श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 10

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दहावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 10

॥ श्री गणेशाय नमः ॥

गाठी होते पूर्वपुण्य । म्हणूनी पावलो नरजन्म ।
याचे सार्थक उत्तम । करणे उचित आपणा ॥१॥

ऐसा मनी करुनी विचार । आरंभिले स्वामीचरित्र ।
ते शेवटासी नेणार । स्वामी समर्थ असती पै ॥२॥

हावेरी नामक ग्रामी । यजुर्वेदी गृहस्थाश्रमी ।
बाळाप्पा नामे द्विज कोणी । राहते होते आनंदे ॥३॥

संपत्ती आणि संतती । अनुकूल सर्व तयांप्रती ।
सावकारी सराफी करिती । जनी वागती प्रतिष्ठित ॥४॥

तीस वर्षांचे वय झाले । संसाराते उबगले ।
सद़्गुरुसेवेचे दिवस आले । मती पालटली तयांची ॥५॥

लटिका अवघा संसार । यामाजी नाही सार ।
परलोकी दारा पुत्र । कोणी नये कामाते ॥६॥

इहलोकी जे जे करावे । परलोकी त्याचे फळ भोगावे ।
दुष्कर्माने दुःख भोगावे । सत्कर्मे सौख्य पाविजे ॥७॥

बाळाप्पाचे मनात । यापरी विचार येत ।
सदा उद्विग्न चित्त । व्यवहारी सौख्य वाटेना ॥८॥

जरी संसारी वर्तती । तरी मनी नाही शांती ।
योग्य सद़्गुरु आपणाप्रती । कोठे आता भेटेल ॥९॥

हाचि विचार रात्रंदिन । चित्ताचे न होय समाधान ।
तयांप्रती सुस्वप्न । तीन रात्री एक पडे ॥१०॥

पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी । भरोनी आपणापुढे येती ।
पाहोनिया ऐशा गोष्टी । उल्हासले मानस ॥११॥

तात्काळ केला निर्धार । सोडावे सर्व घरदार ।
मायापाश दृढतर । विवेकशस्त्रे तोडावा ॥१२॥

सोलापुरी काम आम्हांसी । ऐसे सांगून सर्वत्रांसी ।
निघाले सद़्गुरु शोधासी । घरदार सोडिले ॥१३॥

मुरगोड ग्राम प्रख्यात । तेथे आले फिरत फिरत ।
जेथे चिदंबर दिक्षीत । महापुरुष जन्मले ॥१४॥

ते ईश्वरी अवतार । लोकां दाविले चमत्कार ।
तयांचा महिमा अपार । वर्णू केवि अल्प मती ॥१५॥

स्वामीचरित्र वर्णितां । चिदंबर दिक्षीतांची कथा ।
आठवली ते वर्णिता । सर्व दोष हरतील ॥१६॥

महायात्रा संकल्पेकरुन । जन निघती घराहून ।
परी मार्गी लागल्या पुण्यस्थान । स्नानदान करिताती ॥१७॥

महायात्रा स्वामीचरित्र । ग्रेथ क्रमिता मी किंकर ।
मार्गी लागले अति पवित्र । चिदंबराचे पुण्यस्थान ॥१८॥

तयांचे घेउनी दर्शन । पुढे करावे मार्गक्रमण ।
श्रोती होउनी सावधान । श्रवणी सादर असावे ॥१९॥

मुरगोडी मल्हार दीक्षित । वेदशास्त्री पारंगत ।
धर्मकर्मी सदारत । ईश्वरभक्त तैसाची ॥२०॥

जयांची ख्याती सर्वत्र । विद्याधनाचे माहेर ।
अलिप्तपणे संसार । करोनी काळ क्रमिताती ॥२१॥

परी तया नाही संतती । म्हणोनिया उद्विग्न चित्ती ।
मग शिवाराधना करिती । कामना चित्ती धरोनी ॥२२॥

द्वादश वर्षे अनुष्ठान । केले शंकराचे पूजन ।
सदाशिव प्रसन्न होऊन । वर देत तयांसी ॥२३॥

तुझी भक्ती पाहोन । संतुष्ट झाले माझे मन ।
मीच तुझा पुत्र होईन । भरवसा पूर्ण असावा ॥२४॥

ऐकोनिया वरासी । आनंदले मानसी ।
वार्ता सांगता कांतेसी । तीही चित्ती तोषली ॥२५॥

तियेसी झाले गर्भधारण । आनंदले उभयतांचे मन ।
जो साक्षात उमारमण । तिच्या उदरी राहिला ॥२६॥

अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी । इच्छामात्र घडी मोडी ।
तो परमात्मा त्रिपुरारी । गर्भवास भोगीत ॥२७॥

नवमास भरता पूर्ण । कांता प्रसवली पुत्ररत्न ।
मल्हार दीक्षिते आनंदोन । संस्कार केले यथाविधी ॥२८॥

चिदंबर नामाभिधान । ठेवियले तयालागून ।
शुक्ल पक्षीय शशिसमान । बाळ वाढू लागले ॥२९॥

प्रत्यक्ष शंकर अवतरला । करु लागला बाललीला ।
पाहोनी जनी-जनकाला । कौतुक अत्यंत वाटतसे ॥३०॥

पुढे केले मौजीबंधन । वेदशास्त्री झाले निपुण ।
निघंट शिक्षा व्याकरण । काव्यग्रंथ पढविले ॥३१॥

एकदा यजमानाचे घरी । व्रत होते गजगौरी ।
चिदंबर तया अवसरी । पुजेलागी आणिले ॥३२॥

मृत्तिकेचा गज करोन । पूजा करिती यजमान ।
यथाविधी सर्व पूजन । दीक्षित त्यांसी सांगती ॥३३॥

प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता । गजासी प्राण येउनी तत्त्वता ।
चालू लागला हे पाहता । विस्मित झाले यजमान ॥३४॥

बाळपणी ऐशी कृति । पाहोनी सर्व आश्चर्य करिती ।
हे ईश्वर अवतार म्हणती । सर्वत्र ख्याती पसरली ॥३५॥

ऐशी लीला अपार । दाखविती चिदंबर ।
प्रत्यक्ष जे का शंकर । जगदुद्धारार्थ अवतरले ॥३६॥

असो पुढे प्रौढपणी । यज्ञ केला दीक्षितांनी ।
सर्व सामग्री मिळवूनी । द्रव्य बहुत खर्चिले ॥३७॥

तया समयी एके दिनी । ब्राह्मण बैसले भोजनी ।
तूप गेले सरोनी । दीक्षिताते समजले ॥३८॥

जले भरले होते घट । तयांसी लाविता अमृतहस्त ।
ते घृत झाले समस्त । आश्चर्य करिती सर्व जन ॥३९॥

तेव्हा पुणे शहरामाजी । पेशवे होते रावबाजी ।
एके समयी ते सहजी । दर्शनाते पातले ॥४०॥

अन्यायाने राज्य करीत । दुसऱ्यांचे द्रव्य हरीत ।
यामुळे जन झाले त्रस्त । दाद त्यांची लागेना ॥४१॥

तयांनी हे ऐकोन । मुरगोडी आले धावोन ।
म्हणती दीक्षितांसी सांगून । दाद आपुली लावावी ॥४२॥

रावबाजीसी वृत्तान्त । कर्णोपकर्णी झाला श्रुत ।
म्हणती जे सांगतील दिक्षीत । ते अमान्य करवेना ॥४३॥

मग दीक्षितांसी निरोप पाठविला । आम्ही येतो दर्शनाला ।
परी आपण आम्हांला । त्वरीत निरोप देईजे ॥४४॥

ऐसे सांगता दीक्षितांप्रती । तये वेळी काय बोलती ।
आता पालटली तुझी मती । त्वरीत मागसी निरोप ॥४५॥

कोपला तुजवरी ईश्वर । जाईल राज्यलक्ष्मी सर्व ।
वचनी ठेवी निर्धार । निरोप तुज दिला असे ॥४६॥

सिद्धवाक्य सत्य झाले । रावबाजीचे राज्य गेले ।
ब्रह्मावर्ती राहिले । परतंत्र जन्मभरी ॥४७॥

एके समयी अक्कलकोटी । दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी ।
तेव्हा बोलले स्वामी यती । आम्ही त्याते जाणतो ॥४८॥

यज्ञसमारंभाचे अवसरी । आम्ही होतो त्यांच्या घरी ।
तूप वाढण्याची कामगिरी । आम्हांकडे तै होती ॥४९॥

लीलाविग्रही श्रीस्वामी । जयांचे आगमन त्रिभुवनी ।
ते दीक्षितांच्या सदनी । असतील नवल नसेची ॥५०॥

महासिद्ध दीक्षित । त्यांचे वर्णिले अल्पवृत्त ।
मुरगोडी बाळाप्पा येत । पुण्यस्थान जाणोनी ॥५१॥

तिथे ऐकिला वृत्तान्त । अक्कलकोटी स्वामीसमर्थ ।
भक्तजन तारणार्थ । यतिरुपे प्रगटले ॥५२॥

अमृतासमान रसाळ कथा । ऐकता पावन श्रोता-वक्ता ।
करोनिया एकाग्र चित्ता । अवधान द्यावे श्रोते हो ॥५३॥

पुढले अध्यायी कथन । बाळाप्पा करील जप ध्यान ।
तयाची भक्ती देखोन । स्वामी कृपा करतील ॥५४॥

भक्तजनांची माउली । अक्कलकोटी प्रगटली ।
सदा कृपेची साउली । आम्हांवरी करो ते ॥५५॥

मागणे हेचि स्वामीप्रती । दृढ इच्छा माझे चित्ती ।
शंकराची प्रेमळ प्रीती । दास विष्णुवरी असो ते ॥५६॥

इति श्री स्वामी चरित्र सारामृत । नाना प्राकृत कथा संमत ।
सदा परिसोत प्रेमळ भक्त । दशमोऽध्याय गोड हा ॥५७॥

॥ श्रीस्वामीचरणार्पणमस्तु ॥ श्रीमस्तु शुभंभवती ॥


श्री स्वामी चरित्र सारामृत अन्य अध्याय


श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 1
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 2
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तिसरा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 3
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय चौथा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 4
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 5
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सहावा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 6
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय सातवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 7
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय आठवा | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 8
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय नववा  | Swami Samarth Charitra Saramrut Adhyay 9

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *