श्री गणेशाय नम: ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
चिंतोपंत टोळ सोलापुरात । मामलेदार म्हणूनी काम करीत ।
कारकून त्यांचा असत । सातार्याचा रहिवासी ॥१॥
रजा घेऊनी घरी जात । माघारी असे परत येत।
पंढरपुरासी वाटॆत । दर्शनासी थांबला ॥२॥
ते काळी पंढपुरात । गोपाळ्बुवा महासिध्द ।
नामे एक अवधूत । राहत होते तेथवरी ॥३॥
विठ्ठल दर्शन करोन । सिध्द दर्शना जाई कारकून ।
गोपाळसिध्द त्या पाहोन । वदले पाहा काय ते ॥४॥
अहो तुमचे मामलेदार । त्यांसी कळवा समाचार ।
लिहून घ्या सविस्तर । पत्र तुमच्या साहेबांना ॥५॥
येत्या काही वर्षांत । श्री दत्तात्रेय अवधूत ।
येवोनी तुम्हा भेटत । सेवा त्यांची करा हो ॥६॥
ऐसे करिती भाकीत । पंढपुरी गोपाळसिध्द ।
कारकून येवोनी सांगत । चिंतोपंत टोळांना ॥७॥
असो स्वामी समर्थ । मंगळवेढयासी होते राहत ।
लीला करिती अनंत । लोकोध्दारा कारणे ॥८॥
नित्य राहती अरण्यात । क्कचित येती ग्रामात ।
व्दादश वर्षे मंगळवेढयात । ऐसे राहिले श्री स्वामी ॥९॥
भाग्यवंता दर्शन देत । लोक दत्तावधूत म्हणत ।
दिगंबर स्वामीही म्हणत । काही लोक तयांना ॥१०॥
बाळकृष्ण नामे सिध्द । होते मंगळवेढयासी राहत ।
नित्य जाती अरण्यात । दर्शन घ्यावया स्वामींचे ॥११॥
येता बाळकृष्ण भक्त । स्वामी कटॆवरी ठेविती हात ।
विठ्ठलरुपे दर्शन देत । आपुल्या प्रिय भक्तासी ॥१२॥
श्री स्वामी समर्थ । बाळकृष्णासी सिध्द करीत ।
अनेक लीला करीत । भक्तोध्दारा कारणे ॥१३॥
एका ब्राह्मणा घरी जात । वांझ गाय दुग्धवती करीत ।
ब्राह्मण होई विस्मित । पाहोनी लीला स्वामींची ॥१४॥
बसाप्पा तेली भक्त । दर्शना जाई अरण्यात ।
कंटक शयनी श्री समर्थ । पाहोनी विस्मित होत असे ॥१५॥
मनापासोनी भक्ती करीत । अरण्यी स्वामीसी सेवीत ।
लीला पाहे अद्भुत । श्री स्वामी समर्थांच्या ॥१६॥
बसाप्पा आणि स्वामी समर्थ । फिरत असती अरण्यात ।
असंख्य सर्प दिसत । पाहोनी भक्त भीत असे ॥१७॥
स्वामी बसाप्पाते सांगत । हवे तितुके घॆ म्हणत ।
पागोटॆ सर्पावरी टाकत । एक उचलोनी घेत असे ॥१८॥
आता घरी जा म्हणती । तो जाई गृहाप्रती ।
पागोटॆ झटके खालती । सुवर्ण लगड पडत असे ॥१९॥
गेले त्याचे दारिद्रय । तो झाला श्रीमंत ।
ऐसे महात्म अद्भुत । श्री स्वामी समर्थांचे ॥२०॥
बसाप्पा तेली सदभक्त । अक्कलकोट वारी करीत ।
कृतज्ञतेने सांगत । महिमा स्वामी समर्थांचा ॥२१॥
एक स्त्री वांझ असत । वय पासष्ट वर्षे असत ।
बसाप्पा तीते म्हणत ।सेवी स्वामी समर्थांसी ॥२२॥
नित्य घेई स्वामी दर्शन । दर्शनावीण न घे अन्न ।
होईल तुझी इच्छा पूर्ण । प्रसन्न होता श्री स्वामी ॥२३॥
ऐकोनि बसाप्पाची मात । वृध्द स्त्री व्रत घेत ।
स्वामी दर्शनासी अरण्यात । नित्य पाहा ती जातसे ॥२४॥
कधी कधी स्वामी समर्थ । वृध्द स्त्रीची परीक्षा पाहत ।
दोन दोन दिवस होती गुप्त । कोठे न मिळती तियेलागी ॥२५॥
ऐशा परीक्षा अवस्थेत । दोन दोन दिवस उपाशी राहत ।
परी न व्रत सोडीत । ऐसी निष्ठा तियेची ॥२६॥
दोन वर्षे व्रत करीत । स्वामी समर्थ प्रसन्न होत ।
शिरस वृक्ष दावीत । खा म्हणती चीक याचा ॥२७॥
स्वामी आज्ञेप्रमाण । करी चीक सेवन ।
एक वर्षात पुत्रनिधान । लाभले पाहा तियेसी ॥२८॥
बाबाजी भटाच्या विहिरीस । समर्थकृपे पाणी लागत ।
यवन भक्ता सिध्द करीत । अवलिया ख्याती होतसे ॥२९॥
मंगळवेढा अरण्यात । नदीकिनारी असती समर्थ ।
आणखी दोन महासिध्द । प्रकट तेथे जाहले ॥३०॥
तिघेही पर्वत चढत । एकमेकाश्सी बोलत ।
परी न कोणा कळत । संभाषण तया तिघांचे ॥३१॥
‘का रडतो का ’ एक म्हणे । ‘हाका का मारतो ’ दुजा म्हणे ।
‘ असे का करतो ’ तिजा म्हणे ।गूढ भाषा सिध्दांची ॥३२॥
लीला विग्रही समर्थ । मंगळवेढयाहुनी निघत ।
पंढपुरासी येत । दर्शन द्याया भक्तांना ॥३३॥
तेथूनी मोहोळासी येत । भीमा नदी वाटॆत ।
महापुरात प्रवेशत । समर्थ स्वामी सद्गुरु ॥३४॥
महापुरात चालती समर्थ । पाणी गुढघाभर होत ।
लोक होऊनी विस्मित । अद्भूत प्रकार पाहताती ॥३५॥
गवे स्वामी मोहोळात । ते समय़ी होते राहत ।
स्वामी समर्थांसी सेवीत । अति भक्ती करोनिया ॥३६॥
तेथूनी स्वामी निघत । सोलापुरासी पोचत ।
दत्त दिगंबर अवधूत । दत्त मंदिरी बैसती ॥३७॥
चिंतोपंत टोळ दत्तभक्त । येती दत्त दर्शनार्थ ।
पाहूनी स्वामी समर्थ । मनी म्हाणती अवधारा ॥३८॥
हे कोणी सिध्दपुरुष दिसती । ऐसे टोळ मनी म्हणती ।
तात्काळ समर्थ उत्तर देती । तुला उचापती करीत । कशाला ॥३९॥
आम्ही असो सिध्द बुध्द । यात तुझे काय जात ।
उगाच उचापती करीत । कशासी येथे आहेस तू ॥४०॥
टोळ मनी म्हणत । हे मनकवडे असावेत ।
मनींचे सर्व जाणत ।ऐसे म्हणती मनामाजी ॥४१॥
आम्ही असू मनकवडे । अथवा असू पूर्ण वेडे ।
तुझ्या बापाचे काय जाते । म्हणोनी रागे भरताती ॥४२॥
पाहूनी जाणिले अंतर । टोळ करिती नमस्कार ।
म्हणती तू दत्त दिगंबर । समजूनी मजला आले हो ॥४३॥
पंढरपुरी गोपाळ अवधूत । ते भविष्य सांगत ।
श्री समर्थ दत्तावधूत । भेटती काही वर्षांनी ॥४४॥
ते भविष्य खरे जाहले । म्हणोनी हे चरण भेटलो ।
घरी चला ऐसे विनविले । श्री स्वामींसी तेधवा ॥४५॥
स्वामी त्याचे घरी जात । काही दिन तेथे राहत ।
परी येता मनात ।उठून कुठेही जाती ते ॥४६॥
स्वामींसी घेऊन सांगात । टोळ अक्कलकोटी जाऊ पाहत ।
परी स्वामी होती गुप्त । कोठे गेले कळेना ॥४७॥
गुप्त होऊनी वाटॆत । हुमणाबादी प्रकटत ।
माणिकप्रभू तेथे असत । महासिध्द अवधारा ॥४८॥
आपुल्या आसनी बैसवीत । प्रभू सर्वां सांगत ।
हे असती दत्तावधूत । जगद्गुरु सर्व विश्वाचे ॥४९॥
हुमणाबादेहुनी निघत । अंबेजोगाईसी जात ।
योगेश्वरीसी पाहत । समर्थ स्वामी सद्गुरु ॥५०॥
तेथेची समीप अरण्यात ।दत्तपहाड गुहा असत ।
गुहेत राहती श्री दत्त । समर्थ स्वामी सद्गुरु ॥५१॥
काही दिवस समाधिस्थ । तेथे राहती श्री समर्थ ।
तेथूनी चळांबे गावी येत । लीला विग्रही श्री स्वामी ॥५२॥
तेथे रामदासी मठात । स्वामी समर्थ होते राहत ।
लीला करिती अद्भुत । श्रोते तुम्ही अवधारा ॥५३॥
स्वामी असती निद्रिस्थ । बुवा मठासी टाळे लावीत ।
बाहेर निघोनी जात । कोंडोनिया स्वामींना ॥५४॥
काही क्षणांनंतर । तो जाई नदीवर ।
स्वामींसी पाहे तेथवर । मुलांसवे खेळताना ॥५५॥
आश्चर्य त्यासी वाटत । धावत येई मठात ।
कुलूप पाहोनी निश्चिंत ।होवोनी उघडी मठाते ॥५६॥
परी स्वामी समर्थ । झाले तेथूनी गुप्त ।
हे पाहूनी विस्मित । रामदासी होतसे ॥५७॥
ऐसे परी फिरत फिरत । प्रज्ञापुरी स्वामी येत ।
अक्कलकोट स्वामी समर्थ । म्हणोनी कीर्ती होतसे ॥५८॥
राहोनी अक्कलकोटात । तीनशे सिध्द निर्मित।
केवळ वीस वर्षांत । अगाध महिमा जयांचा ॥५९॥
कोटयावधी जना उध्दरिले । लक्षावधी चमत्कार केले ।
अद्भुत सामर्थ्य दाविले । महास्वामींनी तेथवरी ॥६०॥
समस्त पृथ्वीचा कागद केला । सप्त सागर शाई आणिला ।
सरस्वती बैसे लिखाणाला । तरी लीला संपेना ॥६१॥
ऐशा लीला अनंत । येथे पाहू संक्षिप्त ।
श्री समर्थ लीलामृत । अगाध जाणा आहे हो ॥६२॥
ऊँ निरंजनाय विद्महे । अवधूताय धिमही ।
तन्नो दत्त प्रचोदयात ॥६३॥
सर्व देवी देवता स्वरुपाय । महादत्त अवधूताय ।
प्रज्ञापूर निवासाय । नमन माझे तुजलागी ॥६४॥
हे चरित्र संक्षिप्त । तुझे तू निर्माण करीत ।
तव चरणी लीन होत । म्हणोनी मी सर्वदा ॥६५॥
श्री समर्थ वाड्मय मूर्ती । ऐसी होवो ग्रंथ ख्याती ।
श्रवण पठणे सन्मती ।प्राप्त होवो भक्तांना ॥६६॥
हे दत्तात्रेया गुरुवर्या । मजवरती करी तू दया ।
सद्भक्तासी सदया । अन्नवस्त्राते देई तू ॥६७॥
तैसेचि देई सद्गुण । देई सद्गुरु दर्शन ।
करुणामय ज्यांचे जीवन । लोकोध्दारार्थ अवतरले ॥६८॥
ऊँ दिगंबराय विद्महे ।अवधूताय धिमही ।
तन्नो दत्त प्रचोदयात ॥६९॥
असो श्री स्वामी समर्थ । येवोनी राहती प्रज्ञापुरात ।
अनेक जना उध्दरीत । नाना लीला करोनिया ॥७०॥
॥ अध्याय दुसरा ॥ ॥ ओवी संख्या ७०॥
श्री स्वामी समर्थ सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 10
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय नववा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 9
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय आठवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 8
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय चौथा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 4
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय तिसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 3
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 1