श्री स्वामी चरित्र स्तोत्र

श्री स्वामी चरित्र स्तोत्र | Shree Swami Charitra Stotra

श्री आनंदनाथ महाराज कृत श्री स्वामी चरित्र स्तोत्र

श्री गणेशाय नमः ll

आधीं नमू श्रीसद्गुरूनाथा l भक्तवत्सल कृपावंता l
तुजवांचूनि या जगीं त्राता l अन्य आतां नसेचि ll १ ll

अवतार घेतला समर्थ l नाम शोभे कृपावंत l
पाप जाळूनियां सत्य l भार उतरिला जगतींचा ll २ ll

मूळ स्वरूप निर्गुण l निराकार नित्य ध्यान l
अघटीत लीला करूनि जाण l तारिलें जना कौतुकें ll ३ ll

म्हणुनि नमन तुझे पायीं l तुजविण अन्य दाता नाहीं l
विश्वव्यापक तूंच पाहीं l ध्याती हृदयीं साधुजन ll ४ ll

रूपारूपासी वेगळा l गुणगुणाच्या निराळा l
परी अघटित जगीं कळा l सूत्र हातीं वागवित ll ५ ll

स्वस्वरूपीं निपुण l सादर कराया जगतीं पालन l
स्वामीनाम सगुण l उद्धराकारण धरियेलें ll ६ ll

तो दिगंबरवेष द्वैतरहित l दत्तदिगंबर हाची सत्य l
भार उतरावया यथार्थ l कलियुगीं समर्थ अवतरला ll ७ ll

दीन जनांचिया पोटीं l पाप जाळूनि तारी संकटीं l
नाम जयाचें धरितां कंठीं l मग सृष्टीं भय नाहीं ll ८ ll

ॐ आदिस्वरूपरूपा l ओंकार निर्गुणरूपा l
जगव्याप्यव्यापककौतुका l दाखविता सखा तूंचि खरा ll ९ ll

कोण करील तुझी स्तुती l शेष शिणला निश्चितीं l
तेथें मानव बापुडे किती l अल्पमती निर्धारें ll १० ll

सुख करा स्वामीराया l भक्तवत्सला करुणालया l
जगतारक तुझ्या पायां l नमन माझें सर्वदा ll ११ ll

मी अन्यायी थोर l परी तूं कृपेचा सागर l
जगतारावया निर्धार l सगुण अवतार धरियेला ll १२ ll

जयजयाजी गुरुनाथा l भक्तवत्सला समर्था l
तुजवांचूनि अन्य त्राता l मज आतां पाहतां नसेचि ll १३ ll

सर्व सुख सगुण l अवतार हाचि पूर्णब्रह्म जाण l
जग तारावया कारण l अवतार जाण धरियेला ll १४ ll

अनंत ब्रह्मांडाचा नायक l तूंचि सखा माझा देख l
तुजवांचूनि अन्य कौतुक l नको नको मजलागीं ll १५ ll

कैसी करावी तुझी स्तुती l हें मी नेणें बा निश्चितीं l
चरणीं जडो तुझ्या प्रीती l ऐसें आतां करावें ll १६ ll

दीन दयाळा गुरुराया l भावें वंदिलें तुझ्या पायां l
सोडिली समूळ मोहाची माया l आतां मज वायां दवडू नको ll १७ ll

हें स्तोत्र तुझें लघुस्थिती l तूंचि बोलविता निश्चितीं l
भक्त तारावया गुरुमूर्ती l अवतारस्थिती दाविली ll १८ ll

दीनवत्सला स्वामिराया l अगाधतेजा करुणालया l
अघटित जगतीं तव माया l लीला कौतुक निर्धार ll १९ ll

निरंजन स्वरूपरूपा l विश्वरूपा आदिरुपा l
अक्कलकोटीं दावूनि कौतुका l जगसुखा राहिला ll २० ll

अक्कलकोटीं जरी जन l अवचित कोणी जातां जाण l
उद्धार तया कारण l स्वामिकृपें होय खरा ll २१ ll

अवधूतवेष निर्धारी l निर्गुण निराकारी l
तेज पाहतां थरारी l काळ पोटीं बापुडा ll २२ ll

वेदीं रूप वर्णिलें निर्धार l तैसी लीला दाविली साहाकार l
विश्वविश्वंभर गुरुवर l सद्गुरूनाथ स्वामी माझा ll २३ ll

चरण पाहतां सुकुमार l कैसें पूजावें निर्धार l
ठेऊनि प्रेम गादीवर l सत्य सादर पूजावें ll २४ ll

प्रेम गंगा यमुना सरस्वती l सिंधु कावेरी भागीरथी l
तयासी प्रार्थावें निश्चितीं l स्नानालागीं समर्थाच्या ll २५ ll

मन कलश घेऊनि निर्धार l प्रेम गंगा जलसागर l
स्नान घालूनि उत्तरोत्तर l पूजन प्रकार करावा ll २६ ll

आवडी अक्षता निर्धारीं l सुमन संगती घेऊनि वरी l
सद्गुरुनाथ पुजावा अंतरी l प्रेमभरी होऊनियां ll २७ ll

भक्तिची ती जाण l वरी नामाचा चंदन l
शांती केशर मिळवून l गंध अर्चन समर्थांचे ll २८ ll

क्षमा धूप दीप निर्धारीं l प्रेम नैवेद्य वरी l
भावें समर्पोनि निर्धारीं l सद्गदित अंतरीं होऊनियां ll २९ ll

क्रोध कापूर जाळावा l प्रेमें स्वामी आळवावा l
आवडीचा तो ध्यानीं पहावा l शुद्ध चित्त करूनियां ll ३० ll

ऐसी पूजा झालियावरी l मग प्रार्थावा निजांतरी l
हृदयीं उठती प्रेमलहरी l ऐशापरी आळवावा ll ३१ ll

जयजयाजी गुरुराया l जयजयाजी करुणालया l
भक्ता दाउनियां पायां l भवभया निवारिलें ll ३२ ll

जयजयाजी अनंतरूपा l जयजयाजी आदिरुपा l
चुकवा चुकवा जन्मखेपा l मार्ग सोपा दाऊनियां ll ३३ ll

जयजयाजी त्रिगुणा l जयजयाजी अवतार सगुणा l
पुरवावया मनकामना l जनीं वनीं फिरीयेला ll ३४ ll

जयजयाजी दिगंबरा l जयजयाजी सर्वेश्वरा l
मज सांभाळा लेंकरा l तुजविण आसरा नाहीं नाहीं ll ३५ ll

जयजयाजी समर्था l स्वामिराया कृपावंता l
l तुजविण आम्हां त्राता ll नाहीं नाहीं जगत्रयीं ll ३६ ll

शुद्धतेजा तेजरुपा l दिव्य स्वस्वरूपा l
चुकवा चुकवा जन्म खेपा l आदिरुपा जगद्गुरू ll ३७ ll

जयजयाजी यतिरुपा l जयजयाजी अघटित स्वरूपा l
निर्गुण सगुणरूपा l सच्चिदानंद जगद्गुरू ll ३८ ll

जयजयाजी त्रिगुणरहिता l जयजयाजी त्रिदोषहारका l
जयजयाजी ब्रह्मांडनायका l निजभक्त सख्या स्वामिराया ll ३९ ll

जयजयाजी दत्तात्रेया l जयजयाजी करुणालया l
जयजयाजी विश्वमाया l संशयभयहारका स्वामिराया ll ४० ll

जयजयाजी आनंदविलासा l जयजयाजी पापतमनाशा l
जयजयाजी अवधूतवेषा l भवभयपाश निवारका ll ४१ ll

जयजयाजी निजभक्तपालका l जयजयाजी विश्वव्यापका l
निज दासासि सखा l कलियुगीं देखा तूं एक ll ४२ ll

जयजयाजी विराटस्वरूपा l जयजयाजी आदिरूपरूपा l
जयजयाजी विश्वव्याप्यव्यापका l मायबापा गुरुराया ll ४३ ll

त्रिलोकीं तूं समर्थ l अवतार तुझाचि यथार्थ l
तारक भक्तांलागीं सत्य l दैवीरूप दाऊनि ll ४४ ll

तूं पूर्णब्रह्म जाण l निर्विकार निर्गुण l
निरंजनी सदा ध्यान l लीला कौतुक दाविलें ll ४५ ll

तेज पाहतां थरारे l कली मनीं सदा झुरे l
विश्वव्यापक व्यापूनि उरे l तारक खरे पतितासी ll ४६ ll

तुजविण आणिक आधार नाहीं l कलियुगीं दुजा आम्हां पाहीं l
सद्गुरुनाथ तूंचि खरा तोही l अवताररूपें नटलासी ll ४७ ll

लीला दाविली अगाध l शेषा न करवे त्याचा शोध l
जें तुम्ही केलें विविध l ज्ञानरूपें जाणविलें ll ४८ ll

अक्कलकोटमहापुरीं l वास केला निर्धारीं l
पवित्रक्षेत्र करूनि तारी l पाय ठेऊनि जगतासी ll ४९ ll

तरी जनीं सत्य आतां l अक्कलकोटीं जावें तत्वतां l
हित साधावया यथार्थ l पवित्र भूमी पैं केली ll ५० ll

हें वचन निर्धार l समर्थांचें असे साचार l
बोल बोलवितां उत्तर l स्वामी माझा निर्धारीं ll ५१ ll

अक्कलकोटीं करितां अनुष्ठान l हें स्तोत्र वाचितां एक मास तेरा दिन l
शुद्ध चित्त करून l ध्यान सदा समर्थांचें ll ५२ ll

भिक्षान्न निर्धारीं l पवित्र राहे सदा अंतरी l
षण्मास वाचितां तरी l महाव्याधी दूर होय ll ५३ ll

एक संवत्सर अनुष्ठान l वटछायेसी करितां जाण l
तयासी होईल पुत्र संतान l वचन सत्य समर्थांचें ll ५४ ll

तेरा मासी जोडे धन l चतुर्दश मासीं लक्ष्मीवंत जाण l
प्रेमभावें करितां अनुष्ठान l सत्य वचन निर्धार ll ५५ ll

वटपूजा आवडी पूर्ण l तेथेंचि पादुका स्थापून l
प्रेमभावें करितां अनुष्ठान l मनोरथ पूर्ण होतील ll ५६ ll

कलियुगीं तारक निर्धारीं l स्वामी माझा सगुण अवतारी l
जग तारावया निर्धारीं l सृष्टीवरीं पैं आला ll ५७ ll

तरी सादर सादर मन l ठेऊनि वंदा आतां चरण l
पुढें न मिळे ऐसें निधान l मायाबंधन तोडावया ll ५८ ll

नाम घेतां निर्धारीं l स्वामी माझा कैवारी l
भवामाजीं पार करी l वचन निर्धारीं सत्य हो ll ५९ ll

आनंद म्हणे तरी आतां l स्वामीराया जी समर्था l
भक्तवत्सला कृपावंता l वाचितां जगव्यथा चुकवावी ll ६० ll

हाच देऊनि प्रथम वर l भक्तिपंथ वाढवावा निर्धार l
आणिक काहीं मागणें साचार l तुजपाशीं दयाळा ll ६१ ll

परोपकार हाचि एक l तुझ्या नामें तारावे लोक l
आणिक मागणें तें कौतुक l नाहीं नाहीं सर्वथा ll ६२ ll

विश्व विश्वाकारी l विश्वरूप तूंचि निर्धारीं l
चालविता तुजविण तरी l कोण आहे दयाळा ll ६३ ll

तूंचि सर्व सुखदायक l तूंचि कृपा नायक l
तुजवांचूनि जगा तारक l नाहीं कोणी सर्वथा ll ६४ ll

आतां न करीं निष्ठुर चित्ता l माय जाणे बालकाची व्यथा l
तुजवांचूनि अन्य सर्वथा l माय दुजी न जाणो ll ६५ ll

तूंचि मातापिता सर्वेश्वरू l जगतारक जगदगुरू l
नको नको अव्हेरुं लेंकरुं l दीना उदारु तूं एक ll ६६ ll

दीनदयाघन नाम l तुमचें असे हो उत्तम l
जग तारावया कारण l स्वामी समर्थ धरियेलें ll ६७ ll

महापूर बोरी पायीं उतरला l मैदार्गीहुनी येतां सोहळा देखिला l
अक्कलकोटस्थ जनीं डोळां पाहिला l अघटित लीला समर्थांची ll ६८ ll

प्रेम उंदीर सजीव केला l मुक्यासी वाचा देऊनि बोलविला l
अंधासी रत्नें पारखविला l अघटित लीला जगीं तुझी ll ६९ ll

अघटित केलें चमत्कार l किती लिहावे साचार l
ग्रंथ वाढेल निर्धार l या भेणें सादर लेखणी आवरिली ll ७० ll

स्वामीचरित्र ग्रंथ निर्धार l पुढें स्वामिराज बोलवील सादर l
भक्त तारावया निर्धार l कली जोर मोडोनियां ll ७१ ll

म्हणुनियां आतां लघुचरित्र l स्वामी नाम नामाचें स्तोत्र l
जग तारावया पवित्र l लघुस्तोत्र वर्णिलें ll ७२ ll

अक्कलकोटीं बहु लीला l ज्याणें दाखविली अघटित कळा l
कोटीमदनमदनाचा पुतळा l स्वरुपीं जयाच्या तुळेना ll ७३ ll

बहु वर्षें एकभूमी वस्ती l एक विचार एक स्थिती l
अघटित रूप तें निश्चितीं l जगतालागीं तारावया ll ७४ ll

हे निर्जीव पाटावरी l पादुका उठल्या कलिमाझारी l
अजूनि भुली कैशी जगांतरी l तरणोपाया चुकती हे ll ७५ ll

नाम घेतां प्रेमभरीं l हृदय शुद्ध आधीं करीं l
दया ठेऊनि अंतरीं l वाच निर्धारीं स्वामिलीले ll ७६ ll

स्वामिपादुकापूजन l नामस्तोत्र भजन l
तेणें वंश उद्धरे जाण l कलीमाझारी निर्धार ll ७७ ll

म्हणुनियां आतां l स्वामिनाम आठवावें सर्वथा l
तयावीण अन्य वार्ता l तारक नाहीं जगांत ll ७८ ll

अहा सुंदरस्वरूपनिधान l अहा भक्तवत्सल अगम्य ध्यान l
सच्चिदानंद आनंदघन l स्वामी माझा दयाळू ll ७९ ll

या प्रपंचमोहाचे काठीं l बुडोनियां जातां रे निकटी l
तुम्हां तरावया सुलभ गोष्टी l स्वामिनाम पोटीं धरा ll ८० ll

स्वामिनामाचा प्रताप l पाप जाळूनि करी राख l
अपूर्व दाविलें कौतुक l कलीमाजी तरावया ll ८१ ll

तरी आतां शुद्ध करूनि मन l हेंचि जाण संध्यास्नान l
दया क्षमा शांती पूर्ण l गुणवर्णन समर्थांचें ll ८२ ll

खोट्याचा जाणूनि पसारा l तोडीं तोडीं मायेच्या व्यवहारा l
न भुले ह्या दुर्गतीच्या बाजारा l मोहपसारा दूर करोनी ll ८३ ll

मूळबिंदु हा प्रमाण l तेथोनि वाढविता कोण l
कोणी केलें हो रक्षण l पिंडालागीं जाण पां ll ८४ ll

कैंची माया कैंसा मोह l कोठें आहे तुझा ठाव l
तो आधीं शोधुनी पहा हो l भुलू नको मानवा ll ८५ ll

मूळ बिंदुरूप प्रमाण l देह झाला बीजा कारण l
वाढवोनि करचरण l दीनानाथें अर्पिले ll ८६ ll

तेथें झाली जीवशिवाची वस्ती l तीन गुण गुणांची प्राप्ती l
सहा विकारांची स्थिती l मायेसंगती खेळोनिया ll ८७ ll

दया क्षमा शांती विचार l विवेक ज्ञान जागृतीसार l
अविद्येची गती निर्धार l सोडोनि भवपार करीतसे ll ८८ ll

धरितां स्वामी नावाची आवडी l घेतां भवामाजीं घाली उडी l
नेवोनि भक्तां पैलथडी l पार करी दयाळू ll ८९ ll

नाम जगीं तारक l काय सांगू नामाचें कौतुक l
नामें तारिले कितीएक l महापापी कलियुगीं ll ९० ll

नाम घेतां संकट हरे l वारी केल्या पाप सरे l
सेवा करितां भवांत तरे l चुकती फेरे चौऱ्यांशीचें ll ९१ ll

अक्कलकोटीं न जातां तरी l वटछायेसी अनुष्ठान करी l
तयासीं तारक निर्धारीं l दृष्टांतरूपें स्वामी माझा ll ९२ ll

स्वामींची मूर्ति मनोहर l प्रेमें घेऊनि अयन्यावर l
भावें मांडोनि गादीवर l पूजन करावें प्रेमभावें ll ९३ ll

भजनपूजनाच्या रीती l कलीमाजीं जग उद्धरती l
प्रेम ठेउनियां चित्तीं l स्वामी कृपामूर्ति आठवावा ll ९४ ll

काय न करी श्रीगुरुनाथ l सत्य होती शरणांगत l
भक्ततारक अवतार समर्थ l कलियुगीं यथार्थ अवतरला ll ९५ ll

विश्वव्यापक विश्वंभरू l त्यासी कैंची समाधी निर्धारु l
जगीं जगप्रकार दाखवणें साचारु l लीला थोरु समर्थांची ll ९६ ll

द्वैत नाहीं तिळभरी l आशा कैंची अंतरीं l
योगमाया दवडिली दुरी l अवतार निर्धारीं स्वामी माझा ll ९७ ll

भक्तांकारणे अक्कलकोटीं l वास केला हो निकटी l
पाय दाऊनियां सृष्टीं l पतित उद्धार करविला ll ९८ ll

अघटित कळा अघटित लीला l पूर्णतेज तेजाचा पुतळा l
अगम्य ज्याची अवतार लीला l कलीचा सोहळा मोडावया ll ९९ ll

तरी नामाची संगती l प्रेम ठेउनी सदा चित्तीं l
स्वामी आठवा दिवसरात्रीं l भवामाजी तरावया ll १०० ll

स्वामीनामाचा सोहळा l धाक पडे कलीकाळा l
निजदासासी सांभाळी वेळोवेळां l अवतार सोहळा करूनियां ll १०१ ll

कलीमाजी तारक l भक्तासी एकचि नाम देख l
स्वामीरायाविण कौतुक l आणिक नको सर्वथा ll १०२ ll

स्वामीनामाचें कीर्तन l सप्रेमें पादुकापूजन l
करितां कलीमाजी जाण l जन उद्धरे निर्धारें ll १०३ ll

स्वामीपंथ तारक l भव नाशील हा सत्य देख l
कलीमाजीं जगतारक l परमसुखदायक उद्भवला ll १०४ ll

म्हणुनि जनीं आपुल्या हिता l शरण जावें श्रीगुरूनाथा l
मुखीं धरोनि स्वामीवार्ता l जन्मव्यथा चुकवावी ll १०५ ll

ऐसी भुललिया सोय l पुढें नाहीं रें उपाय l
भवाचा हा भय l दूर कराया निर्धारीं ll १०६ ll

तरी सुंदर मानवाची काया l नेवोनि लावा स्वामिपाया l
सुखें निवारा भवभया l मोहमाया तोडोनियां ll १०७ ll

समर्थें दिधलें अभय वचन l जो हें स्तोत्र करील पठण l
तयाचे मनोरथ पूर्ण l होतील जाण मज कृपें ll १०८ ll

येथें धरितां संशय l तयासी भवामाजी भय l
पुढें नाहीं ऐशी सोय l सत्य सत्य त्रिवाचा ll १०९ ll

हें लघुस्तोत्र समर्थांचें l मनोभावें करितां पठण याचें l
अर्थ पूर्ण होतील अर्थिकांचे l परमार्थकांसी मोक्षपद ll ११० ll

आनंद म्हणे तरीं आतां l स्वामिचरणीं ठेऊनि प्रीति सर्वथा l
प्रेमभावें स्तोत्र गातां l मोक्ष हातां येईल ll १११ ll

इति श्रीस्वामी प्रार्थनास्तोत्र l हें जगतारक पवित्र l
जपामाजीं महामंत्र l अर्थ सादर पुरवावया ll ११२ ll

इति श्रीगुरुस्वामिचरणारविंदापर्णमस्तु l
राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराजकी जय l श्रीरस्तु l शुभंभवतु ll


श्री स्वामी समर्थ सम्बन्धित अन्य पृष्ठ


श्री स्वामी समर्थ तारक मंत्र | Shree Swami Samarth Tarak Mantra
श्री स्वामी समर्थ काकड आरती | Shri Swami Samarth Kakad Aarti
जय जय सद्-गुरु स्वामी समर्था  | Jai Jai Sadguru Swami Samartha-Aarati
आरती स्वामी राजा- स्वामी समर्थ आरती | Aarti Swami Raja- Swami Samarth Aarati
आरती ओवाळू चरणी ठेउनिया माथा -श्री स्वामी समर्थ आरती | Aarti Ovaloo Charani Theuniya Matha-Swami Samarth Aarati
जय जय अवधूता | स्वामी समर्थ आरती  | Jay Jay Avadhuta-Swami Samarth Aarati
स्वामी समर्थ मंत्र पुष्पांजली | Swami Samarth Mantra Pushpanjali
स्वामी समर्थ अष्टक | Swami Samarth Ashtak
श्री स्वामी समर्थ मानस पुजा | Swami Samarth Manas Pooja

अन्य स्तोत्र संग्रह


आदित्य हृदय स्तोत्र | Aditya Hridaya Stotra
श्री गणेश-लक्ष्मी स्तोत्र | Ganesha Lakshmi Stotra
श्री सिद्धकुञ्जिकास्तोत्रम् | Siddha Kunjika Stotram
दुर्गा सप्तशती क्षमा प्रार्थना | Durga Saptashati Kshama Prarthana
शिव तांडव स्तोत्रम् | Shiv Tandav Stotram
श्री गकार गणपति अष्टोत्तर शतनामावली स्तोत्रम | Gakara Ganapati Ashtottara Shatanama Stotram
श्री कनकधारा स्तोत्रम् । Kanakadhara Stotram
श्री लक्ष्मी नारायण स्तोत्रम् | Shri Laxmi Narayan Stotram
शिवषडक्षरस्तोत्रम् | Shivashadakshara Stotram

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *