श्री पुरुषोत्तम मास अध्याय सत्ताविसावा

अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 27 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 27

श्रीगणेशाय नमः ॥

श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरूभ्यो नमः ॥

जयजयमाते आदिजननी ॥ त्रिपुरसुंदरी त्रैलोक्यपावनी ॥
सर्वदुःखदरिद्रशमनी ॥ विघ्नहरणी महामाये ॥ १ ॥

तुझिया कृपाकटाक्षें जाण ॥ पांगुळ पवनाहूनी करी गमन ॥
मुका तोची वाचाळ होय जाण ॥ कृपेकरून तुझिया ॥ २ ॥

ऐका श्रोते एकाग्रचित्त ॥ मलमहिमा अति अद्‍भूत ॥
लक्ष्मीतें नारायण सांगत ॥ तोचि संकलितार्थ निवेदूं ॥ ३ ॥

श्रीउवाच ॥ समानफलदादेव सर्वेमस्मलिम्लुचाः ॥
विशेषोत्तर कथं कस्य तदेतद् वदमे प्रभो ॥ १ ॥

लक्ष्मी वदे हो देवादिदेवा ॥ कृपासागरा करुणार्णवा ॥
समान फल व्रत प्रभावा ॥ कैसे निदेवा लाहिजे ॥ ४ ॥

विषद कीजे जी पुरुषोत्तमा ॥ तेणें आचरतां कर्माकर्मा ॥
प्राणी पवती मोक्षधामा ॥ होय अधमा उपरती ॥ ५ ॥

ऐसा शब्द रमेचा ऐकून ॥ बोलता जाला नारायण ॥
तोची श्लोकाधार पूर्ण ॥ करा श्रवणहो ॥ ६ ॥

नारायण उवाच ॥
समानफलदा देवीसर्वेमासाधिमासका: ॥

विशेषफलदाह्येते माघवैशाखकार्तिकाः ॥ २ ॥

ऐका सुंदरीये पाहीं ॥ समान फळ सर्वही ॥
परी उत्तमोत्तमही ॥ प्रकार वेगळा पै ॥ ७ ॥

विशेष महिमा जाण ॥ पूर्णिमा म्हणजे तीन ॥
माघी वैशाखी कार्तिकी जाण ॥ विशेषहून मलमासीं ॥ ८ ॥

येथें कीजे स्नानदानविधी ॥ विप्रभोजन यथाविधी ॥
होमहवन जपसिद्धि ॥ तरी सर्वसिद्धि तो पावे ॥ ९ ॥

भावे करावे विप्रपूजन ॥ मग यथाशक्त्या दीजे दान ॥
त्रयत्रीणि दशक अपूप अन्न ॥ घृतासहित अर्पावें ॥ १० ॥

याहीवरी जें दान निवेदिले ॥ ते तें पाहिजे प्रत्यही केलें ॥
ऐसें जरी न घडे एक वेळे ॥ पाहिजे केलें पूर्णिमेसी ॥ ११ ॥

मग संपूर्ण मास संपादित व्रत ॥ उद्यापन कीजे यथास्थित ॥
तै संपूर्ण फल होय प्राप्त ॥ जाण सत्य वरानने ॥ १२ ॥

संपूर्ण फलसमानता ॥ प्राप्त होय कैसेनि आतां ॥
तरीं यदर्थी ऐकें तत्वतां ॥ इतिहास शुभानने ॥ १३ ॥

पूर्वी कृत युगाच्या ठायीं ॥ अपूर्व जालीं एक नवाई ॥
तेची श्रवण करवूं ये समयीं ॥ तुज पायीं वरानने ॥ १४ ॥

सुशर्मानामें नृपवर ॥ असे भूपती राज्यधर ॥
धर्मपारंगत अतितत्पर ॥ दानशूर प्रतापि ॥ १५ ॥

सर्वधर्मीं पारंगत पाहीं ॥ हरिभजनीं झिजे देहीं ॥
कथापुराणें कालकर्मीं सर्वही ॥ नीतिन्यायें चालवी राजधर्म ॥ १६ ॥

सत्पात्रीं विन्मुख नव्हे कदां ॥ कधींही न प्रवर्ते वादविवादा ॥
हरिस्मरणीं रत सदा ॥ विप्रसेवा आदरेसी ॥ १७ ॥

भार्या तयाची सुंदर पतिव्रता ॥ सुष्टमती नामें तत्वता ॥
परम प्रीति उभयतां ॥ सदां सादरता पतिसेवे ॥ १८ ॥

तंव पातला मलमास ॥ उभयतां आचरती व्रतास ॥
विप्रभोजनीं अतिहव्यास ॥ दिवसेंदिवस वृद्धिंगत ॥ १९ ॥

दानधर्म नित्य करिती ॥ उणें न पावे कवणे रिती ॥
प्रातःस्नाने उभयता सारिती ॥ आणि मौन्यें सारिती नक्तातें ॥ २० ॥

ऐसें व्रत शास्त्राधारें ॥ आचरती उभयतां वधुवरे ॥
तंव अंगिराऋषी तपी थोरे ॥ राजदर्शना पातला ॥ २१ ॥

दृष्टीं देखतां तपोराशी ॥ उल्हास परम नृपासी ॥
देऊनिया निज आसनासी ॥ भूतळवटासी बैसे राव ॥ २२ ॥

मग आणूनि पूजा प्रकार ॥ उभयतां पूजिते जाले मुनेश्वर ॥
परम हर्षे निर्भर नृपवर ॥ करी सोपस्कार पूजेचा ॥ २३ ॥

ऐसी पूजा करितां तेच क्षणीं ॥ वस्त्रे अलंकारें अर्चिला मुनी ॥
परमहर्षयुक्त अंगिरामुनि ॥ आतिथ्य पाहुनी नृपाचें ॥ २४ ॥

मग बोलता जाला मुनि ॥ भावा आगळा देखिला भूपती ॥
व्रत आचरतां उभयतीं ॥ जाला मातें आनंदु ॥ २५ ॥

उत्तमासनीं बैसविलें आम्हां ॥ भूमीशाई तूं नृपोत्तमा ॥
तुज ऐसा धार्मिक महात्मा ॥ न देखिला अद्यापि ॥ २६ ॥

विप्रातें दिधले अग्रहार ॥ वापीकूप सरोवरें अपार ॥
कीर्ति तुझी नृपवरा थोर ॥ भूधरा आगळी ॥ २७ ॥

ऐसी स्तुतिवादें मुनीची ॥ प्रशंसा ऐकता नृपाची ॥
उद्विग्नता नाही गेली मनाची ॥ बोले काही नृपवर ॥ २८ ॥

तव दर्शनें धन्य जालों आजी ॥ सकळ तीर्थे तव चरणसरोजीं ॥
भाग्यातें पार नाहीं आजी ॥ कृतकृत्य सहजी मज केले ॥ २९ ॥

द्विजसेवे ऐसें नाही देख ॥ साधन दुजें नाहीं आणीक ॥
सदां सेवावें चरणोदक ॥ पावन होती सर्वही ॥ ३० ॥

तुमचिया आशीर्वादे करून ॥ सकळ संपत्ती लाधली पूर्ण ॥
ऐसें तुमचें महिमान ॥ केले पावन मजलागीं ॥ ३१ ॥

न पाचारितां आलेति ॥ अवलोकिली सकळसंपत्ति ॥
पुत्रकलत्रादी युवती ॥ मानीं तृप्ति मी सर्व तेणें ॥ ३२ ॥

ऐसा स्तुतिवाद एकमेकांतें ॥ वाक्‍पुष्पें संतोषविती तेथें ॥
तवं बोलतां जाला नृपनाथ ॥ मुनिवरातें ते काळी ॥ ३३ ॥

म्हणे स्वामिया ऐकावें ॥ जे आश्चर्ये देखिलें स्वभावें ॥
तेंची कथितों सुशोभनाभावें ॥ तथास्तु या भावें बोलें मुनी ॥ ३४ ॥

आम्ही उभयता आचरूं व्रतास ॥ मलमाहात्म्य हें निर्दोष ॥
अपूर्व एक देखिलें असे ॥ तेची परियेसीं मुनिराया ॥ ३५ ॥

अधिमासेपुरा वैश्यो नाम्ना वीर इति श्रुतः ॥
कुमार्गनिरतोनित्यं सर्वलोकहितेरतः ॥ ३ ॥

माझिया नगरामाजी एक ॥ वैश्य नांदतसे देख ॥
वीर ऐसें तयाचें नामांक ॥ परम हिंसक चांडाळ तो ॥ ३६ ॥

चौरकर्म करूनि जाण ॥ पश्‍वादी आणि गोधन ॥
तयाचा विक्रय करून तेणें ॥ धनही हरित विप्राचें ॥ ३७ ॥

जीवमात्रांचा वध करी ॥ प्राणियातें जीवें मारी ॥
वेश्यारत अहोरात्रीं ॥ ऐसा दुराचारी कृतघ्न ॥ ३८ ॥

निष्ठुर भाषणी अनृत वचनी ॥ पापाचे भय न धरी मनी ॥
ऎसा तो वर्तत असतां जनीं ॥ जाली परी ते ऐका ॥ ३९ ॥

ऐसा तो परम कृतघ्न ॥ स्त्रीसहित सेविलें अरण्य ॥
सकुटुंबेसी हिंसाधर्म आचरून ॥ उदरपोषण चालविती ॥ ४० ॥

सदां मार्ग रोधूनि जाण ॥ हरितसे पांथस्थाचें धन ॥
वस्त्रें आणीक प्रावर्ण ॥ हरून नग्न सोडितसे ॥ ४१ ॥

ऐसें असतां एके अवसरीं ॥ तृषाक्रांत वीर अंतरी ॥
उदक धुंडिता हिंसाकरी ॥ तंव देखिलें नेत्री अपूर्व ॥ ४२ ॥

एक देवालय अतिजीर्ण ॥ श्रीविष्णुदैवत असे जाण ॥
देखतां जाला दुरून ॥ हर्षयुक्त निज मनीं ॥ ४३ ॥

सभोंवते वृक्ष घनदाट ॥ केळीनारळी आचट ॥
आंब्र निंबोनि आणि कवठ ॥ देखता थाट मन भुले ॥ ४४ ॥

नाना पुष्पांचिया जाती ॥ तेथें बिल्वादि वृक्ष शोभती ॥
जाई जुई आणि मालती ॥ केतकी डोलती फुलभारें ॥ ४५ ॥

येथें चातकें मयोरे बदक ॥ चक्रवाकादी कोकिळांक ॥
नाना जातीचे पक्षी अनेक ॥ विचरती देखते ठायीं ॥ ४६ ॥

ऐसे अपूर्व रम्य स्थान ॥ सरोवरीं उदक अमृतसमान ॥
वीरेश्वरें नयनीं देखून ॥ गेला धांवून सरोवरतीरा ॥ ४७ ॥

कांतेसहीत जलपान करूनी ॥ क्षण एक विश्रांती पावला ते स्थानीं ॥
तो तेथें आमुची राजपत्‍नी ॥ दर्शना लागुनि गेलीसे ॥ ४८ ॥

करूनियां देवदर्शन ॥ नयनीं सभोवतें निरखितसे वन ॥
तंव तेथें स्त्रीपुरुष दोघेजण ॥ बैसले श्रमोन एकांती ॥ ४९ ॥

तंव ते वीरबाहूची भार्या ॥ येऊन लागतसे पायां ॥
स्वदुःखवार्ता निवेदुनियां ॥ रुदित शब्दें करूनी ॥ ५० ॥

म्हणे बाई जन्मवरी ॥ भ्रताराचें सौख्य नाही तिळभरी ॥
हा तंव कृतघ्न दुराचारी ॥ परम हत्यारी निर्दय ॥ ५१ ॥

याचिया संगती करून ॥ नेणें कांहीं पुण्याचरण ॥
दान तप न घडे जाण ॥ पापाचेन सर्वदां ॥ ५२ ॥

नेणों जन्मपंक्ती अनंत ॥ नेणों सार्थक न घडे देहान्त ॥
पुढें यमयातना बहुत ॥ न दिसे प्रांत मज कांहीं ॥ ५३ ॥

ऐसी नाना परी करुणा ॥ भाकिती जाली वीर अंगना ॥
कृपेनें द्रवली ते शुभानना ॥ राजांगना ते वेळीं ॥ ५४ ॥

मग उठोनियां लवलाहीं ॥ नृपाचरणीं ठेविली डोई ॥
म्हणे महाराजा विनंती परिसावी ॥ ही उभयतां अतिदुःखी ॥ ५५ ॥

तरी यातें कवण उपावो ॥ स्वामी कृपा करूनि निवेदाहो ॥
अतिउत्तम नरदेह पाहाहो ॥ केवी गती पुढारी पैं ॥ ५६ ॥

पूर्वकर्माद्‍भुत हे दोघे ॥ हिंसाधर्म आचरती आंगें ॥
पुण्यसंस्कार आंगीं न लागे ॥ तरीं तरती वेगें कैसेनी ॥ ५७ ॥

यातें पाहूनि ह्रदयीं ॥ दया उपजली माझे जीवीं ॥
तरीं कृपाकरूनीं उपदेशावी ॥ पावे पदवी सायुज्यता ॥ ५८ ॥

ऐकून उभयतांचे वचन ॥ मग मी उभयतांते आश्वासन ॥
फळें भक्षविलीं तया लागून ॥ उपाय जाण सांगितला ॥ ५९ ॥

सहज रीती बोलिलों त्यातें ॥ प्राप्त जाल्या मलमासातें ॥
तरीं सांगतो जें तुम्हांतें ॥ धरा मानसीं निर्धारें ॥ ६० ॥

अंतकालेच संप्राप्ते यन्नामविवशोगृणेन ॥
प्रयाति विष्णुसालोक्यं ॥ पूर्व पुण्यप्रभावतः ॥ ४ ॥

अंतकाळीं जयातें घडे विष्णु स्मरण ॥ तयानें अन्य सेवा न लगे करणें ॥
पापी हो कां सज्ञान-अज्ञान ॥ जाय उद्धरून तात्काळी ॥ ६१ ॥

तरीं तुम्हीं उभयतां स्त्री-पुरुष ॥ मनीं धरूनीं हव्यास ॥
नित्यानित्य विशेषाविशेष ॥ नामघोष पैं करावा ॥ ६२ ॥

नित्य प्रातःकाळीं उठोन ॥ देउळीं कीजे सडासंमार्जन ॥
नंतर सरोवरीं स्नान करून ॥ करा भजन आदरें ॥ ६३ ॥

ऐसें तयातें स्वयें निवेदिलें ॥ तथास्तु म्हणॊन तेंही वंदिलें ॥
मग आचारूं लागले ॥ तैसेंची उभयतां ॥ ६४ ॥

नित्य सडासंमार्जन करिती ॥ सरोवरीं स्नानें सारिती ॥
अष्टौप्रहर भजन करिती ॥ न सोडिती दिनरजनीं ॥ ६५ ॥

नित्य होता माध्यानकाळ ॥ मेळवूनि आणिता ती फळें ॥
देवातें अर्पूनि सकळ ॥ शेष भक्षिती उभयतां ॥ ६६ ॥

ऐसें क्रमितां भावार्थे ॥ स्वामिया नवल वर्तलें तेथें ॥
कृपाळू जाला रमानाथ ॥ परम भावार्थ जाणुनी ॥ ६७ ॥

मलमास होता संपूर्ण ॥ तंववरी केले आचरण ॥
प्राप्त झाला शेवटील दिन ॥ जालें विंदान तें ऐका ॥ ६८ ॥

सहजीं जालें प्रातःस्नान ॥ सर्वही पर्वणी साधिली तेणें ॥
व्यतीपात पूर्णिमा जाण ॥ द्वादशी अमावास्या ते ॥ ६९ ॥

कवण पर्वणी कवणें ठायीं ॥ हे तों तयातें ठाउकेंची नाहीं ॥
परी कृपाळू तो शेषशाई ॥ केली नवाई ते ऐका ॥ ७० ॥

सहजी घडले तया उपोषण ॥ करितां वनफळातें भक्षण ॥
जिव्हा रंगली नामेंकरून ॥ जाहलें दहन पापाचें ॥ ७१ ॥

सप्तजन्मांचे गेले पाप ॥ तंव विमान उतरलें आपोआप ॥
करून उभयतां दिव्यरूप ॥ निजस्वरूपी ठेविलें ॥ ७२ ॥

येवढें नाममहिमान आगळें ॥ महापापिये उद्धरिलें ॥
स्वनयनीं आम्ही देखिलें ॥ म्हणोन कथिलें स्वामिया ॥ ७३ ॥

ऐसे इतिहासालागून ॥ अंगिराऋषी तें कथी नृपनंदन ॥
ऋषी वदे पाहिजे भावपूर्ण ॥ तेणें नारायण कृपा करी ॥ ७४ ॥

पुनः रायें ऋषी अर्चिला ॥ नमस्कारोनि बोळविला ॥
रायें संपादोन व्रताला ॥ केलें उद्यापनाला विधिनें ॥ ७५ ॥

मग तो पत्‍नीसहित भूप ॥ विष्णुलोकीं राहिला सुखरूप ॥
इतिहास हा अपरूप ॥ स्वयें निवेदी नारायण ॥ ७६ ॥

लभते भगवद्‍भक्तिं भुक्तिमुक्तिप्रदायिनीं ॥
मुहूर्ते वा मुहूर्तार्धंयस्तिठेद्धरिमंदिरे ॥ ५ ॥

ऐसी भगवद्‍भक्ति करितां ॥ विष्णुलोका पावलीं उभयतां ॥
यालागीं मुहूर्त अथवा अर्धमुहूर्ता ॥ ह्रदयीं अनंता आठविजे ॥ ७७ ॥

पाहातो वीर आणि पत्‍नी ॥ काय साधन केलें तयांनी ॥
सहजीं सहज संमार्जनीं ॥ नेलें उद्धरोनीं भगवंतें ॥ ७८ ॥

यालागीं भावार्थे करून ॥ वश्य राहो जनार्दन ॥
चुकेल तुमची यमयातना ॥ सत्य माना वचनातें ॥ ७९ ॥

ऐसा संवाद लक्ष्मीनारायणीं ॥ तोची विस्तारिला श्रोतियांकरणीं ॥
जोडुनियां बद्धपाणी ॥ अनुसरा दिनयामिनी पैं ॥ ८० ॥

इति श्रीमलमाहात्म्यग्रंथ ॥ पद्‍मपुराणींचे संमत ॥
मनोहरसुत विरचित ॥ सप्तविंशतितमोऽध्याय रसाळ हा ॥ २७ ॥

ओव्या ॥ ८० ॥ श्लोक ५ ॥

॥ इति सप्तविंशतितमोऽध्यायः ॥


पुरुषोत्तम/अधिक मास कथा अन्य अध्याय


अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 1 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 1
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 2 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 2
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 3 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 3
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 4 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 4
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 5 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 5
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 6 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 6
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 7 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 7
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 8 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 8
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 9 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 9
अधिक / पुरुषोत्तम मास अध्याय 10 | Adhik / Purushottam Maas Adhyaya 10

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *