
नकार म्हणेची सर्वथा । न रुचे चित्ता त्याचिया ॥२६॥

यापरी ब्रह्मचाऱ्यांनी । पाहिली खटपट करोनि ।
शेवटी दादांसी मुंबईहूनी । अक्कलकोटा पाठविले ॥२७॥

दादास घेऊनी सत्वरी । श्रीसन्निध आले टाळकरी ।
तेव्हा दादा घेवोनी तंबुरी । भजन करीत आनंदे ॥२८॥

समर्थे ऐसा समयासी । आज्ञा केली भुजंगासी ।
घेऊनी माझ्या पादुकांसी । मस्तकी ठेव दादाच्या ॥२९॥

मोर्चेल आणूनि सत्वरी । धरा म्हणती त्यावरी ।
आज्ञेप्रमाणे सेवेकरी । करिताती तैसेचि ॥३०॥

उपरती झाली त्याच्या चित्ता ।
हृदयी प्रगटला ज्ञानसविता । अज्ञान गेले लयाते ॥३१॥

दादा भजनी रंगला । देहभानहि विसरला ।
स्वस्वरुपी लीन झाला । सर्व पळाला अहंभाव ॥३२॥

धन्य गुरुचे महिमान । पादुका स्पर्श करोन ।
जहाळे तत्काळ ब्रह्मज्ञान । काय धन्यता वर्णावी ॥३३॥

असो दादांची पाहून वृत्ती । काकूबाई दचकली चित्ती ।
म्हणे समर्थे दादांप्रती । वेट खचित लाविले ॥३४॥

ती म्हणे जी समर्था । आपण हे काय करता ।
दादांचिया शिरी ठेविता । पादुका काय म्हणोनी ॥३५॥

समर्थ बोलले तयेसी । जे बरे वाटेल आम्हांसी ।
तेचि करु या समयासी । व्यर्थ बडबड करु नको ॥३६॥

काकूबाई बोले वचन । एकासी गोसावी बनवोन ।
टाकिला आपण मारुन । इतुकेचि पुरे झाले ॥३७॥

ऐकोन ऐसा वचनाला । समर्थांसी क्रोध आला ।
घाला म्हणती बाईला । खोड्यामाजी सत्वर ॥३८॥

काकूबाईने आकांत । करुनि मांडिला अनर्थ ।
नाना अपशब्द बोलत । भाळ पिटीत स्वहस्ते ॥३९॥

परी समर्थे त्या समयी । लक्ष तिकडे दिले नाही ।
दादांसी बनविले गोसावी । कफनी झोळी अर्पिली ॥४०॥

दुसरे दिवशी दादांसी । समर्थ पाठविती भिक्षेसी ।
ते पाहूनी काकूबाईसी । दुःख केले अपार ॥४१॥

लोळे समर्थांच्या चरणांवरी । करुणा भाकी पदर पसरी ।
विनवीतसे नानापरी । शोक करी अपार ॥४२॥

समर्थांसी हसू आले । अधिकचि कौतुक मांडिले ।
दादांसी जवळ बोलाविले । काय सांगितले तयासी ॥४३॥

अनुसया तुझी माता । तिजपाशी भिक्षा माग आता ।
अवश्य म्हणोनी तत्त्वता । जननीजवळ पातला ॥४४॥

ऐसे बाईने पाहोनी । क्रोधाविष्ट अंतःकरणी ।
म्हणे तुझी ही करणी । लोकापवादा कारण ॥४५॥

भिक्षान्न आपण सेवावे । हे नव्हेची जाण बरवे ।
चाळे अवघे सोडावे । संसारी व्हावे सुखाने ॥४६॥

ऐकोनी मातेची उक्ती । दादा तिजप्रती बोलती ।
ऐहिक सुखे तुच्छ गमती । माते आजपासोनी ॥४७॥

पुत्राचे ऐकोन वदन । उदास झाले तिचे मन ।
असो दादा गोसावी होवोन । स्वामीभजनी रंगले ॥४८॥

काही दिवस झाल्यावरी । मग आले मुंबापुरी ।
स्वामीसुताच्या गादीवरी । बसोन संस्था चालविली ॥४९॥

ते दादाबुवा सांप्रती । मुंबई माजी वास्तव्य करिती ।
काकूबाई अक्कलकोटी । वसताती आनंदे ॥५०॥

कलियुगी दिवसेंदिवस । वाढेल स्वामी महिमा विशेष ।
ऐसे बोलले स्वामीदास । येथे विश्वास धरावा ॥५१॥

दोघा बंधूंचे ऐसे वृत्त । वर्णिले असे संकलित ।
केला नाही विस्तार येथ । सार मात्र घेतले ॥५२॥

जैसे श्रेष्ठ स्वामीसुत । तैसेची दादाबुवा सत्य ।
भूवरी जगदोद्धारार्थ । विष्णू शंकर अवतरले ॥५३॥

इति श्री स्वामीचरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।
सदा प्रेमळ परिसोत । अष्टदशोऽध्याय गोड हा ॥५४॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


श्री स्वामी चरित्र सारामृत अन्य अध्याय


श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 1
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 2
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 3
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 5
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 6
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 7
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 8
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा  | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *