श्री पुरुषोत्तम मास अध्याय बाविसावा

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 22 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 22

श्री गणेशाय नमः ॥

जय त्रिभुवनसुंदरी आदिमाये ॥ वाग्देविके कविमांदुसरत्‍नह्रदये ॥
तुजविण रिता ठाव पाहे ॥ नसे माये सर्वथा ॥ १ ॥

तरी बैसून माझीये जिव्हाग्रीं ॥ ग्रंथ पाववा शेवटावरी ॥
तरीच धन्य संसारीं ॥ नाहीं तरी वृथा वैखरीं माझी हे ॥ २ ॥

ऐका श्रोते भाविकजन ॥ येथींचे ग्राहीक कोण कोण ॥
तयानें लाधलें कोण ॥ इतरां लाजिरवणें अभागिया ॥ ३ ॥

मलमास अति पावन ॥ लक्ष्मी-नारायण संवाद पूर्ण ॥
भावें ऐकतांच श्रवण ॥ तो पावे सदन मोक्षाचें ॥ ४ ॥

श्रीरुवाच ॥ दामोदर दयासिंधो वद दानफलाफलं ॥
मलिम्लुचे विशेषेण कैः कैः कि किं फलं व्रतं ॥ १ ॥

लक्ष्मी वदे हो दामोदरा ॥ दयासिंधो परम उदारा ॥
दान महत्माचिया प्रकारा ॥ वदा साचार स्वामियां ॥ ५ ॥

कवण दाने कवण पुण्य जोडे ॥ सार्थकता कैसेनि घडे ॥
हें वेगळालें फळ निवाडें॥ सांगावें रोकडें स्वामियां ॥ ६ ॥

श्रीविष्णुरुवाच व श्रुणु सुंदरि वक्ष्यामि लोकानुग्रहहेतवे ॥
प्रविधानंतु दानानां फलानि मलमासकं ॥ २ ॥

ऐक भामिनी चतुर देख ॥ तुझे बोल तंव परोपकारक ॥
तरीं दान फळ वेगळालें ऐक ॥ या मलमासा निके अवधारीं ॥ ७ ॥

सुवर्णदान शक्तिनुसार ॥ द्विजाते देती जे देणार ॥
तयावरीं तुष्टें मी सर्वेश्वर ॥ करीं परिहार दरिद्राचा ॥ ८ ॥

तयातें दरिद्राची व्यथा ॥ होऊं नेदीं मी सर्वथा ॥
अंतीं पाववीं मोक्षपंथा ॥ नव्हे अन्यथा हे वाणी ॥ ९ ॥

आतां रौप्यदानाचें फळ ॥ तेंही ऐकहो सकळ ॥
तेणें तुष्टे जाश्वनीळ ॥ आणि सकळ पितृव्याजें ॥ १० ॥

रजतं श्रद्धयोपेतो द्विजेभ्यो वितरत्यणु ॥
पितरस्तस्य संतुष्टा भवंति निखिलेष्टदाः ॥ ३ ॥

आतां मुक्ताफळें आणि पोंवळीं ॥ तेंही ऐक सांगतों बाळी ॥
तयाचीं फळें वेगळालीं ॥ परिसऊं तूंतें जाण पां ॥ ११ ॥

पोंवळीं अर्पितां पावे भुक्ति ॥ मुक्ताफळें लाभें मुक्ती ॥
एवं भुक्ति आणि सुक्ती ॥ लाभरीती जाण पां ॥ १२ ॥

कांस्यपात्र अथवा ताम्रपात्र ॥ विप्रातें अर्चितां विचित्र ॥
तरी भवानीसहित पंचवक्त्र ॥ कृपा करी तयावरी ॥ १३ ॥

वस्त्रदानें संतुष्टे चंद्र ॥ अपूपदानें पाप संहार ॥
अन्नदानें सर्वेश्वर ॥ तुष्टमान सर्वदां ॥ १४ ॥

उदकदान करितां जाण ॥ संतुष्टमान तया वरुण ॥
तयानें प्राप्त करी जीवन ॥ होय अन्नवृद्धीतें ॥ १५ ॥

अन्नदान सर्वात सार ॥ चाले सकळ व्यापार ॥
क्षणभरी अन्न नसलें जर ॥ केवीं व्यापार चालूं शके ॥ १६ ॥

आतां उपानह दान देतां ॥ यम तुष्टमान तयावरुता ॥
पदर्थी भगवंत वचनार्था ॥ आणा सर्वदां मानसीं ॥ १७ ॥

उपानह दान देतां ब्राह्मणातें ॥ मार्गी यम दे सुख तयातें ॥
अश्व दिधलिया दानातें ॥ अश्वरूढ स्वर्गी जाय ॥ १८ ॥

भुकेलियां अन्नदान ॥ तृषार्थि उदकपान ॥
देतां स्वर्गी सुखसंपन्न ॥ यमरावो नेतसे तयातें ॥ १९ ॥

मार्गी जातां ठायीं ॥ अन्न उदक पुरवी सर्वही ॥
यमलोकीं तयाते पाहीं ॥ पुरवी सर्वही अन्नोदक ॥ २० ॥

प्राणी निवर्तलियावरी ॥ द्वादशदिन लागती मार्गावरी ॥
चालतां तेथें यातना भारी ॥ ते गरुडपुराणीं वर्णिलीसे ॥ २१ ॥

म्हणोन येथें जें अर्पावें ॥ तेंची तेथें लागे पावावें ॥
दिधल्याविण तो न पावे ॥ हा निर्धार जाणिजे ॥ २२ ॥

नादत्तमुपतिष्ठतु ॥ ऐसा तो वेद बोलतु ॥
दिधल्याविण नव्हे प्राप्तु ॥ स्वयें बोलतु जनार्दन ॥ २३ ॥

घृताचें दान विप्रालागीं देतां ॥ सूर्य संतुष्टमान तयावरुता ॥
नसे ताप ज्वराची वार्ता ॥ अन्न शांतता तो करी ॥ २४ ॥

तिलपात्राप्रदानेन रुद्रलोके महीयते ॥
ताम्रं वा ताम्रपात्रं वा यो ददाति मलिम्लुचे ॥ ४ ॥

तिळपात्र दान करी जो नर ॥ स्वर्गी सुखावती पितर ॥
न बाधी तया शनैश्चर ॥ पावे सत्वर रुद्र कैलासा ॥ २५ ॥

कमंडलु तोय ताम्रपात्रीं ॥ देतां भावार्थे विप्राप्रती ॥
तेणें तुष्टमान वरुण भूपति ॥ नेत तयाप्रती वरुणलोका ॥ २६ ॥

तेथें बहुत सौख्य तया जना ॥ कांहीं एक नसे यातना ॥
दंपत्यातें करितां वस्त्रदाना ॥ कैलासभुवना तो पावे ॥ २७ ॥

घृतदानात्परंदानं पृथिव्यां नैव विद्यते ॥
सप्त धान्यं द्विजे देयं सह दक्षिणया शुभे ॥ ५ ॥

सप्त धान्य अर्पितां द्विजातें ॥ तेणें पूजिलें सप्तऋषीतें ॥
अरुंधतीसहितयातें ॥ दंपत्य पूजा घडली पैं ॥ २८ ॥

ऐसे नाना दानाचे प्रकार ॥ सांगतां वाढो पाहे विस्तार ॥
परी किंचित गोदानातें तत्पर ॥ होऊन कथा विस्तारिजे ॥ २९ ॥

आणीक आठवलें मजलागोनी ॥ सच्छीद्र अनरसे दानीं ॥
त्रितीनदशक विप्रालागोनी ॥ प्रतिदिनीं अर्पावे ॥ ३० ॥

संपूर्ण जया न घडे एकमास ॥ तरी सायासें अर्पी पांचपर्वास ॥
द्वादशी पौर्णिमा अमावास्येस ॥ व्यतीपात आणि वैधृती ॥ ३१ ॥

हीं मुख्य पर्वें बोलिजे ॥ मागें तूं तें निवेदिलें कमळजे ॥
हे मुख्य आवडीचें खाद्य माझें ॥ तेणें संतुष्टें मी तयावरी ॥ ३२ ॥

आतां गोदान केलियाचा प्रकार ॥ सांगतों ऐका सविस्तर ॥
पूर्वी दक्षिणेस महीस्मृती नगर ॥ असो थोर प्रसिद्ध पैं ॥ ३३ ॥

चारी वर्ण सभोग साधन ॥ शास्त्राधारीं वर्णती जन ॥
नित्य आचरती दानपुण्य ॥ वेदाध्ययन विप्र करिती ॥ ३४ ॥

आधीव्याधी दरिद्र पाहीं ॥ नगरीं धुंडितां न दिसे कांहीं ॥
अपमृत्युची वार्ता नाहीं ॥ जन सर्वही आनंदमय ॥ ३५ ॥

प्रभु तेथीचा धार्मिकरत ॥ पुत्र ऐसी प्रजा पाळीत ॥
लांच न घे न्याय करीत ॥ तोची धन्य भूपती ॥ ३६ ॥

असो ऐसा त्या नगरीचा महिमा ॥ तेथील विप्र एक द्विजशर्मा ॥
वेगळा जो कर्म अकर्मा ॥ चालवी नेम शास्त्राधारें ॥ ३७ ॥

घरीं सदां अग्निहोत्र ॥ कांता भामिनी सुपात्र ॥
पोटीं नाहीं पुत्रकलव ॥ भिक्षान्नें गात्र संरक्षितसे ॥ ३८ ॥

ऐसा तो सत्पात्र विप्रराणा ॥ प्रसंगीं अतीत आलिया जाणा ॥
गृहीं निपजेल जें अन्न ॥ तया लागून अर्पितसे ॥ ३९ ॥

ऐसें करितां बहुत काळवरी ॥ तों कोणी एक ब्राह्मण पुत्र करी ॥
फिरत फिरत तया नगरीं ॥ येऊनियां राहिला ॥ ४० ॥

परी माध्याह्न काळींची वेळा ॥ पोटा पाहिजे अन्नाचा गोळा ॥
म्हणोनिया शोधित चालिला ॥ ग्रामामाजी ते समयीं ॥ ४१ ॥

तंव पुसतसे ग्रामस्थासीं ॥ कोण अन्न अर्पी पांथस्थासी ॥
तयानें गृह दाखवितां त्यासी ॥ द्विजशर्म्यासी भेटला ॥ ४२ ॥

म्हणे माध्यान्ह समयीं क्षुधित ॥ समयीं पातलों मी अतीत ॥
ऐसी ऎकतांची विप्र मात ॥ आला धावत द्विजशर्मा ॥ ४३ ॥

बद्धहस्तें नमिला ब्राह्मण ॥ येरू काय बोले वचन ॥
तोची श्लोक अवधारा पूर्ण ॥ काय वचन बोलिला ॥ ४४ ॥

विप्र उवाच ॥ क्षुधानलेन तप्तानां विषवत्स कलार्चनं ॥
अन्नाद्यौषधमात्राणां दातावश्यं भवेधुना ॥ ६ ॥

म्हणे क्षुधानळें तप्तदेहीं ॥ विषवत् वाटे उपचार सर्वही ॥
तरी अन्न औषधातें दाता होई ॥ आहे किंवा नाहीं दाता तया वदें ॥ ४५ ॥

तथास्तु म्हणोनि आसनीं बैसविला ॥ भोजन देऊनी तृप्त केला ॥
मग स्वागत पुसता झाला ॥ कोठूनि आला परिवार केउता ॥ ४६ ॥

येरू म्हणे तीर्थ भ्रमण करित स्वयें मी एकला फिरत ॥
मातापिता बंधु दुहिता आप्त ॥ पुत्र ना कांतामज लागीं ॥ ४७ ॥

जरी मातें अपंगाल गृहीं ॥ तरीं सेवा करून मी राहीं ॥
कदां वंचनार्थ करून देही ॥ अंतर नेदीं विप्रराया ॥ ४८ ॥

जाणूनि निर्मळ अंतरीं ॥ म्हणे स्वस्थ राहें माझे घरीं ॥
कांहीं न सांगें चाकरी ॥ पुत्रापरी वर्तावे ॥ ४९ ॥

ठेऊन घेतला तयालागून ॥ नाम तयाचें नारायण ॥
सेवा करी न कंटाळे मन ॥ पडिलें कार्य संपादी ॥ ५० ॥

आधीच तीर्थवासी पवित्र ॥ वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र ॥
निःकपटे सेवा चित्रविचित्र ॥ सेवी गात्र तयाचें ॥ ५१ ॥

ऐसे वर्ततां बहुकाळावरीं ॥ तंव नवल वर्तले परी ॥
विप्रस्त्री होती म्हातारी ॥ जाली गरोदरीं त्यापुण्यें ॥ ५२ ॥

तंव विप्र मनीं बहुत हर्षला ॥ म्हणें संतान न होतें मजला ॥
याचा पायगुण मज लाभला ॥ गर्भ राहिला साठवर्षी ॥ ५३ ॥

ऐसे मानुनियां हर्षास ॥ तंव गर्भा आले पूर्णदिवस ॥
प्रसूत होता विप्रस्त्रियेस ॥ पुत्र तियेस पै जाला ॥ ५४ ॥

मग तो विप्र आनंदें नाचें उडे ॥ म्हणे पाहा आश्चर्य केवढे ॥
आजवरी न पाहिले निवाडें ॥ पुत्रमुख जन्मवरी ॥ ५५ ॥

म्हणोन बहुत सोहळाकरी ॥ साहित्य मेळवाया परोपरी ॥
परंतु दुसरें कोणी नाहीं घरी ॥ रक्षण द्वारीं बैसावया ॥ ५६ ॥

मग नारायणातें म्हणें तेव्हा ॥ द्वारीं रक्षण बैसें सदैवा ॥
मी जातों पारखे गावां ॥ साहित्यालागुनी पैं आतां ॥ ५७ ॥

तरीं उदयीक पांचवा दिन ॥ सटवी पूजा लागे करणें ॥
यालागीं बैसे सावधान ॥ द्वारीं रक्षण विप्रराया ॥ ५८ ॥

ऐसें निवेदुनी तयासी ॥ आपण जाय पारखे ग्रामासीं ॥
मागें द्वारा समीप देशी ॥ बैसे रक्षणासी नारायण ॥ ५९ ॥

रात्र झाली यामिनी दोन ॥ तंव तो पंचमीचा दिवस लक्षून ॥
देवी येती झाली चालून ॥ पुत्राक्षरालागी पाहावया ॥ ६० ॥

सुंदर देदीप्यमान केवळ ॥ परीधान वस्त्र केलें सकळ ॥
त्वरित निरखुनियां बाळ ॥ माघारें तात्काळ परतली ॥ ६१ ॥

इतकें कृत्य तये क्षणीं ॥ नारायण देखून नयनीं ॥
हा तंव पुण्यवंत प्राणी ॥ जाहलें म्हणोन दर्शन ॥ ६२ ॥

मग तियेतें पदरी धरिलें ॥ म्हणे तूं कवण पातलीस ये वेळे ॥
यक्षिणी कीं पिशाच्च बाळें ॥ सांग वहिले मजलागीं ॥ ६३ ॥

येरी झिडकावी तयातें ॥ दूर होई म्हणें ब्राह्मणातें ॥
काय कारण तुज पुसावयातें ॥ सर परता माघारा ॥ ६४ ॥

येरू म्हणे तूं ते सर्वथा ॥ जाऊं नेदी मी तत्वता ॥
तू कवण हे सांग वार्ता ॥ मग आलिया पंथा जाईजे ॥ ६५ ॥

ऐसा दुराग्रह पाहोनी ॥ बोलती जालीते भामिनी ॥
म्हणे तूं पुण्यवान म्हणोनी ॥ दर्शन तुज लागुनी दिधलें ॥ ६६ ॥

मी तंव यक्षिणी देवी ॥ मातें म्हणताती सटवी ॥
पुत्राक्षरें आम्हीं निरखावी ॥ ब्रह्मवरदें करूनियां ॥ ६७ ॥

आतां सोडीं जाऊंदे मातें ॥ येरू म्हणे न घडे निरुतें ॥
काय अक्षर याचिया बाळातें ॥ तें मातें निवेदून सुखीं होई ॥ ६८ ॥

ऐकून तयाचें वचन ॥ देवी वदे तूं ते काय प्रयोजन ॥
जें होणार तें सुखें होतसे जाण ॥ ब्रह्माक्षर कोण टाळूं शके ॥ ६९ ॥

तंव विप्र लागतसे चरणीं ॥ सांग इतुके कृपेंकरूनी ॥
मग आणीक पुसें काहाणी ॥ तंव ते यक्षिणी बोलत ॥ ७० ॥

म्हणे हा विप्रकुमार पाहीं ॥ धनधान्य नसे याचे दैवी ॥
कांता पुत्र तेही नाहीं ॥ उदर निर्वाह केउता ॥ ७१ ॥

तरी तक्रविक्रय करून ॥ चालेल याचें उदरपोषण ॥
शतायुषी असे हा पूर्ण ॥ मरण अकाळी ॥ ७२ ॥

ऐसे वचन ऐकतां ते वेळीं ॥ येरे नमस्कारूनि बोळविली ॥
मनीं म्हणे हे नाथ चंद्रमौळी ॥ केवी कुळीं पुत्र ऐसा ॥ ७३ ॥

केवढा पवित्र विप्रराणा ॥ ऐसा पुत्र तया लागून ॥
काय ऐसें संतान होऊन ॥ निसंतान परी भलें ॥ ७४ ॥

केवढा हर्ष विप्राचे मनीं ॥ जन्मदारभ्य सोहळा देखुनी ॥
प्राण देईल हा ऐकतां क्षणीं ॥ म्हणोन मौनीं न बोलावें ॥ ७५ ॥

गोष्ट ठेविली जीवींचे जीवीं ॥ कोणातें न वदे काळत्रयीं ॥
असो विप्र येऊन स्वगृहीं ॥ सोहळा संपादिला आनंदें ॥ ७६ ॥

द्वादश दिनीं जातकर्म ॥ करिता झाला विप्रोतम ॥
संभ्रमें ठेविलें नाम ॥ बहुत लळा पुत्रावरी ॥ ७७ ॥

ऐसे लोटले बहुत दिन ॥ तों पंचम वर्षी पुत्रनिधान ॥
वाढता झाला तो मागुतेन ॥ कांता जाली प्रसूती ॥ ७८ ॥

ते समयीं कन्ये तें प्रसवली ॥ देखून विप्र आनंदमेळी ॥
म्हणे कृतकृत्य जालों येकाळीं ॥ जालें कुळीं कन्यापुत्र ॥ ७९ ॥

नारायण हा भाग्यें आगळा ॥ याचा पायगुण लाभला भला ॥
ऐसें सौख्य मानिता जाला ॥ परी चिंता नारायणा मानसीं ॥ ८० ॥

म्हणे आतां ही रक्षण पुढती ॥ मी बैसेन द्वार दिशेप्रती ॥
मागुती येतां यक्षिणी सती ॥ पुसेन तिजप्रती वृत्तांतु ॥ ८१ ॥

ऐसा निश्चय निजमनीं केला ॥ मागुती गुरू आज्ञेनें रक्षण बैसला ॥
तों पांचवे दिनीं यक्षिणी तेच वेळा ॥ लक्षून तात्काळ प्रगटली ॥ ८२ ॥

अक्षरें निरखून कन्येचे भाळीं ॥ निघती जाली ते क्षणीं बाळी ॥
तंव येरें पदरीं दृढ धरिली ॥ नमस्कारी भावार्थे ॥ ८३ ॥

म्हणे माते कृपाकरून मजसीं ॥ सांग कन्याक्षरें ती कैसीं ॥
येरी म्हणे वारंवार कां पुससी ॥ मूर्ख होसीरें ब्राह्मणा ॥ ८४ ॥

येरू मागुता चरणीं लागे ॥ कृपा करूनि मजला सांगें ॥
आणीक न मागें कांहीं आंगें ॥ जाण शुभांगें यक्षिणी ॥ ८५ ॥

मग भिडेस्तव यक्षिणी पाहीं ॥ बोलती झाली ते समयीं ॥
म्हणे विवाह तंव दैवीं नाहीं ॥ इचिया विप्रवर्या जाणपा ॥ ८६ ॥

मातापिता आप्तवर्ग ॥ न करिता इचा संसर्ग ॥
ही जारकर्मी विचरोन मार्ग ॥ उदर निर्वाहाते करील ॥ ८७ ॥

त्याहीवरी पूर्ण आयुषी ॥ रोगव्याधी नाहीं शरीरासी ॥
शतवर्षे इचिया कर्मासीं ॥ प्रवर्तती निश्चयेसी जाणपां ॥ ८८ ॥

ऐसे वदोन ते वेळीं ॥ यक्षिणी देवी गुप्त झाली ॥
ऐकोन जीवीं तळमळी ॥ नारायण विप्र ते वेळां ॥ ८९ ॥

म्हणे आहा देवा हें काय ॥ दैवापुढे नाहीं उपाय ॥
केवढा पवित्र विप्रराय ॥ संतान लाहे केवि ऐसे ॥ ९० ॥

असो होणार ते होऊन जात ॥ परी कोणाते न वदेची मात ॥
मनींच ठेविलीसे गुप्त ॥ साधी कार्यार्थ वरीवरी ॥ ९१ ॥

ऐसे कांहीं दिवस क्रमिले ॥ सातवर्षी उपनयन केले ॥
पंच वर्षी कन्यारत्‍न जालें ॥ ऐसें उभयतांतें ॥ ९२ ॥

तंव द्विज शर्मा पावला निधन ॥ कांता करी सहगमन ॥
धन्य ते पतिव्रता सतीरत्‍न ॥ टाकून लहान मुलें दोनीं ॥ ९३ ॥

असो ऐसें वर्तमान जालें ॥ नारायणें उत्तर कार्य सांग केलें ॥
म्हणे आतां येथें राहतां नव्हे भलें ॥ आचरती बाळें ती न देखें मी ॥ ९४ ॥

ऐसा निश्चयी मानसीं केला ॥ उपरी मास चार क्रमिता झाल ॥
मग ग्रामवासी जना सकळा ॥ निरविता जाला कन्यापुत्र ॥ ९५ ॥

आपण प्रयाण आरंभिलें ॥ तंव ती कन्या पुत्र कोल्हाळें ॥
आरडून गळां पडूं लागलें ॥ देखते जाले आबाल वृद्ध ॥ ९६ ॥

देखून तयांची करुणा ॥ अश्रू आले जनाचिया नयना ॥
म्हणती हे भगवान् जनार्दना ॥ ही बाळके केवी जगतील ॥ ९७ ॥

नाहीं तयातें पाळिता पोसिता ॥ नाहीं माता आणि पिता ॥
नाहीं द्रव्याची वार्ता ॥ केवी भगवंता हे केलें ॥ ९८ ॥

ऐसा जनाचा कोल्हाळ ॥ टपटपां अश्रू गाळिती सकळ ॥
नारायण ह्रदयींचा कोमळ ॥ परी फुटके कपाळ पैं यांचें ॥ ९९ ॥

बाळपणीं मेली मातापिता ॥ तारुण्यपणीं दरिद्र अवस्था ॥
त्याहीवरी जारकर्म तत्वतां ॥ जाणून निघता तो जाला ॥ १०० ॥

नारायण गेला निघोनीं ॥ तळमळों लागलीं बाळें दोन्ही ॥
मग जन समुदाय आश्वासुनी ॥ मुनी ॥ प्रतिपाळ दिनरजनी करिताती ॥ १०१ ॥

परी होणार तें न टळेची निश्चित ॥ कोण टाळूं शके ब्रह्मालिखित ॥
तें अनायासें होत जात ॥ न चाले तेथें उपाय ॥ 10२ ॥

नारायण निघोन गेल्यावरी ॥ एक धेनु असे त्याचें घरीं ॥
तिची सेवा निरंतरीं ॥ विप्रकुमर करीतसे ॥ 10३ ॥

जाऊन रानांत पाहीं ॥ तृण आणीतसे लवलाहीं ॥
निजकरें तिचा पैसा सांचवी ॥ क्रय विक्रय लावी तक्रातें ॥ 10४ ॥

भगिनीते वय पंच वर्षी ॥ आपण स्वयें दशवर्षा ॥
परी उदर निर्वाह परियेसी ॥ उभयतां सरसी लोटीत ॥ 10५ ॥

कन्या मृत्तिका पात्र घेऊनी ॥ उदक आणीतसे प्रतिदिनीं ॥
येरु स्वकरें दह्याची कथली घेऊनी ॥ दधी मथुन करी तक्र ॥ 10६ ॥

तयाचा विक्रय करून ॥ लागेल तें आणुनी धान्य ॥
तें उभयतां पचवून ॥ उदर पोषण करिताती ॥ 10७ ॥

ऐशी लोटली वर्षे दोन ॥ तो पुढें प्राप्त झालें व्यसन ॥
कोणी एक सभाग्य वेश्या जाण ॥ उतरली येऊन नदीतीरीं ॥ 10८ ॥

समागमें गज अश्वरथ ॥ दास दासीही ते बहुत ॥
स्वयें हेही स्वरूपवंत ॥ अप्सरा भासत इंद्राची ॥ 10९ ॥

ऐसी ते येतां नदीतीरीं ॥ विप्रकन्या देखिली नेत्रीं ॥
मृन्मयपात्र घेऊन शिरीं ॥ तेही घाबरी पाहातसे ॥ 1१० ॥

कधींच पाहिला नाहीं समुदाय ॥ म्हणोन तेथें उभी राहे ॥
तंव वेश्येनें लवलाहें ॥ पाचारिलें आपणा पैं ॥ १1१ ॥

मग पुसती झाली वर्तमान ॥ म्हणें तूं कवणाची कोण ॥
स्वरूपें दिससी सुंदर पूर्ण ॥ वस्त्र मळीण फाटके ॥ १1२ ॥

तूं तें ऐशी दशा प्राप्त जाली ॥ कवणें दुर्जनें तूं तें गांजिली ॥
वर्तमान सांग मजजवळी ॥ मग तें विप्रबाळी बोलत ॥ १1३ ॥

मायबापें गेलीं मरून ॥ एक बंधु तोही लहान ॥
मी ब्रह्मकुमारी पतिहीन ॥ दरिद्रें पूर्ण पीडिलेंसे ॥ १1४ ॥

ऐसें वर्तमान ऐकूनी ॥ वैश्या द्रवली अंतःकरणीं ॥
मग काहीं एक पदार्थ तिजलागूनी ॥ दिधले काढूनि भक्षावया ॥ १1५ ॥

पदार्थी भुलली विप्रकुमारी ॥ मग तैसीच बसली रथावरी ॥
वेश्या निघोन गेली सत्वरी ॥ हें जगनेत्रीं पाहाताती ॥ १1६ ॥

परी कोणी न बोलती बोला ॥ म्हणती कन्येचा पांग फिटला ॥
न्यूनता नाहीं अन्नवस्त्राला ॥ पुढें होणाराला कोण पाहे ॥ १1७ ॥

तों येरीकडे विप्रकुमारगृहीं ॥ तृण घेऊनि आला लवलाहीं ॥
तों भगिनी न देखे गृहाच्या ठायीं ॥ म्हणोन पाही चहूंकडे ॥ 1१८ ॥

भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला ॥ हें ठाऊकें नसेची तयाला ॥
मग ग्रामवासियें पाहिला ॥ तयांनीं कथिला समाचार ॥ १1९ ॥

मग अतिक्षीण अंतरीं ॥ होऊन आठवी श्रीहरी ॥
म्हणे माझी पूर्वदशा खरी ॥ फळा आली ये काळीं ॥ 1२० ॥

मातापितयांचें निधान ॥ पदरीं नाहीं कांहीधन ॥
आम्हीं उभयतां बाळें दीन ॥ अनाथ होऊन पडलों असो ॥ 1२१ ॥

त्यामाजी हा विघड पडिला ॥ आतां कोणी नसेकीं मजला ॥
ऐसा विलाप करिता जाला ॥ रडों लागला अटाहास्यें ॥ 1२२ ॥

ऐसें कर्म तया घडोनी आलें ॥ पुढे काय असे वर्तले ॥
तें पाहिजे श्रवण केले ॥ म्हणे पुढली प्रसंगीं ॥ 1२३ ॥

आतां धेनुसेवा फळली कैसी ॥ तेही श्रवण करा सावकाशी ॥
मुक्ती जाली त्या उभयतांसी ॥ ते सावकाश परिसीजे ॥ 1२४ ॥

इति श्रीमलमाहात्म ग्रंथ ॥ पद्मपुराणींचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ द्वाविंशतितमोध्याय गोड हा ॥ २२ ॥

ओव्या १२४ ॥ श्लोक ६ ॥

॥ इति द्वाविंशतितमोऽध्यायः ॥


पुरुषोत्तम/अधिक मास कथा अन्य अध्याय


अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 1 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 1
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 2 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 2
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 3 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 3
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 4 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 4
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 5 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 5
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 6 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 6
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 7 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 7
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 8 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 8
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 9 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 9
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 10 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *