श्री पुरुषोत्तम मास अध्याय सव्विसावा

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 26 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 26

श्रीगणेशाय नमः ॥

श्रीसरस्वत्यै नमः ॥
जयजयाजी अनाथनाथा ॥ सगुणस्वरूपा कृपावंता ॥
ग्रंथारंभीं प्रार्थितों समर्था ॥ चरणीं माथा भावार्थे ॥ १ ॥

दिननाथ म्हणती कीं तुजला ॥ तरी काय नामातें विसरला ॥
षड्‍रिपु गांजिती मजला ॥ हें काय तुजला उचीत ॥ २ ॥

आम्ही तव अनाथदीन ॥ गांजिले प्रपंचवेदनेनें ॥
हें तव कौतुक पाहून ॥ लाजिरवाणें लौकिकीं ॥ ३ ॥

माता उपेक्षिना बाळातें ॥ तेवि तूं जगदीश जगातें ॥
उपेक्षिता दीनदासातें ॥ केवि हेतूंतें शोभेल ॥ ४ ॥

हरी तूं नाना अवतार धरिसी ॥ दीनदासातें प्रतिपाळिसीं ॥
तेथें मज दीनातें उपेक्षिसी ॥ केवि मिरविसी थोरीव ॥ ५ ॥

आतां श्रोते सज्जन हो ऐका ॥ चित्त करून एकाग्र देखा ॥
भाव धरूनियां निका ॥ संपूर्ण ऐका ग्रंथ हा ॥ ६ ॥

उपेक्षिता निज मनी ग्रंथ ॥ तरी केवि प्राणियांचा प्रांत ॥
यदर्थी इतिहास श्रीअच्युत ॥ अनुवादत लक्ष्मीये ॥ ७ ॥

तोचि भावार्थ संपूर्ण ॥ श्रोतेहो करा श्रवण ॥
लक्ष्मीते वदलासे नारायण ॥ तेचि श्रवण अवधारा ॥ ८ ॥

अत्र ते कथयिष्यामि कथां पापप्रणाशिनीं ॥
यांश्रुत्वा ब्रह्महास्तेनो मुच्यते योनिसंकटात ॥ १ ॥

लक्ष्मीतें वदे नारायण ॥ जे ऐकती भावें करून ॥
तयांचे पाप होय दहन ॥ संकटी जाण न पडती ते ॥ ९ ॥

ऐसें वाक्य तयाचें पाहे ॥ कोण अभागीं उपेक्षूं लाहे ॥
उपेक्षितां कोण दशा होय ॥ तेचि आयकावी सावकाश ॥ १० ॥

वीरबाहुर्नृपः पूर्वमासीभ्दूमितलेखिले ॥
दातायज्वा सुरूपश्‍च सुभगोजनवल्लभः ॥ २ ॥

पूर्वी वीरबाहु राजेश्‍वर ॥ महीमंडळीं कीर्ती अपार ॥
परम धार्मिक अति उदार ॥ दानशूर प्रतापी ॥ ११ ॥

सगुणस्वरूप ऐश्‍वर्यसंपन्न ॥ सर्वरायामाजी श्रेष्ठमान ॥
आप्तवर्ग प्रजानन ॥ चिंतिती कल्याण रायाचें ॥ १२ ॥

ऐसा भूप सर्वांगुणीमंडित ॥ विवेकी जैसा वसिष्ठ सत्य ॥
सेना जयाची अपरिमित ॥ प्रजा पाळित स्वधर्मेसी ॥ १३ ॥

तयाची भार्या रूपवती सती ॥ नाम जाण यशोमती ॥
उभयतांची अत्यंत प्रीति ॥ असें निश्चिती जाण पां ॥ १४ ॥

यौवनगर्वे नसे गर्विष्ठ ॥ लावण्यामाजी असे श्रेष्ठ ॥
प्रधान रायाचा धर्मिष्ठ ॥ अति निकट स्नेहकाजीं ॥ १५ ॥

राज्यभार चालवी नेटका ॥ धाक ज्याचा सर्वांसी देखा ॥
स्वधर्मेसी अतिविवेका न शिवे देखा पापातें ॥ १६ ॥

तया राजयाचा मंत्री चतुर ॥ तेथें यथा न्यायें चाले राज्य भार ॥
तया देशीं अन्य विचार ॥ न घडे साचार निर्धारेसी ॥ १७ ॥

असो ऐसे असतां जाण ॥ राजपत्‍नी सर्वगुणेमंडन ॥
स्वरूपजाळें पसरून ॥ आकर्षिला मनमीन रायाचा ॥ १८

सदासर्वदा विषयासक्त पाही ॥ दानधर्म किंचित नेणें काहीं ॥
वपूभूषणातें सर्वकाळ देहीं ॥ सांवरितसे सायासें ॥ १९ ॥

न दानं न व्रतं वपि न देवार्चनसेवनं ॥
भुंक्‍तेभोगाननेकांश्च वपुभूषणतत्परः ॥ ३ ॥

ऐसि ते राजभार्या जाण ॥ कदांही न करी धर्मदान ॥
नेणे तीर्थपर्वणी गंगास्नान ॥ करी अमान्य सर्वही ॥ २० ॥

पुरोहित सांगतां त्रासले बहुत ॥ कदांही न करी तो दानव्रत ॥
पहा ही अनकूळ असतां त्वरित ॥ नाहीं हेत धर्मावरी ॥ २१ ॥

तयाते पुत्र असती दोन ॥ सुबाहु शतबाहु नामें जाण ॥
तेही स्वरूपेमंडण ॥ गुणसंपन्न आगळे ॥ २२ ॥

एकदा मलमासाचिये संधी ॥ प्रधान स्त्रीकरून अवधी ॥
म्हणे बहुत दिन न घडे विधी ॥ राजस्त्री दर्शनातें ॥ २३ ॥

म्हणूनि साधूनियां वेळ ॥ प्रधानस्त्री निघे तात्काळ ॥
परम जालीसे उतावेळ ॥ राजस्त्रियेचे दर्शनी ॥ २४ ॥

दर्शनाची धरून लालसा ॥ भेटी पातली ते म्हाळसा ॥
सुंदरपणें तिचिया वयसा ॥ शिबिकेमाजी आरूढे ॥ २५ ॥

दूती जाणविति स्वामिणीतें ॥ प्रधानभार्या पातली दर्शनाते ॥
ऐसी ऐकताची मात ॥ सामोरी येत गजगामिनी ॥ २६ ॥

तियेतें धरून निज हस्तकीं ॥ बैसविती जाली निज मंचकीं ॥
येरी स्वभावें तेजा विलोकी ॥ तंव अपूर्वता देखत ॥ २७ ॥

इंद्रभुवना ऐसें रम्य सदन ॥ रत्‍नें विखुरलीं चहुकडून ॥
सूर्यप्रभेसमान जाण ॥ शोभे सदन तियेचें ॥ २८ ॥

तेही अलंकारयुक्त घवघवीत ॥ सुस्वरूपें असे नटत ॥
पयोधर सर्वदां उघडी झांकित ॥ अचळ सरसावित वेळोवेळा ॥ २९ ॥

अपार तेथें दासदासी ॥ सदां सादरता सेवेसी ॥
काय बोलेल केधवां वचनासी ॥ न हालें नेत्रासी पातिया ॥ ३० ॥

ऐसे देखून ते प्रधानजाया ॥ मंजुळ वचनें राजभार्या ॥
नमूनि तिचिया पायां ॥ काय बोले आदरासी ॥ ३१ ॥

तंव प्रधान भार्य ते गुणवती ॥ ते काय वदतसे सती ॥
म्हणे ऐके बाई यशोमती ॥ वचनाप्रती मान देई ॥ ३२ ॥

हा तव मलमास अतिउत्तम ॥ प्राप्त जाला केशव पुरुषोत्तम ॥
तरी स्नानदान यथानुक्रम ॥ उभयता संपादूं एकमास ॥ ३३ ॥

अघटित तेथींचे महिमान ॥ मागुता साध्य नव्हे ऐसा दिन ॥
नेणो कवण वेळकाळ कठिण ॥ घडो शके नेणवे तें ॥ ३४ ॥

यालागी राजसे पाहीं ॥ आयुष्य तंव आपुलें नाहीं ॥
यदर्थी आपण उभयतांही ॥ आचरो देहीं व्रतातें ॥ ३५ ॥

सकळ पदार्थ अनुकूळ ॥ दानधर्म करूं सर्वकाळ ॥
सौभाग्यवर्धन होय सकळ ॥ पुत्र आणि कलत्रेसी ॥ ३६ ॥

तव आज्ञे माजी भूपती ॥ वरी धार्मिक तयाची रीती ॥
तो कदांही वारिना तुजप्रती ॥ करिता दान पद्धती यथाक्रमें ॥ ३७ ॥

ऐसें ऐकूनि तिचिया उत्तरा ॥ बोले कांहींते राजदारा ॥
अव्हेरुनी वचनामृत सारा ॥ बोले सुंदर ते ऐका ॥ ३८ ॥

म्हणे ऐकहो गुणवंतीबाई ॥ कैचें दान कैचें व्रत पाहीं ॥
कोण कष्ठवी या देहीं ॥ फळ कायी आचरूनीं ॥ ३९ ॥

आतां आचरावें व्रतातें ॥ तें फळ पुढें प्राप्त होतें ॥
देव देईल म्हणोनि संकल्पातें ॥ आशा अंतरातें धरूनी ॥ ४० ॥

ऐसा आचरावा जरी नेम ॥ तरी कवण जाणे पुढील जन्म ॥
काय वोढवेल नेणो कर्म ॥ पाहुनियां धर्म कोण आला ॥ ४१ ॥

दानधर्म करून सर्व जन ॥ मृत्यु पावले ते नाहीं आले परतुन ॥
नेणों स्वर्गी जाचणी कीं सन्मान ॥ पाहुनिया कोण परतले ॥ ४२ ॥

वृथा कष्टवावें शरीरातें ॥ काय उणें केलें भगवंतें ॥
सर्व अनुकूळ आहे आम्हांते ॥ ऐक निरुते भामिनी ॥ ४३ ॥

धन मागावें श्रीहरी ॥ सर्व संपत्ती अनुकूळ घरीं ॥
पुत्र मागो इच्छा अंतरी ॥ तरी असती निर्धारीं पुत्र दोघे ॥ ४४ ॥

तेही सगुणसंपन्न ॥ सर्वगुणमंडित पूर्ण ॥
वर्तती आमुचे वचनाधीन ॥ न मोडिती वचन कदां ते ॥ ४५ ॥

जेवी शिव आणि भवानी ॥ तेवीं मानिती आम्हां उभयतालागुनी ॥
तयांची मान्यता सर्व जनीं ॥ जयविजय सुरलोकींचे ॥ ४६ ॥

मीही स्वरूपें सुंदर अंगना ॥ रूपाभिमानें न मानी कोणा ॥
माझिया ऐश्वर्यपुढें उणा ॥ इंद्र ठेंगणा मी मानीं ॥ ४७ ॥

सदांसर्वदा मजलागीं ॥ नृप संतोषवि स्वअंगी ॥
प्राण वेंचील वचनालागीं ॥ माझियां नृपेंद्र तो ॥ ४८ ॥

परम प्रीती आम्हां उभयतां ॥ ऐसें ऐश्वर्य मज असतां ॥
तेथें व्रत प्रभावाची वार्ता ॥ काय भगवंता मागावें ॥ ४९ ॥

आतां व्रत आचरावें कोणी ॥ तेंही ऐकपां कहाणी ॥
सदा पीडिलें जे दरिद्रेंकरूनी ॥ व्रत तयानें करावें ॥ ५० ॥

अन्नवस्त्र न मिळें किंचित ॥ पोटीं नाही ज्याचिया संतत ॥
त्यानें करावें पै व्रत ॥ आणीक मात अवधारी ॥ ५१ ॥

व्याधियुक्त असतां शरीरीं ॥ तयानें जपावा हरिहरी ॥
किंवा एकचि पुत्र संसारी ॥ तोही नायके पितयाचें ॥ ५२ ॥

सदां सर्वकाळ मातापिता ॥ देखों न शकेची सर्वथा ॥
ऐसीं जेथें असे व्यवस्था ॥ तयानें या व्रता आचरावें ॥ ५३ ॥

व्रत आचरतां संपूर्ण ॥ मनीं हेतु हाचि पूर्ण ॥
व्हावें माझें कल्याण ॥ करावें म्हणोन व्रत हें ॥ ५४ ॥

तरी श्रीहरी कृपेकरून पाही ॥ सर्व अनकूळ मजलागीं बाई ॥
मज नसेची वासना कांही ॥ व्रतप्रभावीं साजणीये ॥ ५५ ॥

ऐसी तिचीया वचनाची हेळणा ॥ करिती जाली नृपांगना ॥
कोणी जावें तीर्थाटणा ॥ कष्ट जाणा शरीरातें ॥ ५६ ॥

अमृता ऐसें तिचें वचन ॥ येरी मानी तृणसमान ॥
जेवीं अमृतकुंभ नेऊन ॥ उकरडां ओती अभागी ॥ ५७ ॥

जेवी एकादिया सद्‍बुद्धि सांगता ॥ तो तंव नायकेची तत्वतां ॥
मग तयातें प्रस्तवा होतां ॥ कुसुकुसी मनामाजी ॥ ५८ ॥

तैसा प्रकार येथें जाला ॥ नायके शिकविल्या बोला ॥
अव्हेरूनि सती गुणवतीला ॥ अपायाला वाट केली ॥ ५९ ॥

असो होणार तें कां सुखें ॥ ऐसें मानुनिया निकें ॥
आज्ञा घेऊन तात्काळीकें ॥ गुणवती गृहातें पातली ॥ ६० ॥

तंव ते गुणवती प्रधानकामिनी ॥ आरंभिती जाली व्रता लागुनी ॥
यथापूर्वक भावार्थ मनीं ॥ चक्रपाणी आराधितसे ॥ ६१ ॥

येरीकडे यशोमती सती ॥ भोगसमयीं येतां नृपती ॥
अवघा समाचार तयाप्रती ॥ जाली सांगती आदरेंसी ॥ ६२ ॥

नृपें उत्तर न देतां तयेला ॥ संपादित झाला भोगवळा ॥
तंव अपूर्व जालीसे लीळा ॥ ते सकळांलागीं परिसवूं ॥ ६३ ॥

कठोर शब्द न साहवे मानवियां ते ॥ मग तो तव साक्षांत अनंत ॥
जाणें सर्वांचे ह्रद्‌गत ॥ दूषण वृथा ठेविलेंस ॥ ६४ ॥

म्हणोनि कोपला नारायण ॥ ज्वर प्राप्त झाला न लागतां क्षण ॥
राजभार्या अत्यंत व्याकुळ जाण ॥ शांत नव्हे जाण ज्वर पैं ॥ ६५ ॥

अत्यंत भूतज्वर आंगीं ॥ प्राण जाऊं पाहे लगबगी ॥
वार्ता फांकतांची जगी ॥ नृप वेगी पातला ॥ ६६ ॥

पुत्र ही धाविन्नलें वेगें ॥ सन्निध पातले निजांगें ॥
दास दासी अपार वेगें ॥ पातलें वेगें त्या ठायी ॥ ६७ ॥

बहुतांपरी उपचार ॥ करविता जाला नृपवर ॥
औषधी देतां नव्हे बरें ॥ अधिकाधिक व्यथा जाची ॥ ६८ ॥

घाबरे जाले नगरवासी ॥ उरस्फोट नृपवरासी ॥
रुदित शब्द न फुटे पुत्रासी ॥ दासदासी आकांत ॥ ६९ ॥

तंव तो मंडन प्रधान पाहीं ॥ स्त्रीसहीत धांवत आला, लाहीं ॥
तंव तेथें दुःखाते पारच नाही ॥ समजावित नाही कोणी कोणा ॥ ७० ॥

शांतवितां मंडन प्रधान ॥ उगे न राहती नृपनंदन ॥
राजयाचे अश्रुपूर्ण ॥ देखे प्रधान निजनयनी ॥ ७१ ॥

करपल्लवे समस्तातें ॥ प्रधानें शांत केले तेथें ॥
तंव गुणवती प्रधानभार्या ते ॥ अंतरगृहातें पातली ॥ ७२ ॥

निवारून सकळ स्त्रियांचा मेळा ॥ आपण पातली यशोमतीजवळा ॥
निवारुनि सकळ दुःखकल्लोळा ॥ उपचार केला बहु तेणें ॥ ७३ ॥

तितुकियामाजी काय झालें ॥ राजयोषितेने अवलोकिले ॥
तव गुणवतीचे मुख चांगले ॥ सुशोभित देखिले निजनयनी ॥ ७४ ॥

हरिद्रकुंकुम लेत वदनी ॥ माथा शेंदुरसुशोभिनी ॥
अंजन घालूनिया नयनीं ॥ देखे भामिनी रायाची ॥ ७५ ॥

मुखी तांबूल असे रंगला ॥ अलंकारेमंडित ते अबळा ॥
देखती जाली राजवेल्हाळा ॥ देखूनि कपाळा आठी घाली ॥ ७६ ॥

मग बोले राजयोषिता ॥ कोण काळ श्रृंगारकरिता ॥
सकळिका शोक अवस्था ॥ श्रृंगारिया लज्जा नसे ॥ ७७ ॥

तरी उठे आता येथूनी ॥ जाई आपुल्या सदनी ॥
आली श्रृंगार सावरुनी ॥ दर्शनालागुनी माझिया ॥ ७८ ॥

ऐसे वदता तियेते ॥ येरिचे काय चाले तेथे ॥
स्वामिये निखादितां सेवकाते ॥ न चाले तेथे दुजियाचे ॥ ७९ ॥

राजा कोपला प्रजा ते पाही ॥ सर्व संपत्ति लुटिता होई ॥
तेथे दुजियाचा उपाय नाही ॥ तैसीच नवाईही दिसे ॥ ८० ॥

असो कोपारूढ राजजाया ॥ देखून उठली प्रधानभार्या ॥
स्वगृहा पातली लवलाह्या ॥ सखेदयुक्त अंतरी ॥ ८१ ॥

येरीकडे नृपसुंदरी ॥ भ्रूसंकेते ते अवसरी ॥
नृपालागी अत्यादरी ॥ पाचारी जवळीके ॥ ८२ ॥

म्हणे काही पाहिले कौतुक ॥ येरु म्हणे नाही देखिले सम्यक ॥
ती म्हणे तुम्ही भोळे भाविक ॥ नेणा कौतुक स्त्रियांचे ॥ ८३ ॥

मज प्राप्त झाले हे दुःख ॥ तुम्ही सकळ करितसा शोक ॥
प्रधानस्त्री गुणवती देख ॥ आली निःशंक श्रृंगारुनी ॥ ८४ ॥

काही दुःख न वाटे तिचे मनी ॥ विपरीत मनामाजी करणी ॥
म्हणोन आली श्रृंगारुनी ॥ लज्जा मनी न वाटे ॥ ८५ ॥

ती सेवक मी स्वामिणी ॥ हा भाव नसे तिचे मनी ॥
ऐसी ती सेवकाची करणी ॥ नायको कानी स्वामिया ॥ ८६ ॥

ऐसें बोलविले नृपांतरा ॥ दूर त्यजीते राजसुंदरा ॥
ऐकून कांतेच्या उत्तरा ॥ जाला संचार क्रोधाते ॥ ८७ ॥

परम अविवेकी तो भूपती ॥ ऐकून स्त्रियांची वचनोक्ती ॥
अनुसरला अक्रिय गती ॥ तेची पद्धती अवधारा ॥ ८८ ॥

जो स्त्रीबुद्धीते लागला ॥ तो सर्वीसर्वस्वे बुडाला ॥
तो अपायी पडे भला ॥ संशय याला नसेची ॥ ८९ ॥

तव राये क्रोधेकरून ॥ प्रधान कर्षिला तो मंडण ॥
पायी शृंखळा दृढ घालून ॥ गृह लुटून पै नेले ॥ ९० ॥

तयाची सकळ संपत्ति ॥ आणविता जाला भूपती ॥
प्रधान दंडिला हे ख्याती ॥ नगरामाजी प्रगटली ॥ ९१ ॥

पहा प्रभूचे कैसे विंदान ॥ चाले जो सत्क्रियेकरून ॥
तयावरी अपाय कोसळती जाण ॥ परी धैर्य ठाण न सोडावे ॥ ९२ ॥

गुणवती आचरता व्रत बरवे ॥ प्रधान कर्षून ठेविला राये ॥
परी डगमगेना तिचे ह्रदय ॥ न सोडी सोय व्रताची ॥ ९३ ॥

गृहीचे नेले सर्व धन ॥ परी न कंटाळे तिचे मन ॥
म्हणे व्रत न होता पूर्ण ॥ केवी टाकू मध्यंतरी ॥ ९४ ॥

व्रत आचरे सायासी ॥ वृत्तांत कळला रायासी ॥
मग बोलावू पाठविली दासी ॥ पतिव्रते सन्निध ॥ ९५ ॥

नृप जो पाहे विलोकुनी ॥ तंव अलंकारयुक्त कामिनी ॥
कुंकुमयुक्त शोभित वदनी ॥ नृपै मनी जाणिलें ॥ ९६ ॥

म्हणे कांता बोलिली सत्य ॥ सांप्रत नव्हे असत्य ॥
ही तंव जाया सुशोभित ॥ नव्हे दुःख कालत्रयी ॥ ९७ ॥

मग क्रोधयुक्त होऊन पाहीं ॥ तियेतें ठेविलें कारागृहीं ॥
उभयतां तें एकचि ठायी ॥ ठेविलें असे निर्धार ॥ ९८ ॥

परी तेथेंही न सोडी व्रता ॥ नित्य आचरे प्रधानकांता ॥
तंव एके दिनीं प्रधानतत्वता ॥ जाला बोलतां स्त्रियेतें ॥ ९९ ॥

म्हणे आपण उभयतां कारागृही ॥ कवण दुःख अवस्थादेही ॥
व्रत आठवलें कैचें कायी ॥ अपरूप नवाई देखों ॥ १०० ॥

मंडण उवाच ॥ न जाने कर्मण: कस्य विपाकोयमुपस्थितः ॥
गुणवत्युवाच ॥ देवसेवकवर्गस्य स्वाम्यायत्तं च जीवितं ॥ ४ ॥

तंव वदे तेव्हां गुणवती ॥ बोलतसे पतीप्रती ॥
हे नाथ जाणत जाणतवृत्ती ॥ केवि निरुती करितसां ॥ 10१ ॥

आपुला तो सेवक धर्म ॥ तो आपण ये साधिला नेम ॥
नेणो अव कर्माकर्म ॥ हें पुरुषोत्तम सर्व जाणे ॥ 10२ ॥

मग बोले प्रधान मंडन ॥ हे तो माझी कर्मरेषा पूर्ण ॥
पायी जाल्या श्रृंखळाबंधन ॥ उभयतां आपण दुःख भोगूं ॥ 10३ ॥

मजकरितां तूंतें पाही ॥ दु:ख होतसे ह्रदयी ॥
येरी उत्तर देतेसमयीं शेषशायी निवारिता ॥ 10४ ॥

विष्णुर्विश्‍वंभराभारधरणैकधुरंधरः ॥
श्रीधरः परमेशानः सर्व दुःखनिकृंतनः ॥ ५ ॥

म्हणे हे नाथ चूडामणी ॥ चिंता न कीजे निजमनी ॥
विश्‍वंभर चक्रपाणी ॥ आधार त्रिभुवनीं जयाचा ॥ 10५ ॥

तयाची हे सर्वसत्ता ॥ त्रैलोक्य प्रतिपालिता ॥
जाणे सर्वांचे मनोगता ॥ हिताहिता सर्वही ॥ 10६ ॥

तरी दृढ भाव तयाचे पायीं ॥ निवांत राहावेम ह्रदयीं ॥
आठवूनियां शेषशायी ॥ तोची सर्व निवारिल ॥ 10७ ॥

ऐसें सतीचें नेमवचन ॥ ऐकून स्वस्थ राहे प्रधान ॥
येरी भावार्थ मनी धरून ॥ करी संपूर्ण व्रतपैं ॥ ॥ 10८ ॥

होतां व्रताची संपूर्णता ॥ मग मज आठवूं जाला तत्वतां ॥
उणे येऊं पाहा पैं आतां ॥ न करिती व्रता कोणीही ॥ 10९ ॥

ऐसें जाणून अंतरी ॥ स्वप्नीं जागृत केला नृपकेसरी ॥
तयातें बोलता जाला वैखरी ॥ अवधारीं सुंदरी तेची तूं ॥ 1१० ॥

स्वप्नामाजी रायातें पाही ॥ जागृत केलें ते समयीं ॥
मूर्खा सावध आतां होई ॥ बोलतों काई ते ऐक ॥ १1१ ॥

विनाअपराधें तत्वतां ॥ कारागृहीं राखिले उभयतां ॥
प्रधान आणि त्याची कांता ॥ तरी अन्याय कोणता तयांचा ॥ १1२ ॥

ते गुणवंती परम सज्ञान ॥ ते प्रबोधी यशमतीलागून ॥
मलमास व्रताचर्ण ॥ आचरूं जाण उभयतां ॥ १1३ ॥

तें न आणितां निजमनीं ॥ केली व्रताची हेळणी ॥
तयायोगें ज्वर अद्‍भुत सदनीं ॥ कष्टी होत तव जाया ॥ १1४ ॥

गुणवती भावार्थेकरून ॥ व्रत करिती जाली आपण ॥
भेटीस येता तुझिया कांतेनें ॥ विपरीत मनीं भावलें ॥ १1५ ॥

ते तंव सदैव सुवासिनी ॥ संभ्रमें भरित सौभाग्यखाणी ॥
कज्जकुंकुमातें स्वीकारूनी ॥ पातली सदनीं तुझिया ॥ १1६ ॥

तें तंव देखता मनीं ॥ क्षोभ पावली कामिनी ॥
तूंतें भासवून विपरीत करणीं ॥ घातलें बंधनीं उभयतां ॥ १1७ ॥

तरीं तेथें अन्याय केउता ॥ तुवां विचार न करितां नृपनाथा ॥
गृह लुटून तत्वतां ॥ बंदी उभयतां कारागृहीं ॥ १1८ ॥

ते गुणवती सुशीळा ॥ पुण्यलेश तियेतें घडला ॥
तरी मुक्त करीं उभयताला ॥ देऊनि धनाला सर्वही ॥ १1९ ॥

इतुकें करीं सत्वर आतां ॥ सन्मानें बोळवीं उभयतां ॥
हें जरी न करिसी नृपनाथा ॥ तरीं आत्मघाता पावशील ॥ 1२० ॥

ऐसें स्वप्नीं सांगोन शेषशायी ॥ गुप्त जाले ठायींचे ठायीं ॥
रावो जागृत होता ह्रदयीं ॥ मानी नवाईअद्‍भुत ॥ 1२१ ॥

मग घाबरेपणें ते वेळीं ॥ स्वप्न सांगे स्त्रियेजवळी ॥
ऐकतां ते ही चाकाटली ॥ अंतरीं कळली निज खूण ॥ 1२२ ॥

मग म्हणे जी नृपनाथा ॥ तयातें सत्वर मुक्त करा आतां ॥
नाहींतरी बरी न दिसें व्यवस्था ॥ होईल घाता आपुलिया ॥ 1२३ ॥

ऐसें ऐकतांचि वचन ॥ दचकलें रायाचें मन ॥
मग तैसाच बंदिशाळे येऊन ॥ उभयतांलागून नमियेले ॥ 1२४ ॥

श्रृंखळाबंधनीं मुक्त केला ॥ कांतेसहि गौरविला ॥
नूतन वस्त्रें देता जाला ॥ कारभार वोपिला मागुती ॥ 1२५ ॥

वस्तुजात सर्वही तयाचें ॥ तेंही अर्पण केलें साचें ॥
बोलूनियां नम्र वाचें ॥ सर्वस्वातें क्षमा मागें ॥ 1२६ ॥

गुणवती सती परममंगळा ॥ राव नमस्कारी वेळोवेळा ॥
रावभाजेतेही आराम वाटला ॥ परी कंठ दाटला सद्‍दीत ॥ 1२७ ॥

मौन्येंची नमस्कारिली सती ॥ कांहीं न बोलवेंची पुढती ॥
करीं अपराधाची शांती ॥ नवलरीति अनुपम्य ॥ 1२८ ॥

ऐसें मलमास व्रता ॥ मग त्या आचरती उभयतां ॥
सकळ सौभाग्यसरिता ॥ जाली प्राप्तता तयातें ॥ 1२९ ॥

मग नागरिकवासी सकळ ॥ व्रत करिते जाले अचळ ॥
तयेनगरीं काळवेळ ॥ नोहे दुष्काळ कदांही ॥ 1३० ॥

ऐसें हें मलमाहात्म्यआख्यान ॥ अव्हेरितां काय जालें कथन ॥
तेंची तूंतें केलें निवेदन ॥ सत्य जाण भामिनिये ॥ 1३१ ॥

तोची अर्थांतरबरवा ॥ श्रोतियतें निवेदिला आघवा ॥
न घडे तरीं न हेळसावा ॥ प्रत्ययो घ्यावा श्लोकांतरीं ॥ 1३२ ॥

इतिश्रीमलमाहात्म्यग्रंथ ॥ पद्‍मपुराणीचें संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ षड्‍विंशतितमोऽध्याय गोड हा ॥ २६ ॥

ओव्या १३२ ॥ श्लोक ५ ॥

॥ इति षड्‍विंशतितमोऽध्यायः ॥


पुरुषोत्तम/अधिक मास कथा अन्य अध्याय


अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 1 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 1
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 2 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 2
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 3 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 3
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 4 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 4
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 5 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 5
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 6 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 6
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 7 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 7
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 8 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 8
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 9 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 9
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 10 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *