श्री गणेशाय नम: ।
ऊँ दत्त परब्रह्माय स्वाहा ।
श्री स्वामी समर्थ । अक्कलकोटामाजी राहत ।
अनेक लीला करीत । भक्तोध्दारा कारणे ॥१॥
एकदा काही भक्त । स्वामींसी सोलापुरा नेत ।
लोक जमती अमित । स्वामी दर्शना कारणे ॥२॥
राजा धावूनी येत । सिंहासनी स्वामींसी बैसवीत ।
गुढया तोरणे उभारीत । स्वागत करण्या स्वामींचे ॥३॥
सिंहासनी स्वामी समर्थ । दर्शना लोटला जनसागर ।
हे पाहोनी एक नर । वैषम्याने बोलतसे ॥४॥
सोडोनिया सिध्देश्वर । हे का भजती गुरुवर ।
ऐसे म्हणोनी दुरुत्तर । करु लागला तेधवा ॥५॥
ऐसी निंदा करीत । आला स्वामी होते तेथ ।
तेथील प्रकार अद्भुत । पाहोनी विस्मित होतसे ॥६॥
सिंहासनी शिवपार्वती । बैसली दिसे तयाप्रती ।
होऊनी विस्मित चित्ती । साष्टांग नमन करीतसे ॥७॥
समर्थांसी करुनी नमन । म्हणे दिले आपणा दूषण ।
प्रायश्चित्त मजलागोन । द्यावे आपण म्हणतसे ॥८॥
स्वामी तयासी म्हणत । पश्चाताप श्रेष्ठ प्रायश्चित्त ।
तू आमुचा असती भक्त । आनंदाने राहे तू ॥९॥
सोलापुरातील भक्त । श्री स्वामींसी विनवीत ।
सिध्देश्वर मंदिरालगत । तलाव मोठा आहे हो ॥१०॥
परी त्या तलावात । पाणी एक थेंब नसत ।
कृपा करावी गुरुनाथ । ऐसे म्हणती स्वामींना ॥११॥
श्री स्वामी समर्थ । त्या तलावापासी जात ।
कृपाकटाक्षे पाहत । तलावासी तेथवरी ॥१२॥
ते रात्री अकस्मात । मुसळधार वर्षा होत ।
तलाव भरोनी वाहत । ऐसा महिमा स्वामींचा ॥१३॥
एक शिल्पकार भक्त । स्वामीसी नित्य नमस्कारीत ।
एके दिनी त्यासी पुसत । काय हवे तुजलागी ॥१४॥
तो म्हणे मल्हारी मार्तंड । असे माझे कुलदैवत ।
त्याचे दर्शन जरी होत । कृतार्थ आपण होत असे ॥१५॥
ऐसे ऐकोनी वचन । स्वामी म्हणती तयालागोन ।
होईल तुझी इच्छा पूर्ण । दर्शन होईल देवाचे ॥१६॥
ऐसे म्हणोनी स्वामी समर्थ । म्हाळसाकांत रुप धरीत ।
भक्तासी समाधी लागत । पाहोनी रुप शंकराचे ॥१७॥
मुकुंद नामे ब्राह्मण । येई समर्थांसी शरण ।
स्वामी म्हणती धरी मौन । उगाच राहे पडोनिया ॥१८॥
ऐसे तया सांगत । सोलापुरासी पाठवीत ।
तो मौनीबाबा सिध्द । म्हणोनी ख्याती पावतसे ॥१९॥
एकदा अक्कलकोटात । हत्ती झाला उन्मत ।
लोक पळो लागत । पाहोनी उग्र हत्तीते ॥२०॥
राजा आज्ञा देत । गोळ्या घाला त्वरित ।
परी स्वामी म्हणत । मारु नका गजराजासी ॥२१॥
हत्ती समोर स्वामी जात । शिव्या त्यासी घालीत ।
‘माजलास का रे म्हणत ’ । ‘विसरलास का पूर्वजन्माते ’ ॥२२॥
ऐसे म्हणता समर्थ । हत्तीसी पूर्वजन्म आठ्वत ।
घळघळा अश्रू वाहत । नेत्रांतून त्या हत्तीच्या ॥२३॥
चरणावरी ठेवूनी शिर । हत्ती करी नमस्कार ।
पाहोनी अद्भुत प्रकार । विस्मित सारे जन होती ॥२४॥
ऐसा स्वामी समर्थ । सत्ता सर्वत्र चालवीत ।
तो प्रत्यक्ष दत्त । अक्कलकोटी राहिल ॥२५॥
रामानंद बीडकर । मारुती उपासना करीत ।
स्वप्नी मारुती सांगत । अक्कलकोट स्वामींते पाहावे ॥२६॥
अक्कलकोटी श्री दत्त । सदेहाने असती राहत ।
ऐसा होता दृष्टांत । अक्कलकोटासी येती ते ॥२७॥
करिता समर्थांचे दर्शन । शिव्या देती तयालागोन ।
देवतांची नावे घेऊन । शिव्या समर्थ देताती ॥२८॥
मग होऊनी शांत । काम तुझे झाले म्हणत ।
ऐसी कृपा होत । बीडकरांवरी श्री गुरुची ॥२९॥
पुन्हा जव दर्शना जात । ‘आमका पेड लगाया ’ म्हणत ।
हास्यविनोद करीत । अति प्रसन्न श्री स्वामी ॥३०॥
रामानंद बीडकर भक्त । एके दिनी दर्शना जात ।
पाहोनी स्वामी निद्रिस्थ । चरण चुरो लागले ॥३१॥
तव तेथे अकस्मात । एक सर्प बाहेर पडत ।
फुत्कार करी जोरात । भक्तावरी तेधवा ॥३२॥
त्याकडे करोनी दुर्लक्ष । बीडकर पाय चेपीत ।
स्वामी तेव्हा उठत । शिव्या देती तयांना ॥३३॥
शिव्या देवोनी बहुत । देती एक मुस्कटात ।
बीड्कर बेशुध्द पडत । तये वेळी तेधवा ॥३४॥
सदानंद स्वामी भक्त । स्वामींसी हुक्का देत ।
तो होता तेथ । सावरीतसे भक्ताला ॥३५॥
चार तास समाधिस्थ । रामानंद बीडकर राहत ।
ऐसी क्रृपा अद्भुत । श्री स्वामी समर्थांची ॥३६॥
रामानंदासी स्वामी समर्थ । नर्मदा प्रदक्षिणा करी म्हणत ।
न यावे प्रज्ञापुरात । ऐसे सांगती तयालागी ॥३७॥
नर्मदा प्रदक्षिणेसी जात । नदीकिनार्याने चालत ।
गुहा दिसे मार्गात । म्हणोनी आत जाती ते ॥३८॥
आत एक ऋषी असत । बैसले दिसती ध्यानस्थ ।
जय जय श्री गुरु समर्थ । म्हणोनी वंदन करिताती ॥३९॥
ऋषी म्हणती भक्ताप्रत । अक्कलकोटी स्वामी समर्थ ।
त्यांचा तू अससी भक्त । म्हणोनी भेटलो तुजलागी ॥४०॥
ऐसे म्हणोनी कंद देत । न लागे जेणे भूक।
आठ दिवसापर्यत ।ऐसा प्रभाव कंदाचा ॥४१॥
तया नर्मदा परिसरात । सिध्द ऋषी अनेक राहत ।
तयांची दर्शने होत । रामानंद बीडकरांना ॥४२॥
नर्मदा दर्शन देत । गुरुपुत्र म्हणूनी वाखाणीत ।
ऐसे अनुभव येत । रामानंद बीडकरांना ॥४३॥
ऐसा सद्गुरु समर्थ । सद्भक्तासी सिध्द करीत ।
अनेक उध्दरिले भक्त ।आत्मज्ञान देवोनिया ॥४४॥
श्रीपाद भट नामे ब्राह्मण ।असे दशग्रंथी आपण ।
अक्कलकोटासी येवोन । सेवा करीत राहिला ॥४५॥
त्यासी स्वामी म्हणत । तू जाई वाराणसीत ।
विश्वेश्वर दर्शनार्थ । जाऊन तेथवरी ॥४६॥
आज्ञेप्रमाणे ब्राह्मण । जाई वाराणसीसी निघून ।
नित्य करी गंगास्नान । सेवी विश्वनाथासी ॥४७॥
ऐसे करी नित्य । शिवावरी करी अभिषेक ।
एके दिनी अद्भुत । वर्तले पाहा काय ते ॥४८॥
श्री स्वामी समर्थ । विश्वनाथ मंदिरी प्रकटत ।
भक्त होई विस्मित । पाहूनी स्वामींसी तेथवरी ॥४९॥
म्हणे कधी आलात । अक्कलकोट केव्हा सोडलेत ।
आत्ताच आलो स्वामी म्हणत । तुज भेटाया कारणे ॥५०॥
पंडे पुजारी विस्मित । म्हणती हे कोणी सिध्द ।
अजानुबाहू अवतारी दिसत । भाग्य आमुचे म्हणताती ॥५१॥
असो भक्ता समवेत । श्री स्वामी वाराणसीत ।
राहो तेथे लागत । अपार महिमा होत असे ॥५२॥
महिमा होई अमित । दूरदुरोनी लोक येत ।
योगी सिध्द येत । दर्शना लागी स्वामींच्या ॥५३॥
हे राहती हिमालयात । ऐसे काही योगी म्हणत ।
हम्पी विरुपाक्ष स्थानात । ऐसे काही म्हणत ।पाहुनी रुप स्वामींचे ॥५५॥
साधू सिध्द योगी । नाना वार्तालाप करिती ।
हे महासिध्द यती । म्हणूनी सारे म्हणताती ॥५६॥
हे अजर अमर सिध्द । वायुवेगे सर्वत्र फिरत ।
कधी गिरनार पर्वतात । आबू माजी कधी दिसती ॥५७॥
कधी राहती हिमालयात । कधी सह्याद्री पर्वतात ।
हे अवतारी त्रैमूर्ती दत्त । सर्वत्र वास जयांचा ॥५८॥
हे साक्षात विश्वनाथ । प्रकटले आज वाराणसीत ।
आम्हा दर्शन देत । भाग्य आमुचे म्हणताती ॥५९॥
स्वामी तेज अद्भुत । म्हणोनी सर्व वाखाणीत ।
सिंहासनी बैसवीत। श्री स्वामींसी तेधवा ॥६०॥
ऐसे वेदचर्चा करो लागत । ज्ञान स्वामींसी पुसत ।
श्रीपाद भटासी सांगत । ज्ञान देई यांना तू ॥६१॥
ऐसे दिवस अनेक । स्वामी राहती वाराणसीत ।
काही लोक होते दुष्ट । त्यांसी महिमा साहेना ॥६२॥
मद्य मांसाची पात्रे भरुन । ठेविली स्वामींपुढे आणोन ।
तव अन्नपूर्णा प्रकट होवोन । म्हणे तेथील सर्वांना ॥६३॥
हे साक्षात परब्रह्म । करतील तुमचे कल्याण ।
परी यांसी छळता जाण । महापाप लागतसे ॥६४॥
ऐसे म्हणून स्पर्श करीत । मांसाची फळे होत ।
मद्याचे जल होत ।ऐसा प्रभाव स्वामींचा ॥६५॥
तया वाराणसीत । स्वामी महिमा होई अमित ।
श्रीपाद भटासी सांगत । अक्कलकोटासी ‘जा ’ म्हणती ॥६६॥
तू ‘जा’ अक्कलकोटात । मी जातो हिमालयात ।
ऐसे म्हणोनी गुप्त । होती पाहा तेथवरी ॥६७॥
श्रीपाद भट येई अक्कलकोटात । पाहे तेथे स्वामी समर्थ ।
सर्व भक्तांसी सांगत । वृत्तांत वाराणसीचा हो ॥६८॥
सर्व भक्त त्याते म्हणत । स्वामी येथेची असत ।
कुठेही गेले नसत । ऐसे म्हणती तयाला ॥६९॥
भक्त होई विस्मित । दोन रुपे स्वामी राहत ।
अगाध महिमा म्हणत । साष्टांग नमन करीतसे ॥७०॥
॥ अध्याय नववा ॥ ॥ ओवी संख्या ७०॥
श्री स्वामी समर्थ सप्तशती गुरूचरित्र अन्य अध्याय
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 10
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय आठवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 8
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सातवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 7
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय सहावा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 6
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पाचवा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 5
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय चौथा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 4
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय तिसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 3
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय दुसरा | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 2
श्री स्वामी समर्थ सप्तशती अध्याय पहिला | Shri Swami Samarth Saptashati Adhyay 1